Halloween Costume ideas 2015

प्रचलित व्यवस्था लैंगिक गुन्हे रोखू शकत नाही; महिलांनी स्वतःची सुरक्षा स्वतः करावी


तेरा लिबास बुलाता है जिस्म नोचने को

तू बेहया होकर कहे इब्ने आदम खराब है

सद्य परिस्थितीमध्ये एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की, आपले पोलीस, कोर्ट, कायदे, वकील, न्यायाधीश हे सर्व मिळून महिलांना लैंगिक हल्ल्यांपासून सुरक्षा प्रदान करू शकत नाहीत. प्रचलित गुन्हे न्याय व्यवस्था (क्रिमिनल जस्टीस सिस्टम) महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी का ठरले आहे? ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत महिला कोठेच सुरक्षित का नाहीत? आपल्या देशाला महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देश म्हणून का गणल्या जात आहे? एब्रो इलिनिक्स नावाची महिला तरूण स्विस्नवॅश खेळाडू चेन्नईला झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये का सामील झाली नाही? देशाची प्रचंड बदनामी होत असतांनासुद्धा लैंगिक गुन्ह्यांमध्ये जात आणि धर्म का शोधली जात आहे? कुठलाच दिवस रिकामा का जात नाही ज्या दिवशी महिलांवर लैंगिक हल्ले होत नाहीत. बालिकेपासून बुजूर्ग महिलांपर्यंत कोणीच का सुरक्षित नाहीत?  

वेशाव्यवसाय प्रत्येक शहरात सुरू आहे, व्याभिचार करण्यास मोकळीक आहे, हे सत्कृत्य करण्यासाठी प्रत्येक शहरात माफक दरात लॉजेस उपलब्ध आहेत, त्यांचा भरपूर उपयोग केला जात आहे, गर्भनिरोधाचे उपाय हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहेत, ते प्राप्त करण्यासाठी औषधी दुकानावर जाऊन लाजण्याची गरज नाही ही बाब मनावर बिंबविण्यासाठी जाहिरातींचा भडीमार सुरू आहे, एवढे असतांना एवढे बलात्कार का होत आहेत? कल्पना करा या सुविधा नसत्या तर? 

असो ! प्रश्न हा आहे की, अशा परिस्थितीत महिला व मुलींनी आपली सुरक्षा कशी करावी? यासाठीचा कुठला मार्ग उपलब्ध आहे का? हाच या आठवड्याचा चर्चेचा विषय आहे.

लैंगिक हल्ल्यांची पार्श्वभूमी

 वक्त करता है परवरिश बरसों, हादसे एकदम नहीं होते. 

फार कमी गुन्हे असे असतात जे अचानक घडतात.  बाकी सर्व गुन्हे काळाच्या उदरात जन्म घेतात, अनेक वर्ष तेथे त्यांचे संगोपन होते व अचानक एका दिवशी ते घडतात. लैंगिक गुन्ह्यांच्या बाबतीत तर ही गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवते की, असे गुन्हे करणारे बहुतेक लोक सामान्य असतात, सभ्य समजले जातात पण त्यांच्या डोक्यामध्ये लैंगिकतेचे विष इतक्या पद्धतशीरपणे कालवले जाते की शेवटी एका कमकुवत क्षणी त्यांचा तोल सुटतो व ते लैंगिक हल्ले करण्यास प्रवृत्त होतात. जेव्हा भानावर येतात तेव्हा आपण केलेल्या कृत्याचे गांभीर्य त्यांच्या लक्षात येते आणि मग गडबडीमध्ये आपल्या कृत्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी पीडितेचा खून करण्याशिवाय त्यांच्यासमोर दूसरा मार्ग नसतो. म्हणून बलात्काराच्या बहुतेक घटनानंतर पीडितेची हत्या होत असल्याचे आपल्या लक्षात येईल. 

लैंगिक उत्तेजना वाढविणारे वातावरण

असे म्हटले जाते की, लैंगिकता दोन मांड्यांच्या मध्ये नसून दोन कानांच्या (मेंदू) मध्ये असते. अगोदर लैंगिक विचार मेंदूमध्ये उठतात व नंतर पुढची सारी प्रक्रिया घडते. याचाच दूसरा अर्थ असा की मेंदू हा लैंगिकतेचा केंद्रबिंदू आहे. त्यावर जर माणसांचे नियंत्रण असेल तर माणसं अवाजवीपणे लैंगिकरित्या सक्रीय होणार नाही आणि जर का त्यावर नियंत्रण नसेल तर माणसं सैरभैर झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि लैंगिक गुन्हे केल्याशिवाय राहणार नाही. अनेकवेळा माणसं लैंगिकतेच्या इतक्या आहारी जातात की ते कधी विकृतीच्या स्तरावर पोहोचलेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाही आणि आपली विकृत लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी ते मग कुठल्याही थराला जातात. स्त्री असो का पुरूष अलिकडे लैंगिक विकृतीकडे झुकत असल्याचे दृश्य अनेक घटनांमधून दिसून येत आहे. अशा विकृतीतून रक्ताची पवित्र नाती सुद्धा कलंकित होताना दिसत आहेत. पूर्वीसुद्धा असे प्रकार घडायचे परंतु ते अपवाद असायचे. आता अलिकडे अशा गुन्ह्यांची वारंवारिता वाढलेली दिसून येते. याचे प्राथमिक कारण भांडवलशाही लोकशाही पद्धत होय. भांडवलदारांच्या हितासाठी जाणून बुजून तयार केल्या गेलेल्या लैंगिक भावना चाळवणाऱ्या मालिका तयार करण्यासाठी इतर तर सोडा राज कुंद्रा आणि एकता कपूर सारखी अनेक सभ्य मंडळी सुद्धा पुढाकार घेताना दिसून येत आहेत. ’सेक्स बिकता है’ या उक्तीला बांधिल असल्याने महिलांच्या सुरक्षेला धोक्यात घालून हे लोक फक्त अश्लिलता पसरविण्याच्या उद्योगापासून बेशरमपणे नफा कमाविण्यात व्यस्त आहेत. ’गंदी बात’ सारखे असभ्य शिर्षक आणि त्यासोबत उत्तान्न अशी थंबनेल असलेल्या व्हिडीओ्निलप्सच्या अनेक चित्रफिती यूट्यूबर उपलब्ध आहेत. कोविडच्या प्रकोपामुळे चित्रपटगृहे बंद पडल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म नावाचे एक नवीन मंच उपलब्ध झालेले आहे जे की सेन्सॉर बोर्डाच्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे ते अश्लिलतेचे नवनवीन शिखरं सर करतांना दिसून येत आहे. पैसे कमाविण्यासाठी रोज तयार होत असलेल्या लैंगिक भावनांना विकृतीकडे नेणाऱ्या मालिका,्निलप्स ह्या इतक्या सहज उपलब्ध आहेत की, जबरदस्त मनोनिग्रह असल्याखेरीज त्यांच्या संमोहनापासून पुरूषच काय स्त्रीयासुद्धा स्वतःला वाचवू शकत नाहीत. लैंगिक भावना भडकाविणाऱ्या व माणसाला अस्थिर करणाऱ्या अशा या खुल्या वातावरणात आपल्याला व आपल्या मेंदूला कसे सुरक्षित ठेवावे? हाच एक कळीचा मुद्दा आहे.  हा इतका गंभीर मुद्दा आहे की, याच्या दुष्परिणामापासून कोणीही वाचणे शक्य नाही. सकृतदर्शनी दीनदार दिसत असणारे अनेक लोकसुद्धा या अश्लिल्निलप्सपासून अलिप्त राहण्यासाठी स्वतःशी संघर्ष करतांना दिसतात. लैंगिक मालिका आणि्निलप्सचे प्रसारण रोखण्याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे ते सरकारच महसुलाच्या क्षुद्र लालसेपोटी त्यांना मोकळीक देत असतांना शेवटी, ’’अपनी मदद आप’’ या उक्तीप्रमाणे सभ्य महिला आणि पुरूषांना स्वतःच काहीतरी उपाय शोधावा लागेल. त्यासाठी जगात फक्त एकच उपाय उपलब्ध आहे तो आहे इस्लाम. इतर व्यवस्थांनी या असभ्यपणापुढे कधीच गुडघे टेकलेले आहेत. जोपर्यंत जाणून बुजून इस्लामी जीवनशैलीचा अंगीकार लोक करणार नाहीत तोपर्यंत लैंगिकतेच्या या एल्गारला थोपविता येणे शक्य नाही. 

लैंगिकता रोखण्याचे इस्लामी उपाय

हजरत अबु हुरैराह रजि. यांच्या संदर्भाने एक अशी हदीस उपलब्ध आहे की, जिची मनापासून अंमलबजावणी केली तर माणसाच्या अंतर्मनामध्ये एवढी दैवी ऊर्जा निर्माण होते की तो स्वतःच्या लैंगिक भावनांवर सहज विजय प्राप्त करू शकतो. ती हदीस खालीलप्रमाणे -

’’आदमच्या पुत्राच्या (मानवाच्या) संबंधाने व्याभिचारमध्ये त्याचा किती सहभाग असेल हे लिहून ठेवलेले आहे, निश्चितपणे तो प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. बस्स ! दोन्ही डोळ्यांचा व्याभिचार (लैंगिक भावना चाळविणारी दृश्य पाहणे), दोन्ही कानांचा व्याभिचार (लैंगिक भावना चाळविणाऱ्या गोष्टी ऐकणे), जिभेचा व्याभिचार (लैंगिक भावना चाळविणाऱ्या गोष्टी बोलणे), दोन्ही हातांचा व्याभिचार (लैंगिक भावना चाळविणाऱ्या कृती करण्यासाठी हाताचा उपयोग करणे), दोन्ही पायांचा व्याभिचार (लैंगिक भावना चाळविणाऱ्या गोष्टींकडे चालत जाणे) आणि मनाचा व्याभिचार (अश्लिल भावना चाळविणाऱ्या गोष्टी करण्याची मनात इच्छा बाळगणे) या सर्व गोष्टी घडल्यानंतर शर्मगाह (लैंगिक अवयव) वरील सर्व गोष्टींवर प्रत्यक्ष कृतीची मोहर उमटवितात.’’ (संदर्भ : सनन अबु दाऊद हदीस क्र. 2512).

आपल्यावर हे प्रेषित सल्ल. चे किती मोठे उपकार आहेत की त्यांनी लैंगिकतेचे विश्लेषण इतक्या सहजपणे करून दिलेले आहे की, ज्याला खरोखरच आपली लैंगिक इच्छा नियंत्रणात ठेवायची असेल तर तो वर हदीसमध्ये दिलेल्या टप्प्यांपैकी पहिला टप्पा मनात निर्माण होताच त्यावर तो नियंत्रण मिळू शकतो, मग सहजच पुढचे टप्पे आपसुकच निर्माण होत नाहीत व लैंगिक इच्छा अनियंत्रित होऊच शकत नाहीत. सुबहानल्लाह ! (अल्लाह पवित्र आहे). 

आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या लैंगिक भावनावर टप्प्याटप्प्याने नियंत्रण करा असे म्हणणे फार सोपे आहे परंतु ते प्रत्यक्षात करणे तेवढेच कठीण आहे. जेव्हा माणूस इस्लामला अपेक्षित असलेले पवित्र वातावरण स्वतःमध्ये, घरात आणि समाजात निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार नाही तोपर्यंत हे नियंत्रित होऊ शकणार नाही. मुस्लिमांचे हे प्राथमिक कर्तव्य आहे की, त्यांनी सर्वप्रथम आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवावे मग नियमित फॅमिली इज्तेमाच्या माध्यमातून घरातील पावित्र्य अबाधित ठेवावे. त्यासाठी इस्लामी इबादतींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. 

1. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’हे पैगंबर (स.), पठन करा या ग्रंथाचे जो तुमच्याकडे दिव्यबोधद्वारे पाठविला गेला आहे आणि नमाज कायम करा, निश्चितच नमाज, अश्लील व अपकृत्यांपासून रोखते आणि अल्लाहचे स्मरण याहूनही मोठी गोष्ट आहे. अल्लाह जाणतो तुम्ही लोक जे काही करता.’’  ( सुरे अलअनकबुत  आयत क्र. 45)

स्पष्ट आहे नियमित नमाज अदा केल्याने माणसांमध्ये इतके पावित्र्य निर्माण होते की, फक्त लैंगिक भावनावरच नियंत्रण मिळत नाही तर प्रत्येक वाईट कृत्यापासून लांब राहण्याची दैवी शक्ती त्याच्या अंतरमनात निर्माण होते. आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या नमाजी व्यक्तींच्या जीवनाचे काळजीपूर्वक निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की हे लोक बेकायदेशीरच काय तर अनैतिक गोष्टींपासूनसुद्धा मैलोगणिक दूर असतात. हे असंभव भासणारे काम त्यांना कसे शक्य होते? या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात आहे ते म्हणजे ’नमाज’.  नमाज अश्लिलतेपासून वाचविणारी ढाल आहे. एकदा का माणूस अश्लिलतेपासून लांब गेला तर लैंगिक विकृती पर्यंतचा त्याचा प्रवास खुंटतो आणि त्याच्यापासून सर्व महिला आपसुकच सुरक्षित होऊन जातात. 

2.कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’व्यभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग.’’  (सुरे बनी इस्राईल आयत नं.32)

एका वाक्याच्या या आयातीमध्ये इतकी ऊर्जा ठासून भरलेली आहे की, कुरआन हा अल्लाहचा कलाम (ग्रंथ) आहे असा ज्याचा विश्वास असेल त्याला ही एक आयतच व्याभिचार आणि लैंगिक अत्याचार करण्यापासून रोखण्यासाठी पुरेशी आहे. 

लैंगिकतेच्या नियंत्रणासाठी दूसरी एक युक्ती कुरआन पुरूषांना सुचवितो ती खालीलप्रमाणे-

3. ’’हे पैगंबर (स.), श्रद्धावंत पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी. आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे, ही त्यांच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. जे काही ते करतात अल्लाह त्याची खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलनूर : आयत क्र. 30) 

मुळात लैंगिक भावना चाळविल्या गेल्या की त्या अनियंत्रित होतात आणि माणूस सावज शोधू लागतो. त्याकामी सर्वप्रथम तो नजरेने त्याच्या टप्प्यात येणाऱ्या महिलांची चाचपणी करायला सुरूवात करतो. यावर नियंत्रण मिळविण्याची युक्ती प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी खालीलप्रमाणे सांगितलेली आहे. 

4. ’’अनोळखी महिलांवर अचानक नजर पडल्यास तुम्ही आपल्या नजरा दूसरीकडे वळवा.’’ (अबु दाऊद आयत क्र. 1298) 

कारण कामुक नजरेने स्त्रीकडे पाहणे ही व्याभिचार / अत्याचाराची पहिली पायरी आहे. प्रेषित सल्ल. यांच्या वरील निर्देशाचे पालन केल्यास त्या पायरीपुढे पोहोचण्याची शक्यताच शुन्यवत होऊन जाते. या संदर्भात तर माझे म्हणणे असे की, परस्त्रीवर नजर पडताच आपल्या मनात जर वाईट विचार आले तर माणसाने स्वतःला ही सवय लावून घ्यावी की, तात्काळ नजर बाजूला करावी. त्यासाठी मी एक असे मेकॅनिझम सुचवू इच्छितो की, नजर पडताच तात्काळ माणसाने आपल्या मनामध्ये विचार आणावा की, जर मला ईश्वरांनी हे जे दोन डोळे दिलेले आहेत ते दिले नसते तर मी या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू शकलो असतो काय? किंवा मनात ताजे उदाहरण असे आणावे की, समजा मला ब्लॅक फंगस होऊन माझे दोन्ही डोळे काढावे लागले असते तर मी हिला अशा वाईट नजरेने पाहू शकलो असतो काय? नक्कीच असे आपल्यासोबत घडले असते तर आपण ईश्वराचे काहीच वाईट करू शकलो नसतो. आज जगात कित्येक लोक दृष्टीहीन आहेत आणि कित्येक लोकांचे डोळे फंगसमुळे काढले गेलेले आहेत. त्यांनी ईश्वराचे काय वाकडे केले तर मी काय वाकडे करू शकलो असतो. यातून मनामध्ये ईश्वराप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण होईल व समोरील स्त्री वरून वाईट नजर हटविण्यामध्ये आपल्याला अंतर्गत मदत मिळेल. 

महिलांच्या संबंधानेही विस्तृत अशी आचारसंहिता कुरआनमध्ये दिलेली आहे. एका ठिकाणी म्हटलेले आहे की,  

5. ’’आणि हे पैगंबर (स.), श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आणि आपला साजशृंगार दर्शवू नये त्याव्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये परंतु या लोकांसमोर, पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले आपल्या मेलमिलाफाच्या स्त्रिया, आपल्या दासी, गुलाम, ते हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसतील आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसतील त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे त्याचे ज्ञान लोकांना होईल. हे श्रद्धावंतांनो, तुम्ही सर्वजण मिळून अल्लाहजवळ पश्चात्ताप  व्यक्त  करा,  अपेक्षा  आहे  की  सफल  व्हाल.  (सुरे अन्नूर: आयत नं. 31)’’

स्त्री आणि पुरूष दोघांनाही कुरआन आणि हदीसमध्ये एक निश्चित अशी आचारसंहिता दिलेली आहे व अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की दोघेही त्याची अंमलबजावणी करतील. असे न केल्यास स्त्री- पुरूषांमध्ये अनावश्यक जवळीक निर्माण होऊन व्याभिचार आणि बलात्काराचे मार्ग हमखासपणे खुलतात. तुम्ही कितीही तोंडी उपदेश करा, स्त्री-पुरूषांमधील लैंगिक आकर्षण इतके जबरदस्त असते की त्या ठिकाणी कुठलेही उपदेश कामाला येत नाहीत. त्यासाठी निश्चित अशा आचारसंहितेचे दोहोंनोही पालन करणे आवश्यक असते व त्यासाठी योग्य असे वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी सरकार व जनता दोघांची असते. परंतु आपण पाहतो की भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेला अशा आचारसंहितेमुळे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागते म्हणून जगाच्या पाठीवर कुठलेही सरकार अशी आचारसंहिता लागू करण्याचे धाडस करत नाही. परिणामी महिला आणि मुली लिंगपिसाटांच्या लैंगिक हल्ल्यांना बळी पडतात. शरियतने आचारसंहितेची अंमलबजावणी न केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. 

विशेषतः आपल्या देशात ना आचारसंहिता आहे ना कठोर शरई शिक्षांची तरतूद आहे. अशा परिस्थितीमध्ये एकच मार्ग महिलांसाठी उपलब्ध आहे तो म्हणजे लिंगपिसाट लोकांकडून स्वतःचे संरक्षण स्वतः करणे. लैंगिकदृष्टया विकृत आणि लिंगपिसाट लोक सामान्य लोकांसारखेच दिसतात, त्यांच्या काही कपाळावर लिहिलेले नसते की हे लिंगपिसाट आहेत, म्हणून सर्व पर-पुरूषांपासून महिलांनी सावध राहून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांविषयीच्या ज्या आचारसंहितेचा वर थोडक्यात उल्लेख केलेला आहे त्याचे पालन करून महिलांनी स्वतः कुरआन आणि हदीसचा स्वतंत्र अभ्यास करून महिलांच्या सुरक्षिततेसाठी जी आचारसंहिता दिलेली आहे तिचा विस्तृतपणे अभ्यास करावा आणि तिचे काटेकोरपणे पालन करावे, असे झाल्यास ज्या महिला त्याचे पालन करतील त्या लैंगिक हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील, यावर माझा तितकाच विश्वास आहे जितका सूर्यप्रकाश देतो या गोष्टीवर आहे. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ऐ अल्लाह ! आमच्या प्रिय देशातील सर्व बंधू-भगिनींना, स्त्री-पुरूषांच्या आचार संहितेचे पालन करून देशात एक पवित्र वातावरण निर्माण करण्याची समज आणि शक्ती दे.’’ आमीन.

- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget