Halloween Costume ideas 2015

देशाची बदलती परिस्थिती व मुस्लिमांची भूमिका - जमाअत ए इस्लामी हिंदच्या परिसंवादाला उदंड प्रतिसाद


मुंब्रा - 

देशात सध्या विविध समाजात अविश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे,  सामाजिक सौहार्द संपुष्टात आणण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत, मात्र आपल्याला या परिस्थितीत  देशातील सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, त्यासाठी मुस्लिम समाजातील नागरिकांनी आव्हानांवर मात करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे,  असे आवाहन माजी खासदार मौलाना ओबेदुल्लाह खान आझमी यांनी केले.

'आम्ही कुठे चाललो आहोत' या एसआयओच्या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत 'देशाची बदलती परिस्थिती व मुस्लिमांची भूमिका' यावर १५ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंब्रा येथे आयोजित परिसंवादात ते बोलत होते.  या परिसंवादाला सामाजिक कार्यकर्ते, महिला सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आझमी म्हणाले,  समाजाला वाईट प्रवृत्तीपासून वाचवण्याची जबाबदारी देखील आपली आहे. इस्लामच्या खऱ्या शिकवणीप्रमाणे मुस्लिमांनी आचरण करण्याची गरज आहे. गट तट विसरुन एकत्र राहण्याची गरज आहे. परिस्थितीला शरण जाण्याऐवजी इतर समाजासोबत बंधुत्व वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. देशातील वाढता तणाव कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी दुसरा कोणी प्रयत्न करणार नाही तर तुम्हाला स्वत:ला प्रयत्न करावे लागेल त्यामुळे रडगाणे गाण्याऐवजी प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. इस्लामच्या सर्वसमावेशकतेवर भर देण्याची गरज असून सर्व समाजांसोबत सलोख्याचे संबंध वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा असा संदेश त्यांनी दिला.  

यावेळी माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान, जमात ए इस्लामी हिंद चे साहाय्यक राष्ट्रीय सचिव मोहम्मद सलमान अहमद, एसआयओ चे दक्षिण महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष एहतेशाम हामी खान यांनी आपले विचार मांडले. एसआयओ मुंब्रा अध्यक्ष उमेर खान यांनी आभार प्रदर्शन केले. 

अब्दुल रहमान म्हणाले,  कोणत्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार सहन करणे हा मोठा गुन्हा आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार सहन न करता त्याविरोधात संविधानिक मार्गाने दाद मागायला हवी. लोकप्रतिनिधी,  एनजीओ, सरकारी संस्था,  प्रशासनाची मदत घेऊन अन्यायाविरोधात दाद मागणे गरजेचे आहे. जो समाज आपल्याविरोधातील अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाही तो समाज इतरांना कशी मदत करेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ आपल्या समाजापुरता विचार न करता ज्यांच्यावर अन्याय होईल ते कोणत्याही समाजाचे असले तरी त्यांच्या मदतीला धावून जावे असे आवाहन त्यांनी केले. 

सलमान अहमद यांनी परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. इस्लाम व मुस्लिमांबाबतचे गैरसमजदूर करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता विशद केली. मुस्लिम समाजाने उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या, प्रशासनाच्या मुख्य प्रवाहात येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget