Halloween Costume ideas 2015

सांभाळून घ्या म्हणजे झालं!

प्रति,
माननीय, आदरणीय, प्रातःस्मरणीय (हे आपलं लिहिण्यापूरतं झालं, तसं तर २४ तास तुमचंच स्मरण सुरू असतं.), तारणहार! (काही नतद्रष्ट म्हणतात की आम्ही सत्तेसाठी आमचा स्वाभिमान तुमच्याकडे तारण ठेवला आहे आणि तुम्ही त्याचं हरण केलं आहे. जाऊ द्या. आपण दुर्लक्ष करावं, त्या काँग्रेसवाल्यांकडे करतो तसं.)
तिर्थस्वरूप काकासाहेब बारामतीकर यांच्या चरणांशी
(खरं म्हणजे चरणकमळांशी असं लिहिणार होतो, पण उगाच आपला गैरसमज नको म्हणून टाळलं.) बालक उधोजीचा शिरसाष्टांग नमस्कार. पत्रास कारणे अनेक आहेत, पण थोडक्यात कैफियत मांडतो. खरं म्हणजे मी स्वतःच आपल्याला भेटून सर्व सांगणार होतो, पण लगेच त्याची ‘ब्रेकींग न्युज' झाली असती. आता मी घरातच बसतो हे सर्वांनाच माहिती आहे. एकदा त्याची बातमीही झाली आहे. परत परत ती बातमी होऊ शकत नाही. उगाच आपण घरातून बाहेर पडा आणि त्यांना आयती बातमी द्या, असं होऊ नये म्हणून हा पत्र प्रपंच.
परवा ती राजा मानसिंग बनावट चकमक प्रकरणी अकरा पोलिसांना जन्मठेप झाल्याची बातमी वाचली आणि अंगाचा थरकाप उडाला. पोलीस राजाचाही फेक एन्काऊंटर करू शकतात? ताबडतोब आमच्या दैनिक हमरीतुमरीच्या संपादकांना बोलावून घेतलं. ते पूर्वी कुठेशी तरी क्राइम रिपोर्टर होते ना, त्यामुळे त्यांना पोलीस डिपार्टमेंटची बरीचशी माहिती आहे. त्यांनीही  सांगितलं की गृहमंत्र्यांनी इशारा केला की डिपार्टमेंटवाले कोणाचाही गेम करू शकतात! ते बदल्या रद्द प्रकरण फार सिरियसली घेऊ नये असं आपण आपल्या गृहमंत्र्यांना सांगाल का? हवं तर आपण त्यांना आयएएसच्या बदल्यांचेसुद्धा अधिकार देऊन टाकू. बाळासाहेब तसे आपल्या (म्हणजे माझ्या नव्हे, तुमच्या) ऐकण्यातले आहेत. सांभाळून घ्या म्हणजे झालं!
परवा देवा नानांचा वाढदिवस होता. मी ट्विटरवर मुद्दामच ते मुख्यमंत्री असतांनाचा आमचा दोघांचा जुना फोटो टाकून शुभेच्छा दिल्या. त्यामागे त्यांना
अप्रत्यक्षपणे ते आता फक्त फोटोतलेच मुख्यमंत्री राहिले आहेत हे दाखविण्याचा उद्देश होता, पण त्यांनी ताबडतोब उत्तर पाठविले की तुम्ही टाकलेल्या फोटोतली परिस्थिती लवकरच प्रत्यक्षात येणार आहे म्हणून. हा माणूस असा नेहमी मला का घाबरवत असतो काय माहीत?मला तर या माणसाचा अजिबात भरवसा वाटत नाही. आपण दादांवर लक्ष असू द्यावे. दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असावा हा योगायोग कसा वाटतो? दादांशी सलगी करण्यासाठी देवा नानांनी आपली जन्म तारीख तर बदलून घेतली नसावी? आमच्या संपादकांना तपास करायला सांगतो. बाकी आपण समर्थ आहातच. सांभाळून घ्या म्हणजे झालं!
शेवटला आणि थोडा नाजूक मुद्दा म्हणजे येत्या पाच ऑगस्टला अयोध्येला जावं म्हणतोय. तुमच्या सूनबाईंनी तर बॅगाही भरून
ठेवल्या आहेत. आपण मोठ्या मनाने परवानगी द्याल याची खात्री आहे. सुरवातीपासूनच आमच्या पिताश्रींनी राम मंदिराचा प्रश्न लावून धरला होता हे आपण जाणताच. मी जर त्या
कार्यक्रमाला गेलो नाही तर त्यांचा आत्मा नक्कीच दुखावेल. आता सहा आठ महिन्यांपूर्वीच असंगाशी संग करून त्यांचा आत्मा दुखावला होता. आता परत परत त्यांच्या आत्म्याला क्लेश नको म्हणून जावं म्हणतोय. श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो की तिथला कार्यक्रम आटोपला की कोणालाही भेटणार नाही. सरळ घरी परत येईन. आपल्याशी दगाफटका करणार नाही.
लपवाछपवी आपल्याला आवडत नाही. आपलं जे असतं ते उघड उघड असतं. हवं तर बाळ राजेंना आपल्यापाशी ठेऊन जातो. समय कठीण आला आहे. सांभाळून घ्या म्हणजे झालं!
आपला आज्ञाधारक
उधोजी बांद्रेकर

-मुकुंद परदेशी
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र.: ७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget