Halloween Costume ideas 2015

‘इम्पॅक्ट’ अर्थात दणका!

हल्ली म्हणे मुख्यमंत्र्यांपासून ते ग्रामपंचायत सदस्यांंपर्यंत आणि राज्याच्या मुख्य सचिवांंपासून ते ग्रामसेवकांंपर्यंत सर्व जण दिवसरात्र सगळ्या वाहिन्यांवरच्या बातम्याच ऐकत बसलेले असतात. केव्हा एकदा एखाद्या वाहिनीवरच्या बातम्यांमध्ये लोकांची एखादी समस्या दाखवतात आणि केव्हा एकदाची आपण ती सोडवतो असे या सर्वांना झालेले असते. प्रशासकीय सोयीसाठी त्यांनी म्हणे कोणी कोणती वाहिनी बघायची याचे आपापसात वाटपही करून घेतले आहे! ‘मी २४ तास (ओरडतच असतो!)', ‘न्यूज १८ फेकमत', उघडा डोळे बघा नीट (तेच तेच ऐकवून आणू वीट!) आणि अशाच कोणत्याही वाहिनीवर देण्यात येणाऱ्या बातमीचा इम्पॅक्ट अर्थात दणका इतका जोरदार असतो की क्षणात ‘मातोश्री'वरून मंत्रालयात (हल्ली याला परत सचिवालय म्हणायला लागले आहेत म्हणे!) फोन जातो. मंत्रालयातून विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकारी आणि तिथून थेट खालच्या पातळीपर्यंत फोनाफोनी होऊन प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते आणि कोणतीही समस्या बघता बघता सुटून जाते. याला म्हणतात ‘इम्पॅक्ट’ अर्थात दणका! हे म्हणजे अगदी भूकंपासारखे असते, केंद्रबिंदू दूर कुठेतरी असतो आणि धक्के दुसरीकडेच कुठेतरी बसतात. इथेही केंद्रबिंदू कोणत्यातरी वाहिनीच्या बातम्यांमध्ये असतो आणि धक्के मात्र थेट मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत बसतात!
‘मी २४ तास'च्या बातम्यांमध्ये वृत्तनिवेदिका एक आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेली स्फोटक बातमी अत्यंत घाईघाईने आणि पूर्वी जुन्या चित्रपटांमध्ये शत्रुघ्न सिन्हा जितक्या जोरात ओरडून ‘खामोश!' बोलत असे तितक्याच जोरात ओरडून देत असते, ‘दादर स्टेशन बाहेरील लिंबू सरबतच्या गाडीवर लिंबू सरबतमध्ये प्रमाणापेक्षा कमी साखर टाकून गाडीवाला या करोना काळात जनतेची चक्क फसवणूक करीत आहे.’ (हेच वाक्य वाचकांनी वेगवेगळ्या पद्धतीने २० ते २५ वेळा वाचावे म्हणजे मग वाहिनीवर बातम्या ऐकल्याचा फील होईल!) ‘ही बातमी ‘मी २४ तास' वाहिनीवरच सर्वप्रथम दाखविण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी सदाभाऊ भटके प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलू या.’
‘काय म्हणशील सदा, त्या गाडीवाल्याने तुला पाहिलं आहे का?'
‘नाही. संपदा. अजून मी त्याच्या नजरेला पडलेलो नाही, पण त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर थांबून मी सरबत पिऊन आलेल्या ग्राहकांशी बोललो आहे.' सदा पाच-सहा किलोमीटर धावून आल्यावर निघेल अशा आवाजात माहिती देतो.
‘सदा, काय प्रतिक्रिया आहे लोकांची?'
‘संपदा, सरबतमध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे लोक खूपच संतप्त झालेले आहेत. या करोना काळात आपली इम्युनिटी वाढविण्यासाठी लोक लिंबू सरबत पीत आहेत आणि सरबतमध्ये कमी साखर टाकून त्यांची फसवणूक होत असतांना प्रशासन मात्र झोपलेलं आहे.'
‘सदा, खरोखरच हा फार गंभीर प्रकार आहे आणि सर्वप्रथम आपणच याला वाचा फोडली आहे. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडून याबाबतचे अपडेट्स घेतच राहणार आहोत. तू परिस्थितीवर नजर ठेव. तूर्तास तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद!'
ही बातमी ऐकताच ‘मातोश्री'वर एकच खळबळ उडाली! म्हणजे पारनेरचे पाच नगरसेवक मित्रांनीच ‘दादा'गिरी करून पळवल्यामुळे माजलेल्या खळबळीत थोडी भर पडली. मिना ( अर्थात मिलिंद नार्वेकर) नुकतेच पळवल्या गेलेल्या नगरसेवकांना परत आणण्याच्या कामगिरीवर रवाना झाल्यामुळे दादरच्या सरबतवाल्याचं प्रकरण दुसऱ्याकडे सोपविण्यात आलं. त्याने मंत्रालयात फोन केला. मंत्रालयातून अन्न व औषध आयुक्तांना, तिथून संबंधित कार्यालयाला फोनाफोनी झाली. सर्व प्रशासकीय यंत्रणा हलली. नुसतीच हलली नाही तर गदागदा हलली. अगदी रामदेव बाबांच्या पोटासारखी! हे सर्व होईपर्यंत कार्यालयीन वेळ संपल्यामुळे आणि कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयाचे कोणतेही काम केल्यास तो देशद्रोहाचा गुन्हा ठरत असल्यामुळे आणि कायद्यात त्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असल्यामुळे दादरची व्हिजिट दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संबंधित अधिकारी दादरच्या लिंबू सरबतच्या त्या गाडीवर पोहचले. आपले ओळखपत्र दाखवून मग पेलाभर लिंबू सरबत पिऊन त्यात साखर कमी असल्याची खात्री त्यांनी करून घेतली. लिंबू सरबतच्या गाडीवाल्याला याप्रकरणी त्याला काय शिक्षा होऊ शकते याची कल्पना देण्यात आली. त्याला तो करत असलेला गुन्हा आणि त्याचे परिणाम समजावून देण्यासाठी पंटरसोबत बाजूला पाठविण्यात आले. कायद्याचा ‘अर्थ' गाडीवाल्याच्या डोक्यात आणि पंटरच्या खिशात उतरल्यानंतर गाडीवाल्याला कडक शब्दांत समज देऊन सरबतमध्ये साखरेचं प्रमाण वाढविण्यास लावण्यात आलं. परत दोनदा लिंबू सरबत पिऊन ते योग्य प्रमाणात गोड झाल्याची खात्री करून त्या सरबताचे दोन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले; नंतर गोड झालेल्या तोंडाने आणि जड झालेल्या खिशाने मंडळी कार्यालयस्थ झाली.
‘‘मी २४ तास'च्या वृत्ताचा दणका! दादर स्टेशन बाहेरच्या लिंबू सरबतच्या गाडीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड! तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले!’ (वाचकांनी परत एकदा हेच वाक्य २० ते २५ वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वाचावे आणि वाहिनीवर बातमी ऐकल्याचा फील घ्यावा.) ‘काल सर्वप्रथम ‘मी २४ तास'ने दादर स्टेशन बाहेरील लिंबू सरबतवाला त्याच्या लिंबू सरबतमध्ये साखर कमी प्रमाणात टाकत असल्याचा भांडाफोड केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि आज अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या गाडीवर धाड टाकून तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले आहेत. आमचे प्रतिनिधी सदाभाऊ भटके थेट त्या सरबतच्या गाडी जवळूनच रिपोर्टिंग करीत आहेत. आपण थेट त्यांच्याकडून माहिती घेऊयात.'
‘सदा, काय परिस्थिती आहे तिथली? आज सकाळच्या प्रशासनाच्या कारवाईनंतर काही फरक जाणवतो आहे का?' ‘संपदा, कालच्या आपल्या दणक्यानंतर आज प्रशासनाने त्या गाडीवाल्यावर जी कारवाई केली त्यामुळे तो चांगलाच वठणीवर आला आहे आणि आता लोकांना गोड सरबत मिळू लागल्यामुळे लोक ‘मी २४ तास'ला धन्यवाद देत आहेत. संपदा!'
‘सदा, तू स्वतः सरबत पिऊन ते गोड असल्याची खात्री करून घेतली आहेस का?'
‘हो संपदा, मी स्वतः तशी खात्री करून घेतली आहे.'
‘सदा, असं गोड सरबत देण्यासाठी तो गाडीवाला आता लोकांकडून जास्तीचे पैसे तर घेत नाही?'
‘नाही संपदा, अगदी पहिल्याच दराने तो लोकांना सरबत देतोय आणि याचं श्रेय नक्कीच ‘मी २४ तास'ने दिलेल्या दणक्याला आहे.'
‘अगदी बरोबर आहे सदा. ‘मी २४ तास' नेहमीच लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते आणि प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत असते. आम्ही दिलेल्या दणक्याने प्रशासन कामाला लागते असा आमचा नेहमीचा अनुभव आहे.'
जाता जाता :- ते इंग्रज बेटे नशीबवान म्हणायला हवेत, की त्यांच्या काळात आपल्याकडे अशा वृत्तवाहिन्या नव्हत्या; नाही तर आपल्या एखाद्या वृत्तवाहिनीने इंग्रज आपल्या देशात बळजबरीने कसे घुसून बसले आहेत याची बातमी देताच त्या दणक्यानेच ते रातोरात आपला देश सोडून पळून गेले असते!बापरे, म्हणजे मग या देशाला महात्मा गांधी कोण हे कळलेही नसते!

-मुकुंद परदेशी
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र.: ७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget