Halloween Costume ideas 2015

सूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(११९) ज्यावर अल्लाहचा नामोच्चार झाला असेल तुम्ही ती वस्तू का खाऊ नये?वस्तुत: ज्या वस्तूंचा उपयोग अगदी नाइलाज (जीवावर बेतणे) झाल्याखेरीज इतर सर्व परिस्थितीत अल्लाहने निषिद्ध ठरविला आहे त्यांचा तपशील त्याने तुम्हाला दिला आहे.८५ पुष्कळशा लोकांची परिस्थिती अशी आहे की ज्ञानाविना केवळ आपल्या इच्छेपोटी पथभ्रष्ट करणाऱ्या गोष्टी करतात. या मर्यादा ओलांडणाऱ्यांना तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो.
(१२०) तुम्ही उघड गुन्ह्यापासूनही अलिप्त राहा आणि गुप्त गुन्ह्यापासूनसुद्धा. जे लोक पापकर्मे करतात ते आपल्या या कर्माचा मोबदला अवश्य प्राप्त करतील. (१२१ )आणि जे जनावर अल्लाहचे नाव घेऊन कापले गेले नसेल त्याचे मांस खाऊ नका, असे करणे अवज्ञा होय. शैतान आपल्या सोबत्यांच्या मनात शंका व आक्षेप भरवितात, ते याकरिता की त्यांनी तुमच्याशी भांडण करावे,८६ परंतु जर तुम्ही त्याची आज्ञा मानली तर निश्चितच तुम्ही अनेकेश्वरवादी आहात.८७
(१२२) तो मनुष्य जो अगोदर मृत होता मग आम्ही त्याला जीवन दिले८८ आणि त्याला प्रकाश प्रदान केला ज्याच्या उजेडात तो लोकांमध्ये जीवनाची वाटचाल करतो. तो त्या माणसासारखा होऊ शकतो काय जो अंधकारात पडलेला असेल आणि कोणत्याही प्रकारे त्यातून बाहेर पडत नसेल?८९ नाकारणाऱ्यांकरिता तर त्यांची कृत्ये अशाचप्रकारे आकर्षक बनविण्यात आली आहेत.९०
(१२३) आणि अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक वस्तीत तिच्या मोठमोठ्या अपराध्यांना गुंतविले आहे की तेथे त्यांनी आपल्या कुटिल नीतीचे जाळे पसरवावे. खरे पाहता ते आपल्या कुटिलतेच्या जाळ्यांत स्वत:च गुरफटतात, परंतु त्यांना त्याचे भान नाही.



८५)    पाहा, सूरह १६, आयत ११५ या संकेताने ज्ञात होते की सूरह `नहेल' या सूरहपूर्वी अवतरित झाला आहे.
८६)    अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांचे कथन आहे, यहुदी विद्वान अरबच्या अज्ञानी लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर आक्षेप घेण्यासाठी जे प्रश्न शिकवित त्यापैकी एक म्हणजे ``मग शेवटी हे काय आहे ज्याला अल्लाह मारील (नैसर्गिक व अपघाती मृत्यू) ते तर हराम आहे आणि ज्याला आम्ही मारावे ते `हलाल' आहे!'' हे एक लहानसे उदाहरण आहे वक्र मनोवृत्तीचे जी त्या ग्रंथधारकांमध्ये प्रचलित होती. अशाप्रकारचे प्रश्न ते पुन्हा पुन्हा विचारत होते जेणेकरून सामान्य लोकांच्या मनात संभ्रम निर्माण व्हावे. सत्याच्या विरोधातील हत्यार म्हणून असे प्रश्न ते तयार करीत असत.
८७)    म्हणजे एकीकडे अल्लाहच्या ईशत्वाचा स्वीकार करणे आणि दुसरीकडे अल्लाहच्या द्रोही लोकांच्या आदेशांचे पालन करणे आणि त्यांनी निर्माण केलेल्या पद्धतीनुसार चालणे अनेकेश्वरत्व आहे. एकेश्वरत्व हा आहे की जीवन पूर्णत: अल्लाहच्या मार्गात व अल्लाहच्या आज्ञापालनात व्यतीत व्हावे. अल्लाहसह दुसऱ्यांना आज्ञादाता म्हणून स्वीकारले तर ही धारणा अनेकेश्वरत्व आहे. व्यवहारात अशा लोकांचे आज्ञापालन करणे जे अल्लाहच्या मार्गदर्शनापासून बेपर्वा होऊन स्वत:च आदेश देणे व मनाई करण्याचे अधिकारी बनले असावेत तर हे व्यावहारिक अनेकेश्वरत्व आहे.
८८)    येथे मृत्यू म्हणजे अज्ञानता आणि बुद्धीहीनतेची स्थिती आहे आणि जीवनाशी तात्पर्य ज्ञान आणि विवेक तसेच सत्यपरकतेची स्थिती आहे. ज्याला सत्य आणि असत्याची ओळख नाही, तसेच ज्याला माहीत नाही की सरळमार्ग कोणता आहे; तो भौतिक रूपाने जीवधारी जरी असला तरी वास्तविकतेच्या दृष्टीने त्याला मानवतेचे जीवन प्राप्त् नाही. तो जिवंत प्राणी जरूर आहे परंतु जिवंत माणूस नाही. जिवंत माणूस खरे तर तोच आहे ज्याला सत्य आणि असत्य, सदाचार आणि दुराचार, बरोबर आणि चुकीचे काय आहे याचे भान असते.
८९)    म्हणजे तुम्ही कशा प्रकारे ही आशा करू शकता की ज्या मनुष्याला मानवतेची चेतना प्राप्त् झाली आहे आणि जो ज्ञान प्रकाशात वक्रमार्गांना सोडून सत्य व सरळमार्गाला स्पष्टपणे पाहात आहे, तो त्या अविचारी लोकांप्रमाणे जगात जीवन व्यतीत करेल जे अज्ञानता व नादानीच्या अंधकारात भटकंती करत आहेत.
९०)    म्हणजे ज्यांच्यासमोर प्रकाश ठेवला जाईल आणि ते त्यास मान्य करणार नाहीत. ज्यांना सरळमार्गाकडे बोलाविले जाते आणि ते वक्रमार्गावरच चालणे पसंत करतात त्यांच्यासाठी अल्लाहचा कायदा हाच आहे की त्यांना अंधारच चांगला वाटतो. हे लोक आंधळयासारखे भटकणे आणि ठोकर खाऊन पुन्हा पुन्हा पडणेच पसंत करतात. त्यांना झुडूप बागे समान वाटते आणि काटेसुद्धा पुâलासमान वाटतात. त्यांना प्रत्येक दुष्कर्मात मजा वाटते. प्रत्येक मूर्खतेला ते शोध समजतात. प्रत्येक अत्याचारी अनुभवानंतर त्यापेक्षा जास्त दुसऱ्या अत्याचारी अनुभवासाठी  त्या आशेवर तयार होतात की पहिल्यांदा संयोगाने धगधगत्या विस्तवावर हात पडला परंतु आता मात्र यावेळेस मूल्यवान हिरा हाती लागेल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget