Halloween Costume ideas 2015

मानवतेचा आदर्श

-इद्रीस खान
जगात ज्या वेळेस विद्युत नव्हती टेलिफोन नव्हते, मोबाईल नव्हते, विमान, आगगाडी, मोटारी टेलिव्हिजन, छापखाने, वर्तमानपत्रे, मासिके नव्हती, अशा काळात अरब देश जगापासून अलिप्त होता. उच्चप्रतीची संस्कृती नाही, शाळा नाही, वाचनालय नाही, सर्व देशात साक्षर लोक बोटावर मोजण्याइतके होते. सुव्यवस्थित राजकीय सत्ता नव्हती. टोळ्या होत्या. लूटमार करणे त्यांचा व्यवसाय होता. माणसाच्या जिवाची कदर नव्हती. दुराचार, दारू पिणे. जुगार जोरावर होते. अशा देशात, अशा वाळवंटात, अशा जनसमूहात एक व्यक्ती जन्माला येते.
    अगदी बालपणी आईवडिलांची छाया नष्ट होते. लहानपणी आजोबांचे संरक्षण नष्ट होते. लहानपणाचे संरक्षण करणाऱ्या जबाबदार व्यक्ती नसल्यामुळे प्रशिक्षण होत नाही. मोठा झाल्यावर हा मुलगा इतरांप्रमाणे बकऱ्या चरवण्याचे काम करू लागतो. तरूण झाल्यावर व्यापाराच्या नादी लागतो. शिक्षण नाही, लिहतावाचता येत नाही. इतके असतानादेखील त्याच्या सवयी, आचारविचार सर्वांहून भिन्न. तो कधी खोटे बोलत नाही. तो कोणाला शिव्या देत नाही. त्याचे मधुर, नम्रतेचे बोल ऐवूâण लोक त्याच्या भोवती जमा होतात. त्याच्यावर विश्वास ठेवतात. तो एक पैसा हरामाचा घेत नाही. त्याचा प्रमाणिकपणा असा की लोक त्याजवळ अनामती ठेवतात. त्याला ‘अमीन’ म्हणतात. लढाया होतात, तर हा सलोखा करयासाठी पुढे येतो. निराधारांचा तो कैवारी!
    ज्याला लिहतावाचता येत नाही अशा इसमाने नीती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानवी जीवनावर आधारित अनेक बारीकसारीक कायदे बनविले. मोठमोठे विव्दान वर्षानुवर्षे संशोधन केल्यावर जीवनभर मस्तक खपवूनदेखील जी तत्त्वे समजू शकत नाहीत अशा तत्त्वांची शिकवण त्या निरक्षराने दिली. सुमारे १४३५ वर्ष झाल्यावरदेखील त्यांची परिणामकारकता, उपयुक्तता सुसंस्कृत जगाला अधिकाधिक पटत आहे. जगातील इतर कायदे हजारो वेळेस बनले बिघडले, परंतु या निरक्षर अशिक्षित इसमाने सांगितलेले कायदे, हजारों कायदेपंडितांच्या कायद्यांना मात करीत आहेत.
    तो अव्दितीय सेनापती आहे. उच्चप्रतीचा न्यायधीश आहे. जबर कायदेपंडित आहे. असाधारण समाजसुधारक आहे. नवलाईचा राजकारणी आहे. इतके असून तो तासन्तास रात्री ईश्वराची भक्ती करत आहे. स्त्रियांचे मुलाबाळांचे हक्क पूर्ण करीत आहे. गरीबांची निराधार लोकांची सेवा करीत आहे. विशाल प्रदेशाची राज्यसत्ता मिळाल्यावरदेखील तो फकिरासारखे जीवन व्यतीत करतो. चटईवर झोपतो. साधे कपडे घालतो. गरीबासारखे अन्न भक्षण करतो. कधी कधी उपाशी राहतो. इतकी कमाल असल्यावर जर त्याने असे सांगितले असते की ‘‘मी मानवी स्तरापासून अलग आहे’’ तर त्याचे खंडन झाले नसते. तो नेहमी असेच म्हणे की ‘‘यात माझी स्वत:ची कमाल काहीच नाही, सर्व काही ईश्वराचे आहे. जे बोल, जी वाक्ये मी सांगितली ती माझी नाहीत. हे ईश्वरी बोल आहेत. ईश्वरी आदेशानुसार आहेत आणि सर्व स्तुती ईश्वरासाठीच आहे.’’
    वयाच्या ४० वर्षापर्यंत गुराख्याच्या, व्यापाऱ्याच्या कामाशिवाय इतर कोणतेच काम केले नाही. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की अशा व्यक्तीला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाले? एकदा रमजान महिन्यात हिरा नावाच्या गुहेत ध्यानचिंतन करीत असताना अचानक ईशदूत त्यांच्यापाशी आला व म्हणाला, ‘‘वाच!’’ ‘‘मला वाचता येत नाही,’’ त्यांनी उत्तर दिले. त्या दूताने पुन्हा त्यांना आवळून धरले आणि त्यांची पूर्ण दमछाक होइपर्यंत त्यांना सोडले नाही. मग तो ईशदूत म्हणाला, ‘‘ईश्वराच्या नावाने वाच!’’ त्यांनी पुन्हा म्हटले, ‘‘मला वाचता येत नाही.’’ त्याने तिसऱ्यांदा त्यांना घट्ट धरले आणि सोडुन दिले.
‘‘त्या ईश्वराच्या नावाने वाच, ज्याने रक्ताच्या गुठळीपासून माणसाची निर्मिती केली, कारण तुझा स्वामी मोठा उपकार करणारा आहे.’’ त्यावर त्यांनी त्या आयाती तोंडाने उच्चारल्या आणि इथपासून त्यांना ईश्वराकडून प्रेषित्व प्रदान झाले. या पुढे थोडे-थोडे करून या महान व्यक्तीच्या माध्यमातून पवित्र ग्रंथ कुरआन अवतरण्यात आला. हा पवित्र ग्रंथ सर्व मानवजातीसाठी एक वरदान, एक संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका ठरली आहे. कोण ती व्यक्ती जी या सर्व ज्ञानाशी परिपूर्ण आहे? प्रेषित मुहम्मद (स.)!
हे सउदी अरबच्या मक्का नावाच्या शहरातील बनूहाशिम या खानदानाचे अब्दुल मुतलिब यांचे नातू. अब्दुल मुतलिब यांना १३ मुले व ६ मुलींपैकी त्यांना अबदुल्ला नावाचे सर्वांत लहान मूल होते. अब्दुल्लाचा विवाह वयाच्या २४ व्या वर्षी कुरैश खानदानातील आमिना नावाच्या मुलीशी करण्यात आला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच अब्दुल्ला हे व्यापारासाठी सीरियाकडे गेले होते. सीरियाकडून परतीच्या प्रवासात ते गंभीर आजारी झाले व मदीना मुक्कामी त्यांचे निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय २५ वर्षे होते. आणि आमिना तेव्हा गर्भवती होत्या. मुहम्मद (स.) आईच्या गर्भात असतानाच अनाथ झाले. पित्याच्या निधनानंतर मुहम्मद (स.) यांचा जन्म इ.स. २२ एप्रील ५७१ म्हणजे ९ रब्बिलअव्वल रोजी झाला. अरबी महिन्याच्या तारखेविषयी इतिहासकारांच्या संशोधनात विसंगती आहे. कोणी १२ रब्बिलअव्वल म्हणूनही आपले मत व्यक्त करतात. मुहम्मद (स.) व त्यांच्या आई आमिना यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांचे आजोबा अब्दुल मुतलिब यांच्यावर येऊन पडली. आजोबानी मुलाचे नाव मुहम्मद असे ठेवले. मुहम्मद (स.) यांचे वय जेमतेम ६ वर्षाचे होते तेंव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आंता तर मुहम्मद (स.) यांची देखभाल व सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी आजोबावर येऊन पडली. त्यांना मुहम्मद (स.) अत्यंत प्राणप्रिय होते. मुहम्मद (स.) चे दु:ख अजुन संपलेले नव्हते. आठ वर्षाचे वय असताना ८२ वर्षाचे वयोवृध्द आजोबांचे निधन झाले. आजोबाच्या मुत्युनंतर त्यांना सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांचे चुलते अबू तालिब यांच्याकडे आली. वयाच्या १२ वर्षापासून चुलत्यासोबत व्यापारी व्यवसयात गुंतले. २५ वर्षाच्या वयात खदीजा (रजि.) नावाच्या मक्का येथील नामवंत व्यापारी स्त्रीशी लग्न झाले. खदीजा (रजि.) या ४० वर्षे वयाची विधवा स्त्री होत्या. तेव्हापासून पाव शतकाच्या कालावधीपर्यंत खदीजा (रजि.) या प्रेषितांसाठी आशेचा व दु:खपरिहाराचा फरिश्ता बनून राहिल्या. दोघांचे एकमेकांवर अफाट प्रेम होते. खदीजापासून प्रेषितांना बरीच आपत्य झाली. पहिल्या मुलाचे नाव कासिम ठेवण्यात आले. त्यानंतर तय्यब व ताहीर जन्मले. त्या सर्वांचें बाल्यावस्थेतच निधन झाले. त्यानंतर चार मुली रूकय्या, जैनब, कुलसुम व शेवटी मुहम्मद (स.) यांना सर्वात प्रिय अशी फातिमा जन्मली. मुहम्मद (स.) यांचे वय ५० वर्षे असतानी खदीजा (रजि.) यांचे निधन झाले. खदीजा (रजि.) यांच्या निधनानंतर मुहम्मद (स.) यांनी १० महिलांशी लग्न केले. पैकी फक्त आयशा (रजि.) सोडुन इतर सर्व महिलांसोबत प्रेषितांचे लग्न वेगवेगळ्या युध्दात शहीद झालेले आपल्या निष्ठावान अनुयांयांच्या विधवांच्या दुरावस्थेबद्दल करूणा व दयाभावनेच्या पोटी झाले होते. पूर्वीच्या काळात व आजही बऱ्याच समाजांत विधवा किंवा तलाक झालेल्या स्त्रियांशी कोणी लग्न करीत नसे. ही प्रथा मोडीस काढुन प्रेषितांनी अशा स्त्रियांना आपल्या छत्रछायेत आणले व अशा प्रकारे स्त्री-जातीवर असलेली बंधने मोडून त्यांच्या पुनर्विवाहचा मार्ग मोकळा केला.
प्रेषितांचे आगमन झाले तेव्हा अरबस्थान एक निर्जन वाळवंट मात्र होते. त्यांच्या प्रबळ आत्म्याने या निर्जन वाळवंटात विश्व निर्माण केले. त्यांनी एका अशा नवीन राज्याची स्थापना केली जे मोरोक्कोपासून इंडीजपर्यंत पसरले आणि ज्याने आशिया, आप्रिâका व यूरोप या तीन खंडांच्या वैचारिक जीवनावर आपला प्रभाव पाडला. म्हणूनच आज जगाच्या कानाकोपऱ्यात कोणताही देश असा नाहीं ज्या ठिकाणी प्रषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी वास्तव्यास नाहीत. जगाच्या संपूर्ण लोकसंख्येत जवळपास २०० कोटी लोक हे एकेश्वरत्व, मुहम्मद ( स. ) यांचे अनुयायी आहेत.
    प्रेषित मुहम्मद (स.) एक आदर्श याबद्दल प्रेषितांच्या पत्नी आयशा (रजि.) म्हणतात, त्यांचे नैतिक चारित्र्य कुरआन आहे. कुरआनमध्ये सांगितलेल्या सर्व सद्गुणांचे व सदाचारांचे ते साकारित स्वरूप होते. त्यांच्या सवयी अत्यंत साध्या असल्या तरी सुरेख होत्या. त्यांचे खाणेपिणे. त्यांचा पोशाख अत्यंत साधेपणाचा होता आणि सत्तेच्या शिखरावर पोचल्यावरसुध्दा तोच मुळचा साधेपणा त्यांनी टिकवीला होता.
    शेवटच्या क्षणी त्यांची शक्ती झपाट्याने खचत गेली. त्यांच्या तोंडाने हळू हळू हे शब्द ऐवूâ येत होते, ‘‘हे अल्लाह! मला क्षमा कर आणि मला उच्चस्थानी तुझ्या सहवासात जागा दे.’’ अधूनमधून हे शब्दही उच्चारीत होते, ‘‘उच्चस्थानी जन्नत व उदार सहवासात.’’ त्यानंतर त्यांच्या शरीराची गात्रे शिथिल पडली. आयशा (रजि.) यांच्या मांडीवर ते कलंडले. त्यांची नजर चिंतातुरपणे त्यांच्या चेहऱ्यावर खिळून राहिली. तो सोमवारचा दिवस होता. त्या दिवशी रब्बिअव्वल महिन्याची १२ तारीख होती. त्या दिवशी वयाच्या ६३ व्या वर्षी आपल्या स्वर्गीय निवासात जाण्यासाठी त्यांनी हे जग सोडले. मृत्यूसमयी त्यांची व्यक्तिगत मालमत्ता म्हणजे खजुरीच्या वाळल्या पानाची एक चटई आणि पाण्याची एक कातड्याची पिशवी इतकीच होती. त्यांच्या घरातील दिव्यामध्ये साध्या तेलाचीसुध्दा व्यवस्था नव्हती. त्यांच्या पत्नी आयशा (रजि.) यांनी शेजाऱ्याकडून तेल मागून आणले होते. ही वस्तुस्थिती आहे. अल्लाह त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या सोबत्यांवर आपल्या सर्वोत्तम कृपेचा वर्षाव करो! अशा रितीने ईश्वराची व मानवतेची सेवा करीत एक अत्यंत पवित्र जीवन संपले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget