(४४) पूर्वीच्या पैगंबरांनादेखील आम्ही उज्ज्वल संकेत व ग्रंथ देऊन पाठविले होते आणि आता हे पुन:स्मरण तुमच्यावर अवतरले आहे की जेणेकरून तुम्ही लोकांच्यासमोर त्या शिकवणींचे स्पष्टीकरण करीत राहावे जे त्यांच्यासाठी अवतरले गेले आहे,१० आणि जेणेकरून लोक (स्वत:देखील) गांभिर्याने विचार करतील. (४५) मग ते लोक जे (पैगंबराच्या आवाहनाविरूद्ध) वाईटात वाईट चाली खेळत आहेत यापासून अगदीच निर्भय झाले आहेत काय की अल्लाहने त्यांना जमिनीत खचवावे अथवा असल्या दिशेने प्रकोप आणावा जिकडून तो येण्याचे त्यांच्या कल्पनेतही नसेल.
(४६-४७) अथवा अकस्मात चालता फिरता त्यांना धरावे, किंवा अशा स्थितीत त्यांना पकडावे जेव्हा त्यांना स्वत:च येणार्या संकटाची धास्ती लागली असेल व त्यापासून वाचण्याच्या काळजीत ते दक्ष असतील? अल्लाह हवे ते करतो हे लोक त्याला जेरीस आणण्याची शक्ती बाळगत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता मोठा मायाळू आणि दयावान आहे.
(४८) आणि काय हे लोक अल्लाहने निर्माण केलेल्या कोणत्याच वस्तूला पाहत नाहीत की तिची सावली कशा प्रकारे अल्लाहच्या ठायी नतमस्तक होत उजव्या व डाव्या बाजूला पडते?११ सर्वचे सर्व अशा प्रकारे लाचारी व्यक्त करीत आहेत.
९) म्हणजे ज्या लोकांना ईशग्रंथाचे ज्ञान आहे त्यांना विचारा की पैगंबर मानवच असत अथवा अन्य काही असत?
१०) म्हणजे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ग्रंथ अशासाठी अवतरला गेला होता की ते आपल्या उक्ती व कृतीने त्या ग्रंथाच्या शिकवणी व आज्ञांचे स्पष्टीकरण आणि विश्लेषण करतात. यावरून पैगंबर (स.) यांची पद्धत कुरआनचे सनदशीर अधिकृत स्पष्टीकरण आहे ही गोष्ट आपोआपच सिद्ध होते.
११) म्हणजे सर्व आकारात्मक वस्तूंच्या सावल्या या गोष्टीचे प्रतीक आहे की पर्वत असोत की वृक्ष, पशू असोत की मानव, सर्वचे सर्व एका सर्वव्यापी कायद्याच्या पकडीत जखडले आहेत. सर्वांच्या कपाळावर बंदगीचा (भक्तीचा) ठसा लागलेला आहे. ईशत्वात कोणाचा यत्किंचितदेखील भाग नाही. सावली पडणे हे एखाद्या वस्तूचे भौतिक वस्तू असण्याचे उघड चिन्ह आहे, तर भौतिक असणे हे दास व निर्मिती असण्याचे स्पष्ट प्रमाण आहे.
Post a Comment