तुमच्यामधीलच एक प्रेषित तुमच्याकडे आले. तुम्हाला काही त्रास होणं त्यांना असह्य होते. तुमच्या भल्याची त्यांना नित्तांत इच्छा आहे आणि तो श्रद्धावंतांचा स्नेही आणि कृपावंत आहे.” (कुरआन-9:128)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याविषयी हे वर्णन अल्लाहनं स्वत: कुरआनात केलंय. प्रेषितांना अल्लाहनं ज्या लोकांदरम्यान पाठवलं होतं त्या लोकांबाबत प्रेषितांना कशी काळजी होती, कुणास कशाचाही त्रास होऊ नये ही प्रेषितांची इच्छा होती. प्रत्येकाचं सदैव भलं होत राहावं, असे त्यांना वाटे. विशेषकरून श्रद्धावंतांशी तर त्यांना उत्कट स्नेह होता. त्यांच्याशी दयेनच ते नेहमी वागत होते. कधी कुणावर रागवत नसत. प्रेषित आपल्या अनुयायांशी जशा सद्भावनेचं वर्तन करत, जशी त्यांची काळजी घेत, त्यांच्याशी जवळीक साधत.
प्रेषित मुहम्मद (स.) कुणास कधी जोरानं बोलत नसत. अपशब्द बोलत नसत. दोष काढत नसत. सर्वांना सदैव माफ करत. मानवजातीला नरकापासून वाचवण्यासाठी ते सतत तळमळत होते. कसंही करून लोकांना अल्लाहचा संदेश पोचता करावा, त्यांनी श्रद्धा बळगावी आणि नरकापासून त्यांची सुटका व्हावी, ही चिंता त्यांना रात्रंदिवस सतावत होती.
मानवजातीसाठी जशी अनुकंपा प्रेषित मुहम्मद (स.) बाळगत होते त्यानुसारच त्यांनी नव्या समाजाची उभारणी केली. तमाम लोकांनी एकमेकांशी सौहार्दानं, सद्भावनेनं वागावं, एकमेकांच्या अडीअडचणीत मदत करावी, एकमेकांच्या गरजा ओळखून त्याची पूर्तता करावी, परस्परांशी हेवेदावे करू नयेत, द्वेषभावनांना समाजात थारा असू नये, एकमेकांची मनं दुखवू नयेत, याची त्यांनी काळजी घेतली. समाजात सलोखा, शांतता आणि बंधुभाव नांदावा या दृष्टीनं त्यांनी इस्लाम धर्माच्या अनुयायांना प्रशिक्षण दिलं. त्यांच्यावर संस्कार घडवले आणि उच्चप्रतीच्या शिकवणींनी त्यांनी समाजास समृद्ध केले.
समाजाची स्थापना करताना समाजातील दुर्बल आणि महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख पवित्र कुरआन अशा रितीनं करतो :
”माता-पित्यांशी दयेनं वागा. तसेच जवळच्या नातेवाईकांशी, अनाथांशी, निराधारांशी, निकटच्या शेजार्यांशी, निकटवर्ती, अनोळखी, सान्निध्यातील लोकांशी, प्रवाशांशी आणि तुमच्या अधीन असलेल्यांशी (सदवर्तनानं वागावं).” (कुरआन-4:36)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणी तसेच अल्लाहनं दिलेल्या आज्ञानुसार समाजातील सर्व लोकांना त्यांच्या कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांना कोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचंय. लोकाचे हक्काधिकार काय आहेत याचा तपशील दिलेला नाही. ज्यांनी त्यांनी आपापली कर्तव्यं पार पाडली तर त्यापासून इतर लोकांना आपोआप त्यांचे हक्क प्राप्त होतात. उदा. अनाथांची मालमत्ता हडप केल्यानं त्यांचे जे हक्क आहेत ते हिरावून घेतले जातात. तेव्हा अनाथांना जर असे सांगितलं गेलं की तुमच्या मालमत्तेचं संरक्षण व्हावं हा तुमचा अधिकार आहे, पण ही सुरक्षा कोण करणार? समाजातील प्रत्येक सदस्यानं येऊन अशा अनाथाला विचारावं की तुमच्या मालमत्तेची सुरक्षा होते काय? कारण हा तुमचा हक्क आहे. नुसतं असे सांगण्यानं किंवा तशी हमी देण्यानं त्यांची मालमत्ता सुरक्षित राहू शकेल काय? ही जबाबदारी खरी कोणाची? कुणी सुरक्षा प्रदान करायची? कुणी त्यांना तशी हमी द्यायची?
तसेच तुमच्या माता-पित्याचे अमुक अमुक अधिकार आहेत, ते वृद्धावस्थेत पोचल्यास त्यांची देखरेख केली जावी, त्यांच्या अन्न-पाण्याची तरतूद केली जावी हा त्यांचा हक्क आहे, असे म्हटल्यानं खरंच त्यांची काळजी घेतली जाऊ शकते काय? कुणाची ती जबाबदारी? कुणी त्यांची सेवा करायची? समाजातील प्रत्येक व्यक्तीवर हे बंधनकारक आहे की त्यांनी वाईट हेतूनं अनाथांच्या मालमत्तेकडे पाहू नये. प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. तसेच वृद्धांशी सहानुभूतीनं वागणं, त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणं हे त्यांच्या संततीचं कर्तव्य आहे.
उपरोल्लेखित सर्व गोष्टी समाजातील प्रत्येक सदस्यानं पार पाडायची कर्तव्यं आहेत. त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदार्या आहेत. सर्व लोकांनी आपापली कर्तव्य पार पाडण्याचा अर्थ हा की त्यांच्या कर्तव्यपूर्तीद्वारे समाजातील त्यांच्या आणि इतरांच्या हक्काधिकारांची पूर्तता होते. हे इस्लामी सभ्यता-संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकानं आपली कर्तव्य पूर्ण केलीत तर प्रत्येकाला त्याचे अधिकार आपोआपच प्राप्त होतात. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनानुसार खालील तत्त्वांवर समाजाची बांधणी केली.- पहिलं तत्त्व-
”त्याचा (अल्लाहचा) कुणी भागीदार बनवू नका.” (कुरआन-6:51)
समाज माणसांचे सामूहिक आचारविचार, भावना आणि इच्छाशक्तीनं साकारतो. एकच धर्मग्रंथ, धार्मिक एकत्व, जीवनाचं सामुदायिक तत्त्वज्ञान याद्वारे समान भावना निर्माण होतात. त्याच बरोबर राज्यसंस्था, राजकारणाचं तत्त्वदेखील सामुदायिक असायला हवेत. शासनाचं शासनकर्त्यांचं उद्दिष्ट वेगळं आणि समाजाचं समाजातील वेगवेगळ्या घटकांचं उद्दिष्ट वेगळं असल्यास अशा समाजाला एकसंघ समाज म्हणता येणार नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एकेश्वराच्या तत्त्वावर ज्या समाजाची बांधणी केली होती, त्या समाजातील शासन-शासनकर्ते असोत की साधारण नागरिक असोत, सर्वांचं उद्दिष्ट एकच होतं आणि हे उद्दिष्ट म्हणजे ईश्वराच्या आज्ञेनुसारच जीवनाचं प्रत्येक कार्य पार पाडणं. त्याचं आज्ञापालन करून अल्लाहची प्रसन्नता साधावी. त्यापलीकडे त्या समाजाच्या लोकांचं कोणतही उद्दिष्ट नव्हतं. अल्लाहच्या आज्ञांचं पालन करताना त्याच्याच कारणास्तव जर त्यांचे प्राण गेले तर त्यांचं जीवन सफल झालं असेच त्यांना वाटे. त्यांचं उद्दिष्ट एकच - या जगातील समृद्धी नव्हे, मरणोत्तर जीवनातील शाश्वत आणि समृद्ध जीवन. जगणं आणि मरणं दोन्ही अल्लाहच्या प्रसन्नतेखातर.
- दुसरं तत्त्व -
”माता-पित्यांशी चांगुलपणानं, व्यवहारातील औदार्यानं वागा. त्याच बरोबर स्वत:च्या संततीला दारिद्य्राच्या भीतीपोटी ठार नका करू. त्यांना आणि तुम्हांस आम्हीच उपजीविका देतो.” एकानं प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारलं, ”संततीवर आई-वडिलांचे कोणते अधिकार आहेत?” प्रेषित म्हणाले, ”माता-पिताच तुमच्यासाठी स्वर्ग आहेत आणि (त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास) तेच तुम्हाला नरकाचं कारण बनतील.” (हदीस : इब्ने माजा)-तिसरं तत्त्व -”उघड असो की गुपित व्यभिचाराजवळही फिरकू नका.” (कुरआन-6:151) - चौथं तत्त्व - ”न्याय्य कारणाशिवाय कोणत्याही जीवास, ज्याला अल्लाहनं आदरणीय ठरवलंय, ठार करू नका.” (कुरआन-6:151)
म्हणजे जो समाज प्रेषितांच्या देखरेखीत आकार घेत होता त्याचा पाया न्यायावर आधारित होता. अन्याय-अत्याचार कोणत्याही व्यक्तीवर होणार नाही, याची दखल घेतली होती. समाजातील सर्व माणसांच्या जीवांना अल्लाहनं आदरणीय ठरवलं होतं. समाजात नाहक रक्तपात होता कामा नये, याची काळजी घेतली होती. समाजामध्ये बंधुभाव नांदावा. लोकांनी एकमेकांशी मवाळपणानं, आपुलकीनं वागावं. लहान सहान गोष्टींची जर काळजी घेतली नाही तर त्या पुढं जाऊन समाजात कलह, द्वेष आणि मत्सर निर्माण करतात. प्रेषित ज्या समाजाची आखणी करीत होते, त्यात अशा कोणत्याही गोष्टींना थारा नव्हता ज्यामुळे समाजातील स्त्री-पुरुषांमध्ये एकमेकांविषयी दुष्ट विचार पसरतील.प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारलं, ”चहाडी करणं म्हणजे काय माहीत आहे काय?” अनुयायी म्हणाले, ”अल्लाहच्या प्रेषितांनाच ठाऊक!” प्रेषित म्हणाले, ”आपल्या भावाच्या पाठीमागं त्याच्याविषयी अशा गोष्टी करणं ज्या त्यास आवडत नसतील.” एकानं विचारलं, ”पण जर अशा व्यक्तीमध्ये खरोखरच तशी गोष्ट असेल तर?” प्रेषित म्हणाले, ”तुम्ही जे काही बोलता ते जर खरं असेल तर हे चहाडी करण्यासारखंच होईल. आणि जर ते खरं नसेल तर हा त्याच्यावर आरोप करण्यासारखं होय.” (हदीस : मुुस्लिम).
(लेखक पवित्र कुरआनचे अनुवादक, इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक आणि साप्ताहिक ’शोधन’चे माजी संपादक आहेत. सदर लेख ’पे्रेषित मुहम्मद (स.) नवयुगाचे प्रणेते’ या त्यांच्या आगामी ग्रंथातून घेतला आहे.)
Post a Comment