Halloween Costume ideas 2015

पैगंबरांच्या 'उम्मा'मध्ये बहुविध समाजाची कल्पना-२


अरबी भाषेत ‘उम्मा’ म्हणजे अशा लोकांच्या गट ज्यास समान आधार आहे, मग तो धर्माचा किंवा काळाचा किंवा स्थान आणि प्रदेशाचा समान आधार असो. त्यानुसार ज्या राष्ट्रात (लोकसमूहात) पैगंबर पाठविला गेला आहे, त्या राष्ट्राला त्या पैगंबराची ‘उम्मा’ म्हणतात, मग त्या लोकसमूहाची त्या पैगंबरावर श्रद्धा असो वा नसो. ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे त्यांना ‘उम्मा इजाबत’ म्हणतात आणि जे मानत नाहीत त्यांना ‘उम्मा दावत’ म्हणतात. (शरह मिश्कात अल-तैबी : २/ ४४८) त्यामुळे "उम्माह-ए-इजबत" चा अर्थ ‘पैगंबरांचे आमंत्रण स्वीकारलेला समूह’ आहे आणि ज्याने ते स्वीकारले नाही, त्याला "उम्माह-ए-दावत" म्हणतात, म्हणजेच त्यांना अजूनही आमंत्रण देण्याची गरज आहे.

समान वैशिष्ट्ये असलेल्या समूहाला ‘उम्मा’ म्हणण्याच्या दृष्टीने शब्दकोशात इतका वाव आहे की, केवळ मनुष्यच नव्हे, तर इतर प्राण्यांच्या समूहांनाही ‘उम्मा’ म्हटले आहे, जसे अल्लाहने कुरआनात म्हटले आहे:

“पृथ्वीवरील सर्व प्राणी आणि आपल्या पंखांद्वारे उडणारे पक्षी, ते सर्व तुमच्यासारखे ‘उम्मा’ (समुदाय) आहेत.”  (अल् अनआम : ३८)

मुस्लिम हे एकमेव 'उम्मा' नाहीत, तर प्रत्येक धार्मिक समुदाय, मग तो हिंदू असो वा ख्रिश्चन किंवा ज्यू. कुरआनमध्ये म्हटले आहे की, “प्रत्येक ‘उम्मा’मध्ये अल्लाहने एक सुवार्ता देणारा आणि सावध करणारा पाठविला आहे.” (फातिर : २४)

म्हणूनच कुरआनमध्ये मुस्लिमेतर समूहांचा उल्लेख ‘उम्मा’ या शब्दाने केला आहे आणि मक्केच्या लोकांना म्हटले आहे की, "जर तुम्ही पैगंबर (स.) यांना नाकारले तर नवल नाही, कारण तुमच्याआधीच्या लोकसमुदायांनीही त्यांच्या काळातील प्रेषितांना नाकारले होते." (अनकबूत : १८)

यावरून हे स्पष्ट झाले की, ‘उम्मा’ असणे किंवा स्वत:ला ‘उम्मा’ म्हणणे ही स्वत:च्या महानतेची अभिव्यक्ती नाही किंवा इतरांचा तिरस्कार नाही. ज्याप्रमाणे इतर गोष्टी समूहासाठी सामायिक आधार असू शकतात, त्याचप्रमाणे धर्मदेखील असू शकतात, त्यानुसार एका धर्माचे पालन करणाऱ्या लोकांनादेखील एक ‘उम्मा’ म्हटले जाते. अरबी शब्दकोश आणि व्याकरणातील एक महान तज्ज्ञ जुजाज  यांनी “लोक एक ‘उम्मा’ होते” (कुरआन, बकरा २१३) चे स्पष्टीकरण असे केले आहे की “सर्व लोक एकाच धर्माचे होते.” त्यामुळे धार्मिक नात्याने संपूर्ण जगातील मुस्लिम एक ‘उम्मा’ आहेत.

ज्याप्रमाणे ‘उम्मा’ हा शब्द सामूहिकता दर्शवितो, तसाच एक शब्द ‘कौम’देखील आहे, त्यास ‘लोकांचा संग्रह’ असेही म्हणतात. ‘उम्मा’ हा शब्द सहसा एका विचाराच्या लोकांवर बोलला जातो आणि ‘कौम’ हा शब्द सहसा एखाद्या प्रदेशातील आणि देशाच्या लोकांबाबत बोलला जातो. म्हणूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांना 'कौमी' या शब्दाने संबोधित केले, जरी त्यांच्यात आणि त्यांच्या लोकांमध्ये धार्मिक दृष्टीकोनातून ऐक्य नव्हते; उलट लोकसमुदायाचा त्यांच्या आवाहनाला कडाडून विरोध होता, म्हणून मुस्लिमांचा त्यांच्या सहश्रद्धाळूंशी संबंध आहे आणि या अर्थाने ते "उम्मा" आहेत. आणि दुसरा संबंध त्यांच्या देशवासीयांशी आहे आणि या नात्यानुसार ते एक ‘उम्मा’ आहेत.

कुरआनमध्ये ‘उम्मा’ म्हणून मुस्लिमांच्या जबाबदाऱ्या आणि उद्दिष्टे स्पष्टपणे सांगितली आहेत: “तुम्ही मानवजातीसाठी निर्माण केलेले सर्वोत्कृष्ट राष्ट्र आहात, जेणेकरून तुम्ही लोकांना चांगल्या गोष्टी करण्याची, वाईट गोष्टींना मनाई करण्याची आणि अल्लाहवर विश्वास ठेवण्याची आज्ञा द्याल.” (कुरआन, आलिइमरान : ११०)

कुरआनमध्येही स्पष्टपणे म्हटले आहे की, इतर राष्ट्रांच्या श्रद्धा, विचार, चालीरीती, परंपरा आणि राहणीमान मुस्लिमांना पटत नसले तरी ते जगात अराजकाचे कारण बनवू नये. आपल्याला दिसणारा हा फरक देखील अल्लाहच्या इच्छेचाच एक भाग आहे, जर अल्लाहने या जगात धर्म आणि धर्मांचा फरक मान्य केला नसता तर सर्व लोकांचा धर्म एकच असता, परंतु या जगात धर्माचे मतभेद असतील. "आणि जर तुमच्या ईश्वराने इच्छा केली असती तर त्याने सर्व लोकांना एक ‘उम्मा’ बनवले असते आणि ते नेहमी भिन्न राहतील." (हूद : ११८). 

म्हणून मुस्लिमांनी इतर लोकसमुदायांनी पूजलेल्या देवतांना शिव्या देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे: (कुरआन, अनआम : १०८). इतरांशी लढणे आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणे हे ‘उम्मा’चे उद्दिष्ट इस्लामने जाहीर केले असते, तर निश्चितच ‘उम्मा’ म्हणून मुस्लिमांची घृणा वाटली असती, पण इस्लाममध्ये असे काही म्हटलेले नाही.

- शाहजहान मगदुम


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget