_ मुहम्मद मुस्तफा लांडगे
अहमदनगर
कोणत्याही प्रकारचा
देखावा न करता, पारंपारिक व्यवस्थेला फाटा देत, वायफळ खर्च न करता, भारदस्त पत्रिका
न छापता, सर्वत्र पसरलेल्या नातेवाईकांना गोळा व त्यांचा गदारोळ न करता, विजेचा लखलखाट,
ध्वनिक्षेपाचा कर्कश आवाज न करता, दिमाखी मंडप न उभारता, गाजावाजा नसलेला व नव्या वस्त्रांचे,
डिझाईनचे, शिलाईचे भडक व रूबाबदार पोशाखांचे प्रदर्शन न करता, अनेक दिवसांच्या पूर्व
तयारीला फाटा देऊन, दुचाकी, चारचाकी वाहनाची उधळण न करता, विवाह खरेदीच्या बस्त्याला
डावलून, दिखाऊ पंचपक्वान्नाची, स्नेह भोजनाची लयलूट न करता, आहेर-सप्रेम भेटीचा मागमूस
नसलेला, परंपरागत रूढींना चालना न देता, गरीब समाजाला दिलासा देणारा, मानसिक, शारिरीक
ताण न देणारा, छुपा छळ न करणारा, एक सुंदर, साधा आणि इस्लामी पद्धतीचा विवाह अहेमदनगरमध्ये
नुकताच संपन्न झाला.
इस्लामी आदेशाची पूर्तता करणारा, दोन कुटुंबात
जिव्हाळ्याचे संबंध स्थापित करणारा, साधेपणाने साजरा झालेला हा विवाह 17 डिसेंबर
2017 रोजी संध्याकाळी मगरीबच्या नमाज नंतर, राजनगर, अहमदनगर येथे वधु पित्याच्या घरी
पार पडला. वधू वरांना भविष्यात मंगलमय जीवनाची दुवा देण्यासाठी आप्तेष्ट, समाज बांधव,
मित्रवर्ग आणि अनेक हिंदू बांधव ही उपस्थित होते. वधूपिता समााजिक कार्यकर्ते असून
ते विद्यावाचस्पती आहेत.आर्किटेक्ट व अन्य विद्याशाखेच्या पदव्यांनी अलंकृत शेख अर्शद
महेबूब यांच्या घरी हा साधेपणाचा सोहळा संपन्न झाला. निव्वळ बोलणी करण्यासाठी आलेली
वरमंडळींनी कुठलीही पूर्वतयारी न करता निकाह लावून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
वधू - शाईस्ता अर्शद शेख ही बी.ए. जर्नालिझम
आहे. तर वर दानिश शकील शेख हे बी.ई. मेकॅनिकल असून मल्टीनॅशनल कंपनी पुणे येथे कार्यरत
आहेत.
विधिवत एक वकील, दोन साक्षीदारांनी वधूची संमती
विचारली, संंमती घेतल्यानतर काझी समोर, जमलेल्या सन्माननीय उपस्थितांसमोर वर दानिश
ने अकरा हजार रोख महेर नग्द देत तीन वेळा विवाहास संमती दिली. इस्लाममध्ये लग्नाप्रसंगी
वराने वधूस वधुहक्क धन देणे व त्यास संमती देणे अनिवार्य आहे ते दिले. खुत्बा-ए- निकाह
मध्ये विशिष्ट अशा कुरआनच्या आयातींचे पठण झाले. मौलाना इर्शाद कास्मी यांनी त्या अरबी
आयातींचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण सांगितले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिलेल्या
विवाहसंबंधी वचनांचे दाखले दिले. विवाह विषयक सद्यःपरिस्थितीच सडेतोड पडताळणी केली.
अशा प्रसंगी समाज प्रबोधन झाले. कलंकित हुंडा, दहेज हा प्रकार नव्हता. लग्नाची वेळ
तिथी, शुभ-अशुभ गोष्टी नव्हत्या.
मौलाना इर्शाद कास्मी प्रवचनात म्हणाले, उभयंतांनी
ईश्वरभय जीवनात बाळगावे जेणेकरून दुश्कर्म होणार नाही. अखिल विश्व एक माता पित्यापासून
निर्माण होत गेले. ईश्वराने दांपत्यजीवन दिले. दोहोंनी परस्पर जीवन व्यतीत करतांना
कर्तव्याची जाण ठेवावी. सद्गुण बाळगणारे, सत्कर्म करणारे, ईश्वराचे आज्ञाकारी आहेत.
यश प्राप्त होण्याची ही गुरूकिल्ली आहे.
विवाह करणे ही प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची सुन्नत
(अनुकरण) आहे. सद्यःस्थितीत मुस्लिम समाजाने ” विवाहास” अतिशय कठीण करून टाकलेले आहे.
रूढी, परंपरा, इच्छा, आकांक्षा, मनोकामनांच्या आहारी जाऊन दिवसें-दिवस हा प्रश्न गंभीर
बनत चालला आहे. यामुळेच कुकर्माचे, व्याभिचाराचे मार्ग मोकळे झाले आहेत. व्याभिचारावर
इस्लामने कडक निर्बंध टाकले व जबर शिक्षेची कठोर तरतूद केली. प्रेषित मुहम्मद सल्ल.
म्हणाले, ” जो विवाह सोपा आणि साधारण क्षमतेने होतो त्यात बरकत आहे”. विवाह स्थळ पाहताना
श्रीमंती, सौंदर्य, उच्चनिचता न पाहता, चारित्र्य, संपन्नता व धर्मपरायणता पाहा. विवाहास
समारंभाचे स्वरूप देणे, वरात काढणे, वाद्यवृंद वाजवणे, पुष्पहारांचा अतिरेक करणे, मद्यधुंद
नृत्य, रोषणाई, फटाके ह्या शरियतच्या (धर्म कायदा) विरूद्ध गोष्टी आहेत. व्हिडीओ चित्रणात
पडदानशीन स्त्रियांच्या हक्कांची पायमल्ली होते. त्यात दृष्टी विकारांचे घातक परिणाम
समोर येण्याची शक्यता असते. खेद आहे लोक यास दोष मानत नाहीत. प्रेषित मुहम्मद सल्ल.
यांचे जवळचे सहकार्यांचे लग्न झाल्याची कैफियत प्रेषितांना नंतर कळत असे. वधू पक्षांनी
विवाह सम्मिलीतांना जेवण देण्याची गरज नाही. हुंडा-दहेज अवैध आहेत. पुरूष हे स्त्रीयांचे
विश्वस्त आहेत. आहेर दुष्प्रथा आहे. लग्नाविधीनंतर मिलापनंतर वलीमा (स्नेहभोजन) ऐपतीप्रमाणे
देणे. मशीदीमध्ये विवाह लावण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जेणेकरून अनेक वायफळ
खर्च टाळला जाईल. अनेक प्रथेस आळा बसेल. अचानक ठरलेल्या या विवाहात वधूची रूख्सती
(पतीच्या घराकडे स्थलांतर) नंतर होईल याची मुभा आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी, साधेपणाने
विवाह होत राहो, ही सदिच्छा. उपस्थितांनी वर-वधूसाठी अल्लाहकडे समृद्धीची व ऐहिक, पारलौकिक
जीवनात भलाई मिळो, अशी दुआ केली. आमीन.
Post a Comment