Halloween Costume ideas 2015

हिंस्रपणाचा रानटी कळस

-कलीम अजीम, अंबाजोगाई
जागतिक मानवाधिकार दिनाच्या पूर्वसंध्येला भारतात दोन अमानूष व नृशंस हत्या झाल्या. राजस्थानमध्ये झालेले हे दोन्ही खून ‘हेट क्राईम’चा भाग होते. एकात अलवर पोलिसांनी गोतस्कर म्हणून एन्काऊंटर केला तर दुसऱ्या एका घटनेत भाजपच्या हेटनेस राजकारणाचा राक्षस संचारलेल्या एका माथेफिरुने वृद्धाला जीवंत जाळून मारलं होतं. दोन्ही घटनेत मरणारे दोघेही मुस्लिम होते. तीन दिवसांत राजस्थानमध्ये घडलेल्या या दोन घटनांनी सबंध देश हादरला, पण मीडिया कानोकान खबर नसल्यासारखा वागत होता. नृशंस हत्येपेक्षा मीडियाला राजकीय ‘नीचपणा’ जास्त महत्त्वाचा वाटला. शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ उदयपूरमध्ये भव्य मोर्चा निघाला मीडियाने यालाही दुर्लक्षित केलं.
समांतर मीडिया दोन दिवस या घटनांवर हळहळ व्यक्त करत होता, पण मेनस्ट्रीम पुन्हा-पुन्हा आपला ‘नीचपणा’ उगाळत होता. शुक्रवारी ‘ऑल्ट न्यूज’नं एक लेख लिहून मीडियाच्या या बोटचेपी भूमिकेची चीरफाड केली. कशा पद्धतीने मीडियाने राजस्थानच्या घटनेकडे दुर्लक्ष करुन उथळ बातम्यांना प्राईम टाईमची जागा दिल्याचं विश्लेषण केलं होतं. एवढंच नव्हे तर प्रिंट मीडियाने मुख्य पानावर बातमी न देता आतल्या पानावर सिंगल कॉलम बातमी दिली होती. ऑल्ट न्यूजने मीडियाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच न्यूज लाँड्री व मीडिया विजिल या वेबसाईटनंही मेनस्ट्रीम मीडियाने प्राईम टाईममध्ये ‘नीचपणा’ केल्याबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत.
बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड झाला. ज्यात एक व्यक्ती एका वृद्धाला कुदळीने हल्ला करून जीवे मारतो व त्याला पेट्रोल टाकून जाळून टाकतो. राजस्थानमधील राजमसंद शहरातील हा व्हिडिओ असल्याचं कळालं. हत्येचा व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओत हल्लेखोर खुनाची जबाबदारी स्वीकारतो व म्हणतो, ‘जे लव्ह जिहाद करतील त्यांना असेच मारलं जाईल.’ मरणारा मुस्लिम मजूर होता. मारेकरी शंभूलाल हत्येनंतर लव्ह जिहादवर अकलेचे तारे तोडतो. व्हिडिओ बघताना अंगाला शहारा येईल अशी चित्रफीत नेटीझन्स शेअर करत होते. त्या ५० वर्षीय वृद्धाला शंभूलाल ज्या बिभत्सपणे व मानवतेला लाजवेल अशा पद्धतीने मारतो. त्या सर्व घटनेचं शुटींग करतो, हे खरोखरच अमानूष होतं.
मयत मोहम्मद अफराजुल हा पश्चिमबंगालच्या मालदा जिल्ह्यातून रोजगारासाठी जयपूरपासून जवळ असलेल्या राजसमंद जिल्ह्यात आला होता. ५० वर्षीय मृत अफराजुलला तीन जावई आहेत. तो आपल्या पुतण्यासोबत गेल्या १२ वर्षांपासून एका खोलीत राहात होता. त्याची मुलगी व जावईसुद्धा त्याच बिल्डिंगमध्ये राहतात. स्थानिक दैनिक ‘राजस्थान पत्रिके’नं शुक्रवारी अफराजुलच्या पुतण्याची प्रतिक्रिया छापली आहे. त्यात पुतण्या इनाउल म्हणतो, ‘माझा काका धार्मिक नव्हता. कधीतरी शुक्रवारी नमाजला तो जाई, तो कधी कुणासोबत वाईट वागला नाही, कधीकाळी इथून कुणीतरी एक मुलगी मालदाला पळवून नेली असेल, तर त्याचा माझ्या काकाशी काय संबध?’ शनिवारी बीबीसीने दिलेल्या मुलाखतीत अफराजुलचा जावई म्हणतो, ‘पन्नास वर्षाचा म्हातारा कुणाशी प्रेमसबंध ठेवू शकतो? तो तीन लग्नं झालेल्या मुलीचा बाप होता, तुच्छतावादातून ही हत्या झालीय, खुन्याला कडक शिक्षा झाली पाहिजे.’
आरोपीला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ लाखोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरली होती. या हत्येच्या देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मानवी अधिकार दिनाच्या पूर्संध्येला ही घटना घडल्याने मानवी अधिकार आयोगाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आयोगाने राजस्थान सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बीबीसीने अफराजुल यांच्या कुटुबांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. अफराजुलच्या कुटुंबीयांनी आरोप केला की ‘अफराजुल मुस्लिम असल्याने त्याला मारण्यात आले. आम्ही गरीब रोजगारासाठी परमुलखाला आलोय. आम्ही कशाला कुणाच्या मुलीची छेड काढू.’ आरोपीला तात्काळ फासावर लटकवावं, अशी मागणी अफराजुलच्या कुटुंबीयांनी बीबीसीकडे केली आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल सरकारने अफराजुलच्या कुटुंबीयांना ३ लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
दुसरी घटना एकाला पोलिसांनी गोतस्कर म्हणून एन्काऊंटरमध्ये ठार मारलं आहे. अलवरमधली गेल्या सहा महिन्यातली ही तिसरी घटना आहे. गेल्या महिन्यात एकाला गोळी मारुन ठार मारण्यात आलं होतं. तर तीन आठवड्यांनंतर पुन्हा एकदा पोलिसांनी गोतस्करीच्या संशयातून एकाला पाठलाग करत जीवे मारलं आहे. देशभरात गेल्या आठवड्यातील ‘हेट क्राईम’च्या पाच घटना घडल्या आहे. पण सरकार यावर गप्प आहे.
देशात पहिल्यांदा असं होतंय की एका राजकीय पक्षाने पेरलेला विषाचा दंश सामान्य माणसांच्या दातांतून वापरला जात आहे. द्वेश व तुच्छतावादाचे हे वातावरण एक-एक करुन प्रत्येक राज्यात पसरत आहे. भाजपने सामान्य माणसांच्या मनात मुस्लिमोफोबिया पेरला आहे. केवळ द्वेषापोटी मुस्लिम समुदायावर हल्ले वाढले आहेत. सर्व हत्यांमध्ये एकच पॅटर्न वापरण्यात येतोय. नृशंस हत्येनंतर व्हिडिओ तयार करुन व्हायरल करणे, त्या व्हिडिओतून मुस्लिमांच्या मनात दहशत निर्माण करणे, असे समान पॅटर्न वापरले जात आहेत. विशिष्ट समुदायाविरोधात द्वेषबुद्धी तयार करुन अनामिक शक्तीद्वारे झुंड वापरली जात आहे.
प्रत्येकाला जन्मापासूनच सन्मानपूर्वक व सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरवणे सरकार व प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु अलीकडे दोन धर्मांत कुरघोड्या व द्वेशाचं राजकारण करुन सत्ता टिकवण्याची भाजप करत आहे. मानवाच्या मृत्यूवर सरकार दरबारी राजकारण सुरु असते. मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी भाजप सरकार द्वेषमूलक राजकारणाची आयुधं वापरत आहे. परिणामी राज्यघटनेचे दिलेले अधिकार व मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. प्रशासन व पोलिसी यंत्रणा जातीयवादी व धर्मवादी झालेली आहे. त्यामुळेच अल्पसंख्याकांना न्यायाचा अधिकार नाकारला जात आहे. प्रशासनाच्या अशा व्यवहारामुळे मुस्लिम समुदायाचा विश्वास प्रशासन व न्यायपालिकेवरुन संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
कायदा सांगतो की प्रत्येक गुन्हेगाराला समान शिक्षा झालीच पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. कठोर शिक्षा फक्त मुस्लिमांसाठी आहे. इतर आरोपी व गुन्हेगार मोकाट सुटतात. मुस्लिमांच्या बाबतीत कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून समान शिक्षा देण्याची प्रक्रिया पाळली जात नाही. रविवारी मानवी हक्क दिन पाळला गेला. अनेक उदाहरणे दिली गेलीत. सरकार दरबारी कार्यक्रम झाले. मुस्लिमांच्या समान अधिकारांच्या गप्पा केल्या गेल्या. पण ज्या वेळी मुस्लिमांच्या कायद्याचा व संरक्षणाचा प्रश्न येतो, त्या वेळी कुठं असतात मानवी हक्कासाठी लढणारे? राजस्थानच्या घटनेवर एकही मानवी अधिकार कार्यकर्ता रस्त्यावर निषेधासाठी उतरला नाही. ही सोयीची मानवी अधिकाराची लढाई नव्हे काय? भारतीय लोकशाहीमध्ये मानवी अधिकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण न्याययंत्रणा व प्रशासन दुटप्पी व द्वेषभावनेतून वागत असेल तर अधिकाराची व न्यायाची अपेक्षा कुणाकडे करायची?
जाता-जाता बशीर बद्र यांचा एक शेर...
‘‘सात संदूक़ों में भरकर द़फ्न कर दो नफ़रतें
आज इंसा को मोहब्बत की ज़रूरत है बहुत।’’

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget