Halloween Costume ideas 2015

द पोलीस स्टेट : दुबे एन्काऊंटर

चार वर्षापासून विकासाच्या शोधात चा असलेल्या योगी सरकार पुढे जेंव्हा भलत्याच ‘विकासाने’ आत्मसमर्पण केले तेंव्हा त्या विकासाचे देखील एन्काऊन्टर करण्यात आले. यात फक्त एक विकासच मारला गेला नाही तर त्याच्या सर्व कृष्णकृत्यांचे पुरावे देखील दफन झाले आणि अनेकांची सुटका झाली. साठ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे प्रलंबित असणारा व्यक्ती जामीनीवर अजून मोठे गुन्हे करण्यासाठी सोडण्यात येतो ही भारतीय न्यायव्यवस्थेची शोकांतिकाच नव्हे काय? प्रत्येक गुन्ह्यात जामीन मिळून गुन्हेगार पुन्हा नविन गुन्हे करायला मोकळा होत असेल तर जामीनची प्रक्रियाच कशासाठी? चालू द्या ना गुन्ह्यानंतर अजुन मोठा गुन्हा, त्यानंतर त्यापेक्षा मोठा आणि गुन्ह्याचा ‘विकासाचा’ अखंड प्रवास!
   ज्या विकास दुबेने अगदी पोलीस ठाण्यात पंचेविस पोलिसासमोर एका मंत्र्याची हत्या केली आणि कोर्टात पोलिसांनी साक्षी फिरविल्या. तेव्हा त्यांना कुठलीही शिक्षा झाली नाही किंवा कोर्टात अपीलही झाले नाही. पुराव्या आभावी तो सुटला देखील यापेक्षा सरकारची असंवेदनशिलता अजून काय होऊ शकते? एवढा मोठा पराक्रम करुनही जो कायद्याच्या कचाट्यातुन सहज सुटू शकतो त्या गुन्हेगाराला गुन्हे करण्यापासून कसे रोखणार? अपराध्याला अपराधी बनविण्यात समाजाबरोबरच न्यायपालिकेच्या प्रदीर्घ प्रक्रियेची देखील भूमिका असते कारण की न्यायदानात विलंब हे एका अर्थाने न्याय नाकारने आहे हे सर्वश्रुत आहे. वेळेवरच जर गुन्हेगाराला ठेचले नाही तर ते सबंध समाजाला वेठीस धरतात. निश्चितच विकास दुबेच्या गुन्हेगारीची सुरवात छोट्या गुन्हापासुन झाली असेल. त्यानंतर त्याच्या विकासामध्ये राजकारणी, पोलीस प्रशासन आणि याचे सहकार्य/समर्थन  तसेच न्यायव्यवस्थेच्या दिरंगाईचा देखील भुमिकेचा महत्वाचा वाटा असला पाहिजे. कोणताही गुन्हेगार या चौकडीच्या शिवाय एवढी मजल मारुच शकत नाही.
    ज्याअर्थी विकासला त्यांनी मदत केली त्याअर्थी विकासने देखील त्यांच्या उपकाराची परतफेड सातत्याने केली असावी. म्हणून विकासचा एवढा विकास झाला की त्याच्या समोर कायदा देखील क्षुल्लक झाला. त्यामुळे कायद्याचे रक्षक त्याला पकडण्यासाठी येतात तेव्हा तो एक नाही दोन नाही तर चक्क 8 पोलिसांची निघृण हत्या करतो. त्यात चक्क डिएसपी आणि दोन फौजदारांचा समावेश असतो. याव्यतिरिक्त 7-8 पोलिसांना गंभीर जखमी करतो. यापेक्षा मोठे पोलिसांचे अपयश काय असू शकेल? अगदी सुपरहिट हिन्दी चित्रपटामध्ये देखील खलनायक जास्तीत जास्त एखाद-दोन पोलिसांना मारतो. येथे तर एवढे मोठे हत्याकांड घडवून आणतो हा गडी ! आणि ते सुध्दा चक्क एके-47 रायफलने!  हिच ती एके-47 जी फक्त बाळगल्यामुळे संजय दत्तला अनेक वर्षे तुरुंगाची हवा खावी लागली होती!  ज्या योगी सरकारने गुंडाना नामोहरम करण्यासाठी शेकडो गुंडाचे एन्काऊन्टर करुन त्यांना यमसदनी पाठविले त्यानंतर देखील योगी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची एवढी भयानक परिस्थिती आहे, हे आश्चर्यजनक आहे. एन्काऊन्टरच्या माध्यमातुन योगी सरकारने आपल्या अनेक विरोधकांचा काटा काढल्याच्या विरोधकांच्या दाव्याला देखिल बळ मिळतो.
