Halloween Costume ideas 2015

तुटणारी नाती, विखुरलेले कुटुंब हाच का स्त्री सन्मान !

- डॉ.आएशा पठाण, नांदेड, 9158805927

अल्लाहचे आम्ही ऋणी आहोत ज्याने आम्हाला मानव म्हणून जन्माला घातले व जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला. आम्ही सर्व मानवजात एकाच माता-पित्याची संतान, मानवी साखळीत गुंफलेले आहोत. काळा-गोरा, उच-नीच, लहान-मोठा असा भेदभाव न करणारे, माणुसकीला जपणारे आपण, विश्‍वची माझे घर मानणारे आपण, मानवी संबंधांना जपणारे आपण, कुटुंबाशी एकनिष्ठ राहणारे आपण आहोत. मात्र काही कारणाने आपण एकमेकांपासून दूर होत आहोत. एका स्त्री आणि पुरूषाच्या मिलनातून नवीन कुटुंबाची सुरूवात होते व त्यातून नाती बनतात. ही नाती समाजाचा पाया बनतात. कौटुंबिक नात्यातून समाजाची जबाबदारी सांभाळली जाते. अनेक कुटुंब मिळून समाज बनतो. कुटुंबामध्ये जितका चांगुलपणा तितका देश उत्कृष्ट. नैतिकता व समानता समाजाच्या प्रगतीचा आधार बनते.
    आपण सारे प्रगतीच्या दिशेने झेपावतो आहोत पण कुटुंब ज्या नात्यावर अवलंबून आहे तीच नाती खिळखिळी बनत चालली आहेत. पाश्‍चिमात्याकडे पाहिले तर कुटुंब विभक्त होत आहेत. कुटुंबात दरी पडत आहे. याचा समाजावर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहात नाहीत. अमानवियतेकडे जात असलेला कल, अश्लीलता, अत्याचार, स्त्री अन्याय हक्कापासून वंचित, व्यसनाधिनता, भ्रुणहत्या, बलात्कार, मातेच्या प्रेमाला पारखी झालेली अपत्ये, विधवा स्त्रीयांची  दशा, समलैंगिकता, विवाहबाह्य संबंध जे कौटुंबिक व्यवस्थेला छिन्नविछिन्न होण्यास कारणीभूत होत आहेत. स्त्री स्वातंत्र्याच्या नावावर स्त्री  वस्त्र हटवा, आधुनिकतेच्या नावावर स्त्रीच्या नाजुक खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली जात आहे. त्यामुळे ती सुखापासून वंचित होणारच. पण परिस्थितीशी मुकाबला करणारी स्त्री जर पाश्‍चिमात्याच्या भूलथापांना बळी न पडता सावरली तरच एक आदर्श माता, पत्नी, बहीन, मुलगी यासारखी महत्वाची नाती टिकवू शकेल. पाश्‍चिमात्याचे स्वातंत्र्य मानवी मुल्यांना संपुष्टात आणण्याच्या मागे लागलेले आहे. विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेली बालके आणि कुमारी मातांचे घटते वय हे 18 पेक्षा कमी होत आहे. नवीन पीढि, नो किड्ससाठी पुढे सरसावते आहे, तेव्हा फक्त मैत्रीच्या नावावर यौवनाचा उपयोग घेण्यात धूंद, जीवन जगण्यात, पती-पत्नीचे नाते ओझे वाटणारे विवाहबाह्य संबंध ठेवून स्वच्छंदी जीवन जगत असल्यामुळे कौटुंबिक नाती संपत चालली आहेत. क्षुल्लक कारणांनी जीवन नेस्तनाबूत झाल्याने आत्महत्येची अनेक उदाहरणे पहावयास मिळत आहेत. या अशा विखुरलेल्या नात्यांवर अवलंबित समाजावर देशाचे भविष्य अवलंबून आहे. तणावामुळे बौद्धिक क्षमता क्षीण होत चाललेली आहे. अनेकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आलेले आहे.
    समाजाला सत्याची ओळख झाली पाहिजे. चांगल्या वाईटाची जाण झाली पाहिजे. स्त्री-पुरूष आपल्या मर्यादेत राहून विवाह सारख्या पवित्र बंधनात राहून पवित्र समाज निर्माण करू शकतात. सर्व शक्तीमान अल्लाहने या महान कार्यासाठी स्त्री ची निवड केली आहे. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. स्त्रीला मान दिला आहे. वारसा हक्क दिला, अधिकार दिले, स्त्रीला नाजूक अस्तित्व म्हटले आहे. प्रेषित (सल्ल.) यांनी म्हटले आहे, ’तुम्हापैकी वाईट तो आहे जो त्यांच्याशी वाईट वागतो.’ इस्लाममध्ये स्त्री-पुरूष समान आहेत. हा फक्त दावाच नाही तर स्त्रीला सामाजिक, आर्थिक, संरक्षण विषयक हक्क दिले आहेत.
    पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे, ”पुरूष स्त्रियांचे प्रतिपालक (प्रोटेक्टर) आहेत. म्हणजेच त्यांना स्त्रियांची पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. कारण अल्लाहने त्यांना बलवान बनविलेले आहे.
    कुटुंबाच्या रचनेत स्त्रीला घराची स्वामीनी म्हटले आहे. कुुटुंबाला स्वर्ग बनविणारी स्त्री आहे. स्त्रीला समस्याचे गाठोडे समजू नये. कारण जोपर्यंत स्त्री आहे तोपर्यंत समाज टिकून आहे. स्वैराचार, व्याभिचार व पाश्‍चिमात्याचे अंधानुकरण, अश्‍लिलतेचा महापूर वेळीच रोखला गेला नाही तर समाज नष्ट होईल, म्हणून त्यासाठी मुस्लिमांना पुढे यावे लागेल. अश्‍लिलता व नग्नता यासारखा कलंक समाजाला लागला तर देशाचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. आधुनिकतेच्या ज्वालांत शालिनता सती जात आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. अंतिम प्रेषित (सल्ल.) आदेश देतात.
    ” महिलांच्या बाबतीत अल्लाहचे भय बाळगा तुमचा महिलांवर आणि महिलांना तुमच्यावर अधिकार आहे.”” शृंगाराचे प्रदर्शन करत फिरू नका”
    स्त्री स्वातंत्र्याच्या नावावर स्त्रीची विटंबना नको. आज भारतीय समाजामध्ये अश्‍लिलता व नग्नता भयानक रूप धारण करत आहे. हा समाजाला लागलेला कलंक आहे. विषारी सापाप्रमाणे डसणारा आहे. न्यूडिटी इज द कॅन्सर ऑफ सोसायटी.
    स्त्रीला भोगवादी बनविण्याचा धिक्कार आहे. वैधव्याच्या वाळवंटाचे निर्मुलन करण्यासाठी विवाहाचे पवित्र बंधन आवश्यक आहे. सहानुभूतीची प्रतिमा असलेल्या स्त्रीला अल्लाहने विशाल र्‍हृदय दिले आहे. समाजाला घडविण्याचे व दिशा देण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी आहे. त्यागाची भावना तिच्यात आहे. प्रेषितांनी म्हटलेले आहे की,” माँ की गोद बच्चे की पहली दर्सगाह होती है” मुलांची पहिली शाळा आईच्या कुशीत साकार होत असते. मुलांचे संवर्धन ही मानवजातीसाठी सर्वात महत्वाची बाब आहे.
     देह नाशवंत आहे, कर्मानी बनणार, कर्माचा हिशोब द्यावा लागणार आहे, सत्याचा अवलंब करावा लागणार आहे. प्रकाशमय जीवनातूनच पवित्र सुंदर समाज निर्माण होतो. सामाजिक वास्तवाची जाण होणे आवश्यक आहे. जीवन मौलिकआहे. आज सर्वांनी पारलौकिक जीवनाची जाण ठेवण्याची वेळ आलेली आहे. निसर्ग नियमाच्या विरूद्ध काम करणे गुन्हा आहे. स्त्री सन्मानासाठी स्त्रीचा आदर आवश्यक आहे. तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल बनेल. एका उर्दू शायरने म्हटलेले आहे,
    ऐ मुसलमान जमाना आगे बढता है तो बढने दे !
    तू 1400 साल पीछे चला जा
    जमाना खुद तेरे पीछे आ जाएगा !
तू कलमे की मेहनत करते-करते अख्लाक तक पहूंच
और लोक तेरे अख्लाक देखते-देखते कलमे तक पहूंच जाएंगे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget