Halloween Costume ideas 2015

चला मनं जिंकू या!

आज आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाव्दारे खूप भौतिक प्रगती केलेली आहे आणि पुष्कळशा सवलती प्राप्त केलेल्या आहेत. परंतु या सर्व भौतिक प्राप्तीनंतर आमच्या मनाला शांती प्राप्त झालेली आहे काय? आमच्या समाजात शांती आहे काय? जर गांभीर्याने विचार केला तर आज सर्वत्र असुरक्षितता, अविश्वास आणि अराजकतेचे वातावरण पसरलेले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, स्त्रीभ्रुणहत्या होत आहे. गरीब आणि दुर्बलांवर सतत अत्याचार होत आहेत. राजकारणात नैतिक विचारधारेची जागा भ्रष्टाचार आणि स्वार्थाने घेतलेली आहे. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचाराची एक साखळी निर्माण झाली आहे. त्यांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जात आहेत.
सुख, समाधान आणि शांती यांच्या शोधात माणूस वणवण फिरत आहे, असे एक विचित्र दृष्य पाहायला मिळत आहे. याचे कारण नैतिक र्हास आणि अठराविश्व दारिद्य्र. ऐहिक प्रगती पूर्ण करूनही मानव अठराविश्व दारिद्य्रामध्ये राहिला आहे. अठराविश्व दारिद्य्र म्हणजे ’काम-क्रोध-मद-मत्सर-लोभ-दंभ-संशय-चिंता’यांनी गांजलेली स्थिती. यामध्ये कामाचा अतिरेक झाला म्हणजे स्त्रियांवर अत्याचार होतो, क्रोधाचा अतिरेक झाला म्हणजे हिंसा-खून-दंगल होते. मदाचा अतिरेक झाला म्हणजे अनीती-अन्याय, छळ होतो. मत्सराचा अतिरिके झाला म्हणजे चांगल्या गोष्टीला दूषण देणे, सद्गुण, सत्प्रवृत्तींना विरोध करणे सुरू होते, सर्वांचा तो द्वेष करू लागतो, हेवा-तिरस्कार जन्माला येतात. लोभाचा अतिरेक झाला म्हणजे भ्रष्टाचार होतो. दंभाचा अतिरेक झाला म्हणजे मनुष्य फसवणूक, लबाडी, ढोंग करायला लागतो. संशय आणि चिंतेचा अतिरेक झाला की चित्त, वित्त-स्वास्थ्य गमावून आत्मघात, कुटुंबघात करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे या दारिद्य्रामध्ये सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, गावाचे-शहराचे-देशाचे आणि संपूर्ण विश्वाचे स्वास्थ्य बिघडल्याने एकूण मानवी जीवनच उद्ध्वस्त होते. पर्यायाने समाजाची, राष्ट्राची हानी होते. सुख-समाधान-समृद्धी-विश्रांती नष्ट होते. अशीच परिस्थिती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
”अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातुहु.” (अर्थात- तुम्हावर ईश्वराची शांती आणि दया असो.)
हे आहे एका मुस्लिम व्यक्तीचे सर्वप्रथम अभिवादन! जी व्यक्ती इस्लामची अनुयायी आहे तिला ’मुस्लिम’ म्हणतात आणि ’इस्लाम’ म्हणजेच ’शांती’ होय. म्हणजेच दुसर्या व्यक्तीला अभिवादन करूनच त्याच्याशी सुसंवाद अथवा व्यवहार करावा अशी इस्लामची शिकवण आहे आणि हेच सद्वर्तनाचे द्योतक ठरते. बंधु आणि अनोळखींशी, मित्र आणि शत्रूशी सद्वर्तनातच बाह्य शांती आहे.
समाजात शांती, प्रगती आणि मुक्ती प्रस्थापित करायची तर आम्हाला ज्ञानात्मक बौद्धिक प्रगती, आध्यात्मिक व नैतिकतेची जाण आधी असावी लागेल. सरकारे येतात आणि जातात, पण मानवी समाज मात्र अखंड प्रवाही असतो. व्यक्ती आणि समाज यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असले पाहिजेत? हा जटिल प्रश्न माणूस जगात संस्कृतीच्या आरंभापासून सोडवू शकलेला नाही. कधी व्यक्तीला समाजाच्या अंकित करून ठेवले, तर कधी समाजाला व्यक्तीच्या अंकित ठेवले. घृणा, तिरस्कार असहनशीलता आणि दूषित पूर्वग्रह इ. विभक्तपणावर अधिकार गाजवणार्या गोष्टींपेक्षा दया, स्नेह, फ्रेम आणि संयम इ.चा घट्ट द्रव आम्हाला बांधून ठेवतो. जगाच्या मर्यादित साधनसंपत्तीसाठी, हेवा असूया स्पर्धा-चुरस, चढाओढ इ. गोष्टींपेक्षा शांती, न्याय, समता यांचे ध्येय प्रगती वाटचाल करण्यास अधिक प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतील. भरभराटीपेक्षा संतोष-समाधान, मक्तेदारीपेक्षा सहभागित्व आणि साधनसम्पत्तीच्या भक्षणापेक्षा तिचे संरक्षण आमच्या पुढे जाण्याच्या मार्गाला प्रकाशमान करील. हे जग अशा लोकांच्या हाती सुरक्षित आहे जे विविधतेला आनंदाने साजरी करतात, जे परकेपणाचा आदरसन्मान करतात आणि एकमेकांची काळजी घेतात. परस्परांच्या सुखदु:खात सहभागी होतात.
इस्लामी संस्कृतीचे काही विशिष्ट तत्त्वे आहेत. इस्लामी संस्कृती आणि इतर संस्कृतींमधील काही गोष्टींमध्ये साम्य आढळून येत असले तरी इतर संस्कृतींच्या तुलनेत ती आपल्या लक्ष्य, नियम आणि सिद्धान्तांमध्ये फार वरचढ असल्याचे दिसून येते. ग्रीक व रोमनांचा आधुनिक बुद्धिवाद, शासन व शक्ती, पारसींची भौतिक रुची, सैन्यबल व राजकारण, चीनची आध्यात्मिक शक्ती, साधूसंतांचे मिथक व दंतकथा आणि पाश्चिमात्यांचा भौतिकवाद यांचा इस्लामी संस्कृतीच्या सिद्धान्तावर कसलाही प्रभाव आढळून येत नाही.
शांती, प्रगती आणि मुक्तीवर इस्लामी संस्कृतीचा सिद्धान्त आधारित आहे. म्हणजेच त्या सर्व विषयांवर जे मानवी जीवनाचे भाग आहेत. म्हणूनच इस्लामी संस्कृतीचा सिद्धान्त संपूर्ण संविधानाचे रूप धारण करतो. संपूर्ण मानवजातीत शांती प्रस्थापित करणे, मानवजातीला प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर नेणे आणि हर प्रकारच्या समस्येपासून मानवजातीला मुक्ती मिळवून देणे ही इस्लामी संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. या स्थिर तत्त्वांमुळे इस्लामी संस्कृतीला मानवतेवर शासन करण्याचा अधिकार प्राप्त होतो. ईश्वराने मानवाला धरतीवर उत्तराधिकार आणि पुनर्निर्माणाद्वारे प्रगतीसाठी जन्माला घातले आहे.
इस्लामचा सिद्धान्त स्थितीतील परिवर्तनामुळे बदलत नाही आणि न्याय, सत्य आणि सद्भावावर आधारित असलेले त्याचे नियम (शरियत) प्रत्येक स्थळकाळी मानवी स्वभावानुसारच आहेत. अशा प्रकारे इस्लाम धर्म लोकांच्या विशिष्ट जात, वर्ण अथवा समुदायासाठी नाही. तो गोरे, काळे, लाल, पिवळे सर्वांसाठी आहे. तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील लोकांसाठी आहे. इस्लाममध्ये क्षेत्रिय चरित्र अथवा सांप्रदायिक व जातिवाद आढळून येत नाही. तो कोणत्याही विशिष्ट समुदाय अथवा मानवी गटाशी पक्षपात करीत नाही कारण इस्लामचे उपदेश, संस्कार आणि आचार सर्व काही कोणत्याही काळातील प्रत्येक मानवासाठी उपयुक्त आहेत. न्याय वा चरित्र एखाद्या समूह अथवा काळासाठी उपयुक्त नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. हेच इस्लाम धर्माचे वैशिष्ट्य आहे.
इस्लामनुसार मानवतेसाठी लाभदायक आणि धरतीच्या पुनर्निर्माणाद्वारे प्रगतीचे ज्ञान प्राप्त न करणारा प्रत्येक व्यक्ती पापी आहे. निश्चितच जेव्हा मानवता सांस्कृतिक व वैज्ञानिकदृष्ट्या मंदावलेल्या स्थिती जीवन व्यतीत करीत होती, तेव्हा अल्लाहकडून पैगंबर मुहम्मद (स.) यांना या जगात पाठविण्यात आले. मुहम्मद (स.) यांनी मानवतेला मुक्ती प्रदान केली, इस्लाम धर्म (ज्ञान, पुनर्निर्माण आणि सभ्यतेवर आधारित धर्म) द्वारे तिला सन्मानित केले. ज्यात जागतिक प्रगती आणि आध्यात्मिक विचारांदरम्यान कसलाही विवाद नाही. मुस्लिम व्यक्तीच्या अंतरंगात प्रार्थना, पुनर्निर्माणाच्या दरम्यान आणि आध्यात्मिक जीवन, आपल्या ईश्वराच्या इच्छेनुसार अनुसरण करण्याच्या दरम्यान कसलाही फरक नाही. हे सर्व ईश्वरासाठी आणि त्याच्या मार्गात आहे.
आंतरिक शांती म्हणजे मानवाची आंतरिक प्रसन्नता आणि आधुनिक संस्कृतीमध्ये अधिकांश लोकांना भ्रमात टाकणार्या आंतरिक संघर्षापासून मुक्ती मिळवून देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून मानवाचे या जगातील आणि परलोकातील जीवन शांततेसह व्यतीत व्हावे, प्रार्थना, कार्य आणि पुनर्निर्माणाद्वारे प्रगतीच्या कार्यान्मुख असावे. आध्यात्मिक व भौतिक जीवनाचा संबंध असावा, ज्ञान आणि धर्माचा संगम व्हावा. निश्चितच इस्लामी संस्कृतीमध्ये आंतरिक शांती एकीकरणाच्या सिद्धान्तातून मिळणारा उघड संकेत आहे, जो मुस्लिमाच्या मनात निर्माण होणार्या प्रत्येक गोष्टीला सहजतेने एकत्रित करतो. इस्लाम धर्मात हे जग स्वत: कसलेही लक्ष्य नसून परलोकासाठी शेती आणि माध्यमासमान आहे आणि हीच खरी मुक्ती आहे.
इस्लामी संस्कृतीत आध्यात्मिक विचार आढळतात. त्याचबरोबर इस्लामने भौतिकवादाला कधीही तिलांजली दिलेली नाही. ईश्वराने मानवाला आत्मा आणि भौतिक सामुग्रीपासून निर्माण केले. मानवी जीवनाच्या आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही भागांसाठी प्रत्येक प्रकारच्या साधनांनी सहाय्य केले. शरीरासाठी उपयुक्त वातावरण बनविले. त्यामुळे तो पृथ्वीवर राहतो. अशा प्रकारे मानवाच्या आध्यात्मिक भागासाठी पैगंबरांद्वारे दिव्य वाणी अवतरित केली. आत्मा आणि शरीर दोन्ही एकमेकांना पूरक बाबी आहेत. त्या मानवाच्या मृत्यूपर्यंत एकमेकांपासून अलिप्त होत नाहीत. शरीराला अन्न, पाणी व वस्त्राची आवश्यकात असते. आत्म्याच्याही काही आवश्यकता असतात. आत्मा प्रेम, दया, त्यागाशिवाय जीवित राहू शकत नाही. दुर्भाग्यत: पाश्चिमात्य सभ्यतेला विसर पडल्यामुळे सर्व प्रकारच्या सुविधा असूनदेखील संसारसुखापासून वंचित आहे.
इस्लामी संस्कृतीने मानवाधिकारांप्रती वास्तविकपणे एक अप्रतिम नमूना सादर केला आहे. काळ बदलल्याने आणि परिस्थितीमध्ये परिवर्तन झाल्याने हे अधिकार बदलत नाहीत. हे अधिकार प्राप्त करण्यासाठी इस्लाममध्ये आजपर्यंत बौद्धिक संघर्ष वा क्रांती झालेली नाही. ज्याप्रमाणे लोकशाही आणि तिच्या विकासासाठी मानवी अधिकारांचा इतिहास आपणास आढळून येतो. मानवी अधिकाराचे नियम आणि आदेश ईश्वराद्वारे प्रकाशित झाले आहेत. हे अधिकार वास्तविक आहेत, जीवनाशी संबंधित आहेत आणि मानवी गरजांची पूर्तता करणारे आहेत. या सर्वांत सर्वश्रेष्ठ अधिकार असे आहे- मातापितांचे आणि बांधवांचे अधिकार, संततीवर नातेवाईकांचे अधिकार, भ्रूणाचे अधिकार, धार्मिक व सांसारिक प्रशिक्षणात प्रत्येक व्यक्तीचे अधिकार. वैध मिळकत आणि व्याजापासून अलिप्त राहण्याचे अधिकार. दुराचार थांबविण्याचे अधिकार.
या जगात आल्यापासून जाण्यापर्यंत मानवाचे जीवन इतरांवर अवलंबून आहे. म्हणून सामूहिक व्यवस्था अगदी महत्त्वाची आहे. या व्यवस्थेला सन्मार्गानुसार स्थापित केल्याशिवाय ऐहिक शांती व मृत्युपश्चात जीवनात मुक्ती शक्य नाही. या जगात एका लहानशा उद्दिष्टप्राप्तीसाठी सुद्धा संघटन व सहकार आवश्यक असतो. मग संपूर्ण जगातून अन्याय व अत्याचाराच्या जागी शांती व प्रगती स्थापित करण्यासाठी याचे महत्त्व किती असेल हे समजणे कठीण नाही. सध्या दुष्ट संघटित होत आहेत, परंतु शिष्ट संघटित नाहीत. म्हणूनच दुराचार सतत वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी सदाचारी लोकांना संघटित होऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी त्याग व समर्पण करण्याची आवश्यकता आहे. हा त्याग सामूहिकरित्या प्रत्येक व्यक्तीने करणे अनिवार्य आहे आणि त्यावरच खरी मुक्ती अवलंबून आहे. जे लोक जगात शांतता व प्रगती प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांबरोबर कार्यरत असतात त्यांच्यासाठीच मुक्ती निश्चित आहे!
माणसाच्या सुधारणा व प्रगतीची भाषा जेव्हा आम्ही करतो, तेव्हा आम्हाला माणसांचा एक विशिष्ट गट अभिप्रेत असत नाही, तर अखिल मानवजातीची सुधारणा व त्यांची यथोचित प्रगतीच आम्हाला अभिप्रेत असते. माणसांना माणूस समजले जावे आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात अखिल मानवजातीने आपल्या जीवनाचा प्रवास करावा अशी इच्छा असते.
माणूस जेव्हा आपल्या अंतर्गत त्रुटींवर काबू मिळवील आणि मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे अन्याय व अत्याचार करणारे लोक त्यांच्या दर्जापासून हटविले जातील, तेव्हाच मानवतेच्या सुधारणेची दारे मोकळी होतात आणि माणूस प्रगतीकडे वाटचाल करू लागतो. मानवतेच्या सुधारणेसाठी न्याय व सत्याची स्थापना होणे नितांत गरजेचे आहे. भूमीतील साधनसंपत्तीवर काही ठराविक माणसांचा कब्जा, राजकीय सत्ता काही थोडक्या माणसांच्या हातात एकवटणे, विद्या आणि तंत्रज्ञान एका ठराविक वर्गाच्या हातात ्सणे आणि बाकी सर्व माणसे त्यापासून वंचित राहणे, ही सर्व अन्यायाची वेगवेगळी रूपे आहेत. ते सर्व अन्याय जारी असताना मानवतेची सुधारणा घडविणे शक्य नाही. मग विज्ञान व तंत्रज्ञनाची प्रगती कितीही होवो.
देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांना आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी समता व न्यायावर आधारित व्यवस्थानिर्मितीसाठी सामाजिक परिवर्तनातून एका सकारात्मक अशा क्रांतीसाठी झटणार्या, उदारवादी जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यभरात ’शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ ही दहादिवसीय मोहीम राबविण्यात येत आहे. दि. 12 ते 21 जानेवारी 2018 पर्यंत चालणार्या या मोहिमेत राज्यभरातील सर्व जातीधर्माच्या, जवळपास चार कोटी लोकांपर्यंत पोहोचून जनजागरण करण्याचा जमाअतचा संकल्प आहे. देशातील वर्तमान सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशी जनजागृती मोेहीम राबविण्याची सध्या नितांत गरज भासत होती ती जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश तर्फे पूर्ण करण्याचा एक भरीव प्रयत्न होय. अशा या अभिनव मोहिमेला आपण सर्व जण तळागाळातून प्रतिसाद देऊन ही मानवतावादी मोहीम यशस्वी करू या. चला मनं जिंकू या!

- शाहजहान मगदुम
कार्यकारी संपादक - (8976533404)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget