राजस्थानमधील राजकीय हालचाली
राहूल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये दोन युवा नेत्यांना कालपर्यंत फार महत्त्व होते. एक मध्यप्रदेशचे ज्योतिरादित्य शिंदे, दोन राजस्थानचे सचिन पायलट. या दोन्ही नेत्यांकडे काँग्रेस भविष्यातील पक्षाचे नेते म्हणून पाहत होते. दोघांवर काँग्रेसने मोठ्या विश्वासाने जबाबदाऱ्या टाकलेल्या होत्या. राहूल गांधी आणि सोनिया गांधी पर्यंत त्यांचा सरळ संपर्क होता. अशा या दोन्ही विश्वासू नेत्यांनी राहूल गांधींचा विश्वासघात करून पक्षाला जोरदार तडाखा दिला. त्यामुळे भाजपला दोष देण्याअगोदर काँग्रेस स्वतःचे आमदार आणि युवा नेत्यावंर का नियंत्रण ठेऊ शकत नाहीये याचा उहापोह होणे गरजेचे आहे. एक काळ होता भारतातील जवळ-जवळ प्रत्येक राज्यात काँग्रेसची सरकार होती. श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांचे सचिव आर.के. धवन होते. त्यांचा साधा फोन जरी मुख्यमंत्र्यांना गेला मुख्यमंत्री खुर्चीवरून उठून धवन यांच्याशी बोलत. आज मात्र पक्ष नेतृत्वाची कोणालाच भिती उरलेली नसून त्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक पक्ष नेतृत्वाचा कमकुवतपणा आणि दूसरी पक्षाने तत्वांशी केलेली तडजोड. सोनिया गांधीच्या गुढ आजारामुळे मंदावलेल्या राजकीय हालचाली आणि राहूल गांधी यांचा 40 वर्षानंतरही असलेला अपरिपक्वपणा यामुळे काँग्रेसजणांमध्ये आपल्या नेतृत्वाविषयी विश्वासाची भावना राहिलेली नाही. काँग्रेसचे नेते दिल्लीवरून विमानाने जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत यायचे आणि तेथून हेलीकॉप्टने सभास्थळी यायचे. भाषण करून जनतेच्या तोंडावर धूळ उडवत निघून जायचे. पण या सर्व प्रक्रियेमध्ये जो एक भारदस्तपणा होता त्याने भारून जायची व काँग्रेसच्या झोळीमध्ये मतांची बेगमी अलगद पडायची. पण काळ जसा-जसा बदलत गेला समाज माध्यमांचा उदय झाला. 900 पेक्षा अधिक वृत्तवाहिन्या रात्रंदिवस माहितीच्या नावाखाली वैचारिक प्रदुषण पसरवू लागल्या. त्यामुळे लोकांमध्ये नको तितकी राजकीय जागरूकता निर्माण झाली. काँग्रेसच्या सर्वच पहिल्या फळीमधील नेत्यांची अचाट संपत्ती जिच्याकडे जनता कधीकाळी कौतूक मिश्रित नजरेने पाहत होती नंतरने त्या कौतुकाचे रूपांतर आसुयेमध्ये झाले. लोकांच्या लक्षात आले ही प्रचंड संपत्ती काँग्रेस नेत्यांनी त्यांना गरीब ठेऊन बळकावलेली आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी घृणा जनतेच्या मनात निर्माण झाली. त्यात नवल ते कोणते. ज्योतिरादित्य असो का सचिन पायलट हे काँग्रेसमधील संस्थानिक पुत्र. त्यांच्या वयापेक्षा जास्त महत्त्व व पदे काँग्रेसने त्यांना दिली. त्यामुळे त्यांचा स्वतःबद्दल गैरसमज होणे क्रमप्राप्त होते. काँग्रेसने प्रत्येक राज्यात असे संस्थानिक पोसलेत. आज हे संस्थानिक आणि त्यांचे समर्थक हे केंद्रीय नेतृत्वाच्या नव्हे तर स्वतःच्या बळावर निवडून येत आहेत. म्हणून त्यांच्या स्वतःबद्दलच्या अपेक्षा पक्षापेक्षा मोठ्या झालेल्या आहेत. त्यातूनच पक्ष नेतृत्वाला कस्पटासमान लेखण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण झालेली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या यशस्वी बंडानंतर सचिन पायलट यांच्या मनामध्ये अतिरिक्त राजकीय महत्वकांक्षा निर्माण होणे तसे पाहता चुकीचे नाही. कारण जो काँग्रेस पक्ष ज्योतिरादित्य शिंदेंचे काही वाकडं करू शकलं नाही तो आपले काय वाकडे करणार? असा आत्मविश्वास सचिन पायलट यांच्या मनात निर्माण झाला. तर त्यात नवल ते कोणते? ज्या प्रमाणे घरातल्या भांडणाचा लाभ शेजाऱ्यांना अलगद होतो तसाच काँग्रेसच्या घरातील बंडाळीचा लाभ भाजपला अलगद होत आहे. त्यांचे तर धोरणच आहे. त्याने तर काँग्रेसचा सफाया करण्याचा चंगच बांधलेला आहे. स्वतः काँग्रेसजण भाजपच्या त्या इच्छेला खतपाणी पूर्वत असल्यामुळे भाजपला फारसा दोष देता येणार नाही. परंतु, संसदीय लोकशाही राहिली तर देश राहील. आणि संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे महत्त्व सत्ताधारी पक्षामध्ये आहे, एवढी समज भाजपाला नाही याचे आश्चर्य वाटते. कधी-कधी वाटते की, भाजपा हे जाणून बुजून करते. त्यांना सर्वच विरोधी पक्ष संपवायचे असून, संघाचा अजेंडा लागू करण्यासाठी राजकीय हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्षांना संपविण्याचे काम भाजपा ठरवून करत आहे. अशा पेचप्रसंगी सामान्य जनतेचे त्रिभाजन झालेले आहे. एक असे लोक जे खरोखर धर्मनिरपेक्ष प्रवृत्तीचे आहेत. दोन - असे लोक जे संघ प्रणित हिंदू राष्ट्राचे कट्टर समर्थक आहेत आणि तीन- असे लोक ज्यांना काँग्रेस आणि भाजपचे राजकारण कळत नाही, ते फक्त पैसे घेऊन मतदान करतात.
अशा त्रिभाजित अवस्थेत भाजप सारखा केडरबेस पक्ष ज्या गतीने फोफावायला हवा त्या गतीने फोफावत आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक धोरण नसतांना, सरकारी संस्थांची हानी होत असतांना, सरकारी प्रतिष्ठाने विकली जात असतांना हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा भाजपचा विरोध होत नाही, यावरून भाजपच्या प्रभावाचा अंदाज यावा. कोरोनाशी लढण्याची केंद्र सरकारी फसलेली नीती ही सुद्धा लोकांना विचलित करू शकली नाही, हे आपल्या देशाचे प्राक्तन. मुळात काँग्रेस नेतृत्वात जोपर्यंत बदलत होत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार.
अशा त्रिभाजित अवस्थेत भाजप सारखा केडरबेस पक्ष ज्या गतीने फोफावायला हवा त्या गतीने फोफावत आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक धोरण नसतांना, सरकारी संस्थांची हानी होत असतांना, सरकारी प्रतिष्ठाने विकली जात असतांना हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा भाजपचा विरोध होत नाही, यावरून भाजपच्या प्रभावाचा अंदाज यावा. कोरोनाशी लढण्याची केंद्र सरकारी फसलेली नीती ही सुद्धा लोकांना विचलित करू शकली नाही, हे आपल्या देशाचे प्राक्तन. मुळात काँग्रेस नेतृत्वात जोपर्यंत बदलत होत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार.
Post a Comment