राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो दिल्ली तर्फे
जाहीर आकडेवारीप्रमाणे गेल्या दोन वर्षात पत्रकारांवर एकूण 142 हल्ले झालेले आहेत.
त्यातील सर्वात जास्त 64 हल्ले उत्तर प्रदेशमध्ये, 26 मध्यप्रदेशात आणि 22 बिहारमध्ये
झालेले आहेत. शिवाय अलिकडे एक नवीन पद्धत रूढ झालेली आहे. ज्यात वैचारिक मतभेद ठेवणार्यांना
भिती घातली जात आहे. त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना ठार
सुद्धा मारले जात आहे. आरडब्ल्यूबी च्या रिपोर्टमध्ये असे म्हटलेले आहे की, भारतात
कंटरपंथी लोकांद्वारे चालविणार्या जाणार्या ऑनलाईन अभियानांचे शिकारसुद्धा पत्रकारच
होत आहेत. येथे त्यांना फक्त शिव्याच दिल्या जात नाहीत तर शारीरिक हिंसेच्या धमक्यासुद्धा
दिल्या जातात. मागच्याच काही महिन्यापूर्वी गौरी लंकेश या महिला पत्रकाराची बेंगलुरू
सारख्या सभ्य शहरामध्ये त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. हे प्रकरण एवढ्यावरच
थांबले नाही तर दक्षीणपंथी लोकांनी समाज माध्यमांवर त्यांच्या हत्येला उचित ठरवून जल्लोषही
केला आहे. हे सर्व खरोखरच भितीदायक आहे. पत्रकारांसाठी हा काळ अतिशय कठिण काळ आहे.
लंकेश यांच्या हत्येनंतर मुखरपणे बोलणारे लोक आपल्या कोषात गेलेले आहेत. बोलण्यापूर्वी
प्रत्येक पत्रकार विचार करीत आहे.
भारत एक बहुलतावादी देश आहे. ज्या ठिकाणी अनेक
विचार एकाच वेळेस हातात हात घालून नांदत आलेले आहेत. अनेकतेतील एकता ही आपली ओळख राहिलेली
आहे. किंबहुना हीच आपली सामाजिक शक्ती राहिलेली आहे. मात्र अलिकडे केंद्र सरकारवर टिका
करणे सुद्धा लोकांना सहन होत नाहीये. टिका करणार्याला लगेच देशद्रोही घोषित केले जात
आहे. माध्यम जगतामध्ये अंधाधुंद माजलेली आहे. प्रत्येकजण एकमेकाला संशयाने पाहत आहे.
आपसातील संवाद हरवलेला आहे. वाहिन्यासुद्धा हिंदू विरूद्ध मुसलमान, राष्ट्रवादी विरूद्ध
देशद्रोही अशा प्रकारच्या चर्चा घडवून आणत आहेत. सोशल मीडियाने तर कहर केलेला आहे.
संपूर्ण देशात एका विशिष्ट अशा विचार सरणीला लागू करण्यासाठी नियमित अभियान चालविले
जात आहे. समाज माध्यमांचेही धु्रवीकरण झालेले आहे. समाजमाध्यमातील विभाजन ठळकपणे दिसून
येत आहे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे.
अशा अडचणीच्या वेळेत माध्यमांनी स्वतंत्र रहायला
हवे होते. तोच त्यांचा व्यावसायिक धर्म होता. मात्र आज बहुतांशी माध्यमे शासनाची बाजू
घेवून चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींमध्ये सरकारची री ओढत आहेत. एक विशिष्ट अजेंडा नजरेसमोर
ठेवून माध्यमातील बहुतेक लोक वागत आहेत. कुठल्याही स्वतंत्र लोकतांत्रिक समाजासाठी
ही स्थिती धोकादायक आहे. फ्रेंच तत्वज्ञानी वॉल्टेअरने म्हटले होते, ” मला माहित आहे
जे तुम्ही म्हणत आहात ते खरे नाही. परंतु, तुम्ही ते म्हणू शकता. तुमच्या या म्हणण्याच्या
अधिकाराच्या लढाईत मी आपला जीवही देवू शकतो”.
Post a Comment