Halloween Costume ideas 2015

मुस्लिमांचे महामानवांसाठी योगदान (उत्तरार्ध)

- दीपक त्रंबक गायकवाड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ भारतीयांबरोबरच  अस्पृश्य समाजाचे नेतृत्व करून त्यांना मानवी मूल्यांचे अधिकार मिळवून दिले. यामुळे त्याच्या या चळवळीत अस्पृश्य समाज वेळोवेळी संगती असला तरी महत्त्वाच्या वेळा मुस्लिमांनीच खंबीरपणे स्वत:च्या खांद्यावर घेऊन त्यांना मोलाची साथ दिल्याची डॉ. आंबेडकरांचा जीवन इतिहासच साक्ष देतो. कारण डॉ. आंबेडकरांची अस्पृश्यांच्या मानवी हक्कांच्या लढाईचा प्रारंभ महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने झाला. पण या सत्राग्रहाच्या मंडपासाठी जागा द्यायला त्या वेळी महाडमध्ये एकही सद्गृहस्थ तयार नव्हता. या वेळी संपूर्ण सवर्ण समाजाच्या विरोधात उभे राहून स्वत:च्या जीवाची कोणतीही तमा न बाळगता ‘फतेहखान पठाण’ या मुस्लिम व्यक्तीने जागी दिली. एवढेच नाही तर याच महाडमधील तमाम मुस्लिम समाजाने अस्पृश्यांवर सनातन्यांनी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करून त्याच्या अन्नात माती कालवल्यावर त्यांची आस्थापूर्वक स्वत:च्या घरात नेऊन सुश्रूषा केली व त्याच्या जेवणाची मानवतेच्या मायेने व्यवस्थाही केली. अशीच अस्मितेची, ममतेची, मायेची व मानवतेची महाडपासून सुरू केलेली साथ मुस्लिमांनी नाशिक काळाराम सत्याग्रहातही दिली. या सत्याग्रहाच्या वेळी मानवतेचा पुजारी आणि समता बंधुत्वाचे पायिक असणाऱ्या बाबासाहेबाच्या जीविताला सनातन्यांकडून कोणताही धोका पोहचू नये म्हणून नाशिकमधील झकेरिया मनियार या मुस्लिम सद्गृहस्थाने स्वत:च्या बंगल्यात सुरक्षितपणे राहण्यास जागा देऊन ठेवून घेतले. झकेरिया मनियार यांची ही कामगरिी म्हणजे महाडच्या फतेहखान यांच्यासारखीच फत्ते करणारी होती, यात शंकाच नाही.
मुस्लिम समाज बाबासाहेबांच्या संगती फक्त त्यांच्या सत्याग्रहापुरताच पाठीशी होता असे नाही तर तो बाबासाहेबांच्या सर्वच चळवळींत संगती होता, हे अनेक उदाहरणांरून स्पष्टपणे दिसून येते. जसे इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींनी अस्पृश्यांच्या न्याय्य मानवी हक्कांविषयीच्या मामल्यांना तीव्र विरोध केला. गांधींचा विरोध म्हणजे संपूर्ण काँग्रेसचा विरोध. माझा जीव गेला तरी मी अस्पृश्यांच्या मागण्या कदापि मान्य करणार नाही, अशी भूमिका गांधींची होती. पण हा विरोध करताना गांधी मुस्लिम, शीख यांच्या मागण्या मान्य करायला एका पायावर तयार होते आणि त्यांनी त्या मागण्या मान्यही केल्या होत्या. पण डॉ. आंबेडकरांच्या विरोधापुढे गांधींचे काही चालेना व आपला डॉ. आंबेडकरांसमोर पराजय होतोय असे लक्षात येताच गांधी एका रात्री हातात भगवद्गीता घेऊन बॅ. जीनांच्या बंगल्यावर गेले आणि गीतेवर हात ठेवून जीनांना म्हणाले की, ‘‘मी तुमच्या सर्वच मागण्या मंजूर करतो, हे गीतेवर हात ठेवून सांगतो. पण तुम्ही परिषदेत डॉ. आंबेडकरांच्या मागण्यांना विरोध करा.’’ महात्मा समजल्या जाणाऱ्या या माणसाची ही अमानवी चाल ओळखून बॅ. जीना त्यांना म्हणाले, ‘‘गांधी, आम्ही जसे अल्पसंख्याक असून आमचे अधिकार पदरात पाडून घेण्यासाठी झगडतो आहे, तोच अधिकार डॉ. आंबेडकर त्यांच्या समाजासाठी वापरत आहेत व संघर्ष करत आहेत. एका अल्पसंख्याक गटाने दुसऱ्या अल्पसंख्याक गटाला विरोध करणे हे न्याय्य नसून अमानवीही आहे.’’ बॅ. जीनांचा हा काँग्रेसच्या मानवतेविरूद्ध आसणाऱ्या विचारांना व महात्म्याला विरोध होतात, तसाच त्यांचा विरोध म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या मानवी हक्कांच्या मागण्यांना मूक संमती होती, हे इतिहास संशोधकांनी व विचारवंतांनी लक्षात घेतले पाहिजे, असे मला वाटते.
मुस्लिम समाज डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी कधी पडद्यामागून तर कधी निधड्या छातीने समोर राहिल्यामुळेच त्यांच्या चळवळीला दुधारी बनली होती, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. कारण घटना समितीत येण्यासाठी डॉ. आंबेडकरांना काँग्रेसने कसून विरोध केला होता. हा विरोध इतका तीव्र होता की, काँग्रेसच्या सरदार पटेलांनी तर ‘डॉ. आंबेडकरांसाठी संसदेची दारेच काय पण खिडक्याही बंद केलेल्या आहेत,’ असे जाहीर केले होते. पण संसदेत जाण्याचा इरादा आंबेडकरांचा पक्का होता. डॉ. आंबेडकरांची घटना समितीत अत्यंत गरज आहे, सर्वप्रथम मुस्लिम लीगने ओळखले आणि त्यांना शे.का. फेडरेशनच्या तिकिटावर बंगाल प्रांतातून उभे करून जोगेंद्रनाथ मंडल यांच्या मदतीने मुस्लिम लीगने निवडून दिले, पण डॉ. आंबेडकर निवडून येताच त्यांची ताकद ओळखून काँग्रेसने हा प्रांतच फाळणीत पाकिस्तानला न मागता सप्रेम भेट देऊन टाकला आणि डॉ. आंबेडकरांना घटना लिहिण्याची फारच हौस असेल तर त्यांनी पाकिस्तानची घटना लिहून पुरवावी, असे काँग्रेसने म्हटले. कारण बंगाल प्राप्त पाकिस्तानला दिल्यामुळे डॉ. आंबेडकरांचे एवढ्या कष्टाने निवडून आणलेले सदस्यत्वही पाकिस्तानचेच झालेले होते. पण पुढे एवढ्या तोलामोलाचा व विद्वत्तेचा माणूस काँग्रेसकडे नाही हे काँग्रेसच्याच लक्षात लवकर आले आणि त्यांनी डॉ. आंबेडकरांना घटना लिहिण्याची गळ घालून मुंबईतील जयकरांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या झालेल्या रिकाम्या जागेवर निवडून आणले.
मोठ्या कष्टाने पाठिंबा देऊन व मुस्लिम लीगच्या मदतीने डॉ. आंबेडकरांना घटना समितीत पाठवूनही त्याचा उपयोग न झाल्याने मुस्लिम नाराज झाले. पण जेव्हा डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसूदा तयार केल्यानंतर सर्वप्रथम त्या मसूद्याचा उदार अंत:करणाने स्वीकार करून संसदेत बसलेल्या संपूर्ण घटना समितीच्या सदस्यांसमोर ‘काझी सय्यद कमरुद्दीन’ या मुस्लिम सद्गृहस्थाने त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ असे जाहीर संबोधून काँग्रेसला घरचा आहेर दिला.
भारतातले मुस्लिम डॉ. आंबेडकरांच्या पाठीमागे फक्त राजकीय, सामाजिक चळवळींतच होते असे नाही तर ते त्यांच्या शैक्षणिक चळवळीतही बरोबर होते. कारण ज्या वेळी डॉ. आंबेडकरांनी मुंबईत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली तेव्हा त्यांच्या कार्यावर व धुरंधर नेतृत्वावर खूश होऊन मुंबईतील एक प्रसिद्ध शेठ असलेल्या व मानवी गुणांची जाण असलेल्या ‘हुसेनजी भाई’ या मुस्लिम सद्गृहस्थाने त्यांना त्या वेळी ५० हजार रुपये वर्गणी म्हणून मदत दिली. त्या वेळचे ५० हजार म्हणजे आजचे पाच कोटी हे वेगळे सांगायची गरज आहे, असे मला मुळीच वाटत नाही. एवढेच नाही तर औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाची जागाही डॉ. आंबेडकरांनी मुस्लिम निजामाकडूनच घेतली होती, पण या जमिनीचे रीतसर पैसे त्यांनी नंतर चुकते केले.
डॉ. आंबेडकरांनी सर्वच भारतीयांच्या उन्नतीसाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल व देशासाठी केलेल्या अतुलनीय त्यागी देशभक्तीने प्रेरित होऊन देशात सर्वप्रथम १२ जानेवारी १९५३ ला हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही पदवी देऊन सन्मान केला. त्या वेळी हे उदारतेचे धोरण मुस्लिम विद्यापीठाला सुचले, पण बनारस हिंदू विद्यापीठाला सुचले नाही. तसेचज्या काँग्रेसने संविधानावर स्वातंत्र्यापासून देशाची सत्ता सांभाळली त्या काँग्रेसलाही या प्रज्ञासूर्य महामानवाला त्यांच्या काळात भारतरत्न द्यावे असे वाटले नाही. तर तो मानही व्ही. पी. सिंग यांनी मिळवून भारतीय सत्तेची लाज राखली, असेच सत्याने म्हणावे लागेल.
मुस्लिम समाजाच्या मानवी मूल्यांनी, जीवनाकडे ध्येयवादी दृष्टीने पाहण्याच्या वृत्तीने व त्यांच्यात असणाऱ्या धार्मिक संघशक्तीने डॉ. आंबेडकर भारावून जात असत. त्यांना मुस्लिमांच्या या गुणकर्तृत्वाचा नेहमीच अभिमान वाटत असे. म्हणून १९३५ ला येवला येथे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांनी आपल्या समाजबांधवांना १५ मार्च १९२९ च्या ‘बहिष्कृत भारत’ मधून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. त्या वेळी काही अस्पृश्यांनी मुस्लिम धर्मात धर्मांतरही केले होते, पण १९५६ च्या धर्मांतरावेळी बौद्ध धम्माला जवळ केले. त्यांचा हा निर्णय सर्वच भारतीयांत आजही बंधुता पेरणारा आहे व पेरत आलेला असून पुढेही भविष्यात पेरत राहील, यात शंका नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget