कालपरवापर्यंत भारतातील लोकांची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत होती. मात्र आता ती परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला आहे. हे परिवर्तन करण्यात व प्रगती घडवून आणण्यात ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली , त्यात स्वामीनाथन यांनी प्रमुख भुमिका बजावली आहे.शेतीक्षेत्रात हरितक्रांती घडवून आणणाऱ्यांमध्ये स्वामीनाथन यांच्या नावाचा उल्लेख अग्रक्रमाने व आदराने केला. नुकतेच त्यांचे दुःखद निधन झाले.
स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोठा अहवाल दिला होता. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली होती. ही शिफारस अंमलात आणण्याची आश्वासने प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात दिली. त्यावर निवडणुका जिंकल्या. सत्तेवर आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडले. सर्वोच्च न्यायालयात स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करता येणार नाहीत, असा अहवाल दिला. शेतकऱ्यांच्या जीवनात सुगीचे दिवस आणण्यासाठी सातत्याने झ़टणाऱ्यामध्ये स्वामीनाथन होते. त्यांची ओळख जागतिक कीर्तीचे महान कृषी शास्त्रज्ञ अशी होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आणि लोकांना सशक्त करण्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे हा होय, त्यासाठी उच्च प्रतीचे आणि भरघोस पीक कसे घेता येईल, तसेच त्यामुळे देशातील शेतकरी समृद्ध कसा होईल, याचा सतत ध्यास घेऊन स्वामीनाथन यांनी महत्वाचे संशोधन केले होते. भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटाच्या काळात कायम शेती क्षेत्राने आधार दिला;हे अलिकडच्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या काळात ही पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.परंतु संकट काळातील तारणहार असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना सोयिस्करपणे विसर पडला आहे, हे या देशाचे दुर्दैव आहे. स्वामीनाथन एकदा म्हणाले होते, की ‘अशक्य’ हा शब्द प्रामुख्याने आपल्या मनात असतो आणि आवश्यक इच्छाशक्ती आणि परिश्रम केल्यास महान कार्ये ही शक्य होतात. "अशक्य ते शक्य करिता सायास," या संत तुकोक्तीप्रमाणे त्यांनी ‘अशक्य’ काहीही नसते. इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर अशक्य ते शक्य करता येते.असे त्यांनी नेहमीच प्रतिपादन केले.
स्वामीनाथन यांनी गव्हाचे उत्कृष्ट उत्पादन देणारे वाण विकसित केले. त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळाली. कृषीप्रधान देशात शतकानुशतके पिकांच्या वाढीसाठी औजारे आणि बियाण्यांमध्ये सुधारणा झाली नव्हती. स्वामिनाथन हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी गव्हाचे उत्कृष्ट वाण ओळखले आणि शेतकऱ्यांना त्याची जाणीव करून दिली. त्यांना 'शेतकऱ्यांचा मसिहा' म्हटले जाते. १९६० च्या दशकात भारत मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता. त्या वेळी स्वामीनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांसोबत गव्हाचे एचवायव्ही बियाणे विकसित केले. १९४३ मधील बंगालचा दुष्काळ आणि देशातील अन्नटंचाई अनुभवल्यानंतर स्वामीनाथन यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्यासाठी आजीवन काम करण्याचा निर्णय घेतला. बटाटा, तांदूळ, गहू, ताग आदी बाबतीतही त्यांचे संशोधन शेतकऱ्यांला उच्चांकी उत्पादन देणारे ठरले आहे. त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून काम केले. १९७९ मध्ये ते कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव होते. त्या वेळी आण्णासाहेब शिंदे हे कृषिमंत्री होते. १९८८ मध्ये स्वामिनाथन हे निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्ष झाले. १९९९ मध्ये टाईम मासिकाने त्यांचा विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीत समावेश केला. शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा होण्यासाठी उच्च दर्जाच्या वाणांसह शेती करणे किती गरजेचे व किफायतशीर आहे, हे त्यांनी पटवून दिले. त्यांनी भारतातील गरीब शेतकऱ्यांच्या शेतात झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. हरितक्रांती प्रकल्पाद्वारे त्यांनी भारतातील कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणला आणि संपूर्ण देशात त्याचा विस्तार केला. त्यांच्या योगदानामुळे त्यांनी अवघ्या २५ वर्षात भारतीय शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवले. भारतीय कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल स्वामिनाथन यांना अनेकदा सन्मान करुन गौरविण्यात आले. त्यांच्या अपार कष्ट व चिकाटीने त्यांनी भारतीय शेतीला नवी उज्वल दिशा दिली.
स्वामिनाथन यांनी त्यांना मिळालेल्या निधीचा चांगला उपयोग केला. १९९० मध्ये चेन्नई येथे ‘स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना केली. त्यांनी कृषी संशोधन क्षेत्रात नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या प्रेरणेने मोठे प्रकल्प पुढे नेले. त्यांच्या समर्पित योगदानामुळे त्यांनी भारतीय कृषी क्षेत्रात विकासाचे नवीन मापदंड प्रस्थापित केले आणि देशाची अन्न सुरक्षा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धोरणामुळे भारताने अन्नधान्याच्या तीव्र टंचाईतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली. तांदूळ आणि गव्हाच्या चांगले उत्पादन देणाऱ्या वाणांच्या शोधात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. स्वामीनाथन यांच्या सांगण्यावरून भारत सरकारने बोरलॉग यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. गहू पिकवणाऱ्या काही राज्यांना भेटी दिल्यानंतर त्यांनी मेक्सिकन जातींचे शंभर किलो बियाणे भारताला दिले. काही चाचणीनंतर या बियांची प्रथम दिल्लीत पेरणी करण्यात आली आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. पूर्वीच्या हेक्टरी एक ते दीड टनाऐवजी आता हेक्टरी चार ते साडेचार टन गहू उत्पादन घ्यायला सुरुवात झाली आहे. भारतात १९६५-६६ आणि १९६६-६७ अशी सलग दोन वर्षे दुष्काळ पडला होता. धान्याचे उत्पादन घटले आणि भारताला अमेरिकेच्या आयातीवर अवलंबून रहावे लागले. या अस्मानी संकट काळात स्वामीनाथन यांचे प्रयत्न भारतासाठी उपयुक्त ठरले आणि त्यांच्या देखरेखीखाली उच्च उत्पन्न देणाऱ्या अन्नधान्याच्या जाती व वाणांचे संशोधन झाले. त्यामुळे भारतातील धान्याचे उत्पादन वाढले. भारताच्या हरितक्रांतीच्या मागे इतरही लोक होते; पण तज्ज्ञांच्या मते स्वामीनाथन यांची भूमिका केंद्रस्थानी होती. देशाच्या इतिहासातील संकटाच्या काळात स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील कार्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले आणि देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली.
सन २००४ मध्ये, भारतातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या, आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे ते खूप व्याकुळ झाले, कृषी क्षेत्र सुधारण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष स्वामीनाथन होते. या आयोगाने किमान आधारभूत किंमतीचा दिलेला फॉर्म्युला 'स्वामिनाथन फॉर्म्युला' या नावाने प्रसिद्ध आहे. पिकावरील किमान हमी भाव त्याच्या पिकाच्या सरासरी किमतीपेक्षा किमान ५० टक्के जास्त असावा असे त्यांनी सुचवले होते. शेतकरी हिताच्या दृष्टीने हे क्रांतिकारी पाऊल निश्चितच मोलाचे ठरले आहे; परंतु आजपर्यंत सरकार नावाच्या व्यवस्थेने या सूत्राची अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही. १९८७ मध्ये त्यांना कृषी क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मानले जाणारे पहिले जागतिक अन्न पारितोषिक देण्यात आले.
शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक वसंत फुलवणारा हा 'शेतकऱ्यांचा मसिहा' गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी काळाच्या पडद्याआड गेला. शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी यावी, व याकरिता त्यांच्या उत्पादित मालाला सरकारने हमीभाव द्यावा, हीच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल.
- डॉ. सुनिलकुमार सरनाईक
लेखक आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून सा.करवीर काशी चे संपादक आहेत.
Post a Comment