Halloween Costume ideas 2015

कोरोना, इंधनदरवाढ आणि त्रस्त जनता

सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा चांगलाच भडका उडाल्याचे  दिसून येते. सलग २२ दिवस इंधनदरात वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली. लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सामान्य नागरिक या इंधनदरवाढीमुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे गेल्या २५ दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती जशाच्या तशा आहेत. त्या प्रतिबॅरल ३५ ते ४० डॉलरच्या दरम्यान आहेत, मात्र देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल दरवाढीचे बरेच राजकीय पडसादही उमटले. इंधनदरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षासह इतर सामाजिक व व्यापारी, ट्रान्स्पोर्ट संघटनांकडून देशभरात सर्वत्र आंदोलने होत आहेत. भाववाढीचा भडका असाच होत राहिला तर एखादे दिवशी नागरिकसुद्धा भडकून उठू शकतात. एकीकडे हाताला काम नाही, जेवणाचे वांधे आहेत आणि दुसऱ्या बाजूला महागाई वाढतच आहे. सिलिंडरचे भाव वाढलेत, भाजीपाल्यांचे भाव वाढलेत, हे सगळे कमी म्हणून पेट्रोल-डिझेलचेही भाव दररोज वाढत आहेत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून येत आहेत. शिवसेनेने २५ जुलै रोजीच्या सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून ‘इंधन दरवाढ’ या विषयावरून केंद्र सरकारला सुनावले आहे. ‘सरकार बोलेना आणि इंधन दरवाढ थांबेना’ अशी सध्या स्थिती आहे. ‘अनलॉक’ झाले असले तरी आजही लाखोंना काम नाही. रोजगार नसल्याने उत्पन्न नाही. उद्योग-व्यापाराने गती घेतलेली नाही. त्यामुळे सामान्य जनतेची अवस्था ‘कोरोना भीक मागू देईना, महागाई जेवू घालीना’ अशी झाली आहे. सध्या इंधन दरवाढीचा घोडा चौखूर उधळला आहे. इंधन कंपन्यांच्या बेलगाम दरवाढीला लगाम घाला’, असे म्हणत शिवसेनेने मोदी सरकारला सुनावले आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल दरवाढीचे चटके सोसावे लागत आहेत. कोरोनाचे संकट आणखी गडद होत असताना देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला कामाधंद्यासाठी बाहेर पडणे अनिवार्य झाले आहे. अशात पेट्रोल आणि डिझेलची रोज होणारी दरवाढ असह्य होऊ लागली आहे. कोरोना संक्रमण काळात सर्व व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि कामधंदे ठप्प पडले असताना पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसची दरवाढ करण्यात आल्याने सर्वांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सध्याचा काळ संकटाचा आहे, अशा काळात लोकांच्या मदतीला सरकारने असायला पाहिजे पण सरकार उलट नफेखोरी करत असून गेल्या ३ महिन्यात २२ वेळा सरकारने इंधन दरवाढ केली आहे. २०१४ पासून आंतरराष्ट्रीय तेलबाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असतानाही सरकारने देशात इंधन दर कमी केलेले नाहीत. या काळात केंद्र सरकारने १२ वेळा केंद्रीय अबकारी कर वाढवत १८ लाख कोटी रु.हून अधिक महसूल जमा केला आहे. इंधन दरवाढीचा फटका थेट शेतकरी, नोकरदार, मध्यमवर्ग व छोट्या उद्योगधंद्यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य घरीच अडकून बसल्याल्यामुळे त्यांच्याही उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ बाजारातील किमती या कच्च्या तेलाची किंमत, रिफायनरीचा खर्च, मार्केटिंग कंपन्यांना होणारा नफा, केंद्र आणि राज्य सरकारतर्पेâ लागू करण्यात येणारा व्हॅट अर्थात मूल्याधिष्ठित कर आणि उत्पादन शुल्क, या सगळ्या घटकांची गोळाबेरीज केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरते, जी सर्वसामान्य माणसाला द्यावी लागते. उत्पादन शुल्क म्हणजे देशभरात उत्पादित होणाऱ्या वस्तूंवर सरकारतर्पेâ लावण्यात येणारा कर. कंपन्यांना हा कर भरावा लागतो. व्हॅट हा वस्तू उत्पादित होताना वेगवेगळ्या पातळ्यांवर लावला जातो. हे दोन्ही कर सरकारसाठी उत्पनाचे प्रमुख स्रोत आहेत. उत्पादन शुल्क हे केंद्र सरकारतर्पेâ तर व्हॅट राज्य सरकारकडून आकारला जातो. सध्या सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) २५४ टक्के एवढा कर घेते, असे ‘केअर रेटिंग्जचे रिसर्च’कडून सांगण्यात येते. लॉकडाऊन काळात इंधनांची गरज आणि पुरवठा दोन्हीचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे सरकारच्या उत्पनामध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. इंधन दरवाढ हे दुधारी शस्त्र आहे. महसूलासाठी इंधनांवर कर लागू करायचा की चलनवाढीवर नियंत्रण ठेवायचे हे सरकारने ठरवायचे आहे. हा धोका पत्करावा अशी परिस्थिती आहे कारण मागणीत होणारी घट तसेच आर्थिक प्रगतीला बळ मिळेल अशी शास्त्रोक्त यंत्रणा पुरवणे होय. पेट्रोलच्या किंमतींचा बाजारावर, व्यावसायिक वापरावर मोठा परिणाम होत नसला तरी डिझेलच्या किंमतींचा होतो. लॉजिस्टिक कंपन्यांना डिझेल लागते. त्यांना डिझेलसाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागली तर या कंपन्या ही रक्कम ग्राहकांकडून वसूल करू शकतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती महागाई निर्देशांकाचे अविभाज्य घटक आहेत. देशाची आर्थिक घडी लक्षात घेता, इंधनदरात वृद्धी ग्राहकांच्या खिशावर विपरीत परिणाम करणारी आहे.

- शाहजहान मगदुम
मो. : ८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget