Halloween Costume ideas 2015

मनात पावित्र्य आणि उच्च चारित्र्य हाच मुक्तीमार्ग

वकार अहमद अलीम
9987801906
चराचर सृष्टी मानवाला न उमगलेली एक गूढ व्यवस्था आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? कोणी केली? का केली? माणसांची उत्पत्ती कोणी, कधी व का केली? याचे उत्तर तो विज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरून स्पष्टीकरण देतो, तोच धर्म ! तीच एकमेव जीवनपद्धती!
    इस्लाम केवळ उपासनेचे नाव नाही (धर्म नाही) तर ती एक परिपूर्ण जीवनपद्धती आहे. इस्लामचे मुख्यत: दोन स्त्रोत आहेत. एक अल्लाहची वाणी ’कुरआन’ आणि दूसरे इस्लामचे अंतीम प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) यांचे आचरण (सुन्नाह). इस्लाम समजण्याचे हेच अधिकृत स्त्रोत आहेत.
    श्रद्धावंत लोकांच्या दृष्टीने धर्म, आस्था आणि भक्ती ही एक अत्यंत भावनिक गोष्ट आहे. विद्रोही, ईश्‍वराच्या अस्तित्वाचा इन्कार करणार्‍या (काफीर) लोकांच्या दृष्टीने धर्म ही अफूची गोळी आहे. शेवटी धर्म म्हणजे काय? त्याची वास्तविकता काय आहे? मानवाला मानवाप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी शक्ती म्हणजे धर्म होय. हैवान आणि सैतानापासून मानव भिन्न आहे हे दाखविणारी गोष्ट म्हणजे धर्म. माणसाला माणसांशी जोडणारा पूल म्हणजे धर्म.
ईश्‍वराचे स्वरूप : आपला देशच नव्हे तर जगातील कुठल्याही भागात, मानवांचा प्राचीन इतिहास व प्राचीन जातीचे अवशेष हेच दर्शवितात की, माणसाचे मन व त्याचे अंत:करण ईश्‍वराच्या कल्पनेविरहित कधीच राहिले नाही. मानवाने प्रत्येक युगात ईश्‍वराला कोणत्या ना कोणत्या रूपात मानले आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याची उपासना जरूर केली आहे. ईश्‍वर एकच आहेत की अनेक? त्याचे गूण कोणकोणते? मानवाचे स्थान काय आहे? त्याचा शेवट कसा होणार आहे? मानवाचे ईश्‍वराशी संबंध - (उर्वरित पान 2 वर)
कशा प्रकारचे असले पाहिजेत? अशा सर्व प्रश्‍नांची उत्तरे म्हणजे धर्म ! धर्म माणसाच्या स्वभावात भिनलेला आहे. मनुष्य प्रथमत:च अस्तित्वात आला तेव्हापासून तो अस्तित्वात आहे आणि जोपर्यंत तो या संसारात आहे, तोपर्यंत तो उरणार आहे.
    मानवाची अगतिकता : मनुष्य ’दास’च म्हणून अस्तित्वात आला आहे. मानवामध्ये प्रचंड शक्ती आणि अधिकार असुनसुद्धा स्वभावत:च तो लाचार आणि दुर्बल आहे. या सृष्टीचा निर्माणकर्ता ज्याने मानवाला जन्म देऊन, सर्वोत्कृष्टपणे त्याला आकार दिले. ”लकद् खलकनल इन्सान फी अहसनील तक्वीम्” (कुरआन : सुरह - अत्तीन, आयत नंं.4). भावार्थ : ”आम्ही मानवाला उत्कृष्ट रचनेत निर्माण केले.”
    मानव सृष्टीमध्ये नव्हता. त्याला जगामध्ये पाठविले गेले. जगात तो चिरस्थायी स्वरूपात राहणार नाही. त्याला हे जग सोडावे लागते. हे एक कष्टू सत्य आहे. ज्याला बुद्धी असणारा कोणीही इन्कार करू शकत नाही. प्रत्येक मुस्लिमाचे प्रेत दफन करताना जीवंत माणसांना याची आठवण दिली जाते.
    ”मिनहा खल़कनाकुम व फिहा नुईदुकूम व मिनहा नुखरिजुकूम तारतन् उखरा” (सुरह : ताहा 20, आयत क्र. 55).    म्हणजेच ”याच जमिनीतून आम्ही तुम्हाला निर्माण केले. हिच्यातच आम्ही तुम्हाला परत नेऊ आणि हिच्यातूनच तुम्हाला दुसर्‍यांदा बाहेर काढू”
    भावार्थ : ”याच मातीतून तुम्हाला जन्माला घातले गेले, यातच तुम्ही वाढलात, या मातीतूनच तुम्हाला बाहेर काढले जाईल आणि आमच्या समक्ष (ईश्‍वरासमक्ष) तुम्हाला उभे करण्यात येवून, विचारले जाईल) जगात तुम्ही काय करून आलात?” मानव या जगात बेजबाबार नाही, तर आपल्या भौतीक जीवनातील प्रत्येक क्षणाचा, कर्माचा तो ईश्‍वरासमोर उत्तरदायी आहे.
    सूर्य व चंद्राचे भ्रमण, दिवस-रात्रीचे उलटफेर, प्रचंड आकारात व वजनाचे पाण्याचे ढग, मृत जमिनीतून जीवनावश्यक धान्य, फळे, वनस्पती आदीमधून सृष्टीच्या इतक्या महान कारखान्याचा निर्माणकर्ता कुणीतरी अज्ञानी बालक नाही.’ ज्याने पोरखेळ म्हणून हे सर्वकाही निर्माण केले.
    ईश्‍वराच्या प्रत्येक कणाच्या निर्मितीत एक गंभीर उद्देश गर्भित असल्याचे दिसून येते. मानवाची निर्मिती करताना ईश्‍वराने मानवाला बुद्धी, विवेक, जबाबदारी, विनियोग अधिकार आणि ईश्‍वरी संतोळीचे मार्गदर्शन दिले. अशा मानवाला मृत्यू देऊन, त्याच्या भौतीक जीवनाच्या प्रत्येक चांगल्या-वाईट जीवनकार्याचा हिशोब कधी घेणार नाही, अशी अपेक्षा सुज्ञ माणूस तरी करणार नाही. बौद्धिक दृष्टीने देखील प्रत्येक कृत्याचे चांगले किंवा वाईट परिणाम होत असतात, अपेक्षित असतात, त्या अर्थी मानवाला हिशोबाशिवाय असेच सोडून दिले जाईल? हे कसे शक्य आहे?
    मानवाची अज्ञानता व विवशता सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता, मानवाचा जन्म, मृत्यू देणारा ईश्‍वर आहे हे मान्य केल्यानंतर, मानवाने त्या ईश्‍वरासमोरच आपले मस्तक टेकविले पाहिजे. परंतु, अज्ञानापोटी ईश्‍वराऐवजी ईश्‍वरनिर्मित वस्तुसमोरच तो नतमस्तक होतो. माणसाला ज्या वस्तू प्रचंड आणि शक्तीशाली दिसतात,  अज्ञानामुळे तो त्यांची पूजा करू लागतो. सूर्य, चंद्र, पृथ्वी, नद्या, पर्वत आणि पशुंची तो ईश्‍वर समजून पूजा करू लागतो. गंभीरपणे विचार केल्यास असे दिसून येते की, या सर्व वस्तू स्वयंनिर्मित नसून, त्यांना निर्माण करणारा आहे. निर्मितीला निर्माता समजले की अज्ञानता आहे. कारण महाप्रचंड पशू सुद्धा किरकोळ मच्छराप्रमाणे मृत्युमुखी पडतो. प्रचंड मोठमोठ्या नद्यासुद्धा कोरडे पडतात. प्रचंड पर्वतांना तर दस्तुरखुद्द मनुष्यच छिन्नविछिन्न करीत असतो. पृथ्वीचे सुफलाम होणे पाण्यावर अवलंबून आहे, जमिनिच्या अखत्यारित नाही. सूर्य, चंद्र व नक्षत्रे सुद्धा एका नियमाला बांधील आहेत. नियमाविरूद्ध ते स्वत: काहीही करू शकत नाहीत. काही अदृश्य शक्ती जगावर आणि मानवांवर राज्य करते अशा भ्रामक कल्पनेतून मानव निर्मित वस्तूंना समर्पित होतो, मग प्रकाश, वायू, जल, पृथ्वी आदि वस्तूंचे विभिन्न देव वेगवेगळे असल्याचे मानतो. त्यांच्या काल्पनिक मूर्ती घडवून त्यांची पूजा करीत असतो. यासंबंधी तुकाराम महाराज म्हणतात,
” तुका म्हणे कैसे आंधळे हे जन । गेले विसरून खर्‍या देवा ॥
आपुला तो एक करूनी घ्यावा । तेणे वीण जीवा सुख नव्हे ॥
अल्ला एक तु, नबी एक तु ।  काटते सिर-पावो हाते नही जीव डराए ॥
(तुकाराम गाथा, वैद्यगोळी, अभंग क्र. 3988)
    यासंबंधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
” मुहम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शहाणा ।
संघटित केले प्यारे स्वजना, त्या काळी ॥
    लोक प्रतिमापूजक नसावे, त्यांनी एका ईश्‍वरांशी प्रार्थावे ।
    हा मुहम्मदाचा उपदेश नव्हे एकच । देशासाठी ॥
     (संदर्भ : ग्रामगीता)
    विश्‍वव्यवस्थेत वायूची गती, पावसाचे आगमन, नक्षत्राचे भ्रमण, ऋतूचे परिवर्तन यात नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे. विश्‍वव्यवस्थेतील सदरहु सह्योग आणि काटेकोरपणा पाहून एक सर्वात महान ईश्‍वर आहे, तोच सर्वांवर राज्य करीत आहे. जर अनेक ईश्‍वरे आपापल्या इच्छेनुसार काम करीत असतील, तर संपूर्ण सृष्टीव्यवस्थाच कोलमडून पडेल. माणसाने कुणा एका सर्वोच्च सत्तेपुढे आपली मान तुकवावी त्याची उपासना करीत रहावी ही त्यांची स्वाभाविक निकड आहे. ही अनादी कालापासून आहे आणि आत्तापर्यंत राहणार आहे. परंतु, मनुष्य केवळ आपली बुद्धी आणि ज्ञानेेंद्रियाच्या आधारे ईश्‍वराचे स्वरूप, त्याचे अस्तित्व व सत्ता जाणू शकत नाही.
    प्रेषितांचे आगमन : ईश्‍वराने मानवाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे. मानवामधूनच काही मानवांना प्रेषित म्हणून जगामध्ये पाठविले, जे एकाच ईश्‍वरावर पूरेपूर श्रद्धा (विश्‍वास, इमान) ठेवणारे व ईश्‍वरी इच्छेचे पालन करणारे होते. आपला संदेश प्रेषितांप्रत पोहोचविले. त्यांना सत्यज्ञान देऊन, जीवन जगण्याचा योग्य कायदा शिकविला. ज्या यशस्वी मार्गावरून आदमची संतती दूर गेली होती त्यांना यशस्वी जीवनमार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, म्हणून प्रेषितपदी त्यांची नियुक्ती केली. आद्य मानव ह. आदम (अ.स.) पासून ते अंतीम प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) अशा जवळपास 1 लाख 24 हजार प्रेषितांची साखळी ईश्‍वराने निर्माण केली. जगातील विविध भागात प्रेषित आले त्यांनी लोकांना त्यांच्या मायबोली भाषेत ईश्‍वरांचा संदेश पोहोचविला त्या सर्वांचा धर्म एकच होता. सर्वच प्रेषितांनी आपापल्या काळात उत्तम प्रकारे ध्येयपूर्तता केली.
अंतीम प्रेषित : - साडे चौदाशे वर्षापूर्वी ईश्‍वराने अरबस्थानात आपला अंतीम प्रेषित म्हणून ह. मुहम्मद (सल्ल.) यांना पाठविले. पूर्वीचे प्रेषित ज्या कार्यासाठी आले होते, तेच कार्य ह. मुहम्मद (स.) यांनी केले. त्यांनी समस्त मानवांना सत्यमार्गाकडे बोलाविले आणि ईश्‍वरी संदेश लोकांपर्यत पोहोचविला. याच आवाहनाला ’इस्लाम’ म्हणतात. इस्लामचे आणि मुस्लिमांचे कट्टर विरोधक वि.दा. सावरकर प्रेषित मुहम्मद (स.) संबंधी लिहितात, ”मरणासन्न समाजात त्या (इस्लामी) संंस्कृतीने नवचैतन्याचे वारे संचारले होते. ज्या दिवशी मुहम्मद (सल्ल.) पैगंबरांनी (रमजानच्या एक रात्री) कुराण शरीफचा पहिला श्‍लोक उच्चारला त्या दिवसापासून इस्लामी संस्कृतीत, त्या काळच्या अनेक जीर्णशीर्ण संस्कृतीपेक्षा, जे एकंदरीत त्या काळाच्या जगतात, नुसते जगण्यासच नव्हे, तर या जगास जिंकण्यासही समर्थ तर आणि योग्यतर ठरेल, असे काहितरी असामान्य श्रेष्ठत्व, काहीतरी नवे जीवनतत्व होतेच हे निर्विवाद आहे” (संदर्भ : समग्र सावरकर वाङ्मय, खंड 3, पृष्ठ क्र. 356).
    शंकराचार्य देवानंद सरस्वती आपल्या भाषणात म्हणतात, ” इस्लाम ईश्‍वराने निर्माण केलेला सिद्धांत आहे, कोणत्याही व्यक्तीचे तत्वज्ञान नव्हे. हा तोच सनातन धर्म आहे ज्याचा संदेश ऋषी मुनींनी दिला आहे की, सर्वांचा परमात्मा एकच आहे. इस्लामचा मूलमंत्र (कलमा-ए- तय्यब) मध्ये सर्व वेदांचे रस सामावलेले असल्यामुळे, त्यानुसार आचरण करणार्‍यांपेक्षा मोठा धर्मात्मा कोण असेल? अख्ख्या जगानं इस्लाम स्विकारला तरीही त्यात वाईट असे काही नाही. कुरानाची ही शिकवण जर जगभरात पोहोचली तरच शांती प्रस्थापित होईल. त्याला आतंकवादाशी जोडणारे लोक सैतानाची औलाद आहेत.” (संदर्भ : दिल्ली, भाषण - यू ट्यूब)
    ईश्‍वरी संदेश : ईश्‍वरी संदेश समस्त मानवांना आवाहन करतो, मानवाने दुसर्‍या कुणाच्याही पुढे नतमस्तक न होता, केवळ एका निर्गुण, निराकार ईश्‍वरासमोर नतमस्तक व्हावे.
    हे नद्या, पर्वत, हे सूर्य, चंद्र, पृथ्वी, पशू हे सर्व खरे पाहता तुझे सेवक आहेत. त्यांना केवळ तुझ्या (मानवाच्या)  सेवेसाठी निर्माण केलेले आहे. स्वत:च्याच सेवकापुढे नतमस्तक होणे हे केवळ सर्व शक्तीशाली, महान ईश्‍वराशी कृतघ्नता दाखविणेच आहे. नव्हे तर तुझ्या मस्तकाचा अपमान ही आहे. तू (मानव) भौतिकवादाच्या जंगलात हरवून जावे, हे तुझ्यासाठी विनाशक्ती आहे. ईश्‍वरी संदेश मान्य केल्यानंतर माणसातील शक्ती व प्रवृत्ती जागृत होतात. त्यामुळे त्याचे मस्तक इतर कुणापुढे नमत नाही.
    मुक्तीचा मार्ग : मनात पावित्र्य आणि चारित्र्य उभारणीशविाय मुक्ती व कल्याणाचा दूसरा मार्ग नाही. लालसा, अभिलाषा, ईर्षा आणि मत्सराच्या तुच्छ भावना ही शिकवण मानवातून काढून टाकते. हा विश्‍वास आपल्या मानणार्‍यांना कोणत्याही परिस्थितीत निराश आणि हताश होऊ देत नाही. कारण तो एका अशा ईश्‍वरावर विश्‍वास ठेवतो, जो पृथ्वी आणि आकाशातील सर्व खजिन्यांचा मालक आहे. त्यामुळे साहस, धैर्य, धाडसासह आपल्या वचनावर ठाम राहण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
    मानवी जीवन हे स्वैराचार नसून, त्याच्या प्रत्येक कृती आणि कार्यासाठी तो ईश्‍वरासमोर उत्तरदायी आहे. ईश्‍वरी संदेश मानवाला सत्याचा साक्षात्कार घडविते. इतिहास साक्षी आहे, जेव्हा-जेव्हा मानवाने ही शिकवण स्विकारून, त्यानुसार आचरण केले तेव्हा मानवतेला बहार आलेला आहे. जगाची विद्यमान व्यवस्था सदैव राहणारी नाही तरी एका विशिष्ट समयी ती नष्ट होणार आहे. मानवाला भौतिक जीवनातील प्रत्येक कार्याचा मोबदला मिळण्यासाठी, प्रलयकालानंतर एक शाश्‍वत जीवन आहे. हेच अंतीम सत्य आहे.
    जगात माणूस प्रेम, शांती आणि मुक्तीसाठी अनेक पर्यायाचा विचार करतो, कृती करतो पण ईश्‍वरी संदेशानुसार जीवन आचरणे हेच मुक्तीचे एकमेव व शाश्‍वत पर्याय आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. 

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget