Halloween Costume ideas 2015

युएईची प्रेरणादायी मंगळझेप!

संयुक्त अरब अमिरात (युएई) ने ‘होप मार्स मिशन' अंतर्गत मंगळाचा अभ्यास कराण्यासाठी पाठवण्यात आलेल्या मानवविरहीत यानाचे जपानमधील तानेगाशिमा येथील लाँच पॅडवरुन गेल्या सोमवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले, त्यामुळेच मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लिम देश असण्याचा मान मिळवला आहे. पुढील सात महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात हे यान मंगळाच्या दिशेने प्रवास करेल. त्यानंतर २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करुन तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करणार आहे. हे यान म्हणजे उमेद आणि मानवतेचे प्रतीक असल्याचे युएईने म्हटले आहे. १.३ टन वजनाचे हे यान सुमारे ५० कोटी किमीचे अंतर पार करणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक हवामानासंदर्भात अभ्यास करणारा उपग्रह मंगळावर पाठवण्यात आला आहे. या मिशनच्या माध्यमातून मंगळावरील हवा, पाण्याचा अंश आणि मातीचाही या उपग्रहामार्फत अभ्यास केला जाणार आहे. तसेच मंगळाच्या वातावरणामधून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अस्तित्व कसे संपुष्टात आले यासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळणार आहे. मंगळ ग्रहासंदर्भातील बरीच नवीन माहिती या उपग्रहाच्या मदतीने मिळणार असून मागील लाखो वर्षांमध्ये मंगळाच्या रचनेमध्ये कसा बदल झाला आहे याचाही अभ्यास या माहितीच्या आधारे करता येणार आहे. ‘होप'च्या माध्यमातून एक हजार जीबीहून अधिक नवीन माहिती मिळणार असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मिळणारी ही माहिती जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या २०० हून अधिक वैज्ञानिकांना अभ्यासासाठी मोफत देण्यात येणार आहे. या माध्यमातून पृथ्वीचे भविष्य काय असेल आणि मंगळावर मानवाला राहता येईल का यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी महत्त्वाची माहिती या मोहिमेतून मिळणार आहे. ‘होप'मार्फत मंगळ ग्रहासंदर्भात मानवाला अधिक माहिती कळावी आणि या मोहिमेमधून मिळालेली माहिती सर्वांना उपलब्ध करुन देत संशोधनासंदर्भात जगभरातील देशांमध्ये परस्पर सहाकार्याचे वातावरण तयार करण्याचा युएईचा विचार आहे. तसेच अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये युएई ही मोहीम राबविण्यासाठी सक्षम असल्याचे ‘होप मार्स मिशन'च्या माध्यमातून दाखवून द्यायचे आहे. युएईच्या या अवकाशयानाचे ‘अल अमल’ असे नाव असून त्याचा अर्थ ‘आशा’ असा होतो. या प्रकल्पात कोविड १९ चा मोठा अडथळा येत होता पण त्यावर मात करण्यात युएई सरकारला यश आले आहे. हा २०० दशलक्ष डॉलर्सचा हा प्रकल्प असून अरब जगतातील आंतरग्रहीय योजना पहिल्यांदाच यशस्वी झाली आहे. या मोहिमेसाठी अमिरातीच्या १३५ अभियंत्यांनी सहा वर्षे परिश्रम केले होते. हे अवकाशयान फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर पोहोचणार असून त्यावेळी अमिरातीच्या स्थापनेचा पन्नासावा वर्धापन दिन आहे. तसेच आखाती देशातील महिलांना आणि तरुणांना प्रेरणा देणारी युएईची ही मंगळ मोहीम असेल कारण या मोहिमेचे नेतृत्व सारा अल अमिरी करत आहेत. युएईच्या या महत्त्वकांक्षी मोहिमेचे नेतृत्व सारा अल अमिरी करत आहेत, ही एक विशेष बाब आहे. त्यांनी या मिशनबाबत सांगितले की, ही मोहीम आमच्या देशातल्या लाखो मुलांना नवीन प्रेरणा देणारी आहे आणि त्यांनी यापूर्वी कल्पनाही केली नव्हती अशा गोष्टी यामुळे आता साध्य होणार आहेत. ३३ वर्षीय सारा अल अमिरी या युएईच्या प्रगत तंत्रज्ञान मंत्री आहेत. तसेच सॉफ्टवेअर अभियंताही आहेत. सारा यांनी दुबईतील मोहम्मद बिन राशिद स्पेस सेंटरमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले आहे. येथूनच त्यांंचा कल अवकाश विज्ञानाकडे वळला. याआधी सारा यांनी अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ शारजाह येथून कॉम्प्यूटर सायन्सची पदवी मिळविली. १९८७ मध्ये जन्मलेल्या सारा यांना अवकाश विज्ञानात नेहमीच रस होता. त्याच्या करिअरच्या निवडीच्या वेळी युएईमध्ये कोणताही स्पेस प्रोग्राम नव्हता. युएईमध्ये प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीपद पहिल्यांदा जाहीर केले गेले असताना, सन २०१७ मध्ये सारा यांना या पदावर नियुक्त करण्यात आले होते. २०१७ मध्ये, सारा मंगळ मोहिमेबद्दल बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय टेड परिषदेत भाग घेणाऱ्या अमीरातच्या पहिल्या नागरिक ठरल्या आहेत. यावर्षी मंगळावर जाणाऱ्या तीन मोहिमांपैकी अमिरातीची ही एक मोहीम होती. त्याचबरोबर चीनच्या तैनवेन -१ नुकतेच प्रक्षेपण झाले असून अमेरिकेच्या मार्स २०२० ची मोहीमदेखील याच महिन्यात पूर्ण होणार आहे. जरी या मंगळ मोहिमेचा हेतू या लाल ग्रहाच्या वातावरणाविषयी आणि हवामानाविषयी माहिती गोळा करणे आहे, परंतु त्यामागील एक मोठे ध्येयदेखील आहे – आणि ते पुढील १०० वर्षांत मंगळावर मानवी वस्ती बनविणे आहे. युएई आपल्या राष्ट्रातील तरुणांमध्ये या मोहिमेतून प्रेरणा निर्माण करणार आहे.    

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget