Halloween Costume ideas 2015

इस्लामची शिकवण समस्त मानवजातीसाठी

इस्लाम हा शब्दच मुळी ’सलाम’ या पासून आला आहे. या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. त्यामुळे इस्लाम धर्मियांच्या मनात शांतताही आपसुकच रूजलेली असते. इस्लामचा मूळ गाभा ’तौहिद’ आहे. तौहिद म्हणजेच एकेश्वरवाद. याचा अर्थ असो आहे की, ”अल्लाहच या जगाचा आणि जगातील सार्‍यांचा निर्माता आहे. तोच पालनकर्ता आणि सार्‍यांचा स्वामी आहे. त्याचेच शासन आणि त्याचाच अधिकार आहे. आज्ञा देण्याचा आणि मनाई करण्याचा अधिकारही फक्त त्याचाच आहे. त्यामुळे त्याच्या आज्ञांचे पालन आणि गुलामीही फक्त त्याचीच. तोच या विश्वांचा खालीक, मालीक आहे. त्याचा कोणीही भागीदार नाही. सार्‍यांवर फक्त त्यांचीच हुकूमत चालते. जी व्यक्ती अल्लाहचे हे सारे अधिकार मानते ती सहिष्णू, शांतताप्रिय, समंजस आणि पापभीरू असतेच. समाजात शांतता नांदण्यासाठी एक विचार आणि सिद्धांत हवा. इस्लामची सामाजिक व्यवस्था पवित्र कुरआनच्या एका आयातीवर आधारित आहे. ज्यात म्हंटले आहे की, जगातील सारे लोक हे एका वंशापासून आहेत. इस्लाम जगातील सार्‍या लोकांना सांगतो की तुम्ही सर्व एका आई-बापाची संतती आहात. एकमेकांचे भाऊ-बहिण आहात म्हणून माणसाच्या नात्याने समान आहात. मानवतेचा हा विचार, हे तत्त्व स्वीकारल्यानंतर घृणा, असुया, द्वेष आपोआप गळून पडतात. त्यामुळे शांतता नांदण्यास मदत होते. समाजात शांतता नांदणे आग्रहाचे असते कारण शांततेचा मार्ग हा एकमेव मार्ग यशाकडे आणि मुक्तीकडे नेतो.
    प्रगती : प्रगती ही सापेक्ष संज्ञा आहे. परंतु, आजच्या युगात प्रत्येकजण आपली वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. यातही आर्थिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी जो तो झटताना दिसतो. पण ही प्रगती करीत असतांना आपण कोणाचा हक्क मारीत नाही का? कोणाला वंचित करीत नाही ना? याचेही भान रहात नाही. इस्लामने सामुहिक जीवनामध्ये आर्थिक स्पर्धा खुली आणि निरंकुश असावी अशी व्यवस्था केलेली आहे. माणसांनी एकमेकांशी निर्दयीपणे आणि निष्ठुरपणे वागू नये यासाठी इस्लामने माणसांना नैतिकतेचे धडे गिरवायला सांगितले आहेत. एकमेकांना सहाय्य करण्याचे, एकमेकांबद्दल सहानुभूती आणि बंधुभाव बाळगण्याची शिकवण इस्लाम जगाला देतो. एकदा नैतिकतेचे बळ आणि अधिष्ठान प्राप्त झाले की वैयक्तिक आणि आर्थिक प्रगती होणारच. पण समाजातील निराधार, लाचार, दीन, दुबळ्या बांधवांना आश्रय, मदत आणि पाठबळ द्यायला हवे. आपण एकटे प्रगती पथावर असलो तरी आपल्या बरोबरीचा समाज ही आपल्या सोबत प्रगती पथावर आल्याशिवाय प्रगती साधणे अशक्य आहे. वैयक्तिक वैचारिक प्रगल्भता आणि दृष्टी आली की प्रगतीपथ दृष्टीपथात येतो. आर्थिक प्रगतीसाठीही योग्य आणि कायदेशीर मार्गाने अर्थाजन करण्याची शिकवण इस्लामने दिल्यामुळे स्वतःच्या उन्नतीबरोबर सार्वजनिक हित ही साधले जाते. व्यक्तिमत्वाच्या विकासामुळे आचरण आणि वैचारिक ठेवण सुदृढ होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. वैध मार्गाने कमविलेल्या धनदौलतीवर इस्लाम माणसाचे हक्क मान्य करतो. परंतु, त्याचबरोबर वैधमार्गाने कमविलेल्या संपत्तीला उचित आणि रास्त मार्गातच खर्च करण्याचे बंधनही इस्लाम घालते.
    त्याचप्रमाणे माणूस जेव्हा जबाबदारी, कर्तव्यपालन, आज्ञापालन, भक्ती आणि ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करील तेवढा तो ईश्वराच्या निकट होईल. इस्लाममध्ये ईश्वराशी जवळीक करणे म्हणजेच आध्यात्मिक प्रगती समजली जाते.
    मुक्ती : पवित्र कुरआननुसार मरणोपरांत जीवन हे खर्‍या अर्थाने खरे जीवन आहे. या जीवनात केलेले कृत्य, कर्मावरून जन्नत आणि जहन्नम कायमस्वरूपी प्राप्त होणार आहे. पण पूर्वानुअट अल्लाहवरच्या ईमानची आहे. माणसाच्या मनात आणि बुद्धीत हाच विचार कायम असणे आवश्यक आहे. की, ” अल्लाहच त्याचा स्वामी, त्याचा शासक, त्याचा निर्माता आणि त्याचा ईश आहे” अल्लाहची प्रसन्नता कमावणे हे त्याच्या सर्व प्रयत्नांचे उद्दीष्ट आहे आणि अल्लाहची आज्ञा हाच त्याच जीवनाचा कायदा असतो. मुक्तीचा मार्ग तसा कठीण आहे. कारण ईमानबरोबरच माणसाने जाणीवपूर्वक आपली स्वच्छंदता सोडायला हवी. पण त्याचबरोबर संयम आणि विवेकही असायला हवा. यालाच कर्तव्यपरायणता आणि जबाबदारीची जाणीव म्हटले जाते. याच गोष्टीला ’तक्वा’ म्हणतात. ही कर्तव्यपरायणता आणि जबाबदारीची जाणीव पराकोटीला गेली की ईश्वराची इच्छा माणसाची इच्छा होते. ईश्वराची आवड दासाची आवड बनते आणि ईश्वराला ज्या गोष्टी नापसंत आहेत ते दासालाही नापसंत वाटते. या गोष्टीलाच ’एहसान’ (समर्पन) असे म्हटले जाते. या स्थानावर पोहोचल्यावर माणसास ईश्वराची अत्यंत जवळची निकटता प्राप्त होते आणि हे माणसाच्या उच्चतम आध्यात्मिक विकासाचे स्थान आहे.

डॉ. शेख इक्बाल मिन्ने
7040791137Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget