(६३) अल्लाहची शपथ, हे पैगंबर (स.)! तुमच्या अगोदरदेखील अनेक देशांमध्ये आम्ही पैगंबर पाठविले आहेत (आणि पूर्वीसुद्धा असेच होत राहिले आहे की) सैतानाने त्यांची वाईट कृत्ये त्यांना सुशोभित करून दाखविली (आणि पैगंबराचे म्हणणे त्यांनी मानले नाही.) तोच सैतान आज या लोकांचादेखील वाली बनला आहे आणि हे यातनादायी शिक्षेस पात्र बनत आहेत.
(६४) आम्ही हा ग्रंथ तुम्हावर यासाठी अवतरला आहे की तुम्ही त्या मतभेदांची वास्तवता यांच्यावर स्पष्ट करावी ज्यामध्ये हे गुरफटले आहेत. हा ग्रंथ मार्गदर्शन व कृपा बनून उतरला आहे त्या लोकांसाठी जे याला मानतात.
(६५) (तुम्ही प्रत्येक पावसाळ्यात पाहता की) अल्लाहने आकाशांतून पावसाचा वर्षाव केला आणि अकस्मात मृत पडलेल्या जमिनीत त्याच्यामुळे प्राण ओतले१७ निश्चितच याच्यात एक निशाणी आहे ऐकणार्यांसाठी.
(६६) आणि तुमच्यासाठी प्राणीमात्रांतदेखील एक बोध आहे. त्यांच्या उदरातून शेण व रक्तादरम्यानचा एक पदार्थ आम्ही तुम्हाला पाजतो, निखालस दूध, जे पिणाऱ्यांसाठी अतिशय आल्हाददायक आहे.
१७) म्हणजे हे दृश्य प्रत्येक वर्षी तुमच्या डोळ्यांसमोर येत असते की जमीन पूर्णपणे निर्जीव, सपाट मैदान झालेली आहे, चैतन्याची कोणतीच लक्षणे तिच्यात अस्तित्वात नाहीत. ना गवत ना रोपटी, ना वेली ना वनस्पती, ना फुले ना पाकळ्या, ना कोणत्याही प्रकारचे जिवाणू. अशातच पावसाळा आला व एक दोनदा तुषार पडले न पडले तोच त्याच जमिनीतून चैतन्याचे झरे उफाळू लागले. जमिनीच्या थरात दडलेली असंख्य मुळे अकस्मात जीवंत झाली आणि अगोदरच्या पावसाळ्यानंतर ज्या मृत झाल्या होत्या त्याच वनस्पती पुन्हा प्रत्येकातून उत्पन्न झाल्या. उन्हाळ्यात ज्यांचा मागमूसदेखील राहिला नव्हता असे अगणित जिवाणू अकस्मातपणे पुन्हा त्याच थाटाने प्रकट झाले जसे मागच्या पावसाळ्यात दिसत होते. हे सर्व काही वरचेवर तुम्ही आपल्या जीवनात पाहत असता. तरीसुद्धा पैगंबरांच्या मुखाने हे ऐकून की अल्लाह सर्व मानवांना दुसर्यांदा पुन्हा जीवंत करील, तुम्हाला आश्चर्य वाटत असते.
Post a Comment