Halloween Costume ideas 2015

बहुवादी समाजात घृणेशी युद्ध; मुस्लिमांवरील हल्ले


विविधतेने नटलेल्या भारतीय समाजाचे चरित्र खरोखरच अद्भूत असे आहे. भारतीय महाविद्वपामध्ये विविध संस्कृती, धर्म, भाषा आणि वंशाचे समूह शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. भक्ती आणि सुफी संत तसेच स्वातंत्र्यता संग्रामामध्ये विविध समुदायांच्या मध्ये असलेल्या एकतेच्या भावनेला बळकटी मिळाली. परंतु, मागच्या काही वर्षांपासून भारताच्या या वैविध्याने नटलेल्या संस्कृती आणि त्यांच्यात असलेल्या सौहार्दपूर्ण आंतरसामुदायिक संबंधांना कमकुवत करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न होत आहेत. 

काही दिवसांपूर्वी मथुरेमध्ये ’श्रीनाथ दोसा’ नावाच्या एका दुकानावर कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांनी त्याचे प्रचंड नुकसान केले. इरफान नावाच्या दुकान मालकाला धमकावले. त्यांना आपत्ती या गोष्टीची होती की एक मुसलमान असून त्याने आपल्या हॉटेलचे नाव श्रीनाथ कसे ठेवले? हल्लेखोरांनी त्याला विकास मार्केटमधील आपली हॉटेल तात्काळ बंद करण्याची सूचना दिली अन्यथा वाईट परिणाम होतील, असे सांगितले. मुस्लिमांसोबत अशा आणि यापेक्षा विभत्स तसेच भयावह घटना होत आहेत. राजस्थानच्या सीकरमध्ये 52 वर्ष वयाच्या एका मुस्लिम र्निशा चालकाला मारहाण करून त्याला जयश्रीरामच्या घोषणा देण्यास विविश केले गेले आणि त्याला असेही सांगण्यात आले की, त्याने तात्काळ भारत सोडून पाकिस्तानला निघून जावे. मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये तस्लीमअली नावाच्या बांगड्या विक्रेत्याला फक्त याचसाठी मारहाण करण्यात आली की तो हिंदूबहूल भागामध्ये बांगड्या विकत होता. एका अन्य घटनेमध्ये एका मुस्लिम ई-र्निशा ड्रायव्हरलाही मारहाण करण्यात आली, मारहाणी दरम्यान त्याची छोटीशी मुलगी एक सारखी रडत होती व दयेची याचना करत होती. अजमेरमध्ये आपल्या दोन मुलांसोबत भीक मागणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करून त्याला पाकिस्तानात जावून भीक मागण्याचे निर्देश देण्यात आले. 

या घटनांपेक्षा वाईट गोष्ट अशी की अशा घटना करणाऱ्या लोकांना आपण केलेल्या कृत्यांची लाज वाटण्यापेक्षा असे करून ते स्वतःवर गर्व करत आहेत. म्हणूनच ते अशा घटनांची पद्धतशीरपणे व्हिडीओ बनवून त्या व्हिडीओला सोशल मीडियावर अपलोड करतात. घृणेच्या या घटना त्या आहेत ज्या उघडकीस आलेल्या आहेत. प्रत्यक्षात नक्कीच या घटना अधिक संख्येने घडलेल्या असतील. विशेष म्हणजे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या मुस्लिमांवर अशा प्रकारचे हल्ले ही आता सामान्यबाबत बणून राहिली आहे. या घटना वेगवेगळ्या स्थानी होत आहेत. घृणा पसरविणारी यंत्रणा रात्रंदिवस विष पसरवत आहेत. आणि शेकडो वर्षांपासून विकसित झालेल्या आंतरसामुदायिक नात्यांवर घातक हल्ले करत आहेत. या हिंसक घटना मागील 20 वर्षांमध्ये प्रचारित जातीय अख्यानाचा परिणाम आहे. हे अख्यान मुस्लिम जातीयवाद्यांनी हिंदूविरूद्ध आणि हिंदू जातीयवाद्यांनी मुस्लिमांविरूद्ध तयार केलेला आहे. फाळणीनंतर भारतातील मुस्लिमांमधील जातीयता अत्यंत कमी झाली होती. या उलट मागील काही दशकांपासून हिंदू जातीयता अत्यंत आक्रमक आणि तीव्र झालेली आहे. मुस्लिमांच्या विषयी अनेक खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून प्रचारित केल्या जात आहेत. असाही दावा करण्यात येत आहे की मुसलमान हे विदेशी आहेत आणि मध्ययुगीन मुस्लिम शासक हृदयविहीन आणि क्रूर होते. काही मुस्लिम शासकांच्या क्रूर कारवायांना वाढवून-चढवून दाखविले जात आहे. मीडियाचा एक मोठा भाग पूर्णपणे मुस्लिमांच्या विरूद्ध पूर्वग्रहाने ग्रसित झालेला आहे. आणि आपल्या संकीर्ण जातीयवादी अजेंड्याला पुढे रेटून सत्ताधारी पक्ष आणि सरकारची हर प्रकारे मदत करत आहेत.

अशा प्रवृत्तींची असंख्य उदाहरणे दिली जाऊ शकतात. यासंबंधीच्या अनावरत दुष्प्रचाराने सामान्य माणसाच्या विचारशक्तीवर कशा प्रकारचा प्रभाव टाकलेला आहे याचे उदाहरण काही दशकांपूर्वी रिलीज झालेली मुगले आझम आणि जोधा अकबर या चित्रपटांविषयी विरोधाभासी जनप्रतिक्रिया होत. तबलिगी जमाअतला कोरोना पसरविण्यासाठी दोषी ठरविणे हा या गोष्टीचा पुरावा आहे की, आपली प्रसारमाध्यमे किती खालच्या स्तरापर्यंत जावू शकतात. असं वाटतंय जणू प्रसारमाध्यमांमधील पत्रकारांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि ते अल्पसंख्यांकांच्या बाबतीत घृणेने भरलेले आहेत.

जातीयतत्व पूर्वी घृणा पसरविण्यासाठी मध्यकालीन इतिहासाचा उपयोग करत होते. आता तर स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासालाही विकृत करून मुस्लिमांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आश्चर्य म्हणजे या जातीय हिंदू संघटनांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये काडीभरही सहभाग नोंदविलेला नव्हता. हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही सांप्रदायिक शक्तींच्या सह्योगाने इंग्रजांनी देशाची फाळणी केली. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंना मुस्लिमांच्या तुष्टीकरण आणि देशाच्या फाळणीसाठी दोषी ठरविले जात आहे. घृणेच्या या किल्ल्याला अधिक मजबूत बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दर 14 ऑगस्टला विभाजन विभिषिका स्मृतीदिवस साजरा करण्याची घोषणा केलेली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आपल्याला त्या लोकांच्या बलिदानाची आठवण ठेवावी लागेल ज्यांनी देशाच्या फाळणीच्या दरम्यान आणि त्यानंतर झालेल्या हिंसेमध्ये जीव गमावला. परंतु, त्यांचा खरा उद्देश काय आहे हे त्यांच्या समर्थकांनी स्पष्ट करून दिले आहे. भाजपाचे अनेक प्रवक्ते वर्तमानपत्र आणि नियतकालिकामध्ये लेख लिहून कलकत्यात झालेल्या रक्तपात आणि हिंदू शरणार्थ्यांना झालेल्या यातनांची आठवण करून देत आहेत. माझे कुटुंब ही फाळणीच्या घटनांचे शिकार बनले होते. परंतु, या ठिकाणी प्रयत्न असा केला जात आहे की, फाळणीसाठी मुस्लिमांनी हिंदूंचा रक्तपात केला, असेच एकंदरित चित्र उभे केले जात आहे. सत्य यापेक्षा वेगळे आणि जटील आहे. फाळणीमध्ये फक्त हिंदू आणि शिखांनीच हिंसा सहन नाही केली तर मुस्लिमांचेही जीव गेले. दोघांचीही भारी हानी झाली. यात त्रासदायक घटनांच्या शृंखलेमध्ये अख्खे उपमहाद्विप रक्तरंजित झाले होते. जे लोक मारले गेले, जखमी झाले किंवा ज्यांची संपत्ती आणि उपजिविकेची साधणं दंगलीमध्ये नष्ट झाली त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान दोघे सामील होते.

जेव्हा प्रसिद्ध अँकर करन थापरने हे तथ्य रेखांकित करणारा एक लेख एशियन एज या आघाडीच्या वर्तमानपत्रामध्ये लिहिला तेव्हा तो प्रकाशित करण्यात आला नाही. सत्य हिंदी नावाच्या न्यूज पोर्टलच्या अँकर निलू व्यास यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये करन थापरने सांगितले की, त्यांनी त्यांच्या लेखात जम्मूमध्ये मुस्लिमांवर झालेल्या खुल्या रक्तपातावर प्रकाश टाकला होता, जो की कुठल्याही दृष्टीने हिंदूंविरूद्ध झालेल्या हिंसेपेक्षा कमी भयानक नव्हता.

ज्या लोकांचा उद्देश घृणा पसरविणे आहे ते विभाजनस्मृतीदिवसाचे आयोजन फक्त यासाठी करू पाहत आहेत की, यामुळे त्यांना मुस्लिमांच्या विरूद्ध अधिक घृणा पसरविता येईल. फाळणीविषयी जी पाठ्यपुस्तके आणि अन्य साहित्य उपलब्ध आहे त्यात जम्मूमध्ये झालेल्या मुस्लिमविरोधी रक्तरंजित दंगलीची कुठलीच चर्चा नाही. त्या दंगलींना सरकारचे पूर्ण समर्थन आणि सह्योग प्राप्त होते आणि ते घडवून आणण्यासाठी एका जातीयवादी संघटनेने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. भाजपचे प्रवक्ते आणि नेते आता हे म्हणत आहेत की, काँग्रेसने मुस्लिमांचे तुष्टीकरण केलं याचा परिणाम असा झाला की देशाची फाळणी झाली. ते हे विसरून जात आहेत की, ज्या सरदार पटेलांना ते राजकीय कारणामुळे आपला नायक सिद्ध करण्याच्या अभियानात व्यग्र आहेत तेच त्यावेळेस भारताचे गृहमंत्री होते. जिथपर्यंत मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा प्रश्न आहे ह्या जातीयवादी संघटना 19 व्या शतकाच्या अंतापासूनच हे गाणे गात आहेत. या लोकांचे म्हणणे तर इथपर्यंत होते की, मुस्लिमांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यत्व देणे हे सुद्धा त्यांचे तुष्टीकरणच होते. तेव्हापासून आतापर्यंत हे लोक अनावरतपणे हा दावा करत आहेत की, काँग्रेसने मुस्लिमांचे तुष्टीकरण केले आहे. 

आपल्याला आजही संकीर्ण विघटनकारी विचारांपासून वर उठून विचार करण्याची गरज आहे. आपल्याला या गोष्टीची गरज आहे की, आपण आपल्या संस्कृतीच्या एकसंघ चरित्राला अबाधित ठेवावे. आपल्याला हिंसा आणि घृणेच्या या ज्वालामुखीला नियंत्रित करण्याची गरज आहे. 

- राम पुनियानी

(इंग्रजीतून हिंदीत भाषांतर अमरिश हरदेनिया यांनी केले तर हिंदीतून मराठी भाषांतर एम.आय.शेख, बशीर यांनी केले.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget