Halloween Costume ideas 2015

कोरोनाचा दंश हवेतही पसरतोय

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. आजपर्यंत जगभरात 1 कोटी 19 लाखांत त्याने प्रवेश केला आहे. 5 लाख 45 हजार नागरिकांचा जीव घेतला आहे तर 68 लाख 15 हजारांवर नागरिकांनी स्वतःची सुटका करून घेतली आहे. अशातच या आठवड्यात एक नवीन बातमी धडकली की कोरोनाचे कण अनेक तास हवेत राहू शकतात. हवेतूनही कोरोना व्हायरसा प्रसार होउ शकतो. त्यामुळे प्रत्येकजण नाकातोंडाला मास्क घट्ट बांधण्याकडे लक्ष देत आहे. मात्र मास्कचा काळाबाजारही वाढत आहे. दुप्पट, तीप्पट कीमती वाढवून मास्कची विक्री केली जात आहे. सॅनिटायझरमध्येही अनेक प्रकार आले असून, शुद्ध कोणते अन अशुद्ध कोणते हे ओळखणेही कठीण झाले आहे. खाजगी डॉक्टर्सही कोरोनाचे पेशंट घेण्यात टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेही भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच धडधाकटांना लक्षणे नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येत असल्याने तपासणीवर शंका उपस्थित केली जात आहे. सरकारने यावर खरी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे.
    देशभरात आजपर्यंत जवळपास 7 लाख 19 हजार 665 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील 20 हजार 160  जणांचा मृत्यू झाला तर 4 लाख 40 हजार बरे झाले आहेत. कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र ते खरेच असल्याचे आता जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. याबाबत अगोदरच 32 देशांतील 239 संशोधकांनी कोरोना व्हायरसचे सुक्ष्म कण हवेत अनेक तास राहू शकतात असा दावा केला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. डब्लूएचओच्या टेक्निकल लीड डॉ. मारिया वान केरखोव यांनी म्हटले की, आम्ही एअरबोर्न ट्रांसमिशन आणि एअरोसोल ट्रांसमिशनला अमान्य करत नाही. डब्ल्यूएचओने याआधी म्हटले होते की, व्हायरस नाक, तोंडा आणि अनेक पृष्ठ भागांना हात लावल्याने पसरतो.
जिनेव्हामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओच्या अधिकारी बेनेडेटा अल्लेग्रांजी यांनी म्हटले की, कोरोना हवेतून पसरण्याचे पुरावे मिळाले आहेत, पण अंतिम निर्णयावर पोहचण्यासाठी आम्हाला अजून थोडा वेळ लागेल. त्यांनी पुढे म्हटले की, सार्वजनिक ठिकाणांवर हवेतून व्हायरस पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसांपूर्वीच 32 देशातील 239 संशोधकांनी हा व्हायरस हवेतून पसरतो, असा दावा केला होता. त्यांनी डब्ल्यूएचओ आणि सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (सीडीसी) ला पत्र लिहून यावर विचार करण्याचा आणि दिशा-निर्देशांमध्ये बदल करण्यास सांगितले होते. या संशोधकांनी आपल्या रिसर्चच्या हवाल्याने सांगितले होते की, नोव्हल कोरोना व्हायरस म्हणजेच,सार्स कोव्हि-2   चे सुक्ष्म कण हवेत अनेक तास राहू शकतात आणि यादरम्यान कोणी संपर्कात आल्यास त्यांना संक्रमित करतात.
    महाराष्ट्रात बुधवारपर्यंत 2 लाख 17 हजार 121 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यातील 9 हजार 250 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा रेशोही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील 58 विभागात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

रोगापेक्षा इलाज भयंकर...
कोरोना आजारात बरे होणार्‍यांची संख्या अधिक आहे. मृत्यूचे प्रमाण कमी आहे. मात्र घरातील एखादाही पॉझिटिव्ह आढळून आला की, सगळ्या कुटुंबाला क्वारंटाईन व्हावे लागते. कुटुंबातील अनेकांना याची लागणही नसते. मात्र सगळ्यांचे स्वॅब घेतले जातात. कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाते. त्यामुळे अनेकांना मानसिक धक्का बसतो. यातून ते लवकर सावरत नाहीत. शासनाने या पद्धतीवर विचार करावा, अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.
मास्क अन् सॅनिटायझरचा काळा बाजार
    एखाद्या वाईट परिस्थितीतून मानवी समाज बोध घेईल, अशी अपेक्षा असते. एखाद्याला शिक्षा झाल्यानंतर व तो तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्यात परिवर्तनाची अपेक्षा असते. मात्र तसे होताना दिसत नाही. आज कोरोना महामारीचा विळखा आहे. गरीबापासून श्रीमंतांपर्यंत सगळेच हवालदिल आहेत. अशा परिस्थितीतही काही मानवतेचे शत्रू मास्क विक्रीचा काळाबाजार करताना समोर आले आहेत. त्यात शासकीय यंत्रणाची मिलिभगत असल्याने ही कामे जोमात सुरू आहेत, असे बोलले जात आहे. नुकतेच लोकमतने स्टींग ऑपरेशन केले. त्यात प्रत्येक जिल्ह्यातील मास्क खरेदीत तफावत आढळली आहे. ज्या मास्कची किंमत 30 रूपये होती ते आता 300 रूपयांत घेतल्याचे दाखविले आहे. शासन दरबारी अशी परिस्थिती आहे तर खुल्या बाजारात काय परिस्थिती असेल. एन-95 च्या नावाने डुप्लीकेट मास्क बाजारात आले आहेत. सॅनिटायझरचेही तसेच आहे. निकृष्ट सॅनिटायझरच्या वापरामुळे अनेकांच्या हातांना इजा झालेली आहे. त्यामुळे येणारा काळ किती भयानक आहे, याचे वास्तव समोर येत आहे.

खाजगी डॉक्टरांचे नको रे...
    सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून अनेक खाजगी डॉक्टर्स आपल्या रूग्णालयात रूग्ण घेत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शासन कितीही ओरडून सांगत असले तरी डॉक्टर्स मानायला तयार नाहीत. एका पत्रकाराने स्वतःचा अनुभव कथन केला. ते म्हणाले, माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला असतानाही काही खाजगी डॉक्टर्स मला हॉस्पिटलमध्ये घेण्यास टाळाटाळ करू लागले होते. जेव्हा आमच्यासारख्या वरिष्ठांना डॉक्टर्स जुमानत नाहीत तेव्हा सामान्य नागरिकांसोबत त्यांचा व्यवहार कसा असेल, याचा अंदाज येतो. शासनाने डॉक्टर्सनाही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सुविधा देऊनही जर डॉक्टर्स मानत नसतील तर त्यांचे लायसन्स रद्द करावे, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget