Halloween Costume ideas 2015

ग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा व्हायला हवा!

कर लो दुनिया मुठ्ठी में’चा नारा लगावत भारतातील उद्योगपती श्रीमंत धिरुभाई अंबानी यांनी लावलेल्या ‘रिलायन्स’च्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्यांचे सुपूत्र मुकेश अंबानी यांनी तर उद्योग जगतात गरुडभरारी घेतली आहे. आशिया खंडातील एक नंबरचे श्रीमंत उद्योगपती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रिलायन्स जिओ भारत ही त्यांची देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. गुगल, फेसबूक या कंपन्या रिलायन्सच्या ‘जिओ’ बरोबर एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर  माहितीवहन करणाऱ्या, माहितीवर मालकी सांगणाऱ्या कंपन्या भारतात येत असताना, वैयक्तिक ग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा आपल्याकडे नाही. ऊर्जा क्षेत्रात ’ऐन्रॉन’च्या गुंतवणुकीचे स्वागत करताना आपल्याकडे जसा त्या क्षेत्रातील नियमनाचा कायदेशीर आराखडाच नव्हता, तशीच आपली स्थिती आता आहे. त्यातच, आपली माहिती-तंत्रज्ञान बाजारपेठ तुलनेने नवथर आणि ’मोफत’, ’फुकट’, स्वस्त’ अशा्नलूप्त्यांना भुलणारी आहे! गूगल, फेसबुक, अ‍ॅमेझॉन वगैरेंनी भारतात काही करतो म्हटले की हुरळून जायची प्रथाच सध्या पडलेली दिसते. याबाबत माध्यमांत स्तुतिसुमने ओंजळीत घेऊन टपलेले अनेक असतात. आताही गूगलचे सुंदर पिलाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर आणि मुख्य म्हणजे गूगलच्या भारतातील गुंतवणूक निर्णयांनंतर अनेकांच्या चेहऱ्यावर निर्माण झालेल्या आनंदलहरी अचंबित करणाऱ्या आहेत. अचंबित अशासाठी की ’आत्मनिर्भर’तेच्या घोषणेवरही हे आनंदी होणार आणि गूगलसारखी संपूर्ण आत्मकेंद्री कंपनी आपल्या देशात गुंतवणूक करणार असल्याच्या केवळ सुगाव्यानेही ते खूश होणार. हे दोन्हीही एकाच वेळी कसे असा प्रश्न पाडून घेण्याचा हा काळ नाही, हे लक्षात घेऊन या निर्णयाची चिकित्सा करायला हवी. कारण पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेत डिजिटलायझेशन मोहिमेसाठी भारतात 75 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गूगल आपल्या सूचिबद्धदेखील नसलेल्या ’जिओ’ टेलिकॉममध्ये 33 हजार 700 कोटी रु. गुंतवणार असल्याची घोषणा मुकेशभाई अंबानी यांनी केली. ही बाब पुढे काय वाढून ठेवले आहे यासाठी पुरेशी सूचक ठरते.यात जाणवणारा पहिला मुद्दा म्हणजे गूगल, फेसबुक आदींची आताची गुंतवणूक आणि नरसिंह राव यांच्या पंतप्रधानकीच्या काळात झालेली एन्रॉन कंपनीची ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक यात एक साम्य आहे. ते असे की एन्रॉनच्या निमित्ताने आपल्या ऊर्जा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक आली. परंतु ती आल्यानंतरही आपल्याकडे या गुंतवणुकीचे नियमन करणारी चौकट नव्हती. म्हणजे एन्रॉन  कंपनी आपल्या गुंतवणुकीचा परतावा ग्राहकांकडून कसा, कोणत्या दराने वसूल करणार वगैरे काहीही नियम आपल्याकडे त्या वेळी तयार नव्हते. एन्रॉन  आल्यानंतर पाच वर्षांनी हे नियम तयार करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर तितक्याच वर्षांनी ते अमलात आले. तोपर्यंत एजॉन कंपनीवर गाशा गुंडाळायची वेळ आली होती. हे असे काही गूगल वा फेसबुक यांच्याबाबत होणार नाही. या कंपन्या तेव्हाच्या एनॉनपेक्षा किती तरी प्रबळ आहेत. पण हे साम्य या कंपन्यांपेक्षा आपल्याबाबत आहे. म्हणजे असे की गूगल, फेसबुक वगैरे माहितीवहन करणाऱ्या आणि माहितीवर मालकी सांगणाऱ्या कंपन्या भारतात येत असल्या तरी अद्यापही माहिती महाजालातील वैयक्तिक ग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा आपल्याकडे अजूनही तयार नाही. गूगल, फेसबुक या कंपन्या आणि आता बरोबरीला रिलायन्स समूहाची ’ जिओ’ एकत्र येत असल्याने याचा समग्र विचार हवा. याचे कारण असे की खासगी किंवा व्यक्तिगत माहिती अधिकाराचा कायदा इतक्या वर्षांनंतरही आपल्याकडे तयार होऊ शकलेला नाही. या संदर्भात समित्या आदी नेमल्या गेल्या. त्यावर संसदेत चर्चाही झाली. पण सरकार गोळीबंद कायदा करण्यास अनुकूल नाही. तसा तो केल्यास या कंपन्यांकडील माहितीसाठ्यावर दावा सांगून घुसखोरी आणि नागरिकांवर पाळत ठेवण्याची सोय सरकारला राहणार नाही. याउलट या कंपन्या ज्या प्रदेशांतून भारतात येऊ इच्छितात त्या अमेरिका, युरोपीय देश आदींत नागरिकांचे हितरक्षण करणारे चोख व्यक्तिगत माहिती अधिकार आहेत. त्यामुळे या कंपन्यांवर त्या देश/ प्रदेशांत निबंध येतात. त्या मानाने भारतात त्यांना चांगलीच मोकळीक असेल. त्यात रिलायन्सची साथ असेल तर या कंपन्यांना अडवण्याची समस्त भारतवर्षांत कोणाची हिंमत होणार नाही. गूगल आगामी पाच-सात वर्षांत भारतात 75 हजार कोटी
गुंतवू इच्छितो. त्यानंतर बुधवारी ती कंपनी एकटया ’ जिओ’त 33 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी ’फेसबुक’नेदेखील याच कंपनीत साधारण अशाच काही रकमेच्या गुंतवणुकीची घोषणा केली. सध्या मोबाइलच्या माध्यमातून पैसे/बिले देण्याच्या सेवांमध्ये गूगल पे आघाडीवर आहे. या मोबाइल पेमेंटच्या बाजारपेठेत रांगेत आहे व्हॉट्सअ‍ॅप. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅप या माहितीवहन सेवेलाही आपल्याकडे पैसे/बिले आदी देण्याची सुविधा हवी आहे.

- सुनीलकुमार सरनाईक
मो.: ७०२८१५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्टीय युवा पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार साहित्यिक पुरस्काराने सन्मानित असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget