‘‘दुर्दैवाने भारतात राष्ट्रवादाला असे महत्त्व प्राप्त झालेले आहे की, बहुसंख्यांक लोक आपल्या मर्जीनुसार अल्पसंख्यांकांवर दैवी हक्क असल्यासारखे वर्चस्व गाजवितात. अल्पसंख्यांकांनी जर सत्तेमध्ये भागीदारी मागितली तर त्याला जातीयवादी मागणी समजले जाते आणि बहुसंख्यांक हे सर्व सत्तेवर आपला एकाधिकार प्रस्थापित करू इच्छितात तर त्याला राष्ट्रीयत्व म्हटले जाते. याच राजकीय तत्वज्ञानापासून प्रतिनिधीत्व प्राप्त करून बहुसंख्य कुठल्याही स्तरामध्ये अल्पसंख्यांकांना सत्तेमध्ये भागीदार बनविण्यासाठी तयार नाहीत. त्यासाठी कुठलीही कायदेशीर आणि घटनात्मक तरतूद करण्याचीही त्यांची तयारी नाही.’’ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.\
‘‘ ज्या मुल्यांमुळे माणसाचे सर्वोच्च नैतिक कल्याण होते त्या मुल्यांचा धर्म म्हणजे सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता)’’ - जॉर्ज जॅकब दोलिओ (फ्रेंच तत्ववेत्ता)
र्मनिरपेक्षता ही आधुनिक काळातील जागतिक जीवनशैली आहे यात शंका नाही. विशेष करून फ्रेंच राज्यक्रांती (1789 ते 1799) नंतर जगात धर्मनिरपेक्षतेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या फ्रेंच राज्यक्रांतीच्या मुल्ल्यांचा उदो-उदो केला गेला व आजही केला जातो आहे. तुम्ही जर गुगलला प्रश्न विचारला की फ्रेंच राज्यक्रांतीचे जगावर परिणाम काय? तर तुम्हाला उत्तर देईल की, ’’फ्रेंच राज्यक्रांतीमुळे आर्थिक, सामाजिक समतेची भावना जगभर पसरली. धार्मिक स्वातंत्र्य आणि सहनशिलतेचा प्रचार वाढला. नागरिकांना स्वातंत्र्य प्रदान केले गेले. व्यक्ती स्वातंत्र्याला मान्यता मिळाली. या क्रांतीने जगाला लोकशाही, समानता, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीयतेची प्रेरणा दिली.’’ धर्मनिरपेक्षतेनंतर अलिकडे ज्या लोकशाही मुल्याला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे ते म्हणजे राष्ट्र होय. आधुनिक जगामध्ये राष्ट्रवादाच्या स्थानाइतके उंच स्थान दुसऱ्या कुठल्याच मुल्याला नाही.
निर्विवादपणे वरील सर्व मुल्य ही उच्च मानवी मुल्य आहेत मात्र प्रत्यक्षात ही मुल्य जमीनीवर कुठेच दिसून येत नाहीत. धर्मनिरपेक्षतेचे स्थान बहुसंख्यवादाने घेतलेले आहे. या संदर्भात डॉ. आंबेडकर यांचे म्हणणे खालीलप्रमाणे-’’दुर्दैवाने भारतात राष्ट्रवादाला असे महत्त्व प्राप्त झालेलेे आहे की, बहुसंख्यांक लोक आपल्या मर्जीनुसार अल्पसंख्यांकांवर दैवी हक्क असल्यासारखे वर्चस्व गाजवितात. अल्पसंख्यांकांनी जर सत्तेमध्ये भागीदारी मागितली तर त्याला जातीयवादी मागणी समजले जाते आणि बहुसंख्यांक हे सर्व सत्तेवर आपला एकाधिकार प्रस्थापित करू इच्छितात तर त्याला राष्ट्रीयत्व म्हटले जाते. याच राजकीय तत्वज्ञानापासून प्रतिनिधीत्व प्राप्त करून बहुसंख्य कुठल्याही स्तरामध्ये अल्पसंख्यांकांना सत्तेमध्ये भागीदार बनविण्यासाठी तयार नाहीत. त्यासाठी कुठलीही कायदेशीर आणि घटनात्मक तरतूद करण्याचीही त्यांची तयारी नाही. (संदर्भ : डॉ. आंबेडकर 1947 स्टेट अँड मायनॉरिटीज, https://drambedkar.co.in/wp-content/uploads/books/category2/11states-and-minorities.pdf, retrived on 10-07-2021)
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही, आर्थिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता ही सर्व मानवनिर्मित मुल्य आहेत आणि ही मुल्य जर प्रत्यक्षात जमिनीवर लागू केली गेली नाहीत तर जनता सत्ताधाऱ्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही. म्हणूनच ट्रम्प सारखे धटिंगन बायबलवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतरही सत्तेत येताच सर्व लोकशाही मुल्यांना पायाखाली चिरडून फक्त गोऱ्यांच्या हितासाठीच सरकारची सर्व शक्ती पणाला लावतो. आपल्याच देशातील काळ्या नागरिकांना शत्रु सारखी वागणूक देतो. बाहेरून येऊन अमेरिकेला महान बनविणाऱ्या अप्रवासी लोकांना पक्षपाती वागणूक देतो. प्रसंगी त्यांचे मुडदे पाडण्यासाठी लोकांना प्रेरित करतो. एवढेच नव्हे तर देशाच्या संसदेवर चालून जाण्यासाठी चिथावणी देतो. थोडक्यात ही मानवनिर्मित जीवनपद्धती असल्याने त्रुटीपूर्ण आहे आणि याच त्रुटींचा लाभ उठवत धोरणी राजनेते आपल्या जाती-धर्माचे राजकारण करतात व बाकींच्यांना वाऱ्यावर सोडून देतात.
इस्लामी जीवनशैली
तुफानों से आँख मिलाओ
सैलाबों पर वार करो
मल्लाहों का चक्कर छोडो
तैर के दरिया पार करो
धर्मनिरपेक्ष लोकशाही जीवनशैली शिवाय इस्लामवर आधारित लोकशाही जीवनशैलीही जगात अस्तित्वात असून ती ईश्वरनिर्मित असल्यामुळे त्रुटीविरहित आहे. प्रसारमाध्यमे हाती नसल्यामुळे ही जीवनशैली जगामध्ये फारसी परिचित नाही उलट प्रसारमाध्यमे हाती एकवटलेली असल्यामुळे धर्मनिरपेक्ष लोकशाही जीवनशैलीचा परिचय सर्व जगाला आहे. इस्लामी जीवनशैलीचे वैशिष्ट्ये म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधूता, धर्मनिरपेक्षता, आर्थिक आणि व्यक्ती स्वातंत्र्यच नव्हे तर समग्र मानवकल्याण हे या जीवनशैलीमध्ये निहित आहे. इस्लामी लोकशाही जीवनशैलीचा दुरूपयोग धर्मनिरपेक्ष लोकशाही पद्धतीप्रमाणे करता येत नाही, हे या शैलीचे दूसरे वैशिष्ट्ये आहे. कारण याचा दुरूपयोग केल्यास या जीवनात व मरणोपरांत जीवनात दोन्हीमध्ये त्याचा हिशोब घेतला जाणार आहे हे इस्लामी सत्ताधाऱ्यांना कायम लक्षात ठेवावे लागते.
प्रत्यक्षात ही जीवनशैली कशी आहे याचा परिचय खालीलप्रमाणे -
1. अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही. (सुरे आलेइमरान : आयत क्र.19)
या आयातीमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मुस्लिमाची ही श्रद्धा आहे की, इस्लामी जीवनशैली हीच खरी जीवनशैली असून याद्वारेच मानवाचे खरे कल्याण साधले जाऊ शकते. हा केवळ माझा अंदाज नसून कुरआनने ही बाब अधिक स्पष्ट करताना स्वतःच म्हटले आहे की,
2. ’’आणि ह्या अपेक्षेने कि माझ्या आदेशांच्या पालनाने तुम्हाला त्याचप्रकारे कल्याणाचा मार्ग लाभावा ज्या प्रकारे (तुम्हाला या गोष्टीने सफलता लाभली की) मी तुमच्यामध्ये खुद्द तुमच्यामधूनच एक प्रेषित पाठविला जो तुम्हाला आमचे संदेश ऐकवीत आहे. आणि तुमचे जीवन पवित्र करून तुम्हाला ग्रंथ व विवेकाची शिकवण देत आहे. आणि तुम्हाला त्या गोष्टी शिकवीत आहे ज्या तुम्हाला माहीत नाहीत.’’(सुरे बकरा : आयत नं. 151).
स्पष्ट आहे की, पृथ्वीवर जेव्हा पहिल्यांदा माणसा-माणसांंमध्ये भांडण झाले तेव्हापासून मानवी समुहामध्ये समन्वयासाठी अनेक संस्था अस्तित्वात आल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची संस्था धर्म आहे. धर्माद्वारे एक विशिष्ट अशी जीवनशैली निश्चित केली जाते. त्या जीवनशैलीच्या परिघाबाहेर कोणालाच जाता येत नाही. हे अशासाठी केले जाते की त्यातून सर्वच माणसांचे कल्याण साधता यावे, परंतु इस्लाम व्यतिरिक्त इतर सर्व धर्म ही मानवनिर्मित असल्यामुळे किंवा मानवांनी हस्तक्षेप केल्यामुळे विकृत झाल्यामुळे, त्यातून मानवकल्याण साध्य होणे शक्य नाही. जेव्हा जग सभ्य युगात पोहोचले तेव्हा ईश्वराने शेवटचे प्रेषित म्हणून मुहम्मद सल्ल. यांना पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व माणसांचा मार्गदर्शक म्हणून पाठविले आणि कुरआनला मानवी जीवनाची आचारसंहिता म्हणून अवतरित केले. यामुळे आता मनाप्रमाणे वागण्याची सोय राहिलेली नाही.
3. इस्लामी जीवनशैली जरी ईश्वराला पसंत असली आणि तीच सर्व मानवांनी अंगीकारावी अशी जरी ईश्वरीय इच्छा असली तरी या जीवनशैलीला बळजबरीने ईश्वराने मानवावर लादलेले नाही. म्हणूनच कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की,’’ धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी, तागूत (ईश्वराशिवाय इतर शक्ती) चा इन्कार करून अल्लाहवर श्रद्धा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला की जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.’’ (सुरे बकरा : आयत नं. 256).
या आयातीनुसार एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की, इस्लामी जीवनशैली ही ऐच्छिक जीवनशैली आहे. ज्यांनी तिचा अंगीकार केला ते यशस्वी झाले व ज्यांनी तिला नाकारले त्याचे त्यांना मुल्य चुकवावे लागले व प्रलयाच्या दिवसापपर्यंत चुकवत रहावे लागेल. कुरआनच्या अवतरणाचा मुख्य उद्देशच मानवाला उच्च नैतिक मुल्यांचे मार्गदर्शन करणे होय. या व्यतिरिक्त जेवढेही मार्गदर्शन जगामध्ये आहे ते कुठे ना कुठे जाऊन मानवाला अपाय करते. उदा. धर्मनिरपेक्ष लोकशाही ही अतिशय उत्कृष्ट जीवन पद्धती जरी असली तरी तिचे प्रत्यक्ष स्वरूप काय आहे हे डॉ. आंबेडकरांच्या वर नमूद विचारावरून एव्हाना स्पष्ट झालेले आहे व या जीवन पद्धतीचा किती दुरूपयोग होतो हे आपण आपल्या डोळ्यांनी रोज पाहत असतो.
अल्लाहचे सहाय्यक कोण?
ना शरियत ना तरिकत ना हकीकत ना मजाज
कौन काफीर तुझको कहेता है के मुसलमान है तू
कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहचे सहाय्यक बना ज्याप्रकारे मरयमपुत्र ईसाने हवारींना उद्देशून सांगितले होते, ’’कोण आहे अल्लाहकडे (बोलविण्यात) माझा सहायक?’’ आणि हवारींनी उत्तर दिले होते, ’’आम्ही आहोत अल्लाहचे सहायक.’’ त्यावेळी बनीइस्राईलच्या एका गटाने श्रद्धा ठेवली आणि दुसर्या गटाने इन्कार केला. मग आम्ही श्रद्धावंतांचे त्यांच्या शत्रुविरूद्ध समर्थन केले आणि तेच विजयी ठरले.’’ (सुरे सफ : आयत नं.14)
वर नमूद आयत जरी येशू ख्रिस्तांना उद्देशून कुरआनमध्ये आलेली आहे तरी त्यातील आदेश येशू ख्रिस्तानंतरचे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या अनुयायांना सुद्धा लागू पडते. या आयाती संदर्भात स्पष्टीकरण देतांना मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी लिहितात, ’’अल्लाहचे सहाय्यक बना याचा अर्थ असा मुळीच नाही की (अल्लाह क्षमा करो) अल्लाह मानवकल्याणाचे काम स्वतः करू शकत नाही व त्याला माणसाच्या सहाय्यतेची गरज आहे, असे यासाठी म्हटलेले आहे की, अल्लाहची जरी इच्छा असली की मानवाने इस्लामी जीवन शैलीचा अंगीकार करावा त्यासाठी इस्लामवर श्रद्धा बाळगावी, कुरआनच्या मार्गदर्शनाचे पालन करावे, वाईट कृत्यांपासून दूर रहावे तरी तो आपली ही इच्छा आपल्या (ईश्वरीय) शक्तीने मानवावर थोपवू इच्छित नाही’’ ( संदर्भ : तफहिमुल कुरआन सुरे सफचे भाष्य)
ईश्वराने मानवाला सर्वश्रेष्ठ जीव बनवून बुद्धी प्रदान केली आणि चांगला आणि वाईट यामधील फरक करण्याची समज दिली, पृथ्वीवर कुरआनचे मार्गदर्शन पाठविले, प्रेषित सल्ल. आणि त्यांचे सहकारी साहबा रजि. यांच्या मार्फतीने ते मार्गदर्शन यशस्वीपणे सातव्या शतकात अरबास्थानामध्ये यशस्वीपणे राबवून दाखविले. तो समाज उत्कृष्ट मानवी समुह होता. ज्याने 100 वर्षे एक तृतीयांश पृथ्वीवर आपला ठसा उमटविला. तेच मार्गदर्शन माणसाने आपल्या मर्जीने स्वीकारावे ही ईश्वराची मर्जी आहे. त्यासाठी ईश्वराने उपदेशाची पद्धत अवलंबिलेली आहे; जबरदस्ती केलेली नाही. मौलाना मौदूदी म्हणतात, ’’या ईश्वरीय मार्गदर्शनाचा स्वतः मर्जीने ज्यांनी स्वीकार केला त्यांना मोमीन (खरे मुस्लिम) म्हणतात, ज्यांनी त्याची जीवनात प्रत्यक्ष अंमलबजावणी केली त्याला विश्वसनीय आणि आबिद (भक्त) म्हणतात, जो त्या पुढच्या पायरीवर पोहोचतो आणि ईश्वरीय मर्जीप्रमाणे स्वतः रूपांतरित होऊन जातो त्याला मुत्तकी (चारित्र्यवान) म्हणतात, जो चांगल्या कामामध्ये आणखीन एक पाऊल पुढे जातो आणि इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याचा जीवापाड प्रयत्न करतो आणि इस्लामी जीवनशैलीला स्वतःच्या आणि सामुहिक जीवनामध्ये लागू करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नरत राहतो त्याला ईश्वर, स्वतःचा सहाय्यक (मददगार) म्हणून मान्यता देतो आणि इस्लामी जीवनशैलीचे हे सर्वात उंच शीखर होय.’’ ( संदर्भ : तफहिमुल कुरआन सुरे सफचे भाष्य)
जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अभियान
देखी गई ना मुझसे अंधेरों की सरकशी
खुद आफताब बनके निकलना पडा मुझे
भौतिक जीवनशैलीच्या अतिरेकामुळे आज जीवनाचा उद्देश फक्त कमाविणे, खाणे आणि मनोरंजनात व्यस्त राहणे इतकेच राहून गेलेले आहे. जनता आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक अदृश्य अशी दरी निर्माण झालेली आहे. सत्ताधारी हे जनकल्याणाच्या नावाखाली स्वतःचे पोटभरण्याचे धंदे करत आहेत. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, स्त्रीयांवर अत्याचार वाढलेले आहेत, मुलांची तस्करी होत आहे, दारू आणि ड्रग्ज यांचा मुक्त हस्ते वापर होत आहे, व्याजाधारित अर्थव्यवस्थेने शेतकरीच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांनाही आत्महत्या करण्यास विवश केलेले आहे, सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांनी कोट्यावधी रूपयाचे घोटाळे करून विदेशात पलायन केलेले आहे, त्यांना परत आणण्याची सरकारची मुळीच इच्छा नाही, त्यामुळे अनेक बँका बुडालेल्या आहेत, बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास हळूहळू कमी होत आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाईने सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टींवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने राष्ट्रवाद आणि जातीयतेची मात्रा जनतेला देऊन व्यस्त ठेवण्याचे काम सुरू केले आहे.
एकंदरित या सर्व नकारात्मक परिस्थितीमध्ये केवळ सकारात्मक विचारांची मात्राच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी उमेद देऊ शकते म्हणून जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने ’कूनू अन्सारूल्लाह अर्थात अल्लाहचे सहाय्यक बना’ हे अभियान सुरू केलेले आहे. यातून जास्तीत जास्त लोकांना जमाअते इस्लामीचा परिचय करून देऊन त्यांना अल्लाहचे सहाय्यक म्हणून तयार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला आहे. शीतल पवित्र आणि उच्च नैतिकतेने परिपूर्ण जीवन जगण्याची जगातील सर्वात प्रभावशाली पद्धत जर कुठली असेल तर ती इस्लामी जीवनपद्धती आहे. या पद्धतीचे महत्त्व दुसऱ्यांना पटवून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक प्रभाव वाढविणे आणि कोविडमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीनंतर हलाखीचे जीवन जगत असलेल्या जनतेमध्ये अंतर्गत ऊर्जा निर्माण करून भविष्यातील आव्हानांना पेलण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हा जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राचा उद्देश असून, या मोहिमेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी जमाअतचे तत्वज्ञान समजून घेऊन स्वतःला अल्लाहचे सहाय्यक बनविण्यासाठी प्रयत्न करावा. इस्लामचा हा सर्वोच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची समज, अल्लाह आपल्या सर्वांना देओ आणि आपल्या या प्रिय देशाला जगामध्ये नैतिक दृष्ट्या उच्च स्थानावर नेण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये निर्माण करो, हीच प्रार्थना. आमीन.
- एम.आय.शेख
Post a Comment