नागपूर
अभियांत्रिकी प्रवेशाच्या जेईई मेन्स परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने नागपुरातील दोन कोचिंग क्लासवर धाडी घातल्या. त्यात त्यांनी कागदपत्रे जप्त केली आहेत. सक्करदरा भागातील आर. के. कोचिंग सेंटरचाही त्यात समावेश आहे. दिल्ली आणि स्थानिक सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली. यामुळे नागपूरच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने दिल्ली, एनसीआर, इंदूर, पुणे, जमशेदपूर आणि बंगरुळुसह १९ ठिकाणी छापे घातले होते. त्यानंतर याचे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचले असल्याचे सीबीआयच्या चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यानुसार सीबीआयने नागपूरमधील दोन कोचिंग क्लासवर धडक कारवाई केली. त्यात त्यांनी काही कागदपत्रे जप्त केली आहेत. जेईई मेन्स परिक्षेच्या चौथ्या सत्रात २६, २७ आणि ३१ ऑगस्ट तसेच १ व २ सप्टेंबरला परीक्षा घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आढळले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने अनेक ठिकाणी धाडी घातल्या होत्या. यात काही जणांच्या केलेल्या चौकशीनंतर त्याचे धागेदोरे नागपुरातील कोचिंग क्लासमध्येही असल्याचे लक्षात आले. त्यानुसार सोमवारी सीबीआयने नागपुरात धाडी घातल्या. त्यात त्यांनी काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
Post a Comment