Halloween Costume ideas 2015

राजकारणाची बदलती दिशा

गुजरात निवडणुकी दरम्यान अनेक लोकांनी ही चिंता बोलून दाखविली की राज्यामध्ये 10 टक्के मुस्लिम समाज असूनही प्रचारा दरम्यान कोणाकडूनही त्यांचा साधा उल्लेखही झालेला नव्हता. मला वाटते तो उल्लेख नाही झाला हेच बरे झाले. उल्लेख झाला असता तर भाजपने त्या उल्लेखाचा दुरूपयोग करण्याची संधी सोडली नसती. त्यामुळे गुजरातचे वातावरण बिघडले असते. निकाल लागल्यानंतर एक बोलके व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. त्यात दाखविण्यात आले होते की, एक मुस्लिम कुटुंब एका गुहेत लपून बसलेले आहे व गुहेच्या तोंडाशी दुसरा एक माणूस येऊन त्यांना सांगतो की, ”आता बाहेर या! निवडणुका संपल्या, निकाल सुद्धा लागले” या वरून गुजरातमध्ये मुस्लिम कोणत्या परिस्थितीत जगत आहेत याची सहज कल्पना यावी. गुजरात आपण जिंकू शकणार नाही याची पूर्व कल्पना काँग्रेसला होती याचा अंदाज निकाल घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडून आलेल्या (उर्वरित लेख पान 2 वर)
अधिकृत प्रतिक्रियेवरून येतो. गुजरातमध्ये पराभव पत्करूनही देशी व विदेशी माध्यमांमध्ये भाजपाच्या विजयापेक्षा काँग्रेसच्या पराजयाचीच चर्चा अधिक झाली. हार हो तो ऐसी हो! या निवडणुकीमध्ये भाजपाने एकाही मुस्लिम व्यक्तिला उमेदवारी दिली नव्हती. या उलट काँग्रेसने 6 उमेदवार दिले होते. त्यापैकी शेख गियासुद्दीन (दरियापूर), पीरजादा मुहम्मद जावेद (वानकानेर), नौशाद सोलंंकी (डासडा) आणि इम्रान युसूफ भाई (जमालपूर, खडीया) हे चार उमेदवार विजयी झाले.
या निवडणकीचे वैशिष्ट्ये
      या निवडणुकीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे गुजरातच्या विकासाच्या मॉडेलचा फोलपणा उघडकीस आला. ज्या गुजरात विकासाच्या जोरावर मोदींनी 2014 ची लोकसभा जिंकली होती त्याच गुजरातला वाचविण्यासाठी त्यांना कोण आटापिटा करावा लागला. कारण गुजरातचा खरा विकास झालेलाच नव्हता हे या प्रचारा दरम्यान देशाच्या लक्षात आले. गुजरातचा विकास झाला असता तर संसदेचे अधिवेशन पुढे ढकलून स्वतः नरेंद्र मोदींनी 36 सभा घेतल्या नसत्या आणि अवघे मंत्रीमंडळ निवडणुकीला जुंपले नसते.
      या निवडणुकीचे दूसरे वैशिष्ट्य असे की, काँग्रेसने जी रणनीति आखली होती त्यात विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. विशेषतः गुजरातचा ग्रामीण भाग विकासापासून किती लांब आहे याचे विदारक चित्र काँगे्रसने प्रचारा दरम्यान देशाला दाखविले. एका सामन्य महिलेच्या तोंडून सहज निघालेले वाक्य, ”विकास वेडा झालाय” या निवडणूक प्रचाराची टॅगलाईन बनली. या वाक्याने भाजपाला अक्षरशः पळता भुई थोडी केली. विकासाच्या विषयाला बगल देऊन मोदींनी मात्र गुजराती आस्मीता, खिलजी, औरंगजेब, पाकिस्तान, नीच जातीका सारख्या अनावश्यक मुद्यांवर आपली भीस्त ठेवली. तसेच गांधी-नेहरू घराण्यावर बोचरी टिकाही केली. याउलट पंतप्रधानांना नीच म्हटल्याबरोबर मणीशंकर अय्यर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून काँग्रेसने प्रचाराची पातळी राखली. राहूल गांधी यांनी मोदींवर वैयक्तिक टिका करण्याचे टाळून आपल्या घराण्याच्या शालीनतेची परंपरा जपली.
      या निवडणुकीचे तीसरे वैशिष्टय म्हणून राहूल गांधी यांच्या मेक ओव्हरकडे पाहता येईल. ”पप्पू” म्हणून हिणविल्या गेल्या पासून ते गुजरातमध्ये एकाकी झूंज देणार्‍या एका गंभीर नेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास लोकांच्या नजरेत भरण्याइतपत ठळक होता. गळ्यात रूद्राक्षाची माळ घालून, जिथे जाईल तिथे मंदिरांना भेटी देण्याच्या त्यांच्या रणनीतिमुळे भाजपावाल्यांच्या शीडातील हवाच निघाली होती, हे मान्यच करावे लागेल. म्हणूनच 150 जागा जिंकण्याच्या वल्गना करणार्‍या भाजपाला 99 वर समाधान मानावे लागले. हा जरी त्यांचा विजय असला तरी नैतिक पराभव आहे. त्यांची सहाव्यांदा सत्ता राखतांना दमछाक झाली तर मागील 22 वर्षातील काँग्रेसची गुजरातमधील ही श्रेष्ठ कामगिरी ठरली.
      2014 च्या लोकसभा निवडणुकानंतर सुरू झालेली पराभवाची मालिका राहूल गांधी यांना यावेळी ही खंडित करता आलेली नाही. हिमाचल व गुजरात दोन्ही राज्य गमावल्यानंतर आता काँग्रेसकडे फक्त पंजाब आणि कर्नाटक हीच दोन मोठी राज्ये शिल्लक आहेत. त्यातही कर्नाटकात लवकरच निवडणुका होऊ घातलेल्या असल्याने काँग्रेसवरील संकट भविष्यात अधिक गहिरे झाल्याशिवाय राहणार नाही, यात शंका नाही.
      या निवडणुकीचे चौथे वैशिष्ट्य असे की, काँग्रेसच्या वाढलेल्या 19 आमदारांचे श्रेय जरी राहूल गांधी यांना दिले जात असले तरी त्यास ते कितपत पात्र आहेत याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. कारण की या निवडणुकीत भाजपला रोखण्यामध्ये राहूल गांधी इतकीच हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या त्रिमुर्तींनीही भूमिका बजावली आहे. राहूल गांधी यांची खरी परीक्षा 2018 मध्ये कर्नाटकात होणार्‍या विधानसभा निवडणुकांत होईल. एक मात्र खरे की गुजरात निवडणुकीत प्रचाराची धुरा राहूल गांधीने एकट्याने सांभाळली. बाकी गहिलोत वगैरे मंडळींनी प्रचारात एकतर उशीरा एन्ट्री घेतली. शिवाय त्यांची भूमिका ही ”सहाय्यक कलाकार” इतपत मर्यादित होती हे ही मान्य करावे लागेल.
      या निकालानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाला एक धु्रविय राजकारणाच्या धोकादायक दिशेने घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न फसला, हे एका दृष्टीने बरे झाले. या पुढचे सर्व सामने काँग्रेस विरूद्ध भाजपा असेच होतील. देशाच्या लोकशाहीच्या आरोग्याच्या दृष्टीने हे बरे झाले. निवडणुकांत मोदी वगळता भाजपा शुन्य आहे व राहूल वगळता काँग्रेस शुन्य आहे. हे ही स्पष्ट झाले, ही देशासाठी चिंतेची बाब आहे. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान मिरवितो. मात्र देशातील दोन्ही मोठे पक्ष प्रत्यक्षात दोन व्यक्तींवर अवलंबून आहेत ही बाब देशहिताच्या दृष्टीने योग्य नाही.
काँग्रेसच्या पराभवाची कारणे
      काँग्रेसच्या सतत पराभवाची पाच मोठी कारणे नमूद करता येतील. पहिले कारण म्हणजे राहूल गांधी सहित काँग्रेसच्या इतर अनेक मोठ्या नेत्यांमध्ये आलेली घमेंड. सतत सत्तेत असल्यामुळे एखाद्या घराण्यास सत्तेची घमेंड येणे स्वभाविक आहे. तीच घमेंड राहूल गांधी सहित प्रत्येक राज्यातील काँग्रेस पक्षाच्या अनेक प्रस्थापित राजघराण्यात आलेली होती व इतके पराभव होऊनही तिचा बराच अंश आजही त्यांच्यात आहे, हे कटू मात्र सत्य आहे. याच कारणामुळे हेमंत बिस्व सर्मा सहित अनेक स्वाभिमानी नेते पक्ष सोडून गेलेले आहेत. दूसरे कारण भ्रष्टाचार हे आहे. यात जरा सुद्धा शंका नाही की गेल्या साठ वर्षात काँग्रेस नेत्यांनी देशाचा जेवढा विकास केला, त्यापेक्षा अधिक विकास स्वतःचा केला. त्यामुळे पक्ष रसातळला गेला तरी सात पिढ्या बसून खातील एवढी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. 50 आणि 60 च्या दशकातील खादीधारी काँग्रेस नेत्यांचे रूपांतरण लिनीन धारी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेले आहे. त्यांच्या बुडाखालची जुनी अ‍ॅम्बेसेडर जाऊन चमकणार्‍या विदेशी गाड्या आलेल्या आहेत. मोठ-मोठे साखर कारखाने, मोठ- मोठी शैक्षणिक संकुले, गळ्यात बोटाच्या आकाराच्या सोन्याचे लॉकेट, बोटांत प्लॅटिनमच्या अंगठ्या, राजवाड्यांना लाजविणारी त्यांची आलिशान घरे, हे सर्व पाहता-पाहता शुन्यातून निर्माण झालेले जनतेनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. या संबंधीचा ठाम विश्‍वास जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. तिसरे कारण काँग्रेस नेत्यांची व्याभिचारी पक्षनिष्ठा हे आहे. 2014 नंतर काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री, पाच केंद्रीय मंत्री, चार माजी प्रदेशाध्यक्ष तसेच काही राज्यमंत्री आणि अनेक कार्यकर्ते निष्ठेची परवा न करता भाजपवासी झालेले आहेत. चौथे कारण दलित व अल्पसंख्यांकांचा या पक्षाकडून झालेला मोहभंग. यासंदर्भात असे म्हणणे चुकीचे होणार नाही की, या दोन्ही समाज घटकांचा काँग्रेसने फक्त मतांसाठी वापर केला. त्यांचा विकास जाणून बुजून होऊ दिला नाही. पाचवे कारण मुस्लिमांचे लांगूलचालन हे होय. या संदर्भात तीन रोचक तथ्य मी बुद्धीमान वाचकांसमोर मांडणार आहे. काँग्रेसने मुस्लिमांचे लांगुलचालन करणे तर सोडा त्यांच्याशी न्यायसुद्धा केलेला नाही. एक - त्यांच्या काळात भागलपूरपासून ते मुजफ्फरनगर पर्यंत झालेल्या शेकडो दंग्यापैकी एकाही दंग्यात सामील दंगलखोरांना काँग्रेसने शिक्षा होणार नाही, याची पक्की व्यवस्था करून ठेवली होती. दोन - काँग्रेसनी मुस्लिमांचे लांगूलचालन केले असते तर त्यांची स्थिती आज जशी दयनीय झालेली आहे तशी झालेली नसती. या म्हणण्याला पुरावा म्हणून सच्चर समितीच्या अहवालाचा दाखला देता येईल. तीन - काँग्रेसने शहाबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवून मुस्लिमांचे लांगूलचालन केले, असा सातत्याने आरोप केला जातो. तो खोटा आहे. कारण हा कायदा असूनही त्याचा लाभ मुस्लिम स्त्रियांना मिळत नाही, हे कायद्याचे जाणकार जाणून आहेत. तसे पाहता जलीकट्टू प्रकरणात भाजपनेही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवून द्रविड परंपरेला पूरक असा कायदा केला आहे. मात्र भाजपवर कधी द्रविड लांगुलचालनाचा आरोप केला जात नाही. हा शुद्ध ढोंगीपणा आहे. 
      मुस्लिमांची खरी परिस्थिती किती वाईट आहे याचे वर्णन मागील आठवड्यात राजीव शर्मा या लेखकाने अतिशय समर्पक शब्दात एक लेख लिहून केलेले आहे. त्याचे फक्त दोन परिच्छेद खालीलप्रमाणे वाचकांच्या प्रज्ञेसाठी सादर आहेत. ” अखबार पढना और टी.व्ही.पर खबरे देखना मेरी पुरानी आदत है. पर अब मैं इनसे धीरे-धीरे दूर होता जा रहा हूं. शाम को घर आने के बाद जैसे ही टि.व्ही. खोलता हूं वहां एक अँकर चीख-चीखकर मुझे समझाता है के इस मुल्क की असली समस्या तो बस मुसलमान है. ये मुल्क इसलिए तरक्की नहीं कर रहा क्योंकि, मुसलमान चार शादीयाँ कर रहे हैं. ढेर सारे बच्चे पैदा कर रहे हैं. तलाक पर तलाक दीए जा रहे हैं. अगर ये सब न होता तो भारत बहोत पहले सोने की चिडीया नहीं बल्के सोने का मोर बन गया होता. वो और जोर से चीखता है तो मुझे लगता है की, शायद उसकी बातों में सच्चाई है. अगले दिन मैं अखबार पढता हूं. उसमें खबर छपी है के, एसीबी ने कई भ्रष्ट सरकारी कर्मचारीयों को रिश्‍वत लेते पकडा है. मैंने उनके नाम पढे. मुझे उनमें से एक भी मुसलमान नहीं मिला. मैं एक हप्ते तक लगातार भ्रष्ट कर्मचारीयों के गिरफ्तारी के समाचार पढता रहा. जिनमें एक भी नाम मुसलमान का नहीं था. यही नहीं आंतरराष्ट्रीय संस्था द्वारा जारी की गई उन लोगों की सूची भी देखी जिनपर कालाधन विदेशों में रखने का शक है. मगर मुझे उसमें एक भी मुसलमान नहीं मिला.
      मुसलमान सिर्फ दो चीज चाहता है. 1. उसका घर सलामत रहे. दूसरी उसकी मस्जिद सुरक्षित रहे. हां उसे दीन के नाम पर गुमराह करनेवाले खूब हैं. नेताओं ने उसे सियासत का सामान बना डाला. गरीबी के हालात भयंकर हैं. कोई भी नेता दो चार जोशीले नारे लगाकर, एक दो भडकिले शेर सुनाकर जिधर चाहे हांक ले जाता है. क्या इससे सस्ती चीज भारत में कई और मिलेगी? मैं तो कहूंगा की मेहेंगाई के इस दौर में मुसलमान की जान सबसे सस्ती है. रंगून से लेकर राजसमंद तक रोज मुफ्त में मारे जा रहे हैं.” (संदर्भ ः फेबसुक पेज, कोलसिया).
      शेवटी एवढे नमूद करू इच्छितो की 19 वर्षापुर्वी सोनिया गांधींनी अशाच अडचणीच्या काळात पक्षाची सुत्रे हाती घेतली होती. तेव्हा लोकसभेत काँग्रेसचे 114 सदस्य होते. आता 14 डिसेंबर 2017 रोजी राहूल गांधी यांनी पक्षाची सुत्रे हाती घेतली आहेत. तेव्हा लोकसभेत पक्षाच्या खासदारांची संख्या फक्त 44 आहे. आव्हान कठीण आहे. पाहू ते पक्षाला भविष्यात कोणत्या दिशेला घेवून जातात.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget