Halloween Costume ideas 2015

यशस्वी जीवनाचा एकमेव मार्ग इस्लाम

आज अवघे जग या विचारसरणीने व्यापलेले आहे. मुस्लिमांची ही एक मोठी संख्या याच मार्गान जात आहे. अल्लाहची एक सुन्नत (सवय) अशी आहे की, जो ज्या दिशेने प्रयत्न करतो अल्लाह त्याला त्या दिशेत यशस्वी करतो. जो  दाऊद इब्राहीम बनण्याच्या दिशेने प्रयत्न करत असेल तर त्याला फरिश्ते बळजबरीने ओढून एपीजे कलाम बनवित नाहीत किंवा जो एपीजे कलाम बनण्याच्या दिशेने प्रयत्न करत असेल त्याला बळजबरीने दाऊद बनवित नाहीत. अल्लाहने या जगात प्रत्येकाला आचरण स्वातंत्र्य दिलेले आहे. त्या अनुसार कमी अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्ती प्रगती करीत असते.
    कल्पना करा की, दोन अशा व्यक्ती आहेत, ज्यांना अशा एका देशात जावयाचे आहे की, ज्या देशांशी भारत सरकारशी आरोपी संबंधी देवाण-घेवाण करार झालेला नाही.  एकाला कायम त्याच देशात रहावयाचे आहे तर दुसर्याला 60-70 दिवसात परत यावयाचे आहे. या दोघांच्या विदेश प्रयाणापूर्वीच्या आचरणात ’जमीन-आसमान’ एवढे अंतर  असेल. ज्याला परत यावयाचे आहे तो जवाब दारीने वागेल. कारण त्याला माहित आहे. 60 दिवसांनी परत येऊन याच देशात कायमचे रहावयाचे आहे. मात्र ज्याला परत यावयाचे नाही त्याचे प्रस्थानापूर्वीचे वर्तन बेजबाबदारपणाचे असेल कारण त्याला माहिती आहे की पुन्हा या ठिकाणी आपल्याला परत यावयाचे नाही. ठीक हाच फरक मरणोत्तर जीवनावर ज्यांचा विश्वास आहे व ज्यांचा नाही त्यांच्याबाबतीत आहे. ज्याला मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास नाही तो या जीवनात बेदरकारपणे वागेल  मात्र ज्याला मृत्यूपश्चातही जीवन आहे यावर विश्वास असेल तो या जीवनात जबाबदारीने वागेल.
    पश्चिमेचे वैचारिक संक्रमण संपूर्ण जगावर झालेले आहे. मुस्लिमांमधील काही लोक सोडता बहुसंख्य मुस्लिमांसह संपूर्ण जगाने या वैचारिक संक्रमणासमोर शरणागती पत्करलेली आहे. ‘आम्ही बांधू ते तोरण, आम्ही ठरवू ते धोरण’ या पद्धतीने पश्चिम वागत आहे. त्यांनी गुडघ्यावर फाटलेल्या जीन्सला फॅशन ठरवले की आपण फाटक्या जीन्स घालून फिरणार. त्यांनी दारू पिण्याला प्रतिष्ठा दिली की आपण ही दारू पिण्यात प्रतिष्ठा मानणार. त्यांनी पिझ्झा, बर्गर खाणे व कोल्ड्रींक्स पीने याला स्टाईल म्हंटले की आम्ही अभिमानाने तेच खाणार व पीनार. त्यांनी मुक्त लैंगिक संबंधांना, समलैंगिक संबंधांना मान्यता दिली की आपण ही देणार. एवढेच नव्हे तर ते पॉर्नला प्रोत्साहन देणार तर आपण त्याचा ही डोळे मिटून स्विकार करणार?     जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यांची कॉपी करण्यात स्वतःचा सम्मान समजणार.
     पश्चिमेचे हे वैचारिक संक्रमण अधिक धारदार बनविण्यासाठी चार गोष्टी कारणीभूत आहेत. एक-त्यांची प्रचंड लष्करी ताकत, दोन- व्याजावर आधारित आंतरराष्ट्रीय आर्थिक वित्तीय संस्था (वर्ल्ड बँक/आयएमएफ) मधील व्यवहारातून मिळविलेली प्रचंड माया, तीन - राक्षसी आकाराच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी कंपन्या व चार-प्रभावशाली मीडिया. थोडक्यात वैचारिक, सैनिक, आर्थिक आणि माध्यमांच्या आक्रमणापुढे कोणताच देश त्यांना आव्हान देऊ शकत नाही. जे आव्हान देतात त्यांचा सद्दाम हुसैन किंवा कर्नल गद्दाफी केला जातो. म्हणून अवघे जग पश्चिमेच्या तालावर नाचत आहे. या जीवनशैलीच्या फैलावाचे मुख्य कारण म्हणून पश्चिमेने मरणोत्तर जीवनाच्या संकल्पनेचा केलेला त्याग होय. अवघे जग त्यांचे अनुसरण करत आहे. या जीवनशैलीचा सर्वाधिक फटका महिला, मुलं आणि गरिबांना बसतो आहे. हे तिन्ही घटक स्वतःच्याच समाजाने केलेल्या अत्याचारांनी खचून गेलेले आहेत. त्यांची प्रगती अवरूद्ध झालेली आहे. या भांडवलशाही व्यवस्थेला आव्हान फक्त इस्लामी व्यवस्थेकडूनच मिळत असल्याने पश्चिमेतील झाडून सर्व देश इस्लामचा द्वेश करतात. त्यांना चांगले माहित आहे की आपल्या अनैतिक जीवन पद्धतीला इस्लामी नैतिक जीवन पद्धतीच उध्वस्त करू शकते. म्हणून हाती असलेल्या मीडियाचा उपयोग करून इस्लामी जीवनशैलीला बदनाम करण्याचे काम अखंडपणे चालू आहे.
    माणसाची रचना करतांना अल्लाहने त्याच्या मध्ये दोन प्रवृत्ती समसमान ठेवलेल्या आहेत. एक सद्प्रवृत्ती दूसरी खलप्रवृत्ती. आता हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे की तो कोणत्या प्रवृत्तीकडे झुकतो. साधारणपणे ज्याप्रमाणे सायकल उतारावर विनासायास पळते तसेच मानसाचे नफ्स (मन) वाईट मार्गाकडे विनासायास पळते. परंतु त्याला वाईट मार्गाकडून चांगल्या मार्गाकडे खेचून आणणे गरजेचे आहे. अन्यथा काही शतकात पृथ्वीवरील जीवन नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम कठीण आहे म्हणूनच करण्याजोगे आहे. ही कठिण जबाबदारी अल्लाहने मुस्लिम उम्मत (समाज)वर टाकलेली आहे. कुरआनमध्ये आदेश दिलेला आहे की,
    “आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.” (कुरआन : सुरे आलेइमरान आयत नं. 110)
    या आयातींद्वारे जी जबाबदारी मुस्लिम उम्मतवर टाकलेली आहे ती जबाबदारी ही उम्मत योग्य पद्धतीने पार पाडत नाहीये. म्हणून ती ज्या ठिकाणी अल्पसंख्येत आहे त्या ठिकाणी ही अपयशी आहे व ज्या ठिकाणी बहुसंख्येत आहे त्या ठिकाणी ही अपयशी आहे. प्रेषित सल्ल. पूर्वी जी उम्मत आपल्या उद्देशापासून दूर जात असे तिला नष्ट केल्या जात असे, उम्मते आद, समूद व लूत अलै. यांच्यासह अनेक कौमांना त्यांच्या अनैतिक आचरणासाठी विध्वंसित करण्यात आल्याचे अनेक दाखले कुरआनमध्ये दिलेले आहेत. कुणावर दगडांचा वर्षाव झाला तर कुणाला पाण्यात बुडवून मारण्यात आले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची उम्मत ही अंतिम उम्मत असल्यामुळे तिच्यावर मागील उम्मतींना जसे नष्ट करणारे अजाब (प्रकोप) आले तसे या उम्मतवर येणार नाहीत, मात्र ही उम्मत जेव्हा-जेव्हा व जेथे-जेथे आपल्या कर्तव्यापासून दूर जाईल तेव्हा-तेव्हा तेथे-तेथे निलंबित केली जाईल एवढे मात्र निश्चित. पश्चिमेच्या अनैतिक जीवन शैलीचा यल्गार होत असतांना त्याचा सामना करण्याचे आपले अवतार कार्य करण्याऐवजी जेंव्हा ही उम्मत जीन्स, टी-शर्ट घालून, अश्लिल चित्रफिती पाहून स्वतः त्यांच्यापेक्षा पुढे पळत असेल तर हे अल्लाहचे नातेवाईक नाहीत की यांच्यावर दया दाखविली जाईल.
    कुरआनने मानवावर खालील प्रतिबंध लादलेले आहेत. कुरआन म्हणतो, ‘हे पैगंबर (स.) यांना सांगा की माझ्या पालनकर्त्याने ज्या वस्तू निषिद्ध (हराम) केल्या आहेत. ती ही आहेत, निर्लज्जपणाची (अश्लिल) कामे - मग ती उघड असोत अथवा गुप्त - आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक आणि अल्लाहबरोबर तुम्ही एखाद्या अशाला भागीदार (शरीक) कराल ज्याच्या संबंधात त्याने कोणतेही प्रमाण उतरविले नाही, आणि असे की अल्लाहच्या नावाने तुम्ही एखादी अशी गोष्ट सांगावी जिच्यासंबंधी तुम्हाला ज्ञान नसेल (कि ती  खरोखर त्याने फर्माविली आहे.)’(संदर्भ : सुरे एराफ आ.क्र. 33).
    याशिवाय कुरआनने अनेक ठिकाणी वाम मार्गापासून दूर राहण्याची चेतावणी दिलेली आहे. जे लोक या चेतावणीला जुमानणार नाही त्यांच्यासाठी आखिरत (द डे ऑफ जज्मेंट) च्या दिवशी कसा व्यवहार केला जाईल? “तेंव्हा काहींचे चेहरे तेजःपुंज असतील तर काहींचे चेहरे काळवंडलेले असतील. ज्यांचे चेहरे काळवंडतील (त्यांना सांगण्यात येईल की) श्रद्धेची देणगी मिळाल्यानंतर अश्रद्धावंतांप्रमाणे वर्तन करता? बरे तर आता कृतघ्नतेच्या मोबदल्यात प्रकोपाचा आस्वाद घ्या”
(संदर्भ : कुरआन - आले इमरान आ.क्र. 106.)
    या आयतींना मुस्लिम त्यांच्या श्रद्धेमुळे खऱ्या मानतील परंतु, मुस्लिमेत्तरांनी यांना खरे का बरे मानावे? या प्रश्नावर मौलाना अबुल आला मौदूदी यांचे उत्तर असे आहे की -
    ”जेव्हा बुद्धीजीवी माणसे या ब्रह्मांडाच्या रचनेवर विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, ही रचना अतिशय चिकित्सीय पद्धतीने केलेली आहे आणि ही गोष्ट चिकित्सक बुद्धीला पटत नाही की, ज्या अल्लाहने मानवाला बुद्धी देऊन वैचारिक शक्ती दिली, त्या बुद्धीचा वापर करून चांगला किंवा वाईट मार्ग निवडण्याची शक्ती दिली, त्याला तमीज (शिष्टाचार) ने वागण्याची उर्मी दिली, त्याने त्या सगळ्या शक्तींचा वापर कसा केला? यासंबंधी त्याला विचारपूसही केली जाणार नाही. त्याला पुण्य केल्यावर पुरस्कार व पाप केल्यावर शिक्षा दिली जाणार नाही, हे कसे शक्य आहे? ब्रह्मांडाच्या रचनेवर अशा प्रकारे जे विचार करतात त्यांचा आखिरतवर विश्वास बसतो व ते अल्लाहने तजवीज (प्रस्तावित) केलेल्या शिक्षेपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतात.” (अर्थात आपल्या जीवनात चांगुलपणा आणण्याचा प्रयत्न करतात.) (संदर्भ : तफहिमल कुरआन खंड-1, पान क्र. 311).
    तसे पाहता आपण भारतीय मुस्लिम श्रद्धावान आहोत. आपल्यामध्ये नास्तिकांची संख्या फार कमी आहे. मात्र पूर्ण आस्तिक ही नाही व पूर्ण नास्तिकही नाही अशा फक्त नावाचे मुस्लिम असलेल्या लोकांची संख्या मागील काही वर्षापासून वेगाने वाढत आहे. त्यांना धार्मिक प्रतिकांचा उदो-उदो करण्यामध्ये मोठा रस आहे. पैगम्बर (सल्ल.) जयंतीमध्ये डीजे लावून नाचण्यात त्यांना आनंद येतो. मात्र प्रत्यक्ष प्रेषित (सल्ल.) यांनी  आदेशित केलेले धार्मिक (नैतिक) आचरण करतांना मात्र अवती भोवतीच्या वातावरणातून मिळालेले संस्कार त्यांना आडवे येतात. पश्चिमेकडून आलेल्या सर्वच गोष्टी स्विकार्य नाहीत. याची साधी जाण यांना नाही.
    प्रत्येक माणसाचे खरे यश आखिरतमध्ये मिळणारे यश आहे. याची जाणीव निर्माण झाल्याशिवाय आपल्या मधून ’दाई ’ निर्माण होणार नाहीत व अन्य धार्मिक समुहांना खरे मार्गदर्शन मिळणार नाही. ही जाणीव निर्माण व्हावी यासाठी कुरआनचे शिक्षण प्रत्येक मुस्लिमाने आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही. आज अस्तित्वात असलेल्या कुरआन पठणाच्या पद्धतीत अमुलाग्र असा बदल करून त्याचे फक्त ’वाचन’ न करता ते ’आत्मसात’ करण्याकडे बुद्धीजीवी लोकांना लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. एकदा का कुरआन आत्मसात करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली की मला उद्याच्या सूर्य उगवण्यावर जेवढा विश्वास आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक विश्वास या गोष्टीवर आहे की आत्मसात केलेल्या कुरआनचा प्रभाव एवढा जबरदस्त असेल की आत्मसात करणार्यांचे जीवन आंतरबाह्य बदलून जाईल व हा बदल सकारात्मक बदल असेल, अशा लोकांच्या जीवनातून अंधार नष्ट होईल. नैतिकतेचा सूर्य प्रकाशमान होईल, त्यांच्या हातून गुन्हा तर सोडा अनैतिक काम सुद्धा होणार नाही. ते इतरांच्या मानवाधिकारांची पायमल्ली करणार नाहीत. त्यांच्यातून सकारात्मक उर्जेचा संचार होईल व त्या उर्जेतून सर्व समाजाच्या प्रगतीचे मार्ग प्रशस्त होईल.     मुस्लिम उम्माहला ’उम्मत-ए-वस्त’ असे म्हणतात. याचा अर्थ या उम्मतच्या पाठिमागे 1 लाख 24 हजार प्रेषित आहेत तर पुढे कयामत (प्रलयाचा दिवस) पर्यंत जगात जन्मणारे लोक आहेत. दोघांच्या मधोमध मुस्लिम उम्मत उभी आहे. म्हणून त्यांना उम्मते वस्त म्हणजेच दरम्यानमधील उम्मत असे म्हणतात.
    या पार्श्वभूमीवर इस्लामच्या संदर्भात माझे वैयक्तिक मत असे आहे की, मुस्लिम समाजाची स्थिती रेल्वे इंजिनसारखी आहे. इंजीन जसे अनेक डब्यांना आपल्या अंगभूत ताकतीने ओढत इच्छीत स्टेशनपर्यंत घेऊन जाते, तसेच मुस्लिमांनी इतर लोकांना ओढत स्वर्गा (जन्नत) च्या स्टेशनपर्यंत घेऊन जाणे इस्लामला अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे डब्यांना खेचण्यासाठी इंजीनाला दोन रूळावर असणे आवश्यक आहे. इंजिन जर रूळावरून घसरले तर बाकीच्या डब्यांना ओढणे तर सोडा ते स्वतःच जमिनीत रूतून बसते. ठीक याचप्रमाणे प्रत्येक मुस्लिम (दाई) ला इस्लामच्या नैतिक शिकवणीच्या रूळावर राहणे आवश्यक आहे. असे असेल तरच ते स्वतःसह इतर समाजाची प्रगती सुनिश्चित करू शकतील अन्यथा ते स्वतःही इतरांसोबत वाहवत वाम मार्गाला जातील. अशामुळे वाईट गोष्टींची सुरूवात करण्याची पावती जरी त्यांच्या नावावर फाडली गेलेली नाही तरी वाईट गोष्टींना विरोध न केल्याचा ठपका मात्र त्यांच्यावर अल्लाहच्या न्यायालयात लागल्याशिवाय राहणार नाही.
    प्रत्येक मुस्लिमाने जर व्यक्तिगत नैतिक आचरणाची काळजी घेतली तर त्यातूनच सामुहिक चारित्र्याची निर्मिती होते व अशाच समाजात शांती आणि प्रगती शक्य होते. महिला सुरक्षित होतात. मुलांना निकोप वातावरणात वाढण्याची संधी मिळते. आज ज्या वातावरणात मुले वाढत आहेत ते वातावरण निकोप आहे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखे आहे. या अवस्थेतून बाहेर काढून दुसर्यांना आपल्या सोबत चांगल्या व्यवस्थेत घेण्याची मोठी जबाबदारी मुस्लिमांवर आहे. याची जाणीव सर्वांना असणे ही काळाची गरज आहे. 
    जुगनूओं को साथ लेकर रात रौशन कीजिए
    रास्ता सूरज का देखा तो सहर हो जाएगी
    जमाअत-ए-इस्लामी हिंद ही एक अशीच जाणीव असणारी संस्था आहे. ही संस्था मुस्लिम व मुस्लिमेत्तर दोन्ही समाजाच्या नैतिक उन्नतीसाठी कटिबद्ध आहेत. कुरआन व हदीसची शिकवण सर्वांपर्यंत पोहचावी व त्यातून त्यांची नैतिक व भौतिक प्रगती व्हावी व सर्वांना मुक्ती मिळावी यासाठीची काळजी घेते. जमाअते इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र विभागाने या काळजीतूनच 12 ते 21 जानेवारी 2018 या कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात राहणार्या सर्व धर्मीय लोकांपर्यंत इस्लामच्या नैतिकतेचा संदेश पोहोचवावा म्हणून ’इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्ती’ या शिर्षकाखाली एक विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. तरी सामान्यतः प्रत्येकांनी व विशेषतः मुस्लिमांनी या मोहिमेत सामील होऊन आपले सक्रीय योगदान द्यावे. ही आपली दुहेरी जबाबदारी आहे. एक नैतिक दूसरी राष्ट्रीय. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की,” ऐ ! अल्लाह आम्हाला इस्लामी आचरण किती महत्वाचे आहे व त्या आचरणापासून दूर झाल्याने आज आपल्या प्रिय देशात जो अनैतिक हाहाकार माजला आहे. जनता त्राहीमाम-त्राहीमाम करीत आहे त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आम्हा सर्वांना समज दे.” (आमीन.)

एम.आय.शेख
9764000737Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget