Halloween Costume ideas 2015

अमीरूल मोमीनीन हजरत उस्मान रजि.

व्यापारात इस्लामी नैतिकतेचा परिचय करून देणारे व इस्लामसाठी सर्वाधिक संपत्ती खर्ची करणारे तीसरे खलीफा

सरे खलीफा हजरत उस्मान बिन ति अफ्फान रजि. यांचा जन्म इ.स. 576 मध्ये मक्का शहरात झाला. त्या काळी  मक्का शहरात कुरैश जमातीचे एकूण 10 कूळ गट होते. त्यापैकी दोन कुळ गट एक बनू हाशम व दोन बनू उम्मैय्या हे मातब्बर म्हणू ओळखले जात. ह. उस्मान रजि. यांचा जन्म बनू उम्मैय्या कुळ गटात झाला होता. त्यांचे वडील हजरत अफ्फान हे मक्का शहरातील मूठभर साक्षर लोकांपैकी एक होते. ते मक्का शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी होते. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबात जन्म होवूनही हजरत उस्मान रजि. हे अतिशय नम्र स्वभावाचे होते. वयात येताच त्यांनी वडिलांचा व्यापार सांभाळण्यास सुरूवात केली. आपल्या मधूर स्वभावामुळे ते अल्पावधीतच एक लोकप्रिय व प्रामाणिक ताजीर (व्यापारी) म्हणून नावारूपास आले.  त्यांचे व्यापार कौशल्य एवढे जबरदस्त होते की, ते कोणत्याही वस्तूंचा व्यापार लिलया करत. म्हणून त्यांची श्रीमंती इतकी वाढली  की लोक त्यांना  ’गनी’ (धनाढ्य)  म्हणून ओळखू लागले. त्याकाळी
श्रीमंत अरबांमध्ये असणाऱ्या  मदीरा आदी छंदापासून ते चार हात लांब राहत. त्यांनी कधीही मद्य प्राशन केले नाही, मात्र ते अनेकेश्वरवादी होते आणि मूर्तीपूजा करत. व्यापारा निमित्त अबेसिनीया, सिरीया, यमन इत्यादी देशात त्यांचे दौरे होत असत. इ.स. 610 मध्ये सिरीयामध्ये असताना  एका रात्री त्यांना दृष्टांत झाला की, मक्कामध्ये एक नवे प्रेषित उदयास आलेले आहेत तुम्ही त्यांचे शिष्यत्त्व पत्करा. त्यावरून त्यांनी आपला दौरा आटोपता घेत मक्का शहर गाठले. मक्का येथे येताच त्यांनी  शहरातील दूसरे प्रसिद्ध व्यापारी हजरत अबुबकर रजि. यांची भेट घेऊन इस्लामसंबंधी माहिती जाणून घेतली व आपल्याला झालेल्या दृष्टांताचा त्यांच्यासमोर खुलासा केला. तेव्हा ह. अबुबकर रजि. त्यांना इस्लामबद्दल  सविस्तर माहिती देऊन त्यांना इस्लाम स्विकारण्याचा सल्ला दिला. ह.अबुबकर रजि. यांच्याशी झालेल्या चर्चेवरून समाधान झाल्याने त्यांनी थेट प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे जाऊन त्यांच्या  हातावर हात ठेऊन इस्लाम स्विकारला.

इस्लाम स्विकारल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती
त्यांच्या सारख्या श्रीमंत व्यक्तीने इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे मक्का शहरामध्ये एकच गहजब उडाला. त्यांचासारखा व्यक्ती इस्लाम स्विकारतो म्हणजे इस्लाम हाच सत्य धर्म असावा, असा एक प्रबळ विचार आम जनतेत पसरला. सर्वात तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या स्वतःच्या बनी उम्मैय्या या कुळ गटातून उमटली. त्याचे कारण प्रेषित मुहम्मद सल्ल. हे त्यांच्या प्रतिस्पर्धी कुळ गटातील म्हणजे बनी हाशम मधून येत होते. हजरत उस्मान रजि. यांनी इस्लाम स्विकारून बनी हाशम गटाचे वर्चस्व मान्य केले असा समज बनी उम्मैय्यामध्ये पसरला. त्यांना आपल्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या आईसहीत अन्य नातेवाईकांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचे चुलते व बनी उम्मैय्या कुळाचे कुलपती हकम बिन आस यांनी तर ह. उस्मान रजि. यांचे हातपाय बांधून त्यांना जबर मारहाण सुद्धा केली. परंतु ते आपल्या निश्चयापासून जरासुद्धा विचलित झाले नाहीत. उलट आपल्याच कुळ गटातील दोन मातब्बर घराण्यातील आपल्या दोन पत्नींना त्यांनी इस्लाम स्विकारण्यास नकार दिल्याने घटस्फोट देऊन आगीत तेल ओतल्यासारखी कृती केली. त्यामुळे तर बनी उम्मैय्या कुळातील लोक अधिकच खवळले. परंतु हजरत उस्मान रजि. यांना कशाचीच परवा नव्हती. त्यांचे चित्त इस्लामवर स्थिर झालेले होते व त्यांना त्यातून उर्जा मिळत होती. म्हणून त्यांना स्वतःच्या जीवाचीही परवा नव्हती.
इस्लामी श्रद्धेश्वर दृढ निश्चय असेल तर सुरूवातील भरपूर त्रास होतो. परंतु त्रास सहन केला व श्रद्धेवर ठाम राहीला की प्रत्येकाला अल्लाहची छुपी मदत येते व श्रद्धावान व्यक्ती यशस्वी होतो हा प्रत्येक मुसलमानाचा अनुभव आहे. हजरत उस्मान रजि. चेही असेच झाले. हर प्रकारे प्रयत्न करूनही जेव्हा हजरत उस्मान रजि. हे इस्लामपासून मागे फिरणे तर दूर साधे विचलितही होत नाहीत, हे पाहून अल्पावधीतच बनू उमैय्यावाल्यांनी त्यांचा नाद सोडला.
त्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपली कन्या हजरत रूकैय्या रजि. यांचा विवाह हजरत उस्मान रजि. यांच्याशी करून दिला. त्यानंतर इ.स.615 मध्ये प्रेषित सल्ल. यांच्या आदेशावरून या जोडप्याने अबेसेनिया येथे हिजरत करून तेथे स्थायिक झाले. पुढे प्रेषित सल्ल. यांनी हिजरत करताच हे जोडपेही मदीना येथे पोहोचले व इस्लामीक पद्धतीने मदीना शहरात व्यापार सुरू केला.

इस्लामी व्यापाराचा एकाधिकार
हजरत उस्मान रजि. यांनी मदीनाच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी बाजारपेठेवर ज्यू व्यापाऱ्यांचा एकाधिकार होता. ते मनाला येईल तेव्हा दुकाने उघडत मनाला येईल तेव्हा बंद करीत. मनाला येईल त्या किमती ठेवत. कायम चढ्या दराने माल विकत. लोकांच्या गरजा पाहून किमती वाढवत. वजन काट्यामध्ये सुद्धा फरक ठेवत. मालाची गुणवत्ता सुद्धा लपवून ठेवत. खोट्या शपथा घेऊन हलका माल भारी असल्याचे ग्राहकांना पटवून देत. बाजारपेठेतील सर्व व्यवहार व्याजावर आधारित होते. मोठे व्यापारी छोट्या व्यापाऱ्यांना व्याजावर माल देऊन त्यांची पिळवणूक करीत होते. त्यामुळे छोटे ज्यू व्यापारीसुद्धा मोठ्या ज्यू व्यापाऱ्यांच्या या वर्तणुकीमुळे वैतागून गेले होते.
हजरत उस्मान रजि. यांनी बाजारेपेठेतील ज्यू व्यापाऱ्यांच्या वागणुकीचा अभ्यास करून शुद्ध इस्लामी पद्धतीने व्यापार सुरू केला. मालाची गुणवत्ता स्पष्ट करण्याची पद्धत सुरू केली. हलका माल व भारी माल वेगवेगळा ठेवला. सुका माल आणि ओला माल वेगवेगळा ठेवला व त्यांच्या किमतीही गुणवत्तेप्रमाणे कमी अधिक ठेवल्या. तसेच मक्काहून येतांना त्यांनी स्वतःची प्रचंड अशी संपत्ती सोबत आणलेली असल्यामुळे त्यांचे मूळ भांडवल बिनव्याजी असल्यामुळे त्यांनी ठेवलेल्या किमती ज्यू लोकांच्या व्याजी किमतीच्या पेक्षा तुलनेने कमी राहू लागल्या. खोट्या शपथा खाणे इस्लाममध्ये निषिद्ध असल्याने खरे तोलून त्यांनी व्यापार सुरू केला. दुकान उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या आदेशाप्रमाणे मुस्लिमांचा व्यापार प्रामाणिकपणे सुरू झाला. प्रेषित सल्ल. यांनी सुचविलेल्या अशाच अनेक सुधारणांमुळे व त्यांना हजरत अब्दुरहेमान बिन औफ रजि. व इतर मुस्लिम व्यापाऱ्यांची मोलाची साथ लाभल्याने अल्पावधीतच मदिनाच्या बाजारपेठेचा नूर पालटला व ज्यू व्यापाऱ्यांच्या एकाधिकाराला हादरे बसू लागले. हजरत उस्मान रजि. यांनी मक्क्याहून आणलेल्या आयत्या संपत्तीचा ओघ मदिनाच्या बाजारपेठेत वाढल्याने व ती संपत्ती बिनव्याजी बाजारात फिरू लागल्याने त्याचा फायदा मुस्लिम व्यापाऱ्यांसह छोट्या ज्यू व्यापाऱ्यांना व सर्वधर्मीय ग्राहकांनाही मिळू लागला. येणेप्रमाणे अल्पावधीतच मदिनाच्या बाजारपेठेची सुत्रे ज्यू व्यापाऱ्यांकडून स्थलांतरित होऊन आपसुकच ह.उस्मान यांच्याकडे आली. हजरत उस्मान रजि. यांचे दातृत्व त्यांचे दातृत्व सर्व विधित होते. त्यांनी अनेक छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन बाजारपेठेत उभे केले. प्रेषित सल्ल. यांच्या मस्जिदीसाठी हजरत अबुबकर रजि. यांनी जो जमिनीचा तुकडा खरेदी केला होता त्यावर मस्जिदीच्या बांधकामाचा सर्व खर्च व त्यानंतर सहा वर्षांनी तिच्या विस्ताराचा सर्व खर्च त्यांनी स्वतःउचलला. अनेक लढायांमध्ये त्यांनी सढळ हाताने संपत्ती खर्च केली. एकदा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, ’’इस्लामच्या विस्तारामध्ये ह. उस्मान रजि. यांच्या संपत्तीचा मला जेवढा उपयोग झाला तेवढा कोणाच्याच संपत्तीचा झाला नाही.’’ यावरून त्यांच्या दातृत्वाची वाचकांना कल्पना यावी.
मदिनामध्ये एक विहीर अशी होती की जीचे पाणी गोड होते व ती कधीच आटत नव्हती. मात्र तिच्यावर मुस्लिमांना मुक्त प्रवेश नव्हता. ती विहीर एका ज्यू व्यापाऱ्याच्या खाजगी मालकीची होती. हजरत उस्मान रजि. यांनी लोकांच्या पाण्याची अडचण पाहून ती विहीर 10 हजार दिरहम घेऊन खरेदी करून सर्वांसाठी खुली केली. त्यामुळे त्यांचे नाव अधिकच प्रसिद्ध झाले.

प्रेषित सल्ल. यांच्या दोन मुलींशी विवाह
इसवी 624 मध्ये हजरत रूकैय्या रजि. यांचे अल्पशः आजाराने निधन झाले तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी आपली दूसरी कन्या उम्मे कुलसूम रजि. ज्या विधवा झाल्या होत्या त्यांचा विवाह हजरत उस्मान रजि. यांच्याशी करून दिला. येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. यांच्या दोन कन्यांशी विवाह करण्याचे अपवादात्मक सौभाग्य लाभलेले ते पृथ्वीवरील एकमेव पुरूष होत.

तृतीय खलीफा पदी निवड
द्वितीय खलीफा हजरत उमर रजि. यांनीही आपल्या पूर्वीचे खलीफा हजरत अबुबकर रजि. यांच्याप्रमाणेच आपल्या पुत्राला खलीफा न बनविता आपल्या हयातीतच सहा लोकांची एक निवड समिती गठित केली होती जिच्यावर तृतीय खलीफाच्या निवडीची जबाबदारी टाकली होती. आपसात सल्लामसल्लत करून या सहापैकी कोणा एकाला त्यांनी आपल्यानंतर खलीफा म्हणून निवडावे, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. हे सहाही सहाबी रजि. आशरा-ए-मुबश्शरा (जीवंतपणीच ज्यांना स्वर्ग मिळणार असल्याची भविष्यवाणी  अल्लाहकडून झाली होती.) पैकी होते. एकापेक्षा एक विद्वान आणि सरस आणि निःस्पृह असे हे सहाबी होते. एवढेच नव्हे तर ह. उमर रजि. यांनी हे ही म्हटले होते या सहा व्यतिरिक्त कोणी सातवा व्यक्ती खलीफा बनण्यासाठी पुढे आला तर त्याचे मुंडके छाटून टाकावे. त्या सहा सहाबींची नावे खालीलप्रमाणे होत -
1. ह.उस्मान रजि. 2. हजरत अली रजि. 3. हजरत जुबैर रजि. 4. हजरत तलहा रजि. 5. हजरत सआद बिन वकास रजि. आणि 6. हजरत अब्दुरहेमान बिन औफ रजि.
या समितीने आपसात विचार विनिमय करून हजरत उस्मान रजि. यांची तृतीय खलीफा म्हणून निवड केली. ज्या दिवशी ते खलीफा झाले त्या दिवशी त्यांचे वय 70 वर्षे होते. ते सन 24 हिजरी ते सन 35 हिजरी म्हणजे 12 वर्षे खलीफा म्हणून राहिले. त्यांच्या काळात इस्लामी राज्याच्या सीमांचा बराच विस्तार झाला. एकंदरित अतिशय यशस्वी खलीफा म्हणून ते गणले जात. परंतु दुर्दैवाने त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत बसरा आणि कुफा (इरान) व सीरिया मधून आलेल्या दोन हजार मुस्लिमांच्या एका बंडखोर गटाने मदिनामध्ये घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना शहीद केले. इन्नलिल्लाही व इन्ना इलैही राजेऊन.

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget