Halloween Costume ideas 2015

सुख-शांतीची पैगंबरी दिशा

- डॉ.सय्यद रफिक पारनेकर.

इसवी सनाच्या सहाव्या शतकात मक्का शहरासह संपूर्ण अरबस्थानात टोळ्यांचे राज्य होते. रक्तपात, लुटालूट, दरोडेखोरी राजरोसपणे होत असे. तो अत्यंत काळोखमय काळ होता. अशा स्वैराचारी लोकांत परिवर्तन घडविणे जवळपास अशक्यप्राय कार्य होते.
    परंतु, पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी त्या रानटी लोकांमध्ये समतेची, बंधुभावाची व न्यायाची चळवळ सुरू केली. हळू-हळू ही परिवर्तनवादी चळवळ जोर धरू लागली. मात्र त्यामुळे तत्कालीन प्रस्थापितांच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ लागली. ते सर्व एकत्र आले व त्यांनी पैगंबरी चळवळीला नेस्तनाबूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्यांनी पैगंबरांच्या गरीब, असहाय्य कार्यकर्त्यांचा भयंकर छळ करण्यास सुरूवात केली. काहींची निर्घूण हत्या केली. बिलाल (र.) सारख्या निग्रो कार्यकर्त्याला वाळवंटातील तळपत्या उन्हात उघड्या पाठीवर पाडून उष्ण वाळूवर त्यांना फरफटत मक्केच्या गल्लोगल्लीत मिरवू लागले. या दहशतीने व भयंकर छळाने कंटाळून एकदा काही कार्यकर्ते पैगंबरांजवळ आले व विनवनी करू लागले. ”हे अल्लाहचे प्रेषित सल्ल.! विरोधकांच्या या त्रासाची परिसीमा झाली. आम्ही कुठपर्यंत हे सहन करावे? कृपया आपण अल्लाहजवळ प्रार्थना करा की आम्हाला उसंत लाभावी. हा छळ नष्ट व्हावा व शांती, अभय लाभावे !” त्यांचे सांत्वन करत पैगंबर उद्गारले, ‘सख्यांनो, तुम्ही धीर सोडू नका, हताश होवू नका, अरे, तुमच्या पूर्वी तर जगात असेही घडले आहे की, प्रत्यक्ष पैगंबराला विरोधकांनी जित्याजी करवतीने उभे चिरले! कुणाला जीवंत गाडले तर कुणाच्या शरीरावर, लोखंडी खिळ्यांचे कंगवे चालवून त्यांचे स्नायू त्यांच्या हाडापासून वेगळे केले. तरीही ते हतबल झाले नाहीत की त्यांनी आपला निर्धारही सोडला नाही. तुम्ही या इस्लामी आंदोलनात मला साथ द्या! अल्लाहची शपथ या प्रदेशात अशी शांती, असे अभय प्रस्थापित होईल की भगिनी हिर्‍यांच्या व सोन्याच्या किमती दाग दागिन्यांनी मढऊन सनआ पासून थेट हजर-मौत (अरबस्तानाची दोन टोके - उदा. कश्मीर ते कन्याकुमारी) पर्यंत एकटी प्रवास करेल पण कुण्या माईच्या लालाची हिम्मत होणार नाही की तिच्याकडे वाईट नजरेने पाहावे!”
    आपल्या ध्येयावर किती पराकोटीची बांधिलकी! किती अथांग विश्‍वास! धन्य पैगंबर (सल्ल.).    आणि अवघ्या जगाने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले की पैगंबरांचे हे भाकीत अवघ्या तेवीस (23) वर्षांच्या अथक प्रयत्नाअंती तंतोतंत खरे ठरले. पैगंबरांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी ती शांती, ते अभय प्रस्थापित केले. ज्याला ’न भूतो न भविष्यती’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकांनी खर्‍याखुर्‍या स्वातंत्र्याची चव चाखली. वास्तविक समतेचा व बंधुभावाचा आस्वाद घेतला. न्याय प्रत्यक्षात प्रस्थापित झाला.
    आधुनिक परिवर्तनवादी चळवळींचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले उगाचच पैगंबरी कार्याने प्रभावित झाले नाहीत. फुल्यांनी पैगंबरांचे गुणगाण करणारा भलामोठा पोवाडा लिहिला (मुहम्मद-मुहम्मद) ज्यात ते म्हणतात,
    ” कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास,
    जात प्रमादास खोडी बुडी
    मोडिला अधर्म आणि मतभेद
    सर्वात अभेद ठाम केला.
    आज संपूर्ण जग शांतीच्या शोधात आहे. सर्वत्र अशांतता माजली आहे. अशा अशांत परिस्थितीत पैगंबरी चळवळ, त्या चळवळीची मुलभूत तत्वे व त्या चळवळची कार्यप्रणाली समस्त परिवर्तनवादी कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक आहेत, यात तिळमात्र शंका नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget