(८) त्यांचे शेवटचे ठिकाण नरक असेल त्या दुष्टतेपायी ज्यांची कमाई ते (त्यांच्या या चुकीच्या श्रद्धेमुळे व चुकीच्या आचरणामुळे) करीत राहिले.१२
(९) आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कृत्ये करीत राहिले त्यांना त्यांचा पालनकर्ता त्यांच्या श्रद्धेमुळे सरळमार्गी बनवील, ऐश्वर्यसंपन्न स्वर्गांमध्ये, त्यांच्या खालून कालवे वाहतील.१३
(१०) तेथे त्यांची उद्घोषणा अशी असेल की, ‘‘पवित्र आहेस तू हे परमेश्वरा!’’ त्यांची प्रार्थना अशी असेल, ‘‘शांती व सुरक्षितता असो’’ आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा शेवट असा असेल, ‘‘सर्व स्तुती सर्व जगांच्या पालनकत्र्या अल्लाहसाठीच आहे.’’१४
(११) जर एखादे वेळी१५ अल्लाहने लोकांशी वाईट व्यवहार करण्यात तितकीच घाई केली असती जितकी ते लोक या जगातील भले मागण्यासाठी घाई करतात तर त्यांची कार्यमुदत केव्हाच संपुष्टात आणली गेली असती. (परंतु ही आमची रीत नव्हे) म्हणून आम्ही त्या लोकांना ज्यांना आम्हाला भेटण्याची अपेक्षा नाही त्यांच्या शिरजोरीतच भटकत राहण्याची सूट देत असतो.
(१२) माणसाची स्थिती अशी आहे की जेव्हा त्याच्यावर एखादा बिकट प्रसंग ओढवतो तेव्हा उभा असता, - बसता व पहुडला असता आमचा धावा करतो, पण जेव्हा आम्ही त्याचे संकट निवारण करतो तेव्हा अशाप्रकारे तो चालता होतो जणूकाही त्याने कधीही त्याच्या कोणत्याही बिकट प्रसंगी आमचा धावा केलाच नव्हता. अशाप्रकारे मर्यादा ओलांडणाऱ्यासाठी त्यांची कृत्ये शोभिवंत बनविली गेली आहेत.
(१३) लोकहो! तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांना१६ आम्ही नष्ट करून टाकले१७ जेव्हा त्यांनी अन्यायाचे वर्तन अवलंबिले आणि त्यांचे पैगंबर त्यांच्यापाशी उघडउघड संकेत घेऊन आले आणि त्यांनी श्रद्धा ठेवलीच नाही. अशाप्रकारे आम्ही गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याचा बदला देत असतो.
(१४) आता त्यांच्यानंतर आम्ही तुम्हाला भूतलावर त्यांची जागा दिली आहे जेणेकरून पाहावे, तुम्ही कशी कृत्ये करता.१८
१२) येथे पुन्हा दाव्यासह त्याचा पुरावा संकेतमध्ये स्पष्ट केला आहे. दावा आहे की परलोकावरील विश्वासाला नाकारण्याचा अनिवार्य आणि निश्चित परिणाम नरक आहे. यासाठी पुरावा देण्यात आला आहे की परलोक विश्वासाला नाकारणारा आणि यावर आपले एखादे विचार न ठेवणारा दुष्टतेच्या आहारी जातो. या दुराचारांची शिक्षा नरकाशिवाय दुसरी असत नाही. परलोक विश्वासासाठी हा एक आणखी पुरावा आहे. पहिले तीन पुरावे बौद्धिक स्वरुपाचे आहेत आणि ते अनुभव सिद्ध पुरावे आहेत. येथे याचा फक्त संकेत दिला आहे. परंतु कुरआनमध्ये वेगवेगळया ठिकाणी आम्हाला याचे विस्तृत विवरण सापडते. या पुराव्यांचा सार म्हणजे माणसाचे वैयक्तिक जीवनव्यवहार आणि सामाजिक जीवनव्यवहार तोपर्यंत दुरुस्त होत नाही जोपर्यंत त्याच्या मनात परलोक चेतना आणि विश्वास घर करून राहात नाही. तसेच हा परलोकध्यास मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनव्यवहारात दडलेला असतो की आम्हाला अल्लाहसमोर आपापल्या कर्मांचा हिशेब द्यावा लागणार आहे. आता हे विचार करण्यासारखे आहे की शेवटी हे असे का आहे? काय कारण आहे की परलोकध्यास कमजोर झाल्याने किंवा नष्ट झाल्याने मनुष्य जीवनव्यवहराची व चारित्र्याची गाडी दुष्टतेकडे चालू लागते. जर परलोक विश्वास वास्तविकतेनुसार नसता आणि त्याचे नाकारणे सत्याविरुद्ध असते तर हे असंभव होते की परलोक मान्य करणे अथवा अमान्य करणे एकसारखे समोर आले असते. एकाच गोष्टीचे बरोबर परिणाम समोर येणे आणि त्याच्या नसल्याने गोष्टी चुकीच्या ठरणे याचा भक्कम पुरावा आहे की ती गोष्ट स्वत: एक सत्य गोष्ट आहे. (असे आढळून येते की अल्लाहशी द्रोह करणारे आणि परलोक नाकारणारेसुद्धा सत्चरित्र असतात आणि सदाचारी असतात, परंतु ही आपत्ती किंवा विचार वरवरचा आहे) अल्लाह आणि परलोकाला नाकारणारे जगात काही सदाचार आणि काही दुराचारापासून दूर राहणारे आढळतात. परंतु त्यांचा हा सदाचार आणि धार्मिकता त्यांच्या जीवनाच्या भौतिकवादी दृष्टिकोनाचा परिणाम नाही तर त्या धर्मप्रभावाचे फळ आहे जे नकळत त्यांच्या मनात घर करून आहेत. त्यांचे नैतिक संचित धर्मापासून चोरलेले आहे आणि त्यास हा मनुष्य अनुचित प्रकारे अधार्मिकतेत प्रयोगात आणत आहे. त्यामुळे आपल्या अधार्मिक आणि भौतिकवादाच्या संचितात याच्या स्त्रोताला दर्शवू शकत नाही.
१३) या वाक्याचा विषयक्रम गंभीरतापूर्ण लक्ष केंद्रित करू इच्छितो.
१) या लोकांना परलोक जीवनात स्वर्गप्राप्ती का होईल? कारण हे जगातील जीवनात सरळमार्गावर चालत राहिले. प्रत्येक कार्यात त्यांनी सत्यनीतीचा स्वीकार केला आणि असत्य रीतींचा त्याग केला.
२) प्रत्येक वेळी सत्य आणि असत्य, चूक किंवा बरोबर हे अंतर त्यांना कसे कळले? मग त्या अंतराप्रमाणे सत्यावर (सरळमार्ग) चालण्यासाठी आणि वाममार्गापासून दूर राहण्यासाठीची शक्ती त्यांना कोठून मिळाली? त्यांच्या पालनकर्ता स्वामीकडून कारण तोच ज्ञानात्मक मार्गदर्शन आणि व्यावहारिक सन्मतिस्त्रोत आहे. त्यांचा पालनकर्ता त्यांना हे मार्गदर्शन आणि ही सन्मती का देतो? तर त्यांच्या ईमान धारण करण्यामुळे!
हे परिणाम जे वर्णन झालेत कोणत्या ईमानचे परिणाम आहेत? त्या ईमानचे नाहीत जे फक्त मानण्याच्या अर्थापुरतेच असते. परंतु त्या ईमानाच्या परिणामस्वरुप मनात घर करून राहाते आणि आचरणाचा आत्मा बनतो. त्याच्या शक्तीमुळे चारित्र्य आणि व्यवहारात भलाई (चांगुलपणा) प्रकट होतो.
१४) येथे एका सूक्ष्म शैलीत हे दाखविले गेले की समृद्धशाली स्वर्गात प्रवेश केल्यानंतर हे लोक तेथील सुख वैभवाच्या वस्तूंवर तुटून पडणार नाहीत. स्वर्गाचे नाव ऐकताच काहींच्या मनात आपल्या वक्र बुद्धीमुळे हा विचार येतो. परंतु सदाचारी ईमानधारक जगात उच्च् विचार आणि चारित्र्यशीलतेने आपल्या भावनांना सावरून तसेच आपल्या चरित्राला पवित्र बनवून एक श्रेष्ठतम व्यक्तित्वाची उभारणी करतात असेच लोक जगाच्या वातावरणाशी भिन्न स्वर्गाच्या पवित्र वातावरणात आणखीन श्रेष्ठतम बनतील. जगातील त्यांचे सद्गुण स्वर्गात त्यांच्या चरित्रात पूर्णत्वाने दिसून येतील. त्यांचे सर्वप्रिय कार्य म्हणजे अल्लाहचे पावित्र्यगान असेल ज्याचा त्यांना जगात ध्यास होता. आपल्या समाजातील एक दुसऱ्याचे कल्याण करण्याची भावना कार्यरत होती ज्यास त्यांनी जगात आपल्या सामाजिक जीवनाचा उद्देश बनविला होता.
१५) वरील आरंभीच्या वाक्यानंतर आता उपदेश आणि समजून सांगण्यासाठीचे व्याख्यान सुरु होत आहे. या व्याख्यानाला वाचण्याअगोदर याच्या पार्श्वभूमीच्या दोन गोष्टींना जाणून घेणे आवश्यक आहे.
(१) या व्याख्यानाअगोदर काही दिवसांपूर्वी तो भीषण दुष्काळ समाप्त् झाला होता ज्यामुळे मक्कानिवासी अत्यंत विचलीत झाले होते. या दुष्काळात कुरैशच्या गर्विष्टपणाने अकडलेली मान अगदीच झुकून गेली होती. प्रार्थना करीत होते आणि रडत होते. तसेच अनेकेश्वरत्वात आणि मूर्तीपूजेत लक्षणीय घट झाली होती. एक अल्लाहकडे हे कुरैश आपले डोळे लाऊन होते. ही वेळ येऊन ठेपली की अबू सुफियान याने पैगंबर मुहम्मद (स.) यांना विनंती केली की, आपण अल्लाहशी प्रार्थना करावी की हे संकट टळावे. परंतु जेव्हा दुष्काळ समाप्त् झाला आणि पाऊस पडू लागला, सुख समृद्धीचा काळ पुन्हा आला तेव्हा जी मने अल्लाहकडे लागलेली होती ती पुन्हा मूर्तीपूजेकडे आणि विद्रोह व दुराचाराकडे वळू लागली.
दुसरे म्हणजे पैगंबर मुहम्मद (स.) या लोकांना सत्याला नाकारण्याच्या शिक्षेने सावधान करीत होते तेव्हा ते म्हणत की तुम्ही अल्लाहचा ज्या कोप पासून आम्हाला धमकावित आहात तो कोप का होत नाही? त्याच्या येण्यात उशीर का होत आहे?
यावरच सांगितले जात आहे की अल्लाह लोकांवर दया व कृपा करण्यात जेवढे लवकर करतो, त्यांना शिक्षा देण्यात व पापकृत्यावर त्यांची पकड करण्यात तेवढी घाई करीत नाही. तुम्हाला वाटते की ज्याप्रकारे तुमची प्रार्थना ऐकून त्याने दुष्काळ लवकर दूर केला त्याचप्रमाणे तुमचे आव्हान ऐकून व उदंडता पाहून अल्लाह तुमच्यावर शिघ्र कोप होईल. परंतु अल्लाहची ही पद्धत नाही. लोकांनी कितीही जास्त उदंडता कृत्ये करोत, अल्लाह त्यांची पकड करण्यापूर्वी त्यांना सुधरण्याची संधी देत असतो. जेव्हा सवलत देण्यात अति होते तेव्हा कर्माच्या बदल्याचा नियम लागू केला जातो.
१६) मूळ अरबी शब्द `कर्न' आहे. म्हणजे एका युगातील लोक, परंतु कुरआनमध्ये ज्याप्रकारे वेगवेगळया प्रसंगाने या शब्दाचा प्रयोग झाला आहे, त्यावरून असे वाटते की `कर्न' म्हणजे ते राष्ट्र जे आपल्या काळात पूर्ण विकसित होते आणि त्याने काही किंवा पूर्णत: जगाचे नेतृत्व केले असेल. अशा राष्ट्राचा विनाश अनिवार्यपणे अशा अर्थाने नाही की त्याच्या पूर्ण वंशाला नष्ट केले जावे. परंतु त्या राष्ट्राचा विकास आणि नेतृत्वाच्या पदावरून खाली येणे त्यांच्या संस्कृती व सभ्यतेचे नष्ट होणे, त्याची ओळख नष्ट होणे तसेच त्याच्या वंशाचे तुकडे तुकडे होऊन दुसऱ्या वंशात सामील होणे हे सर्व विनाशाचेच रूप आहेत.
१७) `अत्याचार' शब्द येथे सीमित अर्थाने नाही. तर तो त्या सर्व पापी कृत्यांचा परिपाक आहे ज्यांना मनुष्य आज्ञाधारकतेच्या सीमेपलीकडे जाऊन करतो. (तपशीलासाठी पाहा सूरह २, टीप ४९)
१८) येथे संबोधन अरबांशी आहे. त्यांना सांगितले जात आहे की पूर्वीच्या राष्ट्रांना आणि वंशांना त्यांच्या काळात कार्य करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु त्यांनी (आपल्या पैगंबरांचे ऐकले नाही आणि अत्याचार व विद्रोहाची नीती स्वीकारली.) यामुळे आमच्या परीक्षेत विफल ठरले आणि मैदानातून हटविण्यात आले. आता हे अरबांनो, तुमची वेळ आली आहे. जर तुमची गत त्यांच्याप्रमाणे होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर या संधीचा सदुपयोग करा. मागील राष्ट्रांच्या इतिहासापासून बोध घ्या आणि त्या चुकांची पुनरावृत्ती करू नका ज्या मागील लोकांनी केल्या होत्या. त्या चुका त्यांच्या विनाशाचे कारण ठरले होते.
Post a Comment