इंडियन सायन्स काँग्रेस ही संस्था 1910 सायमन सेन आणि पी. मॅकमान या दोन ब्रिटिश प्राध्यापक विचारवंतांनी कलकत्ता येथे स्थापन केली जेणेकरून भारतीय जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी. त्यांनी सर्वप्रथम कोलकत्ता जे त्यावेळच्या ब्रिटिश राजवटीचे मुख्य केंद्र होतं, येथील एशियाटिक सोसायटीतल्या दालनामध्ये पहिलें अधिवेशन भरवलं. आणि या पहिल्या वहिल्या अधिवेशनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. शंभरहुन अधिक विज्ञान अभ्यासक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे विचारवंत त्याला उपस्थित राहिले. यानंतर दरवर्षी ही परिषद भरत गेली आणि या परिषदेला लवकरच असे महत्त्व प्राप्त झाले की अनेक देशी परदेशी शास्त्रज्ञ आणि विचारवंत यामध्ये सामील व्हायला लागले. त्यानंतर १९४७ सालच्या जानेवारीमध्ये म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अगदीच आधी, जानेवारीमध्ये ही परिषद भरवली गेली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. नंतर ही परंपराच बनली की ,जो कोणी प्रधानमंत्री असेल त्यांनीच या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे. त्या संमेलना नंतरच्या संमेलनाना जगदीश चंद्र बोस, सर विश्ववेश्वरय्या यांच्यापासून होमी भाभा ते वसंत गोवारीकर पर्यंत अनेक मान्यवर उद्घाटक म्हणून लाभले आणि कित्येक नोबल पुरस्कार विजेते देखील या परिषदेमध्ये आपली हजेरी लावून विचार मांडू लागले. अशी ही १०९ वर्षांची परंपरा असणारी इंडियन सायन्स काँग्रेस यावर्षी लखनऊ येथे भरणार आहे. आणि वेळोवेळी तिच्या तयारीच्या बाबतीत माहिती देखील वृत्तपत्रांना दिली जात होती. पण आता अचानकच आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवून केंद्र सरकारने त्यात सहभागी होण्याचे नाकारले. याचाच अर्थ हा आहे की ,परंपरेनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेमध्ये येणार नाहीत. वास्तविक या आधीच्या ज्या बैठकी आणि परिषदा झाल्या होत्या त्या सर्वाना केंद्र सरकारने हजेरी देखील लावली. प्रधान मंत्र्यांनी देखील हजेरी लावली होती.
विशेष करून 2019 ची परिषद होती ती मात्र खूपच चर्चेत राहिली, कारण त्या वेळेला जवळपास सहा सात नोबल पुरस्कार विजेते आणि 30 हजाराहून अधिक विज्ञान विचारवंत तेथे हजर होते. तसं जर बघायला गेलं तर 2019 च्या त्या संमेलनामध्ये खूप नवीन नवीन गोष्टी विज्ञान विश्वाला शिकायला भेटल्या. कारण त्यामध्येच आम्हाला हे माहित झाले आणि जगाला पण कळलं की, पुरातन काळात रावणाकडे वेगवेगळ्या 24 प्रकाराची विमाने होती आणि लंके मध्ये विमानतळंlचे जाळे होते, टेस्ट ट्यूब बेबी च्या तंत्रज्ञानाचा शोध महाभारत काळापूर्वीच लागलेला होता, प्लास्टिक सर्जरी चे उदाहरण गणपतीच्या रूपाने जगासमोर आहे, इत्यादी इत्यादी!!!
२०२३ मधील इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन गाजले ते कीर्तन आणि खण-नारळाने भरलेल्या महिला वैज्ञानिकांच्या ओटिमुळे! २०२४ मधील अधिवेशनाकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. आम्हाला चंद्रावर होम हवन करायचे होते, दांडिया खेळायचा होता, अणुबॉम्बच्या किरणोत्सर्ग वर गोमूत्र कसे उपयोगी आहे यावरील संशोधन अभ्यासायचे होते. पण सरकारने यावर पाणी फेरले! इंडियन सायन्स काँग्रेस चा अपराध हा आहे की, नावातच मृत्युयोग दिसत आहे. आधीच इंडियन त्यात काँग्रेस!!! या दोघांमध्ये सायन्स चे सँडविच झाले आहे. आता एकतर या काँग्रेस ने नामांतराबरोबर स्वगृही परत यावे. भारतीय विज्ञान सेवा संघ असे नाव धारण केल्यास सगळच पवित्र होईल आणि पंतप्रधान ब्रहमव्रूदांबरोबर उद्घाटनाला येतील.
-डॉ. इकराम खान काटेवाला
मो.- 9850922229
Post a Comment