Halloween Costume ideas 2015

ऑपरेशन काँग्रेसयुक्त भाजपा

BJP Congress
राजस्थानातील सत्तानाट्य दिवसेंदिवस नवनवीन वळणे घेत आहे. अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील हा लढा अनेक पातळ्यांवर लढला जात आहे. पायलटांची राजकीय  महत्वकांक्षा आणि त्याला आळा घालण्याचे गहलोतांचे राजकीय डावपेच यातून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षाचे स्वरुप असे वरवर दिसणारे हे सत्तानाट्य याहूनही अनेक अंगानी निराळे आहे. ते समजून घेणे त्यामुळेच महत्वाचे ठरते.आधी कर्नाटक, त्यानंतर मध्यप्रदेशातील तत्कालीन काँग्रेस सरकारे आमदारांना राजकीय  लाभाचे वेगवेगळ्या  प्रकारचे अमीष दाखवून पायउतार करण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. हे यश मिळवणे तितकेसे कठीण नव्हते याचे कारण या राज्यात असलेले काठावरचे बहुमत, ते राखणे काँग्रेससारख्या पक्षाला कठीण झाले. त्याचा पुरेपूर फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला यात कुठलेच दुमत नाही.
    भारतासारख्या बहुपक्षीय राजकीय  प्रणालीत फोडाफोडीचे राजकारण हे काही नवे नाही. याआधी हेच काम अगदी प्रामाणिकपणे काँग्रेस नेतृत्वाने केले आता त्यांची कार्यपध्दती भाजपाने पुरेपुर आत्मसात केलेली आहे. काहीही करुन सत्ताधारी कसे होता येईल हीच या पक्षाची राजकीय निती राहीलेली आहे. आधी जनसंघ त्यानंतर जनता पक्ष आणि त्याचीच सुधारीत आवृत्ती म्हणजे आजचा भाजपा. असे असले तरी आजच्या भाजपात आणि पूर्वीच्या भाजपात खूप फरक आहे. तथ्यात्मक राजकारण आणि सैध्दांतीक मुल्यांची जपवणूक करीत अडवाणी आणी वाजपेयी यांनी या पक्षांची रुजवणूक केली. त्याला आता अभूतपूर्व यश मिळाले असले तरी मुळच्या भाजपापेक्षा आजची भाजपा फार वेगळी आहे. शहा हे आजच्या भाजपाचे शिर्ष नेतृत्व आहे. आधी गुजरात आणि आता केंद्र  स्तरावर कार्य करताना संपूर्णपणे  हुकुमशाही आणि राजकीय सत्तेचा सुडासाठी होणारा वापर, प्रसंगी राजकीय विरोधकांना संपूर्णपणे नामोहरम करुन विरोधी विचार, पक्ष संपूर्णपणे चिरडून टाकून एकहाती निरंकुश सत्ता उपभोगणे ही या नेतृत्वाची कार्यपध्दती आहे. त्याचा प्रयोग आता देशपातळीवर सुरु आहे.
    ममता बँनर्जी, शरद पवार अशी देशपातळीवरील मोजकी राजकीय नेतेमंडळी वगळता अन्य कुठल्याही  नेत्यांकडे भाजपाला कडवे आव्हान  देण्याचे सामर्थ्य  राहीलेले नाही हे उघड सत्य आहे. मायावती, लालुप्रसाद यादव, यांसारख्या  डझनभर मंडळीना राजकीय अवकाश मिळू नये याचीच पुरेपूर तजवीज भाजपाने घेतली आहे. हे यश अभूतपूर्व आहे यात कुठलेही दुमत नाही. निम्याहून अधिक राज्यात सत्तास्थानी पोहचण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. आता तीन राज्यातील  सत्तेकडे भाजपाचे लक्ष लागून आहे. ते म्हणजे राजस्थान, महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगाल. यापैकी राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याचे पुरेपुर प्रयत्न सचिन पायलटकरवी अद्यापही सुरु आहेत. त्याला अजूनतरी यश मिळालेले नसले तरी राजस्थानातील गहलोत सरकारवर राजकीय  अस्थिरतेची तलवार अद्यापही  टांगती आहे. सलग तिन वेळेस राजस्थान उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर काँग्रेस आमदारांवर कुठलीही कार्यवाही करु नये असा आदेश दिला आहे. दुसरीकडे मायावतींनी आपल्या आमदारांनी सभागृहात काँग्रेसविरोधी मतदान करावे, असा पक्षादेश काढला आहे. तर गहलोत यांना बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपाल वेळ देत नाहीत. अशात गहलोत समर्थकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे पडण्यास सुरुवात झाली आहे. यात भाजपा नसेल असे क्षणभर गृहीत धरले तरी नेमके याच वेळी विशिष्ट नेतृत्वाशी संबधीतावर हे छापे पडणे या मागचा अर्थ कोणतेही विवेकी मतदार समजू शकतात. हे सगळे पडद्याआडून सचिन पायलटांकरवी भाजपा करवून घेत आहे. हे आता लपून राहिलेले नाही. यात सचिन पायलटांचे राजकीय भवितव्य संपुष्टात येण्याची चिन्हे  निर्माण झाली आहेत. आपण भाजपामध्ये प्रवेश करणार नाही असे सुतोवाच त्यांनी याआधी केले आहे. काँग्रेसने तर सरळ बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आता नवीन पक्ष स्थापन करुन आपले राजकीय भवितव्य आजमावून पाहणे हा एकमेव पर्याय पायलटांपुढे उरतो. असे असले तरी राजस्थानच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपा वगळता इतर पक्षाला जनाधार नाही. तेव्हा हे बंड यशस्वी झाले तरी पायलटांचा रस्ता आव्हानात्मक आणि तितकाच खडतर आहे. राहीला प्रश्‍न गहलोतांचा तर ते मुरब्बी आणि कसलेले राजकारणी आहेत. भाजपाने कितीही शिरा ताणल्या तरी ते सत्ता सहजासहजी हातून जाऊ देणार नाहीत हे उघड आहे. बरेचसे बंडखोर आमदार परतले असल्याने आपल्याकडे अद्यापही बहुमत शाबूत आहे अशी ग्वाही गहलोतांनी दिली आहे. प्रत्यक्ष सभागृहाच्या पटलावर विश्‍वासदर्शक ठरावावेळी काय होते यावर गहलोताचे भवितव्य अवलंबून आहे. असे असले तरी याप्रकरणी काँग्रेसच्या केंद्र स्तरावरील नेत्यांनी जी निष्क्रियता दर्शवली ती नजरेत भरणारी आहे. 2014 च्या राजकीय पराभवाच्या छायेतून काँग्रेस पक्ष अजूनही  बाहेर आलेला नाही. राहुल गांधीना राष्ट्रीय राजकारणात यशस्वी करण्याची सोनीया गांधीची राजकीय मनिषा अद्यापही कायम आहे. काँग्रेस पक्षावर गांधी घराण्याची राजकीय मक्तेदारी असावी हे अवघड दुखणे काँग्रेस पक्षाला रसातळाला नेत आहे. नव्या दमाचे नेते अजूनही या पक्षात  सक्रीय नाहीत. केवळ सत्तेच्या राजकारणापलीकडे  जाऊन देशहितासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करीत राहू असा आशावाद नेत्यांमध्ये दिसून येत नाही परिणामी सत्तेसाठी आसुसुलेले नेते वेळप्रसंगी विरोधी गटामध्ये सहभागी होत आहेत. आजच्या भाजपामध्ये निवडून आलेली बरेचशी मंडळी ही काँग्रेस वा अन्य राजकीय पक्षातून आयात झालेली आहे. भाजपाच्या वाढीसाठी खस्ता खाललेल्या अनेक नेत्यांना वयाचा निकष लावून घरी बसवले गेल्याने, अप्रत्यक्षपणे भाजपाचे एकाअर्थाने काँग्रेसीकरण झालेले आहे. भाजपा कितीही पार्टी विथ डिफरन्सचा नारा देत असली तरी पार्टी विथ काँग्रेस अशीच तिची आजची स्थिती आहे. सत्तेच्या राजकीय सारीपाटात काँग्रेसची सगळी कार्यपध्दती अगदी तंतोतंतपणे भाजपाने आत्मसात केलेली आहे. अपवाद मुस्लिमा आणि दलीतांचा अनुनय. तो काहीही केले तरी भाजपाला करता येणार नाही हे तितकेच उघड सत्य आहे. म्हणून काँग्रेसने जे केले तेच आज भाजपा करीत आहे. त्यामुळे भाजपाविरोधी अधिक आक्रमक होणे काँग्रेसला दिवसेंदिवस कठीण आणि तितकेच आव्हानात्मक झाले आहे. त्यातच राहुल गांधीची कार्यपध्दती आणी त्यांना सतत येत असलेले राजकीय अपयश यामुळे काही नेतेमंडळी अद्याप शांत दिसत असली तरी ती सुप्तपणे काँग्रेसविरोधी गटांना पोषक होईल अशी कामे करण्यात धन्यता मानत आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या पदरी अपयश येत असेत तर त्यात काही नवल नाही. मुळात राष्ट्रीय लढ्याचा प्रदीर्घ  वारसा असलेल्या पक्षावर ही वेळ का यावी हे पहाणे उद्बोधक आहे. स्वातंत्र्यानंतर अगदी इंदिरा गांधीच्या पहिल्या कार्यकाळापर्यत काँग्रेसच्या एकहाती बहुमताला टाच आणू शकेल असा एकही पक्ष नव्हता. पुढील काळात इंदिरा गांधीच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे विशेषतः आणिबाणीमुळे विरोधी विचारांच्या पक्षाला बाळसे मिळाले. अतिहुकुमशाहीमुळे दुखावलेले अनेक सुप्तघटक एकाचवेळी जनता पक्षाच्या रुपाने एकत्र झाले आणि त्यांनी  इंदिरा गांधीची सत्ता घालवली. त्यानंतर त्यांना फार काळ सत्ता यशस्वीपणे चालवता न आल्यामुळे ते सरकार कोसळले. पुन्हा  इंदिरा  गांधी सत्तेत आल्या. असे असले तरी यादरम्यान काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या प्रादेशीक नेतृत्वानी नवे पक्ष स्थापन करुन काँग्रेसला शह दिला. काळ आणि स्थितीचा विचार करुन सत्तेसाठी आघाड्यांशी युती करुन पुढील काळात काँग्रेसने आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली. या वाटचालीत वरवर धर्मनिरपेक्षतेचा झेंडा मिरवून आतून मात्र हिंदुत्ववादी विचारसरणीला पोषक अशी स्थिती  उपलब्ध करुन दिली. यामुळे  अति उजव्या विचारसरणीची यशस्वीपणे पायाभरणी झाली. तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या पारंपारीक दलीत,मुस्लिम  मतदारांसाठी फार काही करीत आहोत असा भास दाखवला.त्यामुळे दलीत, मुस्लिमांना काँग्रेससोबत राहून अन्यायापलीकडे काहीही मिळाले नाही तर हे दोन घटक वगळता अन्य घटक याला विरोध म्हणून उजव्या विचारसरणीत सहभागी झाले. त्यात नव्याने उदयाला आलेल्या ओबीसींचा मोठा भरणा होता. यामुळे काँग्रेसकडून आपली फसवणूक झाल्याची भावना दलीत मुस्लिमांमध्ये निर्माण झाल्यानंतर आपसुकच काँग्रेसला राजकीय यश मिळणे दुरापास्त झाले. कालांतराने या दोन्हीही  घटकाला समर्थ राजकीय पर्याय निर्माण झाले. आणि काँग्रेसला ओहटी लागली ती आजतागायत सुरु आहे.
     गत साठ वर्षात काँग्रेसने खूप काही देशहितासाठी केले परंतू ज्या गतीने ते व्हायला पाहिजे होते ते न झाल्यामुळे आणि त्याची आकर्षक मुद्देसुद जाहीरातबाजी न झाल्यामुळे काँग्रेस म्हणजे भष्टाचाराची वाळवी अशी मांडणी करुन ती जनतेच्या मनात ठसवण्यात विरोधी पक्षाला यश आले. त्यामुळेच 2014 साली नरेंद्र मोदींना अभूतपूर्व  यश मिळाले. ते मिळवताना कुठेही हिंदुत्वाचा गवगवा नव्हता तर धर्माच्या पलीकडे जाऊन विकासासाठी राजकारण ही आशावादी मांडणी होती हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर मात्र गत सहा वर्षात हिंदुत्वाची पुरेपुर पायाभरणी झाली. संपूर्ण देश कोरोनासारख्या आजाराशी झुंजत असताना,स्थलांतरीत शेतमजूर पायपीट करताना, चहावाल्याचा मुलगा ठिकठिकाणची सरकारे पाडून सत्तास्थानी कसे येता येईल हे पहाण्यात मश्गूल होता. आता तर देशभरात कोरोनाने थैमान घातल्यावरही प्रधानसेवक राम मंदीराची उभारणी करण्यात मश्गूल झाले आहेत. तेव्हा कुठे गेले ते विकासाचे स्वप्न, कुठे गेली ईमानदारीची भाषा, हे विचारायचे धारीष्ट्य एकाही विरोधी पक्षाकडे नाही. सगळे जण मूग गिळून गप्प आहेत. तेव्हा आता त्यांचे पुढील लक्ष महाराष्ट्रातील सत्ता कशी खिळखिळी करता येईल, महाराष्ट्रात नव्या सचिन पायलटच्या भूमीकेत कोण असेल याकडे लागले आहे.
     फडणवीस तर अक्षरशः वेडेपिसे झाले आहेत. अगदी भान आणि परस्थितीशी विसंगत अशी राजकीय  टिका करणे सोडून त्यांना कुठलाही दुसरा उद्योग नाही. आपल्या  कार्यकाळात  शेतकर्‍यांना कर्जमाफी न देता केवळ पारदर्शकतेचा ढोल पिटून अब्जावधींच्या जाहीराती वर्तमानपत्रात देऊन आम्ही ऐतीहासीक कर्जमाफी केली अशी खोटी आरोळी ठोकली. एवढेच कशाला टोकाचा भष्टाचार आणि बेबंदशाही माजवून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री  म्हणून नोंद होईल अशी  स्वतःची कामगीरी असतानाही  उद्धव ठाकरेसारख्या संयत आणि तितक्याच कसदार,निष्कलंक नेत्याला कसे बदनाम करता येईल ह्या हेतूने प्रेरीत राजकीय सुडाचे राजकारण देवेंद्र फडणवीस करताना दिसत आहेत. अगदी कोरोनाच्या संकटातही भाजपाचे मनसुबे कायम आहेत.असे असले तरी भाजपाचे आँपरेशन कमळ महाराष्ट्रात  कदापीही यशस्वी  होणार नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ती भाजपाचा राजकीय आलेख आणि सत्ताकारण पुरेपूर जाणून आहे. महाराष्ट्रातील  महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या प्रश्‍नांप्रती संवेदनशील आहे. मुख्यमंत्री  संयमी आणि तितकेच प्रगल्भ आहेत. तेव्हा अजून  पाच वर्ष तरी फडणवीसांना विरोधी बाकावर बसावे लागेल. एकणूच काय तर 2014 साली भाजपाने काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती कालौघात मात्र भारत काँग्रेसमुक्त झाला का याहीपेक्षा भाजपा काँग्रेसयुक्त झाली.हे लक्षात घेतल्यानंतर भाजपाचे आँपरेशन कमळ आता आँपरेशन काँग्रेसयुक्त भाजपामध्ये परीवर्तीत झाले आहे यात कुणाचेही दुमत नाही. (लेखक सामाजीक राजकीय प्रश्‍नांचे अभ्यासक व विश्‍लेषक आहेत)

- हर्षवर्धन घाटे,
नांदेड 9823146648

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget