वर्ल्डकपनंतर रोहित शर्माकडे नेतृत्वाची धुरा
दुबई
भारताचा आधारस्तंभ विराट कोहली याने संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायऊतार होत असल्याचे जाहीर करत गुरुवारी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असेही त्याने स्पष्ट केले. आता टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार आहे.
कोहलीने ट्विटरवरून टी-20 संघाचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा गुरुवारी केली. टी-20 वर्ल्डकपनंतर मी टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायऊतार होत आहे. कामाचा अतिरिक्त ताण आणि त्याचे ओझे मी गेली 8-9 वर्षे सांभाळत आहे. गेल्या 6-7 वर्षांपासून मी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. आता कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व अधिक सक्षमपणे सांभाळण्यासाठी मला वेळ हवा आहे. त्यामुळेच मी टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अन्य कुणाच्या खांद्यावर टाकू इच्छित आहे, असे कोहलीने स्पष्ट केले.
मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माच्या कामगिरीचा आलेख उंचावत असल्याने कोहलीचे कर्णधारपदावरील भवितव्य धूसर झाले होते, अशी चर्चा होती. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध मायदेशी होणाऱ्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी रोहितकडेच भारताचे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता आहे.
कोहलीने 2017मध्ये महेंद्रसिंह धोनीकडून भारताच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली. त्यानंतर 45 सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद सांभाळत कोहलीने 27 सामने जिंकून दिले आहेत तर 14 सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे. कोहलीने 90 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये 28 अर्धशतकांसह 3159 धावा केल्या आहेत. आता 17 ऑ्नटोबरपासून दुबईत ट्वेन्टी-20 विश्वचषकाला सुरुवात होत असून भारताला जेतेपद जिंकून देण्याचे आव्हान कोहलीसमोर असेल. कर्णधारपदावरून पायऊतार होण्याचा निर्णय मी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा तसेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी चर्चा करून घेतला असल्याचे कोहलीने स्पष्ट केले.
Post a Comment