    विकास दुबे निश्चितच मृत्युदंडाला पात्र होता यात शंकाच नाही. परंतु ज्या पध्दतीने त्याला शिक्षा देण्यात आली ती समर्थनीय नाही. शिक्षा ही सुडाच्या भावनेतुन न देता न्यायाच्या चौकटीत दिली जाते. पोलीस यंत्रणा ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आहे न्याय देण्यासाठी नाही. त्यासाठी आपल्या देशात न्यायपालिका नावाची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. जर पोलिसांनीच न्याय द्याला सुरवात केली आणि जनतेने त्याचे समर्थन केले तर लवकरच आपले राष्ट्र अराजकतेचे राष्ट्र होईल आणि लोकशाही संपुष्टात येऊन हे पोलीस स्टेट होईल यात शंका नाही आणि हे आपल्याला परवडणार नाही. यानंतर राजकारणापोटी पोलीस कोणत्याही नागरीकाला कुख्यात गुन्हेगार म्हणून त्याची हत्या करु शकतात.
   न्यायाच्या प्रक्रियेत संपूर्ण साक्षीपुराव्याची पडताळणी होऊन न्याय दिला जातो. कोणतीही शहानिशा न करता सुडाच्या भावनेतून किंवा राजकारणाच्या दबावाखाली झालेले एन्काऊन्टर हे अपराध्याला शिक्षा नसुन हत्या आहे. कायद्याची प्रदीर्घ प्रक्रिया अनेक अपराध्यांना गुन्ह्यातून मुक्त करीत असेल तर आपल्याला कायद्याच्या प्रणालीत आमुलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. जलद गतीने न्याय मिळण्यासाठी पोलिसांना किंवा कोणत्या व्यक्तीला कायदा हातात घेऊन बंदुकीच्या जोरावर न्याय करण्याची नाही. कारण विषय हा एका विकास दुबेचा नाही. अशा प्रवृत्तीच्या हजारो लाखो गुन्हेगारांचा आहे. प्रत्येक गुन्हेगारासाठी आपण न्यायासाठी असेच ‘एन्काऊंटर’चा समर्थन करणार का? असे झाल्यास न्यायपालीकेची गरजच राहणार नाही. आणि तातडीने निर्णय बंदुकीची गोळी करेल. आणि आपले राज्य कायद्यानुसार न चालता बंदुकीच्या गोळीने चालेल. कोणी वेडा देखील विश्वास करणार नाही अशा हास्यास्पद पद्धतीने विकास दुबेचा एन्काउंटर घडविण्यात आला. यावरुन सरकार जनतेला किती मूर्ख समझते याचा प्रत्यय येतो. कोरोनामुळे पदोपदी बैरिकेटसह पोलिसांचे चेकपॉईंट असतांना देखील देशातील सर्वात वाँटेड व्यक्ती एक नाही दोन नाही तर तीन-तीन राज्यात सात दिवस मुक्त भ्रमण करतो यापेक्षा पोलीस यंत्रनेचे वाभाडे तरी किती निघनार?
    आता प्रश्न राहतो की एवढ्या तातडीने ‘विकास’ ला का मारण्यात आले?’ कारण विकास एका प्रचंड मोठ्या गुन्हेगारी विश्वाचा चेहरा मात्र होता. अनेक राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस इत्यादी त्याचे भागीदार आणि समर्थक असावेत जेणेकरुन विकासचा गुन्हेगारीच्या दुनियेत एवढा विकास शक्य झाला. विकास जर पकडला गेला असता तर निश्चितच त्याचे लागेबांधे उघड झाले असतेच आणि भर पावसाळयात उत्तर प्रदेशामध्ये मोठे भुकंप आले असते. निश्चितच या धक्क्याने शेजारी असलेला बिहार देखील हादरला असता. आणि निवडणूकांच्या तोंडावर बिहारचे हादरणे  परवडू शकले नसते म्हणून चार गोळ्यांनी संभाव्य भुकंप रोखता आला हे राजकीय मुत्सदेगिरीचे द्योतक नाही का? विकासला लागलेल्या या गोळ्यांनी अनेकांचे जीवन वाचविले हे मात्र निश्चित!
    विकासला लागलेल्या गोळ्यांनी एका कुविख्यात गुन्हेगाराचा अंत झाला मात्र या गुन्हेगारी विश्वामागील सुत्रधार वाचले, पुन्हा अशा विकासना जन्म देण्यासाठी! त्यामुळे विकासला शिक्षा मिळणे महत्वाचे असली तरी त्यामागील सुत्रधार जोपर्यंत ठेचत नाही तोपर्यंत अशा अनेक विकासचे एनकाउन्टर होत राहणार परंतु अशा घातक प्रवृत्ती संपणार नाही. समाज अशा गुन्हेगारी प्रवृत्तीपासून असुरक्षित आणि अशांत राहणार. कारण मेला तरी विकास मेला मात्र सुत्रधार अब भी जिंदा है !

- अर्शद शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget