***
जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांची ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग’ या मोहिमेच्या अनुषंगाने शोधनचे उपसंपादक बशीर शेख यांनी मुलाखत घेतली. त्यांनी मोहिमेच्या अनुषंगाने विविध विषयांवर परखड मते व्यक्त केले. ते वाचकांच्या सेवेत सादर. - संपादक
***
प्रश्न : जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्ती’ चा मार्ग ही मोहिम राज्यभर राबवित आहे. याचा उद्देश्य काय?
- बिस्मील्लाह अर्रहमान निर्रहीम. होय बरोबर आहे. 12 ते 21 जानेवारी 2018 या कालावधीत राज्यभर ही मोहिम राबविण्याचा जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने निर्णय केलेला आहे. जमाअते इस्लामी हिंद एक अशी संघटना आहे की, जी एका अशा भारताची कल्पना करते जिथे कोणी भिकारी नसावा, कोणी वेश्या नसावी, महिलांना, वृद्धांना आणि मुलांना त्यांचे अधिकार मिळावेत, सर्वांना समानतेने वागविण्यात यावे, सगळ्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात. त्यांना सर्व सुख सुविधा मिळाव्यात. याशिवाय, सर्व देशवासियांचे अध्यात्मिक जीवन ही समृद्ध व्हावे. सर्व लोकांनी सुखाने रहावे. कोणावरही अत्याचार होऊ नयेत. महिलांविरूद्ध लैंगिक अत्याचार होणार नाहीत, कोणी कोणाची हत्या करणार नाही.
जमाअत-ए-इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, ज्या अल्लाहने सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. एका आई-वडिलांपासून सर्वांना जन्माला घातलेले आहे, त्याचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय वरिल गोष्टी साध्य होणार नाहीत. शिवाय मरणोप्रांत जीवनही सफल होणार नाही. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र या मोहिमेद्वारे प्रयत्नशील आहे की, सर्वजण यशस्वी होऊन अंतिमतः जन्नतमध्ये जावेत.
जमाअतच्या ध्येय धोरणानुसार नेहमीच चार वर्षाची योजना तयार असते. या मोहिमेची आखणी सुद्धा चार वर्षांपुर्वीच करण्यात आलेली होती. ही मोहिम कुठल्याही घटनेची प्रतिक्रिया नाही. आमचा दावा आहे की, इस्लाम मुळात शांती, प्रगती आणि मुक्ती साठीच आहे. हा संदेश सर्वापर्यंत पोहोचविणे ही आम्ही आपली जबाबदारी समजतो. म्हणून ही मोहिम सुरू करण्यात आलेली आहे.
प्रश्न : अल्लाहच्या मार्गाकडे बोलाविणे म्हणजे नेमके काय?
- अल्लाह हे काही एखाद्या व्यक्तीचे नाव नाही. ती अशी शक्ती आहे जी संपूर्ण विश्वांची मालक आहे. ज्याला सर्व अधिकार प्राप्त आहेत. मानव ही त्याची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. ज्यासाठीच या विश्वाच्या सर्व गोष्टी तयार करण्यात आलेल्या आहेत. सर्वांचा मृत्यू त्याच्याच हातात आहे. तो अंतिम निवाड्याच्या दिवसाचा मालक आहे. त्या शक्तीला मुस्लिम अल्लाह म्हणतात. कोणी ईश्वर म्हणतात तर कोणी गॉड म्हणतात. त्याचे मार्गदर्शन सर्वांसाठी आहे. त्याने मानवकल्याणासाठी या पृथ्वीवर वेळोवेळी प्रेषित पाठविले. अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. होत. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय जगात शांतता नांदणे शक्य नाही. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे म्हणजे अल्लाहच्या मार्गाकडे बोलाविणे आहे.
प्रश्न - देशाच्या सद्यःपरिस्थितीवर आपण काय भाष्य कराल?
- हे पहा ! आपल्या देशाने प्रगती केलेली आहे, यात काही वाद नाही. स्वातंत्र्यानंतर घोर गरिबी होती. लोक ठिगळ लावलेले कपडे घालत होते. शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. मात्र वेगाने प्रगती करीत देशात शाळा, महाविद्यालये आणि अनेक विद्यापीठे स्थापन झाली. त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात नव-नवीन अभ्यासक्रम सुरू झाले की, आज विद्यार्थ्यांना हवे त्या शाखेमध्ये इच्छेप्रमाणे शिक्षण घेता येते. शिवाय, बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम झालेले असून, रेल्वेचे जगातील सर्वात मोठे जाळे आपल्याकडे आहे. विमान प्रवासही सहज शक्य झालेला आहे. भुपृष्ठ मार्गही विस्तारलेले आहेत. ही सर्व प्रगती झालेली आहे. हे मान्य आहे. मात्र यासोबत विषमता ही वाढलेली आहे, याचाही इन्कार करता येणार नाही. आज परिस्थिती अशी आहे की, कोणाला मोठ-मोठ्या इमारती मिळत आहेत तर कोणाला फुटपाथवर झोपावे लागत आहे. महिलांविरूद्ध हिंसेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या सुरक्षित नाहीत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे अशक्य झालेले आहे. मोठ-मोठ्या शाळा, महाविद्यालये प्रत्येक गावात उभी आहेत. मात्र त्यांचे शैक्षणिक शुल्क इतके जास्त आहे की, गरीबांची मुले त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाहीत.
मोठ्या प्रमाणात जातीयवाद वाढत आहे, जो समाजाच्या अनेक घटकांमध्ये फूट पाडत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर भारत महासत्ता होवू शकणार नाही. भारताला महासत्ता करावयाचे असेल तर विकासासोबत समता, न्याय, एकात्मता आणि अध्यात्मिकता या क्षेत्रातही प्रगती करावी लागेल. त्यासाठी जमात आपल्या परीने आपली भूमिका बजावत आहे.
प्रश्न : आपल्याला देशात कुठल्या प्रकारचा बदल अपेक्षित आहे?
- सगळ्यांना समान अधिकार मिळावेत. आज दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना त्यांचे अधिकार पूर्णतः मिळत नाहीत. शिक्षण आणि शासकीय नौकऱ्यांमध्ये या लोकांचे प्रमाण किती आहे? याचा विचार झाला पाहिजे. समाजाचा एक भाग दाबला जात असेल तर त्याला सर्वांगीण प्रगती म्हणता येणार नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी जेव्हा वाढत जाते तेव्हा वर्गसंघर्षाचा जन्म होतो. गरीब लोक श्रीमंतांवर हल्ले करायला सुरूवात करतात. आज जरी ते दबलेले असतील तरी उद्या ते उठून क्रांती करू शकतात. म्हणून सर्वांसाठी प्रगतीची दारे खुली असणे, सर्वांसाठी समान अधिकार उपलब्ध असणे म्हणजे खरी प्रगती होय. आम्हाला हेच बदल अपेक्षित आहेत. जमाअत या सर्वांसाठी प्रयत्नशील आहे.
प्रश्न - देशात कशा प्रकारची शांती आपल्याला अपेक्षित आहे?
- न्यायाच्या स्थापने शिवाय शांतीची स्थापना होऊ शकत नाही. मी स्वतःला गोरा आणि तुम्हाला काळा समजत असेन, स्वतःला उच्च जातीचा आणि तुम्हाला हलक्या जातीचा समजत असेन, स्वतःला श्रीमंत आणि तुम्ही गरीब आहात हे डोक्यात ठेऊन जर मी तुमच्याशी वर्तन करत असेन तर मी कधीही तुमच्याशी न्याय करू शकणार नाही. जमातचे असे मत आहे की, इस्लामी श्रद्धा ही समाजामध्ये समानता आणते. सबका मालिक एक, हम सब उसके बंदे, मग कोणी काळा असेल, कोणी गोरा असेल, कोणी श्रीमंत असेल कोणी गरीब असेल, सगळे एकसमान आहेत. हे उद्देश्य साध्य करण्यासाठी इस्लामने पाच वेळेसची नमाज अनिवार्य केली, मस्जिदमध्ये सर्व खांद्याला खांदा लावून नमाज अदा करतात, प्रेषितांच्या काळात अरबी समाजामध्ये उच्च-नीचतेची भावना अतिशय प्रबळ होती. त्यांनी नमाजमध्ये सर्वांना एकत्र उभे करण्याची तरतूद करून ही विषमता मोडून काढली. आज मस्जिदीमध्ये कोट्याधीश जावो, मंत्री जाओ का गरीब भिकारी जाओ सर्व एका रांगेत उभे राहून नमाज अदा करतात. कोणी कोणाला मागे पुढे करू शकत नाहीत. ती समानता आजही जशीच्या तशी पाळली जाते. अशी समानता जेव्हा प्रत्येक समाजात येईल तेव्हा शांती येईल, असा आमचा ठाम विश्वास आहे. रंग, जात, धर्म हे वेगवेगळे असू शकतात मात्र माणूस म्हणून सर्व समान आहेत. हा विचार जोपर्यंत प्रबळ होणार नाही तोपर्यंत देशात शांती व प्रगती दोन्हीही साध्य होणार नाहीत. यासाठी ईश्वरावर श्रद्धा ठेवणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपण सर्व ईश्वराचे बंदे असल्याची भावना प्रबळ होते.
शांती आणि प्रगतीसाठी दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, सर्वांना हे मान्य करणे आवश्यक आहे की, आपण सर्व एका आई-वडिलांची लेकरे आहोत. इस्लामच्या मुलभूत शिकवणीपैकी ही एक शिकवण आहे. जगातील सर्व माणसे हे आमचे भाऊ-बहीण आहेत. मग ते ऑस्ट्रेलियाचे असोत की पंजाबचे. मलेशियाचे असोत की अमेरिकेचे. काळे असोत की गोरे असोत. श्रीमंत असोत का गरीब असोत. या प्रकारची उदात्त विचारसरणी जोपर्यंत आपल्या समाजामध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत शांती स्थापित होणार नाही. जात, रंग, भाषा व प्रादेशिक अस्मिता कुरवाळत बसल्यास कधीच न्यायाची स्थापना होवू शकत नाही. आज 70 वर्षानंतरही आपल्या देशात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटक-तामिलनाडू जलवाद कायमच आहे. अरे ! आपण सर्व भारतवासी आहोत. देश सर्वांचा आहे, पाणी सर्वांचे आहे, मग हे भांडणं कशासाठी? आपण एकमेकांना एका-आई वडिलांची लेकरे समजत नसल्यामुळे हे सगळे विवाद एका देशाचे नागरिक असून सुद्धा वाढत आहेत. एक आई-वडिलाची लेकरे असल्याची मनापासून श्रद्धा असेल तर माणसाचे मन मोठे होते. परिणामी, देशच काय जगभरातील मानवजातीच्या कल्याणाचा विचार आपल्या मनात येतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात हा विचार प्रबळ होणे, शांती स्थापण्याच्या दृष्टिकोणातून अत्यावश्यक असे आम्हाला वाटते.
प्रश्न - इस्लामला कशी प्रगती अपेक्षित आहे?
- इस्लाम प्रगतीच्या अगोदर डिग्नीटी (सन्मान) चा विचार करतो. आता हेच पहा! प्रेषित सल्ल. यांच्या पूर्वीच्या काळात महिलांना, गुलामांना कुठलेच अधिकार नव्हते. जेव्हा प्रेषितांनी स्त्री-पुरूष दोन्ही समान असल्याची घोषणा केली तेव्हा पुरूषांना धक्काच बसला. स्त्रिया मात्र आनंदी झाल्या. त्यांना इस्लामने वडिलांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क दिला. त्यांना शिक्षणाचा, व्यापार करण्याचा, लग्न आपल्या पसंतीने करण्याचा, एवढेच नव्हे तर त्यांना युद्धातसुद्धा जाण्याचा अधिकार दिला. जेव्हा गुलामांना सुद्धा त्यांच्या मालकाएवढेच महत्व इस्लामने दिले तेव्हा गुलामांच्या मध्येही एका नव्या शक्तीचा संचार झाला. याच नव्या विचार सरणीतून हळूहळू गुलामीच्या पद्धतीचेही उच्चाटन झाले. याला समानता आणि प्रगती म्हणतात.
प्रश्न - मुक्ती संबंधी इस्लामची संकल्पना काय आहे?
- अल्लाहने स्पष्ट सांगितले आहे की, मी जगातील सगळ्या गोष्टी तुमच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या आहेत. एवढ्या माझ्या सुविधांचा उपयोग घेवूनही तुम्ही
भक्ती मात्र दुसऱ्यांची करणार? हे मी खपवून घेणार नाही. माझ्या अवाज्ञांची तुम्हाला मी शिक्षा देईन. यावर विश्वास ठेवणे प्रत्येकाला आवश्यक आहे. या जीवनामध्ये आपण जे काही करतो त्याचा आपल्याला एक दिवस हिशोब द्यावा लागणार आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवल्यास मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. हे असेच उदाहरण आहे जसे, एका देशाचा नागरिक असतांनासुद्धा जो कोणी त्या देशाशी एकनिष्ठ न राहता दुसऱ्या देशासाठी हेरगिरी करतो. अशा देशद्रोह्याला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही? त्याला मुक्ती कशी मिळेल? जो अल्लाहला सोडून दुसऱ्याची भक्ती करेल त्याला मुक्ती कशी मिळेल? त्याला नक्कीच शिक्षा मिळेल. मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे माणसाने त्याचीच भक्ती करावी, त्याचेच ऐकून रहावे ज्याने त्याला जन्माला घातले. ही तर झाली मुक्तीची व्यापक संकल्पना. व्यक्तिगत स्तरावरसुद्धा भुकेपासून मुक्ती, अपमानापासून मुक्ती, मानसिक तणावापासून मुक्ती मिळविणे सुद्धा यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. इस्लामी जीवन व्यवस्थेमध्ये मानवाच्या या सर्व दुःखापासून मुक्ती देण्याची शक्ती आहे. शेवटची मुक्ती ही नरकापासूनची मुक्ती होय. कुरआनने स्पष्ट म्हटलेले आहे, अल्लाहची आज्ञा मानणारे लोक नेहमीसाठी जन्नतमध्ये मुक्तपणे राहू शकतील. त्या ठिकाणी अनंतकालीन सर्व सुख, सुविधा त्यांंना मिळतील. आज जगात कितीही हुशारी केली तरी अंतिम निवाड्याच्या दिवशी प्रत्येक माणूस ईश्वरासमोर अडकून पडेल. तिथे त्यांची हुशारी चालणार नाही.
प्रश्न : आपल्या देशाने भांडवल आणि समाजवादी व्यवस्था अंगीकारली आहे, यासंबंधी आपले मत काय?
- या व्यवस्थेचा एक दोष असा आहे की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो तर गरीब अधिक गरीब. इस्लाम सर्वांना समान आर्थिक संधी देतो. प्रत्येकाची आर्थिक उन्नती होईल, यासाठीही उपाययोजना करतो. कारण समाजामध्ये सगळे समान नसतात. काही दिव्यांग, निराधार असतात. काही लोक काही कारणांमुळे अर्थाजन करू शकत नाहीत. अशा लोकांनाही सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद इस्लाम करतो. त्यासाठी तो श्रीमंतांना आपल्या कमाईतील एक विशिष्ट असा हिस्सा अशा लोकांसाठी दान करण्यासाठी प्रेरित करतो. श्रीमंताच्या बचतीवर किमान अडीच टक्के वर्षाला गरीबांसाठी दान करणे अनिवार्य केलेले आहे. गरीबांना जे काही दान दिले जाते ते अल्लाहला पोहोचते अशी इस्लामची भूमिका आहे. बंदा खुश तो खुदा खुश. माझ्या शेजाऱ्याच्या घरात खायला अन्न नाही आणि मी पुन्हा-पुन्हा हज आणि उमऱ्याला जाण्यासाठी लाखो रूपये खर्च करीत असेल तर माझी ही इबादत स्वीकार केली जाणार नाही.
प्रश्न - संसदेने तीन तलाक देणाऱ्या मुस्लिम व्यक्तींना शिक्षा देण्याचा कायदा करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे यावर आपले काय मत आहे?
- हा प्रश्न फिकाह (इस्लामी न्यायशास्त्र) चा आहे. यासंबंधी सरकारने देशातील उलेमा व मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विश्वासात घेतले पाहिजे, कारण ते त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, असे आमचे मत आहे.
प्रश्न - सध्या देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण होत आहे. यासंबंधी आपण काय म्हणाल?
- मला तर वाटत नाही की आम्हा देशबांधवात दरी निर्माण झाली आहे. एवढे निश्चित आहे की, काही लोक दरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण मोठ्या संख्येने देशबांधव सहिष्णु, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष आहेत. जे थोडे लोक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या संदर्भात मुस्लिमांची भूमिका कशी असावी, याबद्दल कुरआनमध्ये स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे. जे तुमच्याशी वाईट वागतात तुम्ही त्यांच्याशी चांगले वागा आणि पहा जे तुमचे कट्टर शत्रु आहेत ते तुमचे जिवलग मित्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. या शिकवणीची मुस्लिमांनी आठवणीने अंमलबजावणी केली तर परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही.
प्रश्न - अनेक मुस्लिमांना इस्लामच्या तरतुंदीची जाणीव आहे परंतु, ते आपल्या जीवनात त्यांची अमलबजावणी करीत नाहीत, त्यासंबंधी आपण काय म्हणाल?
- इस्लामच्या शिकवणीं योग्यरित्या न समजल्यामुळे त्यांच्या ज्ञान आणि वर्तनामध्ये तफावत दिसून येते. किती लोकांनी कुरआन समजून घेतलेले आहे? किती लोकांनी कुरआनचे भाषांतर वाचलेले आहे? किती लोकांनी कुरआनची व्याख्या (तफसीर) समजून घेतलेली आहे? किती लोक कुरआनच्या शिकवणीनुसार आपल्या मुलां-मुलींचे विवाह करीत आहेत? जोपर्यंत कुरआन आणि हदीसच्या शिकवणी मुस्लिम लोक आत्मसात करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या वर्तनामधील विरोधाभास संपणार नाही.
प्रश्न - शोधनच्या माध्यमाने आपण मुस्लिम तरूणांना काय संदेश द्याल?
- त्यांनी अल्लाहचे आभार मानायला हवेत की, अल्लाहने त्यांना मुस्लिम केले. भारतासारख्या श्रेष्ठ देशात जन्माला घातले. जी संवैधानिक व्यवस्था आपल्या देशात आहे, कदाचित ती जगात दुसरीकडे नसेल. इस्लामच्या शिकवणीच्या पायावर या व्यवस्थेचा लाभ उठवित मुस्लिम युवकांनी सर्वाधिक लक्ष आपल्या शिक्षणावर केंद्रित केले पाहिजे. तसेच देशात शिक्षणाच्या अनुरूप काम करण्याची संधीपण उपलब्ध आहे. तिचा लाभ उठविला पाहिजे. इस्लामचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला पाहिजे. तसेच आपली सर्व ऊर्जा ही सकारात्मक पद्धतीने देशाच्या व स्वतःच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे, हाच माझा संदेश आहे.
बशीर शेख
उपसंपादक
9923715373
Post a Comment