ह. अबू हुरैरा (र.) म्हणतात की एका व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांना सांगितले की अमुक महिलेला तच्या सक्त नमाज अदा करणे, रोजा ठेवणे आणि दान देण्याला लोकांत बरीच प्रसिद्धी मिळत आहे. परंतु ती आपल्या जिभेने आपल्या शेजाऱ्यांना त्रास देते. प्रेषितांनी उत्तर दिले, "तिचे ठिकाण नरक आहे." त्या व्यक्तीने दुसऱ्या महिलेबाबत सांगितले की अमुक महिला बऱ्याच कमी प्रमाणात रोजे (ऐच्छिक) ठेवते, कमीच दान देते आणि कमी प्रमाणात (ऐच्छिक) नमाजचे पठण करते, परंतु ती आपल्या शेजाऱ्यांना त्रास देत नाही. त्यावर प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले, "तिचे ठिकाण स्वर्ग आहे." (अहमद, बैहकी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, "ज्याला हे आवडेल की अल्लाह आणि त्याचे प्रेषित (स.) यांनी त्याच्यावर प्रेम करावे किंवा त्याने अल्लाह आणि प्रेषितांशी जवळीक साधावी तर तो जेव्हा काही बोलेल तर सत्य बोलावे, त्याच्यावर विश्वास ठेवला गेला असेल तर त्याने विश्वासघात करू नये आणि आपल्या शेजाऱ्यांसाठी चांगुलपणाचा पुरावा द्यावा. " (ह. अब्दुर्रहमान बिन अबी कुरा, बैहकी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, "कोणाकडे तीन दिवसच पाहुणे म्हणून राहावे. एक दिवस आणि एका रात्रीचा पाहुणचार उत्तम आहे. कुणाही मुस्लिमाला हे बरे नाही की तो आपल्या बंधुकडे तीन दिवसांपेक्षा अधिक राहावे, कारण पाहुण्याच्या जेवणापाण्याची व्यवस्था करण्यास त्याच्याकडे काही शिल्लक राहू नये." (अबू शुरैह, मुस्लिम)
एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर होऊन म्हणाला की हे अल्लाहचे प्रेषित (स.) माझ्याकडून एक मोठा अपराध घडला आहे. मी कसा पश्चात्ताप करू शकतो? प्रेषितांनी विचारले, "तुमच्या आई हयात आहेत का?" त्यावर त्याने उत्तर दिले की हयात नाही. मग प्रेषितांनी विचारले, तुमची मावशी हयात आहे का? त्याने होकारार्थी उत्तर दिले. त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, "तिच्याशी चांगले वर्तन करत राहा." (ह. इब्ने उमर (र.), तिर्मिजी)
ह. अली (र.) म्हणतात, "आम्ही मक्केहून निघालो तेव्हा हमजा (र.) यांची मुलगी 'हे काका, हे. काका' म्हणत हाक देत होती." ह. अली (र.) यांनी तिला उचलून घेतले आणि तिचा हात धरून ह. फातिमा (ह. अली र. यांच्या पत्नी) च्या हवाली करत म्हणाले की, "घ्या आपल्या मुलीला." ह. फातिमा (र.) यांनी तिचा हात धरला आणि नंतर हा किस्सा सांगितला की ह. जाफर (र.) म्हणाले की ती माझ्या काकाची मुलगी आहे. तिच्या मावशीशी मी विवाह केलेला आहे. म्हणून हा (तिचे संगोपन करण्याचा) मला अधिकार आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ती मुलगी तिच्या मावशीच्या हवाली केली आणि म्हटले, "मावशी आईसमान असते." (अबू दाऊद)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment