Halloween Costume ideas 2015

गृहिणी हेच पद श्रेष्ठ!

तब्बसुम मंजूर नाडकर, मुंबई.
9870971871
    अल्लाहने संपूर्ण विश्‍वाची व त्यातच पृथ्वीची रचना अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे. ती नुसती सुंदरच नाही तर त्यात व्यवस्थापनाची अत्युच्च रचना सामावलेली आहे. ज्यात एका सेकंदाचाही फरक पडत नाही. कुरआनमध्ये स्पष्ट केलेले आहे की, आदम अलै. यांची सर्वप्रथम रचना केली गेली आणि त्यांच्यापासून त्यांची पत्नी हव्वा अलै. यांची निर्मिती केली. पृथ्वीवर सर्वात अगोदर हेच जोडपे पाठविण्यात आले व त्यांच्यापासून वाढलेला वंश म्हणजे आज जगात अस्तित्वात असणारे 7 अब्ज लोक होत.
    जगाच्या रचनेमध्ये व मनुष्याच्या उत्पत्तीमध्ये महिलेला जे उच्चस्थान इस्लामने दिलेले आहे तसे स्थान दुसर्‍या कुठल्याही सामाजिक व्यवस्थेत दिलेले नाही. इस्लामी व्यवस्था आणि कायद्याची व्यवस्थित माहिती असेल तर त्यात साडे चौदा वर्षापूर्वी महिलांना जे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत ते पाहून लोक आश्‍चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाहीत. असे लोक ज्यांना खरेपणा आवडतो आणि वृत्तीनेही सभ्य आहेत, ते इस्लाममधील खरेपणा स्विकार केल्याशिवाय राहत नाहीत.
    आदर्श समाजाचा पाया स्त्री आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, आईच्या कुषित मुलांची पहिली शाळा साकारतेे. येथूनच या गोष्टीचा निर्णय होतो की, पुढे चालून मुलं चांगली निपजणार का वाईट? यावेळेस झालेले संस्कार मरेपर्यंत टिकून राहतात. स्त्री एक ईश्‍वराची श्रेष्ठ रचना आहे. तिच्यावर मानवी वंशाला जन्माला घालण्याची, आकार देण्याची आणि संस्कार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. हीच जबाबदारी जगातील सर्वात श्रेष्ठ जबाबदारी आहे. स्त्रीने जर ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली तर जग सुंदर आणि राहण्यालायक होईल आणि दुर्देवाने स्त्री ही जबाबदारी पार पाडण्यास अयशस्वी झाली तर हे जग राहण्यालायक राहणार नाही.
    यावरूनच एक स्त्रीच्या अस्तित्वाचे महत्व कळू शकते. स्त्रीची भूमिका आई बनण्यापासून घरातून सुरू होते. दगड, मातीपासून तयार केेलेल्या इमारतीला घरपण स्त्री शिवाय येत नाही. स्त्री नसेल तर कितीही मोठी इमारत दगड मातीची आकृतीपेक्षा जास्त मानली जाणार नाही. घराला घरपण देण्यासाठी, सजविण्यासाठी, तिला रोज सकाळी सर्वात अगोदर उठावं लागतं, घरातील प्रत्येक सदस्याच्या आवडी-निवडीच्या विचाराप्रमाणे सकाळचा नाष्टा तयार करावा लागतो. त्यानंतर घरातील इतर महत्वाच्या जबाबदार्‍या पार पाडता-पाडता कधी रात्र होते हे कळत नाही. सकाळी सगळ्यात अगोदर उठलेली गृहिणी झोपायला मात्र सगळ्यात शेवटी जाते. गृहिणी घरात ज्या तत्परतेने काम करते तेवढ्या तत्परतेने पुरूष काम करू शकत नाहीत. तिच्या अस्तित्वाने घर भरून जाते.
    व्यक्तिगत जीवनात असो का सामुहिक जीवनात स्त्रीशिवाय शोभा येत नाही. स्त्री शिवाय जगाची कल्पना सुद्धा करता येत नाही. स्त्रीला पुरूषांबरोबरचे अधिकार देण्याच्या गप्पा तर सगळे मारतात मात्र प्रत्यक्षात तिला तिचे अधिकार कधीच मिळत नाहीत.
    स्त्रीने कार्यक्षम असणे हे समाजहिताचे आहे. ती जर कार्यक्षम नसेल तर समाज वेगाने प्रगती करू शकत नाही. संस्कृती आकार घेऊ शकत नाही. स्त्री जर सुसंस्कारी नसेल तर समाज सुसंस्कृत होऊ शकत नाही.
    इस्लामपूर्व काळात अरबस्थानात महिलांवर भरपूर अत्याचार होत होते. त्यांच्यावर अनेक बंधने लादली गेली होती. समाजात तिला कुठलेच स्थान नव्हते, तिला कुठलेच अधिकार नव्हते, तिचा कुठलाच सन्मान केला जात नसे, स्त्रीला  पुरूषाच्या हातातील बाहुलीप्रमाणे वागणूक मिळत होती. मात्र प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिव्य कुरआनच्या मार्गदर्शनाखाली एवढी जबदरस्त समाजसुधारणा केली की, जे अरब आपल्या मुलींना जीवंत गाडून टाकत होते तेच अरब आपल्या मुलींना फक्त लाडाने वाढवतच नव्हते तर त्यांना आपल्या संपत्तीतून हक्कही देत होते.
    इस्लाममध्ये स्त्रीचे अधिकार कुरआन आणि सुन्नतमध्ये स्पष्टपणे नोंदविलेले आहेत. एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे शरियतमध्ये पुरूषाला स्त्रीवर कुठलेच वर्चस्व गाजविण्याचा अधिकार दिलेला नाही. फक्त पतीला पत्नीवर हक्क गाजविण्याचे काही विशेषाधिकार दिलेले आहेत. त्याचा उद्देशही पत्नीवर पतीने हक्क गाजवावा हा नाही. तर कुटुंबाचे संचलन शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे हा आहे. इस्लाममध्ये स्त्रीला जो मान-सन्मान दिलेला आहे तो अवर्णनीय आहे.
    आजकाल मुलींच्या शिक्षणासंबंधी दोन विचारप्रवाह मुस्लिम समाजामध्ये रूढ आहेत. एक विचार प्रवाह मुलींना उच्चशिक्षणापासून रोखू पाहतो तर दूसरा मुक्तपणे उच्चशिक्षण देण्याची शिफारस करतो. माझ्या मते हे दोन्हीही विचार बरोबर नाहीत. मुलींना उच्च शिक्षणापासून रोखणे ही चुकीचे व त्यांना गैरइस्लामी वातावरणात उच्च शिक्षणाच्या नावाखाली मुक्त सोडणेही चुकीचे आहे. सत्य या दोघांच्या मध्ये आहे. अर्थात इस्लामी आचारसंहितेच्या परिघामध्ये राहून मुलींना शोभेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा शाखेत उच्च शिक्षण देण्यास हरकत नाही. स्त्रियांचा वावर आज प्रत्येक क्षेत्रात दिसून येतोय. मात्र माझ्या मते महिलांसाठी काही विशिष्ट क्षेत्र चिन्हित करून त्यामध्ये गरजू महिलांचा समावेश व्हावा. खरे पाहता गृहिणी हेच पद कुठल्याही पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे, अशी माझी धारणा आहे.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget