Halloween Costume ideas 2015

शिक्षणाचे ऑनलाइन धोरण

कोरोना महामारीचे संकट भारतासह जगभरात पसरले आहे. यात अनेकांचे संसार रस्त्यावर आले तर अनेकांनी रस्त्यावरच जगाचा निरोप घेतला. ज्यांच्याकडे आहे ते या संकटकाळात बिनधास्तपणे जीवन व्यतीत करीत आहेत तर ज्यांच्याकडे अजिबात नाही त्यांना काही का होईना सरकार व इतर सेवाभावी संस्थांकडून मदत होत आहे. मात्र हातावरचे पोट असणारे, रोजबोलीवर काम करणारे, तुटपुंज्या पगारावर मोलमजुरी करणारे तसेच मध्यमवर्गीयांवर या संकटाने चांगलाच आघात केलेला आहे. कोरोनाच्या आपातकालीन परिस्थितीत सरकारकडून नागरिकांच्या अपेक्षा असणे साहजिक आहे. सरकार लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्नही करीत आहे. मात्र सरकारच्या नीती व मनसुबे पाहता साशंकता निर्माण होण्यास वाव आहे. विविध समस्यांप्रमाणेच शिक्षणाची समस्यादेखील जनतेसमोर आ वासून उभी आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंगळवारी १४ जुलै रोजी ऑनलाइन वर्गांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यात वर्गांचा कालावधी आणि सत्र यांच्यावर मर्यादा आणण्याची शिफारस करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘प्रग्याता' असे म्हटले आहे. कोविड - १९ महामारीमुळे २४ मार्च २०२० रोजी देशभरात लॉकडाऊन पुकारला होता. सध्या देशात अनलॉकिंगची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे, मात्र विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये अद्याप बंदच आहेत. ऑनलाइन पद्धतीमुळे देशातील २४० दशलक्ष विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जात नसून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतरही बड्या शहरातील शाळादेखील आपल्या १०० टक्के विद्याथ्यांपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. याची कारणे अनेक आहेत. ती जशी तांत्रिक आहेत, तशी सामाजिक आहेत, वैयक्तिक आहेत आणि आरोग्यविषयकही आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मल्लाळ येथे ऑनलाइन शिक्षणासाठी शेतकरी वडिलांकडून वेळेत मोबाइल मिळत नसल्याने एका विद्यार्थ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात घडताना दिसत आहेत. त्यामुळे  ज्या मुलांची शिक्षण घेण्याची ऐपत नाही त्यांनी काय करायचे असा सवाल अनेक तज्ज्ञ आणि पालक संघटनांनी केला आहे. राज्यातील अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये वीजेची सुविधा उपलब्ध नाही. मुलांकडे वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे त्यांना कॉम्प्युटरपेक्षा मोबाईल किंवा टॅबवरुन ऑनलाइन शिकावे लागत आहे. पण ही यंत्रणा आणि इंटरनेटसाठी मोठा खर्च परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागात मुलांची कुचंबणा झाली आहे. शिक्षणासाठी शासनाला कराव्या लागणाऱ्या खर्चात ऑनलाइनमुळे बरीच बचत होणार असेच दिसते. म्हणजे नवीन इमारती बांधणे नको की नवीन शिक्षक नको. लोक घराबाहेर पडणार नाहीत, म्हणजे कमी ट्रॅफिक, कमी इंधन, कमी अपघात. असे कितीतरी फायदे आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक विषमता वाढेल, अशी मोठी शक्यता दिसते आहे. याचा परिणाम सामाजिक विषमता वाढण्यावर होईल. मानसिक परिणाम होत आहेत. याचे प्रमाण वाढेल अशी भीती आहे. मुलांमध्ये नैराश्य निर्माण होऊ शकते. शाळा आणि शिक्षण थांबले तर मुलींचे शिक्षण कायमचे थांबणे, लहान वयात लग्न लावून देणे अशा घटना वाढतील. मुले शाळेत न गेल्यामुळे बालमजुरी वाढण्याचा मोठा धोका आहे. ‘शालेय शिक्षणातील ऑनलाइन शिक्षण पद्धत कुचकामी आहे आणि त्यातून विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला वाव नाही,’ असे मत प्रख्यात शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले आहे. कस्तुरीरंगन हे सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. मुलांनी खेळ खेळणे हे त्यांच्या शारीरिक, मानसिक, मेंदू विकासासाठी अतिशय आवश्यक आहे. केवळ अभ्यास आणि परीक्षा यावर अवलंबून न राहता, यापुढच्या काळात कौशल्याधारित शिक्षण अग्रक्रमाने सुरू करणे आवश्यक वाटते. यात एक धोका म्हणजे शिक्षण सरकारच्या ‘एका छत्रा’खालून बाहेर पडून अन्य खासगी संस्था, कंपन्यांच्या हातात जाण्याचा. तसे झाल्यास ‘ज्याला वाटेल त्या पद्धतीने अनेक अभ्यासक्रम’ सुरू होईल. अशा प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा, जीवन कौशल्ये, संविधानाधारित मूल्ये, बालकहक्क, मुलांच्या वयोगटानुसार शैक्षणिक तत्त्वे या सर्व समाज घडणीसाठी अति आवश्यक असणाऱ्या गोष्टी मागे पडण्याचा मोठा धोका आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शासन अशा सगळ्यांनाच आता आपल्या मानसिकतेत बदल करावा लागणार आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या गोंडस नावाखाली ग्रामीण पालकदेखील नाकीनव आलेले आहेत ऑनलाइन शिक्षण किती विद्यार्थ्यासाठी फायदेशीर ठरेल हादेखील एक प्रश्नच आहे. हे करत असताना वंचित विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे लॉकडाऊन होऊ नये म्हणजे झाले! पालकांनी आता मुलांच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे सोडून तो कसा जास्तीतजास्त उत्पादक आणि सुरक्षित राहील याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याच्या संवेदना जागृत राहून तो येणाऱ्या नवीन जगात कसा बळकटपणे उभा राहील हे पाहावे लागेल.  

- शाहजहान मगदुम
मो.: ८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget