Halloween Costume ideas 2015

चीनची घुसखोरी भ्रम आणि वास्तव

indo china
कोविड - 19 च्या पार्श्वभूमीवर  सगळे जग एकसंघ होऊन या महामारीशी भिडत असतांना 15 जूनच्या रात्री भारत-चीन सीमेच्या गलवान क्षेत्रामध्ये दोन्ही देशातील सैन्यांमध्ये चकमक होऊन भारताचे 20 तर चीनचे 47 जवान ठार झाल्याची बातमी आली. त्यामुळे देशाचे लक्ष कोविड-19 वरून विचलित होऊन या विवादावर केंद्रीत झाले.
15 जूनच्या रात्री घडलेली घटना ही जाणकारांसाठी अप्रत्याशित नव्हती. कारण मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच अनेक सुत्रांकडून ही माहिती येत होती की, चीन हा गलवान घाटीमध्ये एलएसीच्या अलिकडे येत आहे, नव्हे बांधकाम करून फौजफाटा वाढवत आहे. आजमितीला तर अशी माहिती आहे की त्याने या भागात हेलीपॅड बांधून दोन डिव्हीजन सैन्य तैनात केलेले आहे. सैनिकांची ये-जा करणारी अनेक वाहने, फायटर प्लेन, हेलिकॉप्टर्स, बंकर्स इत्यादी तयार आहेत.
दोन्ही बाजूच्या सैनिक अधिकाऱ्यांच्या बोलण्याच्या अनेक फेऱ्या होऊनही चीन ऐकत नसून त्याचा परत जाण्याचा इरादा नसल्याच्या निष्कर्षापर्यंत अनेक पूर्व लष्करी अधिकारी येवून ठेपले आहेत. अशात पंतप्रधानांचे हे म्हणणे की, ’कोणी आमच्या जमीनीवर आलेले नाही आणि आमच्या कोणत्याच पोस्टवर कब्जा केलेला नाही’ हे तत्वतः जरी खरे असले तरी वास्तविकताः थोडीशी वेगळी आहे.
गलवान घाटी लगतचा काही भाग आणि त्या लगतचा प्रदेश दोन्ही  देशांमधील बफर झोन म्हणजे नो मॅन्स लँड म्हणून ओळखला जात होता. त्या भागामध्ये दोन्ही देशाचे सैनिक गस्त घालत होते. मात्र आता त्यावर चीनने बळजबरी ताबा मिळविल्याचे बहुतेक तज्ज्ञांचे मत आहे. तत्वतः जरी भारताच्या एक इंच भूमीवर सुद्धा चीनने कब्जा केला नसला, हे बरोबर असले तरी बफर झोनमधील जमीन त्याने बळकावली आहे याकडे डोळेझाक करून कशी चालणार?
20 जवानांच्या शहादतीनंतर देशभरात उमटलेली तीव्र प्रतिक्रिया पाहता केंद्र सरकारने 59 चीनी अ‍ॅपवर बंदी आणून तसेच चीनी कंपन्यांना देय असलेले काही ठेके रद्द करून एक संकेत जरूर दिलेला आहे परंतु यावर कोणाचेही समाधान झालेले नाही.

भारत आणि चीन

चीन आणि अमेरिका हे असे देश आहेत की त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवता येत नाही. चीनने नेहरूंच्या विश्वासालाही सुरूंग लावला होता मोदींचाही चीनवरील विश्वास किती फोल होता हे अलिकडच्या चीनी घुसखोरीमुळे उघडकीस आलेले आहे. चीन आपल्या सैन्य ताकदीपेक्षा व्यापारी ताकदीवर जास्त घमेंड करतो. त्याचा जागतिक व्यापार जगातील कुठल्याही देशापेक्षा जास्त आहे. जगातील कुठलाच असा देश शिल्लक नाही ज्याच्या बाजारपेठेत चीनी माल विकल्या जात नाही. आपल्या विशेष अशा भौगोलिक परिस्थिती, प्रचंड लोकसंख्या आणि हुकूमशाही वृत्तीमुळे प्रत्येक वस्तुचे उत्पादन हिमालयीन स्तरावर करून ते जगातील प्रत्येक बाजारपेठेत पाठविण्याच्या चीनच्या यशस्वी प्रयत्नाला सुरवातीला जगाने दाद दिली नाही. कारण चीनी उत्पादन जरी स्वस्त असायचे तरी त्यांची गुणवत्ता अतिशय सुमार असायची. मात्र गेल्या काही वर्षामध्ये चीनने आपल्या उत्पादनाचा दर्जा इतका उंचावत नेला की, आजमितीला जगात त्या दर्जाचे उत्पादन त्या किमतीमध्ये करणे भारतालाच काय जगातल्या कुठल्याच देशाला शक्य नाही; त्यात अमेरिकाही आली.
चीनच्या आर्थिक क्षमतेची माहिती देतांना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले म्हणतात की, ’’ चीनने 1978-79 साली खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर 80 कोटी लोकांना दारिद्रय रेषेच्या वर आणले. 1980 साली चीनचा जीडीपी 150 बिलियन डॉलरचा होता तो 2019-20 साली 14.14 ट्रिलियन डॉलर एवढा झाला. म्हणजे त्यात 94 पटीने वाढ झाली. 1980 मध्ये चीनची जागतिक निर्यात 40 बिलियन डॉलरपेक्षाही कमी होती, ती आता 4.6 ट्रिलियन डॉलर एवढी आहे. म्हणजे चीनने यात 115 पट वाढ केलेली आहे. 1980 मध्ये जागतिक व्यापारामध्ये चीनचा वाटा अवघा 2 टक्के होता, तो 2020 मध्ये 18 टक्के एवढा झाला. म्हणजे यातही चीनने 9 पटीने वाढ नोंदविली. भारताच्या तुलनेत चीनचा जीडीपी 4.5 ते 5 पटीने जास्त आहे. चीन 16 आठवड्यामध्ये ग्रीसच्या अर्थव्यवस्थेएवढी भर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये घालतो. 25 आठवड्यात 1 इजराईल उभा करतो. 2 आठवड्यात रोम शहर उभे करतो. 2011 ते 13 या दोन वर्षामध्ये चीनने जे सिमेंट उत्पादित केले व वापरले ते अमेरिकेने संपूर्ण विसाव्या शतकात उत्पादित केले किंवा वापरले नाही. 2011 मध्ये चीनने 30 मजली इमारत 15 दिवसात पूर्ण केली तर 19 दिवसात 57 मजली इमारत बांधून पूर्ण केली. अवघ्या काही दिवसात कोविडसाठी एक अख्खा हॉस्पिटल चीनने बांधल्याचे अवघ्या जगाने पाहिले आहे. गेल्या 15 वर्षात चीनने युरोपमधील सर्व घरांपेक्षा जास्त घरे बांधली. 1996 ते 2016 या काळात चीनने 26 लाख माईल्स रस्ते बांधले. त्यापैकी 70 हजार माईल्स हे महामार्ग होते. चीनच्या 95 टक्के गावापर्यंत पक्के रस्ते पोहोचलेले आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी 12 हजार माईल्स नव्या रेल्वेलाईन्स टाकल्या. चीनमधील रेल्वेचा धावण्याचा वेग तासाला 180 माईल्स एवढा आहे. चीनच्या अजस्त्र रेल्वेचा अंदाज यावरून यावा की, जगातील सर्व देशात अंथरलेले रेल्वे रूळ जरी एकत्र केले तरी चीनमध्ये अंथरलेले रेल्वे रूळ त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. चीनने अनेक विमानतळ बांधली. चीनमध्ये 24 तास वीज आणि स्वच्छ पाणी उपलब्ध असते. शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात चीनने जगातील कुठल्याही देशापेक्षा जास्त प्रगती केलेली आहे.’’
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची झालेली गोची आणि चीनने त्यावर मिळविलेला विजय यावरून महासत्तेचा लंबक अमेरिकेकडून चीनकडे झुकत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

चीनशी मुकाबला कसा करावा लागेल?
केवळ 59 चीनी अ‍ॅप बंद करून चालणार नाही तर  चीनशी होणाऱ्या सर्व व्यापाराचा नव्याने आढावा घ्यावा लागणार आहे. चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंची वर्गवारी तीन गटामध्ये करावी लागणार आहे. ’अ’ वर्गामध्ये अशा वस्तू ज्या चीनकडून आयात केल्याशिवाय पर्याय नाही. उदा. औषधनिर्मिती उद्योगासाठी लागणारे मुलभूत घटक, ’ब’-वर्गामध्ये असा माल ज्यावर आपले देशी उद्योग मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. ’क’-वर्गामध्ये अशा वस्तू ज्या चैनीच्या किंवा मनोरंजनाच्या आहेत. पहिल्या झटक्यामध्ये या ’क’ वर्गातील वस्तूंची आयात  पूर्णपणे बंद करावी व त्यानंतर ’ब’ आणि ‘क’ वर्गातील वस्तूंच्या उत्पादनामध्ये आपले उद्योग आत्मनिर्भर होतील, याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्यासाठी मागेपुढे पहाण्यात येऊ नये.
याशिवाय, आपल्या शेजारी राष्ट्रांना चीनने ज्या पद्धतीशीरपणे खतपाणी घालून आपल्याविरूद्ध उभे केले आहे तीच पद्धत अवलंबून हाँगकाँग आणि तैवान यांना तयार करावे लागेल. शिवाय, जपान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्स इत्यादी देशांशी अतिशय विश्वासाचे संबंध स्थापित करावे लागतील. कारण हे देशही चीनच्या दक्षीण चीनी समुद्रातील आगळीकीस वैतागलेले आहेत. हाँगकाँगमधील नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा अवघ्या दोन दिवसांपूर्वी पास केलेला आहे. त्यामुळे हाँगकाँगच्या जनतेमध्ये चीनबद्दल प्रचंड असंतोष आहे. त्या असंतोषाला कशी हवा देता येईल, याचे प्रयत्न झाले पाहिजेत. शेवटचा मुद्दा असा की, चीनने अब्जो रूपयांची गुंतवणूक भारतात केलेली आहे. एक संपूर्ण युद्ध झाले तर ती गुंतवणूक मातीत जाईल, हे सुद्धा चीन जाणून आहे. म्हणून चीन फक्त धमक्या देत आहे आणि त्याने थोडेसे आक्रमक धोरण स्वीकारलेले आहे. एक संपूर्ण युद्ध लढण्याची त्याचीही तयारी नाही, हे एकंदरित त्याच्या वर्तणुकीवरून लक्षात येत आहे. चीनने युद्ध सुरू केले तर भारत एकटा लढणार नाही, तर त्या सोबत अनेक देश जे की, चीनचा वचपा काढण्यासाठी टपून बसलेले आहेत, ते भारताची साथ देण्याची संधी सोडणार नाहीत, याचीही चीनला पुरेशी कल्पना आहे. म्हणून ड्रॅगनच्या या गिधाड धमक्यांना भीक न घालता केंद्र सरकारने खंबीरपणे पावले उचलणे गरजेचे आहे. केंद्र सरकार जरी वरवर शांत वाटत असले तरी आतून ठोस अशी रणनीति आखली जात असावी, याबद्दल आपण सर्वांनी विश्वास ठेवायला हवा. चीनने केलेल्या या आगळीकीच्या पार्श्वभूमीवर सर्व देश एकजूट आहे, ही समाधानाची बाब आहे. आपण या परीक्षेतही यशस्वी होऊ ही अल्लाहकडे प्रार्थना. जय हिंद ! - एम.आय. शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget