एक अफगाणी आपले गाढव घेऊन टेकडीवर चढत होता. ते गाढव टेकडीवर पुढे जाण्यास काही केल्या तयार नव्हता. ते तिथेच अडून राहिले. त्या अफगाणीने गाढवाला खूप मारले. शेवटी कसे तरी ते गाढव टेकडी चढू लागले. वर पोहोचल्यानंतर पुन्हा त्या अफगाणीने गाढवाला मारायला सुरवात केली. एक माणूस दूरवरून हा सर्व प्रकार पाहात होता. गाढवाला अफगाणीकडून मारले जाताना तो जवळ येऊन त्या अफगाणीला विचारले की, का बरे आता पुन्हा या गाढवाला मारत आहात, टेकडीवर चढून आल्यावरसुद्धा? त्यावर तो अफगाणी उत्तरला, अडणे हा अफगाणींचा स्वभाव आहे, गाढवाचा नाही. गाढवाने अडायला नको होते. म्हणून आधी त्याला अडून राहाण्याबद्दल मारले आणि मग अडलाच होता तर टेकडीवर चढला कशाला? म्हणून पुन्हा टेकडीवर चढण्याची शिक्षा दिली.
असेच काही अफगाणिस्थानबाबत अमेरिकेचे झाले आहे. आधी त्या देशात गेलेचे कशाला आणि जर गेलेच होते तर माघारी का परतले?... नंतर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज नाही.
ही झाली विनोदाची बाब. अमेरिकेने अफगाणिस्थान सोडून तिथल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडून जसे निघून गेले आणि निघून गेल्यावर तालिबानींनी त्या देशावर जसा ताबा मिळवला त्यावर जगभरातील प्रत्येक प्रकारच्या माध्यमांमध्ये इतके बोलले, लिहिले जात आहे, इतक्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत की त्यातले दहा टक्केही लोक वाचत, पाहात, ऐकत असतील तर नक्कीच येत्या काही दिवसांत त्यातले बरेच जण मानसिक आजाराने गासलेले आढळतील. जो तो मुस्लिमांना आवर्जून प्रश्न विचारतो की अफगाणिस्थानात जे काही घडलंत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जणू भारताच्या मुस्लिमांनीच अफगाणिस्थानात सत्तापालट केली असावी. अमेरिकेने अफगाणिस्थानातून का पळ काढला, याचेसुद्धा उत्तर इथल्याच नागरिकांना विचारले जाते. तिथले लोक देश सोडून पळून का जातात याबद्दलसुद्धा मुस्लिमांनीच उत्तरे द्यावीत, असे त्यांचे म्हणणे आहे, असे वाटते. अमेरिकेने २० वर्षे त्या देशाची नासधूस केली, लाखो अफगाणींना ठार केले, त्या वेळी कुणी मुस्लिमांना, हे अमेरिकेचे वागणे बरोबर आहे का? असे विचारले नव्हते. अफगाणिस्थानवर तालिबानने कब्जा केला. अमेरिकेने लोकशाही साथापन करण्यासाठी त्या देशावर चढाई केली होती. अफगाणींना आधुनिक व्यवस्थेत आणायचे होते. त्या देशाच्या सुरक्षेसाठी तीन लाखांचे सैन्य उभारले होते. त्यांना आधुनिक शस्त्रे व प्रशिक्षण पुरविले होते. त्या सर्वांचे पळून गेलेल्या अशरफ गणींनी काय केले? हे प्रश्न अशरफ गणी आणि अमेरिकेला न विचारता भारतीयांना विचारले जातात, यामागचा खरा हेतू काय?
अमेरिकेने दहशतवादाविरूद्ध युद्धाची घोषण केली. साऱ्या जगाने अमेरिकेपुढे लोटांगण घातले. या युद्धात अमेरिकेने जवळजवळ सव्वा कोटी माणसांची हत्या केली. लहान मुलांसाठी सुद्धा औषधांच्या पुरवठ्यावर अमेरिकेने जगभरातील देशांवर बंदी घातली. याचे उत्तर कुणी त्याला विचारत नव्हते. शहरेची शहरे उद्ध्वस्त करून खंडरमध्ये त्यांचे परिवर्तन केले. लीबिया, इराक, येमेन, सीरिया हे देश जणू जगाच्या नकाशावर मानवी संस्कृती म्हणून शिल्लकच नाहीत. इतकी नासधूस केली की पुढची शंभर वर्षे ते पुन्हा उभारू शकणार नाहीत. हे प्रश्न कुणीतरी का विचारत नाही? जगात फक्त अफगाणिस्थानच एक देश नाही. इराककडे जैविक शस्त्रे नसताना तसा आरोप त्यावर लावला. जगातील इतर राष्ट्रांनी अमेरिकेच्या या आरोपाला समर्थन दिले. ती जैविक शस्त्रे आता कुठे आहेत? इराकला पिंजून काढल्यानेदेखील त्यांचा पत्ता का लागला नाही? हे प्रश्न कुणी विचारायचे? सगळेकाही उद्ध्वस्त झाल्यावर काही मानवतावादी आता असे म्हणू लागले की इराककडे तशी शस्त्रे नव्हतीच. अमेरिकेचा आरोप खोटा होता. प्रश्न असा उपस्थित होतो की तेव्हा का हे मानवतावादी मूग गिळून बसले होते?
अमेरिकेने जी दहशत जगभर माजवली त्यास प्रत्येक देशाची संमती होती. म्हणजे एक प्रकारे केवळ अमेरिकाच नव्हे तर त्याला समर्थन देणारेसुद्धा दहशतवादी आहेत का? हा प्रश्न देखील कुणीतरी कधीतरी विचारायला हवा की नाही?
मानवतावादी, शांतताप्रेमी, सुसंस्कृत, सभ्य अमेरिकेने जगभर जो पराक्रम गाजवला त्याची काही छायाचित्रे इथे देत आहोत. जगाच्या इतर मानवतावादी, शांतताप्रिय राष्ट्रांनी ती पाहावित, कारण यात त्यांचादेखील पुरेसा वाटा आहे.
- सय्यद इफ्तिखार अहमद
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment