Halloween Costume ideas 2015

मॅप’ची लढाई अ‍ॅप’ने

App Map
एक आटपाट नगर होते. त्या नगरात एक तरुण राहत  होता. हा तरुण रोज आपल्या प्रेयसीबरोबर ‘विकास वाटिका’ नावाच्या बागेत जात असे. ही बाग मीच फुलवली असे तो तिला  सांगत असे. हे ऐकून प्रेयसी त्याच्याकडे कौतुकाने, अनिमिष नेत्रांनी पाहत राही. सतत कौतुकाने बघणाऱ्या प्रेयसीकडेपाहून त्याची छाती फुलून जात असे. तिचा तो महानायक होता. पण रोज रस्त्यांत एक फाटका दारुड्या त्याच्या अंगावर येऊन शिव्यांचा भडीमार करीत असे. खचितच हे अपमानास्पद होते. एके दिवशी त्या तरुणाने दारुड्याला कानशिलात मारल्याचा आविर्भाव केला. आश्चर्य म्हणजे त्याच्या हाताचा कानाला स्पर्शही न होता दारुड्या भेलकंडला. प्रेयसीच्या डोळ्यांतील कौतुक आणखीन वाढले. आता तरुणाला चेव चढला. तो जाता येता दारुड्याला कधी कानशिलात मारल्याचे तर कधी लाथ मारल्याचे आविर्भाव करू लागला. आजूबाजूचे लोक टाळ्या पिटू लागले. प्रेयसीला प्रियकराची मर्दानगी पाहून आभाळ ठेंगणे झाले. एकदा तर त्याने गंमत म्हणून दारुड्याला खेळण्यातील पिस्तूल दाखवली. दारुड्या गर्भगळीत झाला. आता तो तरुणाला पहाताच थरथरू लागला, प्रेयसीच्या डोळ्यातील कौतुक वाढू लागले, तरुणाची छाती फुगतच राहिली. एक दिवशी दारुड्या त्याला म्हणाला, हात तर लाव मला, माझ्या मोठ्या भावालाच सांगेन, तो मोठा पहिलवान आहे. तरुण म्हणाला, अरे जा, बोलव तुझ्या भावाला, माझा दोस्त तर जगातील सगळ्यात मोठा पहिलवान आहे. एक दिवशी नेहमीप्रमाणे तरुणाने दारुड्याला हवेतच लाथ घातली. आणि अचानक मागून एक धिप्पाड, बलदंडमाणूस उगवला. त्याने तरुणाला हवेत एकफटका मारला. वरवर घासून गेलेल्या त्याच्या बोटांनी तरुणाच्या कानाचा टवका उडाला. तरुण भेलकंडला. स्वत:ला सावरत त्याने त्या बलदंडाकडे पाहिले. अरे हा तर आपला लंगोटी यार! तो त्या बलदंडाला म्हणाला, काय यार, अरे तू नी मी एका झोक्यावर खेळलो. त्या बलदंड माणसाने कोणतीही ओळख न दाखवता त्याला दरडावून विचारलं, कोणी मारलं तुला?तरुण म्हणाला छे छे, तू काहीच केले नाहीस. तू तर माझ्या जवळही आला नाहीस. तरुणाने प्रेयसीचा आधार घेत काढता पाय घेतला. खूप दूर गेल्यावर त्याने आपल्या मित्राला मोबाइल लावला. झालेली घटना सांगितली. मित्र म्हणाला मी खूप दूर आहे, माझी तब्येत बरी नाही, प्रश्न सामंजस्याने सोडव. अगदीच तशी वेळ आली तर हाताखालचे पहिलवान पाठवीन. तरुणाला कळून चुकले. आजूबाजूच्या टाळ्या पिटणाऱ्यांनी तोंडे फिरवली. प्रेयसी त्याच्याकडे पाहत होती. दारुड्याच्या बलदंड भावाला ऐकू येणार नाही एवढ्या अंतरावर गेल्यावर तरुणाने प्रेयसीकडे पाहत उसने अवसान आणले, डोळ्यांवर गॉगल चढवला आणि गर्जना केली, लक्षात असू द्या दादागिरीचा काळ संपलाय! तरुणीने अभिमानाने त्याच्याकडे पाहिले, पण यावेळी त्याची छाती मात्र फुगली नाही. छातीतील हवा केव्हाच निघून गेली होती!
या रूपक कथेतील कोणत्या व्यक्ती कोणाशी साम्य दर्शवतात हे ज्याने त्याने ठरवावे. रूपक कथा कालातीत असतात. अनेक कालखंडांना आणि देशांना त्या वेळो-वेळी  लागू पडत जात असतात. या रूपक कथेतील व्यक्ती किंवा घटना यांचे साम्य वर्तमानातील व्य्नती किंवा घटना यांच्याशी आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनांमुळे मात्र आम्हाला साबरमतीच्या काठावरील गांधी आश्रमातील झोपाळ्यावर बालमित्र असल्यासारखे झुलणारे, चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर हातात हात घालून भटकणारे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवले. चीनी प्रवासी शेकडो वर्षापूर्वी मोदी यांच्या गावी आला होता आणि शी जीनपिंग यांच्या गावी परतला होता, या योगायोगाची कथा पुराव्यासहित शी जीनपिंग यांनी मोदी यांना खाजगीत सांगितलेली आणि मोदी यांनी जाहीरपणे भक्तगणांना सांगितलेली आठवली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका भाषणात शी जीनपिंग यांच्याबरोबर अनेक भावी प्रकल्प जन्माला घालण्याचे स्वप्न ते कसे बघत आहेत आणि विधात्याने त्यांची निर्मिती ही भव्य स्वप्नेच पाहण्यासाठी कशी केली आहे, हे सांगितलेले आठवले. त्यानंतर त्यांनी सरदार पटेल यांचा अतिभव्य चिनी बनावटीचा पुतळा कसा उभा केला तेही आठवले. त्यांचे मित्र अंबानी यांनी चीनबरोबर केलेले लाखो कोटी रुपयांचे करार आठवले. ‘मेक इन इंडिया’च्या बॅनर खाली चिनी लष्कराने छुप्या पद्धतीने हाइक व्हीजन या सी.सी.टी.व्ही.च्या रूपाने देशाच्या संरक्षण क्षेत्रासहित सर्वत्र विणलेले जाळे आठवले. भारतीय जनता आणि ‘मोदीभक्त’ यांचे जीवन व्यापणारे 59 चिनी अ‍ॅप्स आठवले. पी.एम. केअर्स या नव्या फंडाला चीनी कंपन्यांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आठवल्या आणि भारताचा भूभाग नकाशात घेऊन नेपाळ्यांनी केलेला जल्लोशही आठवला. देशप्रेमापोटी आम्ही या सर्व आठवणी डीलीट करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. कारण आता चीनबद्दलची कोणतीही आठवण मेमरीमध्ये स्टोअर करणे हा देशद्रोह आहे असे एका हिंदुत्ववाद्याने आम्हाला सांगितले होते. यावर आम्ही त्याला ‘1962 आणि नेहरू’ तू तुझ्या मेमरीमधून डीलीटकेलेस का? असे विचारता तो म्हणाला त्या आठवणी आमच्या सिस्टिम आणि प्रोग्रॅम मेमरीमधील असल्याने तसे करता येणार नाही. आमचे हिंदुत्वाचे सॉफ्टवेअर त्यावर रन होते. तसे केले तर सॉफ्टवेअर बंद पडेल. आम्ही त्याला यावर विचारले की तुमच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर चिनी व्हायरसने हल्ला केलाय त्याचे काय? यावर तो हसून म्हणाला हार्डवेअरवरचा हल्ला किरकोळ होता. त्याचा फायदा कोठे आणि कसा घ्यायचा हे आम्ही पुरेपूर जाणतो. सॉफ्टवेअरवरचा हल्ला आम्ही सॉफ्टवेअरनेच परतवणार आहोत. चीनच्याविरुद्ध आम्ही सायबर युद्ध  पुकारणार आहोत! भारत आय.टी. क्षेत्रात अग्रेसर आहे याचा अभिमान असणाऱ्या आम्हाला या वास्तवाचीही जाणीव होती की भारतातील आय. टी.यन्स हे बुद्धिमान नोकरदार आहेत, उत्कृष्ट तंत्रज्ञ आहेत, पण ते प्रतिभावान संशोधक आणि शास्त्रज्ञ नाहीत. आय.टी. क्षेत्रातील, आणि तसे पाहता कोणत्याही क्षेत्रातील मूलभूत संशोधन आपल्या नावावर नाही. मेकइन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या घोषणांमधून जग वापरेल असे साधे एखादे अ‍ॅपही आम्ही जन्माला घालू शकलो नाही. हे त्याला आम्ही सांगितल्यावर तो म्हणाला, याची गरज नाही, आपण जगाचे आध्यात्मिक गुरु आहोत. विज्ञान अध्यात्माच्या पायाशी लोळते. आम्ही असहकार, बहिष्कार या मार्गांनी चिन्यांना जेरीला आणणार आहोत. आम्ही सर्व चिनी अ‍ॅप्स आणि वस्तूंवर बहिष्कार घालणार आहोत. चायनीज खाणे बंद करणार आहोत. आम्ही भाबडेपणे त्याला विचारले, म्हणजे महात्मा गांधींच्या मार्गाने? मला वाटले तुम्ही थेट बीजिंग किंवा शांघायवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ कराल ! तो म्हणाला छे, गांधींचा मार्ग? तो तर भेकडांचा मार्ग आहे. आम्ही आमच्या व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठाच्या अंतर्गत सर्व शाखांमधून शी जीनपिंग यांची अशी बदनामी करणार, त्यांच्या चारित्र्याच्या अशा चिंधड्या उडवणार की ते ऐकून त्यांची पत्नी त्यांना सोडून जाईल आणि गलवान खोऱ्यात शेकडो चिनी सैनिक भारताने मारले हे कळल्यावर चिनी जनता त्यांना ‘पप्पू’ मानू लागेल. ठरवलं तर आमचा सिंह ड्रॅगनला चिरडून टाकू शकतो, पण सध्या सॉफ्टवेअर युद्ध पुरेसे आहे. भारतीय सैन्य सिंह मानायचे असेल तर आमच्या मनात त्यांच्या शौर्याबद्दल थोडीही शंका नसल्याने आम्हाला त्यांच्या वाक्याचा पहिला भाग पूर्ण मान्य होता. पण त्यांना अभिप्रेत असणारा सिंह मात्र आम्हाला शेळी झालेला वाटला. तो हे बोलत असताना आमच्या डोळ्यापुढे गलवान खोरे  पुन्हा तरळू लागले. तेथील घटनाक्रम डोळ्यांपुढे फिरू लागले. कोण सीमा पार करून दुसऱ्याच्या हद्दीत गेले? पंतप्रधान म्हणाले चिनी सैनिकांनी भारतीय हद्द ओलांडली नाही. मग भारतीय जवान चिनी हद्दीत गेले का, तर का गेले? इतका क्रूर हल्ला झाल्यावरही त्यांनी शस्त्रे का वापरली नाहीत? भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, आपल्या जवानांकडे शस्त्रे  होती. सशस्त्र जवानांना चिनी सैनिक इतक्या निर्घृणपणे कसे मारू शकले? शस्त्रे न वापरण्याचा करार 1996 आणि 2005  मध्ये करण्यात आला होता, असेही जयशंकर म्हणाले. या करारात कोणतीही शस्त्रे वापरायची नाहीत हे नमूद नव्हते का? शस्त्राची काही व्याख्या करण्यात आली होती का? मध्ययुगीन शस्त्रांनी शत्रूने हल्ला केल्यावरही आपल्या सैनिकांना शस्त्रे वापरण्यापासून कोणी रोखले? बाकी सैन्य कोठे होते? आपल्या सैनिकांची शवे चिनी सैनिक आपल्या हद्दीत टाकून गेले का? सरकारने दावा केला की आपल्या सैनिकांनी 43 चिनी सैनिक मारले. हे कोणी मोजले? कुठे जाऊन मोजले? मग त्यांची शवे परत का दिली? एक ना अनेक प्रश्नांनी आमच्या डोक्यात दंगल माजवली. तेवढ्यात एक गोष्ट आम्हाला आठवली की या घटनेच्या काही महिने आधी या भागातील गोरखा रेजिमेंटला हटवून बिहार रेजिमेंटला नेमण्यात आले होते. 20 हुतात्म्यांमधील 17 बिहारी आहेत. हा भाग अतिउंच, सुमारे 15 हजार फुटांवर आहे. तेथे प्राणवायू विरळ असतो, मरणाची थंडी असते. अशा भागात काम करण्यास आणि तेथील हवामानाला तोंड देण्यास गोरखा रेजिमेंटच सक्षम असू शकते. मग हा निर्णय कोणी घेतला? का? काहीही असो या हुतात्म्यांना मात्र बिहारमधील त्यांच्या गावांमध्ये सन्मानाने मिरवण्यात आले हे लक्षात घेऊन प्रश्न विचारणे थांबवले पाहिजे असे आमच्या लक्षात आले. येणारी निवडणूक हा योगायोग आहे.
वास्तविक नेहरूंनी माओ आणि चीनशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. असे असताना ‘हिंदी चिनी भाई भाई’ ही घोषणा देत माओने नेहरूंचा विश्वासघात का केला? याला नेहरूंची ‘फॉरवर्डपॉलिसी’ कारण होती? नेहरूंनी चीन ज्या भागांवर अधिकार सांगत होता तेथे धडाक्यात लष्करी चौक्या उभ्या केल्या. 1959मध्ये दलाई लामांना आश्रय दिला. चीन यामुळे बिथरला का? आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वीडिश तज्ज्ञ बर्टील लिंटर ही शक्यता नाकारतात. त्यांचे म्हणणे की 1958 मध्ये माओने चीनला आधुनिकीकरणाकडे नेण्यासाठी ‘ग्रेटलिप फॉरवर्ड’ योजना पुकारली. ही योजना भयानक अपयशी ठरली. अत्यंत वेगाने केलेल्या औद्योगीकरणामुळे शेतीवर भयानक परिणाम झाले, दारिद्रय वाढले. त्यात दुष्काळ पडले आणि 1961 पर्यन्त साडेचार कोटी लोक मेले. माओच्या नेतृत्वाला धक्का बसला. आपले नेतृत्व सावरण्यासाठी माओला सर्व अपयशी राज्यकर्त्याप्रमाणे बाहेरील शत्रू उभा करणे गरजेचे होते. नेहरूंमुळे भारताचे आशियात आणि एकूणच जगात नेतृत्व प्रस्थापित होत होते. माओसाठी भारत हा सॉफ्ट टार्गेट ठरला. युद्धातील यशाने देश एक झाला आणि माओचे नेतृत्व चीन आणि जगात सावरले गेले. मग शी जीनपिंग यांनी अशाच कारणांसाठी हे घडवले असावे का, असा प्रश्न पडतो. पण प्रत्यक्षात वुहान शिखर परिषदेनंतर आणि त्यापूर्वी पासूनही मोदी यांचे वर्तन शी जीनपिंग यांच्यावर टीका न करण्याचे राहिले आहे, मग तो तैवानचा प्रश्न असो, हाँगकाँगचा प्रश्न असो, कोरोना महासाथ असो किंवा अगदी त्यांचा महत्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड’प्रकल्प असो. चीनची नाराजी ही भारताने सातत्याने पाकिस्तानवर हात उगारणे, जम्मू काश्मिरचेचे दोन तुकडे करणे आणि अमेरिकेशी अतिरेकी जवळीक करणे अशा गोष्टींबाबत असू शकते. नोव्हेंबर महिन्यात ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ने अक्साई चीनचा लडाखमध्ये समावेश केलेला नवा अधिकृत नकाशा जाहीर केला यामुळेही ही ठिणगी पडलेली असू शकते. अमित शहा यांनी लोकसभेत पीओके आणि अक्साई चीन हे भारताचे भाग असल्याचे व्नतव्य केले होते. जागतिक महासत्ता बनण्याचे ‘चीनचे स्वप्न’ प्राचीन आहे. मंडारीन भाषेत ‘तियांक्सिया’ म्हणजे ‘एका स्वर्गाखाली सारे  जग’ असे म्हटले जाते. चीनचा इतिहासही पाच हजार वर्षांचा आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या लढ्याचा इतिहास जवळपास  शतकाचा आहे. ब्रिटिश भारत सोडून जाताना चीन आणि भारत यांच्यामधील हजारो कि.मी. सीमेचा प्रश्न तसाच सोडून गेले. तो आपल्याला सोडवता आला नाही आणि ते सोपे नाही. आजच्या जगात विस्तारवाद जसा शक्य नाही तसेच दुसऱ्या राष्ट्राच्या ताब्यात असणारा भूभाग पुन्हा जिंकणेही सोपे नाही. चीन इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून व्यापाराच्या मार्गाने विस्तारवाद करीत आहे. ईस्ट इंडिया कंपनीने गुलाम देशांमधून कच्चा माल कवडी मोलाने आणून, त्याचे प्न्नया मालात रूपांतर करून तो चढ्या भावाने पुन्हा त्याच देशांना विकून पैसा मिळवला. वसाहतीतील देशांचे अपरंपार शोषण केले. चीनने आधुनिक विज्ञानाच्या किमयेने  देशातील स्वस्त आणि मुबलक हात वापरून अक्षरश... हजारो नावीन्यपूर्ण वस्तू जन्माला घालून जगाच्या बाजारपेठा या स्वस्त मालाने काबीज केल्या. हा आर्थिक चमत्कार चीनने गेली 38 वर्षे प्रचंड नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून केला आहे. हे करीत असताना चीनने आपली लष्करी ताकद काही प्रमाणात अमेरिकेच्याही पुढे नेऊन ठेवली आहे. रशिया चीनबरोबर आहे.
पाकिस्तानला प्रचंड मदत करणाऱ्या अमेरिकेशी अतिरेकी  जवळीककरून आपण रशियाशी असणारी जुनी मैत्री संपवली. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या पारंपरिक शत्रू यादीत कम्युनिस्ट तिसरे आहेत. चीन कम्युनिस्ट देश आहे आणि रशियालाही तसाच इतिहास आहे. त्यांचा लोकशाही आणि स्वातंत्र्यावर विश्वास नाही. अमेरिका लोकशाही आणि स्वातंत्र्य यांचा उद्घोष करणारा पण तद्दन भांडवलशाही आणि साम्राज्यवादी देश आहे. जगातील गैरसोयीची अनेक लोकशाही सरकारेही अमेरिकेने उलथवून पाडलेली आहेत. मोदींचे परममित्र ट्रम्प हे रशियाचे पुतीन यांची मदत घेऊन सत्तेवर आलेले आहेत. हे सर्व लक्षात घेता चीनशी थेट युद्ध पुकारणे, आणि तेही कोरोनाच्या महासाथीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडलेले असताना, न परवडणारे आहे. त्यात गेली सहा वर्षे देश मंदीर, मस्जीद, तिहेरी तलाक, गाय, झुंडशाही, देशद्रोह, काश्मिरींना धडा शिकवणे, सी.ए.ए. अशा भलत्याच गोष्टींमध्ये बेभान होता. शिक्षण, आरोग्य, रोजगार, मूलभूत सुविधा, विज्ञान, संशोधन, कला, साहित्य या गोष्टी दुय्यम बनल्या होत्या. देशाच्या सार्वजनिक मालमत्ता विकायला काढल्या जात होत्या. मूठभर उद्योगपती देशाचे मालक बनत होते. चीनने वेळ साधून गलवान घडवले आणि इतकी हवा निघून गेली की युद्ध भूमिपासून 250 कि.मीवर जाऊन शत्रूचे नाव न घेता डरकाळी फोडावी लागली. चीनशी लढायचे असेल तर प्रथम देशाची आर्थिक आणि सामाजिक उभारणी करावी लागेल. हा देश आर्थिकदृष्टया उभा करायचा असेल तर तो आसेतूहिमालय एक करावा लागेल. देश एक करायचा असेल तर त्यासाठी प्रथम जातीयवाद आणि जमातवाद यांना तिलांजली द्यावी लागेल. नाहीतर ‘मॅप’ची लढाई ‘अ‍ॅप’नेच खेळावी लागेल आणि या लढाईतील विजयाच्या रोमांच उभे करणाऱ्या कहाण्या ‘व्हॉटसअ‍ॅपवर वाचाव्या लागतील! 

डॉ.अभिजित वैद्य
puja.monthly@gmail.com
(साभार : पुरोगामी गर्जना)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget