15 ऑगस्ट रोजी सबंध देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच भारताच्याच एका कोपऱ्यात काळा दिवस मनवण्यात आला. मेघालयातील एक बंडखोर नेता पोलीस गोळीबारात ठार झाल्यामुळे वातावरण इतके तापले की थेट गृमंत्र्यांनाच राजिनामा द्यावा लागला, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. मेघालयातील हा असंतोष नेमक्या कोणत्या घटनेमुळे सुरू आहे आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असतील यावर केलेली ही मांडणी...
ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्यदिनी शिलाँगमधील रस्त्यांवर सरकारच्या निषेधात दुचाकी व चार चाकींची मिरवणूक काढण्यात आली. या तरुणांनी हातात काळे झेंडे घेतले होते. पोलिसांच्या एका स्कॉर्पिओ जीपचं काही तरुणांनी अपहरण केलं, काळे स्कार्फ चढवलेले तरुण पोलिसांच्या रायफली हातात मिरवत होते. मेघालयातील माजी बंडखोर नेता, चेश्टरफील्ड थँग्यूचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याच्या निषेधात हे तरुण निदर्शनं करत होते. संतप्त तरुणांनी पोलिसांच्या आणि खाजगी वाहनांवर दगडफेक केली, मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकला. शिलाँगच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली. मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. चेश्टरफील्ड थँग्यूच्या मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, राज्याचे गृहमंत्री लखमेन रांयम्बो यांनी राजीनामा दिला. ज्या तरुणांनी पोलिसांच्या वाहनाचं अपहरण केलं, पोलिसांच्या रायफली हिसकावून घेतल्या त्यांनी शस्त्रं परत करावीत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
हायेनट्रेप नॅशनल लिबरेशन कौन्सिल या फुटीरतावादी संघटनेचा संस्थापक होता चेश्टरफील्ड थँग्यू. प्रदीर्घकाळ तो भूमिगत होता. 2018 साली तो प्रकट झाला. पोलिसांचा दावा होता की त्याने समर्पण केलंय, परंतु तो सांगत होता की मी आता निवृत्त झालोय. जुलै महिन्यात मेघालयात दोन किरकोळ बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये कोणीही मृत्यूमुखी पडलं नाही परंतु काही लोक जखमी झाले. या दोन बॉम्बस्फोटांमध्ये थँग्यूचा सहभाग होता अशी पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्याला अटक करण्यासाठी पोलीस भल्या पहाटे त्याच्या घरी गेले. मेघालयाचे पोलीस महासंचालक आर. चंद्रमोहन यांनी पत्रकारांना सांगितलं की, थँग्यू आणखी एक बॉम्बस्फोट घडवण्याच्या कटात गुंतला आहे अशी खबर मिळाल्याने त्याला अटक करणं भाग होतं. परंतु थँग्यूने पोलिसांवर सुरीहल्ला केला आणि स्वसंरक्षणार्थ पोलीसांनी एक गोळी त्याच्यावर झाडली. इस्पितळात नेताना वाटेतच तो मृत्यू पावला.
पोलीस महासंचालकांच्या या स्पष्टीकरणावर विश्वास बसणं कठीण आहे. हातात सुरी असलेल्या व्यक्तीला सशस्त्र पोलीस सहजपणे अटक करू शकतात. एकाच गोळीने थँग्यूचा मृत्यू झाला म्हणजे चकमक खोटी होती अशीच समजूत होते. पोलिसांनी थँग्यूचा खून केलाय असा आरोप थँग्यूच्या कुटुंबियांनी केला आहे.
सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँण्ड पीस स्टडीज ही संस्था ईशान्य भारतातील फुटीरतावादी गटांचा अभ्यास करते. मेघालयातील भूमिपुत्र-गारो, खाँसी आणि जैंतिया या जमाती, यांनी बाहेरून आलेल्या-पंजाबी दलित, हिंदी, आसामी, नेपाळी, बंगाली, इत्यादींच्या विरोधात सुरु केलेल्या आंदोलनातून, फुटीरतावादी संघटनांचा जन्म झाला. हायेनट्रेप आचिक लिबरेशन कौन्सिलची स्थापना 1980 मध्ये झाली. यामधील हायेनट्रेप म्हणजे खाँसी व जैंतिया या दोन जमाती. हायेनट्रेप म्हणजे मूळ आदिवासी कुटुंबं ज्यांच्यापासून मानवजातीची सुरुवात झाली अशी या आदिवासी जमातींची धारणा आहे. आचिक म्हणजे गारो जमात. शेकडो वर्षांपूर्वी तिबेटमधून गारो मेघालयात स्थलांतरित झाले असं मानलं जातं. गारो केवळ मेघालयात नाहीत आसममध्येही आहेत. गारोंचा समावेश बोडोंमध्येही होतो. हायेनट्रेप आचिक लिबरेशन कौन्सिलमध्ये फूट पडली आणि आचिक मॅत्ग्रीक लिबरेशन आर्मी ही गारोंची संघटना वेगळी झाली. तिचंच रुपांतर पुढे आचिक नॅशनल व्हॉलेंटिअर्स कौन्सिल या संघटनेत झाले.
खाँसी-जैंतिया आणि गारो या दोन जमातींमध्ये तणाव आहे. खाँसी व जैंतिया हे बहुसंख्य आहेत परंतु त्यांच्यामध्ये ऐक्य नाही. त्यामुळे निवडणुकीत त्यांच्या मतांची विभागणी होते. साहजिकच मेघालयाचं मुख्यमंत्रीपद वा सत्ता गारोंच्या ताब्यात येते. कॉन्रॅड संगमा हे विद्यमान मुख्यमंत्री गारो जमातीचे आहेत. लोकसभेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, पूर्णो संगमा यांचे हे पुत्र. त्यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीला भाजपने रसद पुरवली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात भाजपही सामील आहे. हायेनट्रेप नॅशनल लिबरेशन कौन्सिल ही खाँसी जमातीची संघटना मानली जाते. खाँसी तरुणांना या संघटनेचा गर्व आहे. भारतापासून वेगळं होऊन स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणं हे या संघटनेचं कागदोपत्री उद्दीष्ट आहे. परंतु या संघटनेची शक्ती फारशी नाही. या संघटनेतील सशस्त्र तरुणांची संख्या जास्तीत जास्त शंभर असावी. त्यापैकी बहुतांश तरुण बांग्लादेशात आहेत. या संघटनेने घडवून आणलेले स्फोट कमी तीव्रतेचे होते. म्हणजे या संघटनेला परदेशी राष्ट्रांची फारशी मदतही नाही.
चेश्टरफील्ड थँग्यूला अटक करणं पोलीसांना सहज शक्य होतं, खोट्या चकमकीत त्याचा खून करण्यात आला अशी बहुसंख्य खाँसी तरुणांची साधार धारणा आहे. भाजपला एकात्मिक राष्ट्रवाद लोकांवर लादायचा असल्याने जाती-जमातींचं वैविध्य व स्वायत्तता यांना चिरडून टाकण्याचं धोरण अवलंबलं जातंय असंही मानलं जातं. युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचा पत्रकार अभिजीत देब शिलाँगमधील बंगाली कुटुंबात जन्माला आला. त्याचे अनेक मित्र खाँसी आहेत. खाँसी राष्ट्रवादाचे चटके अभिजीतलाही बसले आहेत. तो मला म्हणाला की भाजपच्या एकात्मिक राष्ट्रवादाच्या आक्रमक भूमिकेमुळे ईशान्य भारतातील आदिवासी वा मूळ रहिवासी बिथरले आहेत. गोवंश हत्याबंदीचा कायदा भाजपच्या आसाम सरकारने केला आहे. आदिवासी राज्यांमधील गाईगुरं मेघालय, मिझोराम, नागालँण्ड, अरुणाचल प्रदेश या आदिवासी राज्यांमध्ये विक्रीला जातात. आसाम सरकारच्या कायद्यामुळे ही निर्यात थंडावली आहे. साहजिकच त्याचा फटका या आदिवासी राज्यांना बसला आहे. ईशान्य भारतात आसाम हे मध्यवर्ती राज्य आहे, त्याचा भूप्रदेश आणि लोकसंख्या सर्वाधिक आहे. केवळ गाईगुरंच नाही तर सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आसाममधूनच या राज्यांना होतो. आसामसोबत अनेक राज्यांचे सीमाविवाद आहेत. आपल्या हद्दीचं उल्लंघन करण्यात आलं आहे का यावर नजर ठेवायला राज्य सरकारं ड्रोनचा उपयोग करू लागली आहेत. शेखर गुप्ता या ज्येष्ठ पत्रकारानेही आसाममधील हिंदुराष्ट्रवादाचा फटका आदिवासी राज्यांना बसतो आहे या आशयाची नोंद शिलाँगमधील घडामोडींसंबंधात केली आहे. मेघालयाच्या तीन दिशांना आसाम आहे तर एका दिशेला बांग्लादेश आहे. ईशान्य भारतातील प्रत्येक राज्य आंतरराष्ट्रीय सरहद्दीला भिडलेलं आहे. संपूर्ण ईशान्य भारताला जोडणारा सिलीगुडी हा भूप्रदेश केवळ 22 किलोमीटर्सचा आहे. उत्तरेला चीन आहे तर दक्षिणेला बांग्ला देश यांच्या चिमटीत सापडेल्या या भूप्रदेशावर नियंत्रण नाही तरी नजर ठेवण्यासाठी चीन उत्सुक आहे. याच मुद्द्यावरून डोकलाम येथे चीन आणि भारतीय सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
मणिपूर असो की मिझोराम वा मेघालय किंवा नागालँण्ड वा दस्तुरखुद्द असम, ईशान्य भारतातील जनजीवनात जमात हीच ओळख आहे, अस्मिता आहे. ईशान्य भारतात दर पन्नास मैलांवर भाषा बदलते. एका जमातीची भाषा दुसऱ्या जमातीला कळत नाही. या जमातींची स्वायत्तता, त्यांचं वैविध्य, त्यांच्या प्रदेशातील नैसर्गिक स्त्रोतांवरील त्यांचे अधिकार, अन्य जमाती व प्रदेशांशी असेल त्यांचे व्यापारी व आर्थिक संबंध यावर भाजपच्या एकात्मिक राष्ट्रवादाचा विपरीत परिणाम होतो आहे. मिझोराम असो की मेघालय दोन्ही राज्यांत भाजपच्या पाठिंब्यावरच स्थानिक पक्ष सत्तेवर आहेत. आसाममध्ये तर भाजपचीच सत्ता आहे. परंतु तरीही जमातीच्या अस्मिता उग्र होताना दिसतात. यावर्षी शिलाँगमध्ये काळा स्वातंत्र्यदिन पाळण्यात आला. राज्य सरकारचा कारभार आणि भाजपच्या आक्रमक एकात्मिक राष्ट्रवादाच्या विरोधातील नाराजी त्यातून प्रकट झाली आहे. मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या रायफली परत करणाऱ्या तरुणांना माफ करण्यात येईलं अशी घोषणा केली आहे.
- सुनिल तांबे
(साभार : दिव्य मराठी रसिक स्पेशल)
suniltambe07@gmail.com
Post a Comment