Halloween Costume ideas 2015

मोहम्मद अली गार्ड : समर्पित कार्यकर्त्याचे संघर्षशील जीवन

      अस्थवस्थ करणार्‍या वर्तमानात समाजमनावर प्रत्याघात करण्यासाठी प्रतिगामी शक्ती जेंव्हा सरसावतात तेंव्हा समाजातील काही समाजधुरीण त्याच्या विरोधात ठामपणे उभे राहतात. समाजाचं वर्तमान विकृत होऊ नये, भविष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ते लढण्यासाठी पुढे येतात. कधी-कधी तर समाजाच्या भविष्यासाठी स्वतःचं वर्तमानदेखील ते उद्ध्वस्त करुन घेतात. काळाच्या पुढे पाहतात आणि काळाशी भिडतात देखील. काळाचा हात हातात घेऊन कालचक्राला आपल्या गतीने पुढे ओढत नेतात. काळ बदलवतात आणि स्वतःला कालपरिवर्तक ठरवतात. इतिहास घडवतात आणि स्वतः इतिहासजमा होतात. अशा इतिहासात जमा झालेल्या अनेक व्यक्तींचे बोट धरुन समाज कित्येक वर्षे पुढे चालत राहतो. इतिहास अशा अनेक व्यक्तींना आपल्या उदरात सामावून घेऊन समृध्द झाला आहे. आजही काळाची पावलं पुढे पडताहेत तशी काळाला दिशा देऊ शकणारी माणसं काळाच्या अक्राळ विक्राळ जबड्यात आपला देह ठेवताहेत. ज्यांच बोट धरुन चालावं अशी माणसं एकापाठोपाठ एक समाजातून कमी होताहेत.
      मागील आठवड्यात मोहम्मद अली गार्ड ह्या काळाला आव्हान देत संघर्षशील जीवन जगलेल्या एका समर्पित कार्यकर्त्याने आपला इहलोकीचा प्रवास संपवला. मोहम्मद अली गार्ड यांच्या जाण्याने समाजात पोकळी निर्माण व्हावी इतकी जागा त्यांनी स्वतःच्या अस्तीत्वाने व्यापून टाकली होती. अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता आणि इतके करुनही दुनियेत आलोच नाही असे ते माघारी फिरले देखील. त्यांनी कधी आत्मस्तुती, आत्मगौरवाच्या सिमेजवळही स्वतःला उभे केले नाही. स्वतः समर्पण आणि संयमाशी आजन्म नाळ जोडून ठेवली.
      गार्डसाहेबांचा जन्म तसा अतिसामान्य परिवारातला. जन्मानेच थोरलेपण विधात्याने दिलेले. सामाजिक स्थित्यंतराचे काळातला म्हणजे स्वातंत्र्यपुर्वकाळातला त्यांचा जन्म. सहा भाऊ आणि सहा बहीणी असा विशाल परिवार. जगात पहिला श्‍वास घेतला तेंव्हापासून त्यांनी कुटुंबासमवेत जगण्यासाठीचा संघर्ष आरंभला. जस-जसे कळत्या सवरत्या वयात आले तस-तसे त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी वाढली. सुदैवाने रेल्वेत गार्डची नोकरी मिळाली. क्लासवन झाले. पण या नोकरीचे सुख त्यांना काही मिळाले नाही. सहा बहीणींची लग्ने, भावंडांचे बस्तान बसवण्यापासून सार्‍याच गोष्टी त्यांनी केल्या. त्यातही फाळणीनंतर एका भावाने पाकीस्तानात स्थलांतर केले. कमवत्या वयात त्यांना भावा बहीणींसाठी आयुष्याची पुंजी समर्पित करावी लागली. तरी ते कधी कुरकुरले नाहीत. कधी त्यांनी कसली तक्रार केली नाही. जगत राहिले, लढत राहिले. संघर्ष हाच जणू त्यांचा स्थायीभाव होता. विवाहानंतर देखील हा संघर्ष सुरुच होता. गार्ड साहेबांना एकुण आपत्य दहा. प्रत्येकाच्या आयुष्याला आधार देण्याची जबाबदारी गार्ड साहेबांनी पेलली. कधी त्यांनी माघार घेतली नाही किंवा ते कधी हताश झाल्याचे कुणी पाहिले नाही. स्वतःच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांना तिलांजली देत ते जगले. क्लासवनची नोकरी लागल्यानंतर त्यांनी एक लुना मोटारसायकल खरेदी केली होती. हात-पाय सोबतीला होते तोपर्यंत त्यांनी तेच वाहन वापरले. आयुष्य इतरांना आधार देण्यातच खर्ची घालायचे हा जणू निर्धारच त्यांनी केला असावा.
      सोलापूरच्या जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या स्थापनेपासूनचे ते सदस्य होते. जमाअतच्या विचारांवर, मुल्यांवर त्यांची अढळ निष्ठा होती. मरहूम सरफराज हुसैन काझी, मुस्तफा खान आणि अ. हकीम खान यांच्या समवेत त्यांनी सोलापूरच्या जमाअतची धुरा खांद्यावर वाहिली. 1992 च्या जमाअतवरील बंदीच्या वेळी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. पण त्यामुळे त्यांचे निष्ठांतर झाले नाही. संकटातून त्यांचे विचार आणि निष्ठा अधिक दृढ होत गेल्या. इस्लामी जीवनमुल्यांच्या प्रसारासाठी ते झटत राहिले. कोणत्याही चळवळीला तात्वीक आधार प्रदान करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी लागते. गार्डसाहेब हे जमाअतचे त्या फळीतले कार्यकर्ते. गार्डसाहेब प्रचंड व्यासंगी विद्वान. गार्डसाहेबांचे ग्रंथप्रेम विख्यात होते. 2011 साली पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांना पुण्याला मुलाकडे स्थलांतरीत होण्याची वेळ आली. ज्या शहराची जडण-घडण डोळ्यांनी पाहिली. ज्या शहरातून सारी हयात घालवली ते शहर जड पावलांनी त्यांना सोडावे लागले. जाताना तब्बल एक छोट्या रिक्षाट्रॉली भरून पुस्तकं त्यांनी सोलापूरातल्या अल्लामा इक्बाल अवामी लायब्ररीला दिली. आयुष्यभर त्यांनी एक कटाक्ष पाळला होता. वेतनातील 25 टक्के रक्कम पुस्तक खरेदी करण्यात, साहित्यसेवेत खर्ची घालणे. तो त्यांनी आयुष्यभर पाळला. त्याचे फलित म्हणजे मोठ - मोठ्या विद्वानांना लाजवणारे त्यांचे प्रचंड मोठे ग्रंथालय.
      गार्डसाहेब नुसते वाचत बसले नाहीत. जे वाचलं त्यावर त्यांनी चिंतन केले. जे चिंतन केलं ते प्रत्यक्षात यावं म्हणून ते झटत राहिले. गार्डसाहेबांप्रमाणेच एडव्होकेट सय्यद शाह गाजीउद्दीन हे सोलापूरतील मोठे समाजचिंतक. फकीरीला वैभव मानून जगलेल्या या दोन समाजधुरीणात मैत्री झाली नसती तरच नवल. दोघे एकमेकांचे जीवलग मित्र. मुफ्ती मोहम्मद युसुफ, गार्डसाहेब आणि गाजीउद्दीन साहेब ज्यावेळी एकत्र बसत त्यावेळी त्यांच्यात विद्वेत्तेची जुगलबंदी पहायला मिळत असे. अवघ्या तासाभरात एकमेकांच्या मुद्यांच्या पुष्ठ्यर्थ शेकडो संदर्भ सांगितले जायचे. हास्यविनोदातूनही विद्वत्तेचा प्रवाह अखंडीत वाहत राहायचा. गालीब हजरजबाबी शायर होता असे म्हटले जाते. त्याने जीवनाच्या अनेक अंगावर भाष्य केले. गार्डसाहेब गालीबच्या तुलनेत हजरजबाबी रसिक होते. जीवनाच्या कोणत्या प्रसंगावर कोणत्या शायरने कोणती शायरी लिहली आहे, हे ते सहज सांगत असत. गार्डसाहेबांनी स्वतः शायरी देखील केली. अनेक उर्दु काव्यमैफली त्यांनी गाजवल्या. लेख लिहिले. जमाअत इस्लामी च्या ‘दावत ’ या मुखपत्रात त्यांचे अनेक लेख प्रकाशीत झाले होते.
      गाजीउद्दीन साहेब आणि मोहम्मद गार्ड साहेबांनी मिळून ‘आईना-ए-अय्याम’ नावाचे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले होते. गाजीउद्दीन साहेब त्याचे संपादक आणि गार्डसाहेब त्याचे सबकुछ. अशा विद्वजनांनी आईना-ए-अय्याम मोठ्या यशस्वीतेने चालवले. गार्डसाहेब त्याचे अनेक मनोरंजक किस्से आपल्या बहारदार शैलीत सांगत असत. गार्डसाहेबांची कथनशैली अप्रतीम होती. उर्दूवरील त्यांचे प्रभुत्त्व शब्दातीत होते. गाजीउद्दीन साहेबांनी लिहिलेल्या प्रत्येक ग्रंथाचे प्रुफ रिडींग गार्डसाहेबांनी हक्काने केले. गाजीउद्दीन साहेबांच्या पुस्तक प्रकाशनात ते स्वतःच्या अस्तीत्वाने कार्यक्रमाला व्यापून टाकत. सूत्रसंचालन असो की प्रास्ताविक कधी त्यांनी कोणतीही जबाबदारी लहान मोठी मानली नाही.
      गार्डसाहेब जिथे गेले तिथे संघर्षाचा बाणा त्यांचा कायम राहिला. रेल्वेतून निवृत्ती पत्करल्यानंतर ते पेन्शनर्सच्या हक्कासाठी लढत राहिले. अखेरीस 2011 मध्ये पत्नी आणि मुलाच्या निधनानंतर ते जायबंदी झाले. पुण्यात सिमेंटच्या जंगलात त्यांना फ्लॅटसंस्कृतीत त्यांना रहावे लागले. देहाला घेउन उभ्या असलेल्या पायातही अशक्तपणा प्रचंड वाढला होता. अनेक  व्याधी शरीरात घर करुन होत्या. सहचरणीच्या जाण्याने एकाकीपण बोचणारे होते. आयुष्यभर दुसर्‍यांसाठी झटणार्‍या या समर्पित कार्यकर्त्याला अखेरीस निसर्गाने एकाठिकाणी जखडून टाकले. स्वतःच्या शहरापासून दुरु नेले. एका समर्पित कार्यकर्त्याची अखेर जीवनाला शोभेल अशी झाली. गार्ड साहेबांच्या जाण्याने सोलापूरकरांनी एक हरहुन्नरी आणि अभ्यासू, मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन निघणार नाही. अल्लाहकडे प्रार्थना आहे की, अल्लाह त्यांना जन्नत नशीब करो आणि त्यांच्या परिवाराला मोठे धैर्य देओ. (आमीन)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget