- फयाज अहमद दलमीर खान,
भुसावळ, मो. 9421519583
भारताला स्वातंत्र्य
मिळून 70 वर्षे पूर्ण झाली. आज आम्ही 21 व्या शतकात महासत्तेची स्वप्न पाहत आहोत त्यात
गैर काही नाही. आज सच्चर कमिटीने आम्हाला आरसा दाखविला आहे की आम्ही कोणत्या स्तरावर
आहोत. त्यासाठी आम्ही काय करतो आहोत? हा यक्ष प्रश्न आहे. आम्ही आमचा पूर्व इतिहास
विसरत चाललो आहोत. आम्ही जगाला रसायनशास्त्राचा पितामह जाबिर बिन हय्यान दिला. वैद्यकीयशास्त्रात
इब्ने सिना सारखा शास्त्रज्ञ दिला.
आज गरज आहे फक्त आम्हाला त्यांच्या संशोधना विषणी
जाणून घेण्याची. आमच्याजवळ तंत्रज्ञान आज मुठीत आहे. 4 जी च्या युगात आम्ही थोडे श्रम
व आपली सामाजिक जाणीव ठेवल्यास समाजावर लागलेला अभिशाप दूर करण्यास नक्कीच मदत मिळेल.
आजच्या 4 जी जनरेशनची विनाशी प्रवृत्ती आहे. त्यावर त्यांचे मार्गदर्शन करणे जरूरी
आहे. त्यांना समाजाशी काही देणेघेणे नाही ही संकल्पना बदलावी लागेल.
स्वातंत्र्याच्या चळवळीत फक्त यूपी-बिहारमधून
40,000 पेक्षा अधिक मुस्लिम धर्मगुरू (उलेमा) फासावर चढले. आपणास अशफाक उल्लाह खान
यांचे वाक्य आठवत असेल, ”मैं खुदा के सिवा किसी के आगे सर नहीं - झुकाता हूँ।” आज समाजाला
बळजबरीने हे करा ते करा म्हटले जाते. ज्यांचा स्वातंत्र्याच्या चळवळीत काडीमात्र सहभाग
नव्हता ते आज दुसर्यांच्या देशप्रेमाचे मापदंड ठरवित आहेत.
सर्वधर्मसद्भाव या देशात नेहमी जोपासला गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी व फारसीचे शिक्षण घेतले. या भाषांमधील त्यांचे फरमान
आजही संग्रहित आहेत. आज त्यांच्या नावावर राज्य करणारी मंडळी त्यांचे विचार आत्मसात
करत नाहीत, ही खेदजनक बाब आहे.
आज ’जिहाद’ या शब्दाची प्रसारमाध्यमांद्वारे
चुकीची व्याख्या केली गेल्यामुळे व काही कट्टर मुस्लिम संघटनांच्या चुकीच्या कृत्यामुळे
जगात गैरसमज वाढतो आहे. जिहाद म्हणजे संघर्ष तोही वाईट प्रवृत्ती, दुष्कृत्यांवर मात
करणे. निष्पाप जीवांना किंवा मुस्लिमेतरांना ठार करणे असा त्याचा अर्थ अजिबात नाही.
असे करणे जुलूम व अत्याचारी कृत्य आहे, असे कृत्य करणार्याचे ठिकाण नरक आहे.
इंग्रजांना माहीत
होते की येथे राज्य करायचे असेल तर येथील दोन प्रमुख समाजांत फूट पाडूनच राज्य करावे
लागेल. त्यांनी ’फोडा व राज्य करा’ची नीति अवलंबिली. म्हणून जाता-जाता त्यांनी भारताचे
दोन तुकडे केले. मात्र यातून काही बोध न घेता आजची सरकारेही इंग्रजांच्या याच तत्त्वावर
राज्य करीत असल्याचे दिसून येत आहे. काही सत्ताधुंद राजकारणी या देशातील मुस्लिमांना
देशद्रोही संबोधतात. चालते व्हा! तुमच्या मतदानाचा अधिकार काढून घेऊ. अशा नाना धमक्या
देतात.
मुस्लिम समाज नेहमी देशप्रेमी राहिला आहे आणि
मरणोपरांतही देशप्रेमी राहील. कारण त्याला या देशाच्या मातीत दफन केले जाते. ज्याला
पाकिस्तानात जायचे होते, ते गेले. जे राहिले ते या मातीशी इमानेइतबारे वागतात. काही
मोजक्या लोकांकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही. मुस्लिम म्हणजे अल्लाहसाठी समर्पित
व्यक्तिमत्त्व आणि इस्लाम म्हणजे सर्वांशीच प्रेम जोपासणे. त्याच्यात जातधर्माचे बंधन
नाही.
आज देशात विविध समस्या आहेत. बेरोजगारी, जातीय
हिंसाचार, लूटमार, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. त्यावर सरकारे नापास झालेली दिसत आहेत.
आज युवकांमध्ये जातीय सलोखा, सद्भावना, शांतता रुजवावी लागेल, जेणेकरून आम्ही महासत्तेकडे
वाटचाल करू शकतो. परंतु या समस्यांकडे डोळेझाक केली तर बलाढ्य रशियासारखी आपली गत झाल्याशिवाय
राहणार नाही, हे विसरता कामा नये. समस्यांवर मात करण्याची ताकद भारतीयांमध्ये आहे.
आपली संस्कृती अहिंसा, सहिष्णुता, बंधुभाव शिकविते. येथे अन्याय, द्वेषाला जागा नाही.
आपण नेहमी गुण्यागोविंदाने राहिलो आहोत ते काही जात्यांध शक्तींना रुचत नाही. त्यांना
वेळीच लगाम घातला पाहिजे, तरच भारत प्रगतशील महासत्ता बनेल, यात दुमत नाही.
Post a Comment