Halloween Costume ideas 2015

आदर्श समाजाची निर्मिती का व कशी?

- एम.आय.शेख
9764000737
भारतीय मुस्लिम समाजाला जरी अल्पसंख्यांक म्हटले जात असले तरी 20 कोटींच्या जवळपास असलेला हा समाज कोणत्याच दृष्टीनेअल्पनाही. किंबहुना तो सेकंड लार्जेस्ट मेजॉरिटी आहे. भारतातील प्रत्येक पाचवा माणूस मुस्लिम आहे़  मुस्लिमांनी आदर्श असावे, आदर्श दिसावे आदर्श वागावे ही त्यांची धार्मिक जबाबदारी आहे़ दुर्देवाने या जबाबदारीची बहुतेक लोकांना जाणीव नाही़ प्रेषित मुहम्मद सल्ल़ हे अंतिम प्रेषित असल्यामुळे त्यांचे वारस म्हणून आदर्श समाज रचनेचे मुस्लिमांकडूनच होणे अपेक्षित आहे़  हे कार्य खडतर आहे म्हणूनच करण्यालायक आहे. ही जबाबदारी कुरआनने त्यांच्यावर टाकलेली आहे़  कुरआन मुस्लिमांना आदेश देतो की, ”जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.” (संदर्भ सुरे आलेइमरान आयत क्र. 110).
      या आयातीमध्ये आदर्श समाज रचनेसाठी मुस्लिमांनी काय करावे याची व्याख्या एका ओळीत केलेली आहे़ मुस्लिमांनी नेकी (पुण्यकर्म)चा आदेश दुसर्यांना द्यावा बदी (पापकर्मा)पासून त्यांना रोखावे. हे काम करण्यासाठी भारतीय मुस्लिम समाज तयार आहे का? याचा अगोदर विचार करावा लागेल़  सद्य:स्थितीत आपण खात्रीने सांगू शकतो की हे काम करण्यासाठी (अपवाद खेरीज करून) मुस्लिम समाज तयार नाही़ उलट मोठी संख्या अशा मुस्लिमांची आहे जे मोठ्या प्रमाणात बदी फैलावण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत़  कुरआनने आदेशित केलेले हे मुलभूत काम करण्याकडे आपण दुर्लक्ष केले तर अल्लाहला आपली गरज नाही, आपण अल्लहाचे कोणी नातेवाईक नाही हे लक्षात ठेवायला हवे़ नेकीचा आदेश लोकांना देण्यापूर्वी आपण स्वत: नेक असणे आवश्यक आहे़ तसेच बदी पासून रोखण्याचा दुसर्यांना आदेश देण्यापूर्वी आपण स्वत: बदीपासून दूर असणे गरजेचे आहे़  ही किमान पात्रता आहे़ कुरआनमध्ये हा आदेश 1439 वर्षापुर्वी आलेला आहे़  मग मुस्लिम या आदेशाचे पालन का करत नाही? याचे उत्तर असे आहे की, बहुसंख्य भारतीय मुस्लिम हे कुरआनपासून तुटलेले आहेत. कुरआनला ते फक्त एक पवित्र धार्मिक ग्रंथ समजतात़ त्याच्या रक्षणासाठी प्रसंगी लढण्या/मरण्यासाठी तयार होतात. परंतु त्या अनुरूप आचरण करण्याइतपत जाणीव त्याच्यात निर्माण झालेली नाही़ ही जाणीव निर्माण करण्यामध्ये बौद्धिक, राजकीय धार्मिक मुस्लिम नेतृत्व कमी पडलेले आहे, यात शंका नाही.
दुर्लक्षित विषय
शोर--मातम है जिस तरफ जाएं,
गम़जदा लोग कैसे मुस्कूराएं?
      मुस्लिमांनी भारतातील आपला 800 वर्षाचा शासन काळ मोठ-मोठी बांधकामे करण्यात आपली सत्ता टिकविण्यात घालविला तर इंग्रजांनीही त्यांचाच कित्ता गिरविला़ मात्र आदर्श समाज रचनेसाठी दोघांनीही प्रयत्न केलेले नाहीत़  किंबहुना ब्रिटिश कालखंडात तर ब्रिटीशांची जीवनशैली अंगीकारून, त्यांची चाकरी करण्यात स्वत:ला धन्य समजणारा एक मोठा वर्ग भारतात निर्माण झाला होता. स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्या लोकांनी लोकशाही टिकविण्यात, औद्योगीकरणात, विज्ञान-तंत्रज्ञान विकसित करण्यात 70 वर्षे खर्ची घातली़ मात्र आदर्श समाज रचना करावी असे त्यांनाही वाटले नाहीउलट दारू निर्मिती, अश्लील सीनेमे सिरियल्स, सहशिक्षण यांना प्रोत्साहित करून, भ्रष्टाचाराचे रक्षण करून, आदर्श समाज निर्माण होणार नाही याची पूरे-पूर व्यवस्था करून ठेवली. अशा परिस्थितीत मुस्लिमांची आदर्श समाज रचनेची जबाबदारी अधिक कठिण होऊन बसली आहे़
आदर्श समाजच का?
      कोणत्याही देशाने कितीही भौतिक प्रगती केलेली असो मात्र जर का तो आदर्श समाज निर्माण करण्यात अपयशी ठरला तर त्याची ती प्रगती त्याच्या काहीच कामी येत नाही़  उलट तीच प्रगती त्याच्या मुळावर उठत असते़ नैतिक प्रगतीशिवाय भौतिक प्रगती झाली तर त्याचे काय होते याचे उत्तम उदाहरण अमेरिका आहे़ जगातील सर्वात प्रगत असा हा देश, स्वत: तयार केलेल्या स्वयंचलित बंदुकीमुळे उध्वस्त होत आहे़  अमेरिकेमध्ये असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी कुणी तरी माथेफिरू उठतो निरपराध लोकांना गोळ्या घालतो़ फरक फक्त एवढाच आहे की, जेव्हा मोठी हत्याकांडे होतात त्याच्या आंतरराष्ट्रीय बातम्या होतात बाकी छोट्या मोठ्या घटनेत बळी पडलेल्या लोकांच्या बातम्या त्यांच्या सोबतच दफन होऊन जातात़ आपल्याकडेही हीच परिस्थिती आहे. फक्त पद्धत वेगळी आहे़ 1995 ते 2015 च्या वीस वर्षाच्या कालखंडात सुमारे 3,18,000 शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत़ म्हणजे सरासरी दर वर्षी 15,926 शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत़ आजही होत आहेत़ पण कुत्र्यां-वाघांच्या जीवांची काळजी वाहणार्या उच्चभ्रू लोकांना या शेतकर्यांच्या जीवाची परवा नाही, हे मात्र कटू सत्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रात शेतकरी मरत असतांना पुण्या, मुंबईचे लोक संपन्न जीवन जगत आहेत़ नियमितपणे विकएंड साजरे करत आहेत़ नवीन वर्षाचे भरभरून स्वागत करीत आहेत. शेतकर्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही पण तद्दन फालतु चित्रपटांना कोटी कोटींचा प्रतिसाद मिळत आहे़  मुलांवर असे संस्कार झालेले आहेत की केवळ परीक्षा टाळण्यासाठी एक बालक दुसर्या बालकाचा खून करीत आहे. सांगलीच्या पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे मरतो आहे. रस्त्यात, कार्यालयात, घरात महिला कुठेच सुरक्षित नाहीत. भ्रष्टाचार शीगेला पोहोचलेला आहे़ इतकाकी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पकडल्या जात आहेत़  दारू रिचविण्यात समाज उच्चांक प्रस्थापित करीत आहे. अनैतिक संबंधांना सामाजिक मान्यता मिळत आहे. हा खचितच आदर्श समाज नाही़  समाज आदर्श नसल्यास समाजाच्या कमकुवत घटकांवर विपरित परिणाम होतो. मुलं, महिला वृद्ध त्यात अगोदर भरडले जातात़ गोरक्षेच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे मुडदे पाडले जातात़  पण समाजाला फरक पडत नाही़ तो पडावा, अन्यायाविरूद्ध तो पेटून उठावा, कायद्याचे नव्हे तर न्यायाचे राज्य यावे, कोर्टातून निकाल नव्हे न्याय दिला जावा, समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी, देशाच्या प्रगतीत सर्वांना सोबत घेतले जावे यासाठी आदर्श समाजाची गरज आहे़  आदर्श समाज का? याचे हे उत्तर आहे़
आदर्श समाजाची निर्मिती कशी?
      जिस तरह अहेमद--मुख्तार हैं नबियों के इमाम
      बस उसी तरहा ये उम्मत है इमामे अक्वाम
      बहुतांशी भारतीय मुस्लिमांना ह्या सत्याची जाणीवच नाही की ते इस्लाम सारख्या एका महान धर्माचे पाईक आहेत़ त्यांना आपण फक्त अल्पसंख्यांक आहोत त्यामुळे आपले हक्क डावलेले जात आहेत़ एवढीच जाणीव आहे़ काहींना तर तीही नाही़ हमारे मुकद्दरमेच गरिबी है! उसको हम क्या कर सकते हैं? अशी अनेकांची भावना आहे़ शिवाय मस्लकी (वैचारिक) मतभेदाने तो पोखरलेला आहे़  अशा दुभंगलेल्या समाजापासून एका आदर्श समाजापर्यंतचा त्यांचा प्रवास सकृतदर्शनी अशक्य वाटतो़ पण मक्केमध्ये याच किंबहुना यापेक्षा विदारक परिस्थितीतून प्रेषित मुहम्मद सल्ल़ यांनी रानटी अरबी समाजाला आदर्श अरबी समाजाच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले होते. हा आधुनिक इतिहास आहे़ त्यासाठी त्यांनी जी कार्यपद्धती अवलंबिली होती तीच जर का आजही अवलंबिली गेली तर अनादर्श भारतीय मुस्लिम समाजाचे रूपांतर आदर्श मुस्लिम समाजात झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या सूर्य निघणार! याची मला जेवढी खात्री आहे तेवढीच खात्री याही गोष्टीची आहे़  कारण इस्लाम ही केवळ उपासना पद्धती नाही तर आदर्श समाज रचनेची परीपूर्ण संहिता आहे़ फक्त तीव्र इच्छा शक्ती कष्ट उपसण्याची तयारी हवी़
      आदर्श समाज, आदर्श व्यक्ती पासून बनतो आदर्श व्यक्ती आदर्श कुटुंबातून येतात आदर्श कुटुंब कसे तयार करावे? याची तपशीलवार माहिती शरियतमध्ये दिलेली आहे़ शरियतची विभागणी दोन भागात करता येते़ एक - व्यक्तिगत शरियत, दोन-सामुहिक शरियत. व्यक्तिगत शरीयतीमध्ये, व्यक्तिगत पातळीवर एक मुस्लिम व्यक्ती कशी असावी? याचा तपशील दिलेला आहे. तर सामुहिक शरियतीमध्ये एक आदर्श समाज कसा असावा याचा तपशील दिलेला आहे.
      अर्थात, व्यक्तिगत आचरणात प्रत्येक मुस्लिम व्यक्ति ही अल्लाहच्या आदेशाचे पालन करणारी असावी़ त्याने हलाल संसाधनांची तसेच सत्याची कास धरावी, असत्य आणि हरामपासून दूर रहावे. अश्लिलतेचा त्याच्या जीवनात लवलेशसुद्धा नसावा. हराम मार्गांचा संधी असूनही त्याने उपयोग करू नये़ अधिकारांचा दुरूपयोग करू नये, शेजार्यांशी आप्त स्वकीयांसारखे रहावे इत्यादी. हे सर्व करणे मुस्लिमांवर शरियतने बंधनकारक केलेले आहे़ हे जर का केले नाही तर समझलो के दुनिया भी गई और आखिरत भी गई.
      आज मुस्लिमांचा मोठा वर्ग तौहिद, रिसालत, आखिरत पासून दूर आहे़ अनेकांना तौहिद म्हणजे नेमके काय? हेच माहित नाही़ मी- मी म्हणणारे सुद्धा अल्लाहला एक मानणे म्हणजे तौहिद. तौहिदचा एवढाच मर्यादित अर्थ घेतात़ अल्लाह एक आहे हे सर्वांनाच माहित आहे़ मुस्लिमेत्तर सुद्धा, करता करविता ईश्वर एकच आहे, असे मानतात़  तौहिदचा अर्थ एवढा संकुचित नाही तर अल्लाहला मनोभावाने, एक करता करविता मानल्यानंतर अल्लाहच्या प्रत्येक आदेशाचे निमुटपणे पालन करणे म्हणजे तौहिद़ 
      अल्लाहचे आदेश म्हणजेच कुरआनचे आदेश, म्हणूनच या आदेशांचे पालन करणे म्हणजेच खरी तौहिद़  पण याची जाणीव अल्लाहला एक मानणार्या प्रत्येक मुस्लिमाला नाही़ जी परिस्थिती तौहिदची तीच रिसालतची. प्रेषित सल्ल़ ला प्रेषित मानणारी, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी, प्रसंग त्यांच्यासाठी जीव देण्याची तयारी ठेवणारी, मात्र प्रेषितांच्या शिकवणींना आपल्या जीवनात महत्व देणारी एक मोठी जमात मुस्लिमांमध्ये उदयास आलेली आहे़ आखिरतवर विश्वासाची तर अगदी भीषण परिस्थिती आहे़मरने के बाद क्या होगा किसको पता? तब का तब देखा जाएगा”, असे म्हणणार्या मुस्लिमांची संख्या कमी नाही़  तौहिद, रिसालत आखिरत या इस्लामच्या मूळ संकल्पना होत. त्यांच्या अंमलबजावणी शिवाय आदर्श मुस्लिम समाज निर्माण होऊच शकत नाही.    किंबहुना आदर्श समाजाचा तोच पाया आहे़ 
      कल्पना करा की, डॉक्टरने तुम्हाला तपासल्यानंतर अमूक एक आजार झालाय असे म्हटल्याबरोबर माणसाचा जसा विश्वास बसतो अगदी तसाच विश्वास जोपर्यंत या तिन्ही संकल्पनावर बसणार नाही तो पर्यंत आपला समाज आदर्श होणार नाही याची प्रत्येकाने खात्री बाळगावी़
      या तिन्ही संकल्पनांवर पक्का विश्वास बसल्याशिवाय माणूस भ्रष्टाचारमुक्त होणार नाही, त्याचे चारित्र्य स्फटिका सारखे स्वच्छ होणार नाही, खोटे बोलने, धोका देणे, फसवणूक करणे, लोकांच्या दुखा:पासून अलिप्त राहणे, हिंसा करणे, उपजिवीकेसाठी वाममार्गाचा उपयोग करणे, लोकांवर अन्याय, अत्याचार करणे तो सोडणार नाही़  स्वत: वाईट चारित्र्याचे असून दुसर्यांना चांगल्या चारित्र्याचे महत्व समजावून सांगण्यात काय हशील? चारित्र्य निर्मितीसाठी श्रीमंत असण्याची गरज नाही उलट गरीबी चारित्र्य संवर्धनासाठी उपयोगाची असते. काँग्रेसच्या कृपेने भारतीय मुस्लिम गरीब आहेत. या संधीचा उपयोग करून चारित्र्य संवर्धनाची मोहिम हाती घ्यावी. मुस्लिम धर्म पंडितांनी उर्दूमध्ये चांगल्या साहित्याची निर्मिती करून आपले अर्धे काम केलेले आहे. फक्त उर्दू शिकून त्यांचे अवलोकन करण्याची जबाबदारी आपली आहे. इंग्रजी, हिंदी अन्य प्रादेशिक भाषांतून इस्लामी साहित्य मोठ्या प्रमाणात छापले गेलेले आहे. ते अन्य धर्मीयांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. 70 वर्षानंतर सुद्धा भारतीय मुस्लिम आपल्या सहिष्णु हिंदू बांधवांच्या मनातील इस्लाम संबंधीच्या शंकांचे निरसन करू शकलेले नाहीत. ही वस्तूस्थिती आहे. अनेक हिंदू बांधव आजही तोंडी तलाकच्या तरतुदीला वाईट समजतात. मुस्लिम चार बायका डझनवारी मुलं पैदा करतात, आतंकवादाचे समर्थक असतात, जातीयवादी, उग्र, असहिष्णु, कट्टर आणि कठोर असतात अशा एक ना अनेक शंका घेऊन जगतात. आपला शेजारीच जेव्हा आपल्याबद्दल एवढे प्रचंड गैरसमज बाळगून असेल तर सौहार्दाची ऐशी-तैशी झाल्यास नवल ते काय? या सर्व शंकांचे निरसन करणार्या विश्वासार्ह साहित्याची निर्मिती, त्यांना कळेल अशा भाषेत केली गेली पाहिजे त्या बरहुकूम आपले वर्तन ही असले पाहिजे. तेव्हा कुठे आदर्श मुस्लिम समाजाच्या रचनेस खर्या अर्थाने सुरूवात होईल. हे महान उद्देश साध्य करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. मस्लकी मतभेदाने पोखरलेल्या समाजाला कुरआनच्या फक्त एका आयतीच्या आधारावर आपसात दोन्ही हाताची बोटे जशी जुळतात तसे जोडता येऊ शकतेती आयत म्हणजे,” श्रद्धावंत तर एकमेकांचे भाऊ आहेत, म्हणून आपल्या भावांच्या दरम्यान संबंध सुरळीत करा आणि अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा, आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल ” (सुरे : हुजरात आयत नं. 10).

      एक अल्लाह, एक प्रेषित, एक ईश्वरीय ग्रंथ, एवढे भांडवल एका आदर्श समाजाचा पाया रचण्यासाठी पुरेसे असतांनासुद्धा मुस्लिम समाज एक नाही. म्हणूनच मुस्लिम समाज आदर्श बनू शकलेला नाही. याची जाणीव एव्हाना सगळ्यांना झाली असेल. या समाजाला आदर्श बनविण्यासाठी जमाते इस्लामी सारखी संस्था कायम प्रयत्नशील असते. या संस्थेद्वारे चालविल्या जाणार्या आयएमपीटी (इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट) द्वारे मराठी भाषेमध्ये प्रचंड साहित्यनिर्मिती केेली गेलेली आहे. आपल्या योजनाबद्ध कार्यक्रमातून, वेगवेगळ्या मोहिमांतून ही संस्था आदर्श समाज निर्मितीसाठी प्रयत्नशील असते. त्यांच्या या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्याचे बळ दिले पाहिजे. जेंव्हा अशा जनजागृतीची पराकाष्ठा होईल तेंव्हा आज पावेतो झालेली अज्ञानाची दमकोंडी नष्ट होईल मुस्लिम समाज मोकळेपणाने श्वास घेईल. तेव्हा खर्या अर्थाने त्यांचा आदर्श समाजाच्या दिशेने प्रवास सुरू होईल. शेवटी अल्लाहकडे एवढीच प्रर्थना करतो की परवरदीगार ! आम्हाला आदर्श समाज निर्मितीचे ध्येय गाठण्याची समज बळ दे. आमच्या प्रिय भारत देशात उत्कृष्ट समाज सेवा करण्याची आम्हाला संधी दे. सर्वजण भौतिक प्रगती मागे अंधळ्यासारखे धावत आहेत. आम्हाला नैतिक भौतिक दोन्ही स्तरावर खर्याने मार्गक्रमण करण्याची हिम्मत दे” (आमीन.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget