Halloween Costume ideas 2015

इस्लामचा सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता

तौहीद अर्थात एकेश्वरवाद हा इस्लामचा प्रथम आधारस्थंब आहे ज्याचा संपूर्ण विश्वामध्ये प्रचार व प्रसार करणे हे समस्त मुस्लिमांचे आद्य कर्तव्य आहे. हे महत्कार्य तडीस नेण्यासाठी अल्लाहने जगात विविध भागांत आणि समाजात आपले प्रेषित धाडले होते. प्रेषित आगमनाचा क्रम महान अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर समाप्त झाला. इस्लामच्या तौहीदच्या धारणेनुसार संपूर्ण जगाचा पालनहार, निर्माता आणि नियंता अल्लाहतआला आहे आणि संपूर्ण विश्व अल्लाहचे कुटुंब आहे. म्हणून तार्किकदृष्ट्या धर्मभेद, जातपात, रंगभेत, वंशभेद, भाषाभेद आणि देशप्रदेशामध्ये भेदाभेद करणे समाप्त होऊन जाते आणि संपूर्ण जगाने एकजुटीने राहणे आवश्यक होऊन जाते. याचे कारण हे की संपूर्ण मानवजातीचे आई-वडील एकच म्हणजे आई हव्वा आणि बाप आदम (अ.) आहेत. अशा वेळी तिरस्कार आणि शत्रुत्वाच्या सर्व सीमा तुटून जातात. भेदभावाशिवाय सर्वधर्मीय व सर्वजातीय आणि सर्व प्रकारचे जनसमूह आपापसात बांधव होऊन जातात. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहचे फरमान आहे की, ”हे लोकहो, आम्ही तुम्हा सर्वांना एकाच पुरुष व एकाच स्त्रीपासून जन्माला घातले आणि यासाठी की तुम्ही आपापसात एक दुसऱ्याला ओळखावे म्हणून तुमचे कबिले, जाती आणि समूह निर्माण केले, अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वाधिक प्रतिष्ठित तो आहे जो ईशभीरूता आणि सत्कर्म अंगीकारील. नि:संशय अल्लाह बुद्धिमान आणि सर्व खबर राखणारा सर्वज्ञ आहे.”
    तौहीदप्रमाणेच प्रेषित्व हे इस्लामचे एक अत्यंत महत्वपूर्ण आधारस्थंभ आहे. अल्लाहचा दैवी संदेश पोहोचविणाऱ्या सन्माननीय पैगंबरांवर ईमान राखल्याशिवाय कुठलाही मनुष्य मुस्लिम होऊ शकत नाही. अल्लाहची ही पैगंबरी परंपरा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनानंतर संपुष्टात आली, या श्रद्धेवर जो ईमान राखणार नाही तो निश्‍चितच व निर्विवादपणे मुस्लिम वा मोमीन वा मुसलमान नाही. हे कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वचनाने सिद्ध झाले आहे. ही मूलभूत धारणासुद्धा आमच्याकडून अपेक्षा बाळगते की एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याबरोबर प्रेम, बंधुभाव, दया आणि सांप्रदायिक ऐक्याची वागणूक ठेवावी. धर्म व जातीपाती अथवा वंश वा प्रदेशापायी मत्सर बाळगू नये. याचे कारण हे की प्रेषित मुहम्मद (स.) यांना संपूर्ण मानवजातीसाठी भलाई, शांती, कल्याण आणि उद्धारासाठी अल्लाहतर्फे पाठविण्यात आले आहे. ते एखाद्या विशेष प्रदेशासाठी वा जातीसाठी पाठविण्यात आले नाहीत, तर अखंड मानवतेसाठी धाडण्यात आले आहेत. त्यांचे हे प्रेषित्व समस्त मानवकल्याणासाठी आहे.
    प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचार (सुन्नत) विचारां(हदीस)मध्ये मानवतावाद, सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक सलोख्यावर आधारित आदेशांची कमतरता नाही. त्यांनी फरमावले आहे की ”सर्वात उत्तम लोक ते आहेत जे समाजासाठी लाभदायक आहेत.” राष्ट्रीय सद्भावनेसाठी याहून उत्तम उपदेश कोणता असू शकतो बरे! सांप्रदायिक एकता आणि राष्ट्रीय सद्भावनेचे सर्वोत्कृष्ठ उदाहरण पवित्र कुरआनमध्ये सांगितल्याचे आढळून येते.
    महान प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या मदीनेतील आयुष्यात फरमाविले की, ”बनू जदआनच्या घरात जी समिती गठीत झाली होती, अशा प्रकारे सद्भावना आणि शांतीकरिता एखादी समिती स्थापन होत नसेल तर त्याचा सदस्य बनने माझ्याकरिता लाल रंगाचा उंट प्राप्त करण्यापेक्षाही बेहतर आहे.” ही शांती-सद्भावना समिती ’हिलफूल फजूल कमिटी’ म्हणून इस्लामी इतिहासात प्रसिद्ध आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका अमुस्लिम व्यक्तीच्या घरी बनलेल्या कमिटीचे सरदार नव्हे तर सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली. मानवता, सौहार्द आणि एकतेचे असे उदाहरण आपणास कुठेच सापडणार नाही. हा आदर्श जगवासियांसमोर ठेवण्यासाठीच अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना जगात पाठविले होते. आणि त्यांच्या सोबत्यांनी (सहाबा) तो आदर्श व्यावहारिक रूपात सादर करून दाखविला.
    अशाच प्रकारे दुसरे उदाहरण म्हणजे जेव्हा इस्लामी शासन प्रस्थापित झाले तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी यहुदी, इसाई आणि इतर बहुदेववाद्यांबरोबर शांती-सलोखा राखण्यासाठी सुप्रसिद्ध हुदैबियाचा करार केला होता. राष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने प्रेषितांचा हा प्रयास एक ठोस पुरावा आहे की सामाजिक सलोखा राखण्याकरिता प्रेषितांनी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही.
    इस्लाम धर्मावर सतत शिंतोडे उडविले जातात की, हा दहशतवादी, आक्रमणकारी, हिंस्र, कठोर आणि कपटनीतीची शिकवण देणारा अमानवी धर्म आहे. कुरआन आणि हदीसचे अध्ययन केल्यानंतर हे आरोप किती थोतांड आहेत हे आपल्याला कळून चुकते. इस्लामने आणि इस्लामच्या खऱ्या अनुयायांनी दहशतीचे व हिंसेचे कधीच समर्थन केले नाही आणि आजपावेतो करीत नाहीत.
इस्लामने सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी जी काही मानवतापूर्ण व दूरगामी पावले उचलली आहेत त्याबद्दल आम्ही अगदी थोडीशी माहिती देऊ इच्छितो.
(1) प्राणाची सुरक्षा-
इस्लाम अमुस्लिमांसमवेत सर्व मानवजातीच्या प्राणाची रक्षा करण्याची शाश्वती देतो. धरतीवर वसणाऱ्या कोणत्याही निरपराध व्यक्तीची हत्या करणे म्हणजे संपूर्ण मानवजातीची हत्या करणे, असे इस्लामचे कठोर मत आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांची आज्ञा आहे की, ”अमुस्लिमांना ठार मारणारा स्वर्गाचा सुगंध प्राप्त करू शकणार नाही.” (सही बुखारी हदीसग्रंथ)
(2) न्यायपूर्ण व्यवहार-
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फरमावले की, ”अल्लाह स्वत: आज्ञा देतो की, हे अल्लाहच्या दासांनो! मी माझ्यावर अत्याचाराला निषिद्ध केले आहे. आणि तुमच्यादरम्यानदेखील अत्याचाराला निषिद्ध केलेले आहे. म्हणून तुम्ही आपापसात एकमेकांची पिळवणूक करू नका.” (मुस्लिम हदीसग्रंथ) इथे सर्व मुस्लिम-अमुस्लिम अल्लाहचे दास आहेत. त्या सर्वांना संबोधून अल्लाहचा हा सामाजिक सलोखा राखणारा उपदेश आहे.
(3) धार्मिक स्वातंत्र्य-
राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी सर्व धर्मांच्या लोकांच्या धर्माचा आदर करणे आणि त्यांना स्वातंत्र्य बहाल करणे अनिवार्य आहे, त्याशिवाय कोणतेही राष्ट्र एकजिनसी कधीच होणार नाही.” ज्या मुस्लिम राष्ट्रात विविध धर्मियांचे लोक राहतात अशा सर्व धार्मिक समूहांना धर्मस्वातंत्र्य बहाल करणे इस्लामच्या शिकवणीनुसारच आहे. पवित्र कुरआनमध्ये अल्लाह प्रेषित मुहम्मद (स.) यांना आदेश देतो की, ”तुम्ही सांगा की, तुमचा धर्म तुमच्यासाठी आणि माझा धर्म माझ्यासाठी आहे.” (कुरआन, सूरह काफिरून-6)
    पवित्र कुरआनमध्ये एक आयत आहे, ”धर्माच्या बाबतीत कोणतीच जोरजबरदस्ती नाही.” (कुरआन, सूरह बकरा-256)
या धार्मिक स्वातंत्र्याला आणखीन मजबूत बनविण्यासाठी इस्लामने अमुस्लिमांच्या श्रद्धास्थानांना आणि त्यांच्या उपास्यांना वाईट बोलण्यापासून मनाई केली आहे. कुरआनमध्ये अल्लाहची आज्ञा आहे, ”शिव्याशाप देऊ नका त्यांना, ज्यांची हे लोक अल्लाहशिवाय इतराची उपासना करतात. कारण की अशाने ते सुद्धा मर्यादेच्या पलीकडे जाऊन अल्लाहला उलटसुलट बोलू लागतील.”(कुरआन,सूरह अन्आम-108)
- पवित्र स्थळांचा आदर-
इस्लाम सर्व धर्मियांच्या पवित्र स्थळांचा आदरसन्मान राखतो, कारण श्रद्धाळूची आपल्या धर्मस्थळावर प्रचंड श्रद्धा असते, याची जाणीव इस्लामला आहे. कुणाचे श्रद्धास्थळ उद्ध्वस्त केल्याने धार्मिक भावना इतक्या दुखावल्या जातात की एक समाज दुसऱ्या समाजाचा कट्टर वैरी होऊन जातो आणि काळानुसार या वैरभावात अधिक वाढ होत जाते. त्यामुळे समरसता, एकता, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेम लयास जाऊ लागते. त्या दृष्टिकोनातून इस्लामचे प्रथम खलीफा अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांनी अमुस्लिमांच्या धार्मिक बाबींसंबंधी एक करार सादर केला होता. त्या कराराचे असे शब्द आहेत- ”त्यांची पूजास्थळे, चर्च, त्यांचे महाल, इमारती आणि किल्ले ज्यांना त्यांनी शत्रूंपासून बचाव करण्यासाठी निर्माण केले होते, त्यांना अजिबात उद्ध्वस्त केले जाणार नाही. त्यांना त्यांची धार्मिक वाद्ये वाजविण्यापासून रोखले जाणार नाही, तसेच त्यांच्या उत्सवात क्रूस घेऊन मिरवणूक काढण्यास मनाई केली जाणार नाही. (तबकात इब्ने सआद, पृ. 357)        (4)    क्षमादान-
सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेखातर क्षमादान देणारा इस्लामसारखा शांतीप्रेमी धर्म या पृथ्वीपृष्ठावर दुसरा कदापि आढळणार नाही.
पवित्र कुरआनमध्ये अल्लाहचे फर्मान आहे,
”सत्कर्म आणि दुष्कर्म एकसमान असू शकत नाही. दुष्कर्माला तुम्ही सत्मार्गाने समाप्त करून टाका, मग तो, ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व आहे असा होऊन जाईल जसे अत्यंत घनिष्ठ मित्र.” (कुरआन, सूरह हा मीम अस्सजदा-34)
    प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्का शहरात आपल्या आयुष्याची 13 वर्षे अशा लोकांत व्यतीत केली जे प्रेषितांच्या रक्ताला आसुसलेले होते, त्यांची हत्या करण्यासाठी नाना प्रकारची षङ्यंत्रे रचित होते, प्रेषितांच्या नातेवाईकांना, हितचिंतकांना, सोबत्यांना ठार मारीत होते, त्यांच्यावर जादूगार, वेडा, बहकलेला, खोटा अशी दुषणे लावित होते. अशा लोकांनादेखील प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्वत: सत्ताधीश, सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली झाल्यानंतर क्षमा केली.

त्याच्या सूक्ष्म कणांच्या बारीक बारीक स्फटिकांमधून
माझ्या शरीरात ईमान घटकांचे सबलीकरण होत जावे!
 - निसार मोमीन, पुणे.
9763810609

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget