Halloween Costume ideas 2015

पैगंबर मुहम्मद (स.) - मानवतेचे हितकारक


आपल्या निर्मात्याची आम्हा मानवांवर ही दया आहे की ज्याप्रमाणे त्याने आमच्या शारीरिक गरजांसाठी अन्न पुरवले त्याचप्रमाणे त्याने आपल्या प्रेषितांद्वारे आम्हाला मार्गदर्शन देऊन आमच्या आत्म्यासाठीही खुराक दिली आहे, ज्यामुळे आम्हाला आपल्या सर्वशक्तिमान ईश्वराला समजून घेता येईल, आपल्या जीवनाचा उद्देश जाणून घेता येईल आणि ह्या जगात कसे वावरून परलोकात यशस्वी होता येईल. आदम, नूह, अब्राहम, मोझेस, येशू (अ.) हे काही पैगंबर आहेत जे लोकांच्या जीवनातील अंधाराची छाया दूर करण्यासाठी आणि त्यांना ईशमार्गदर्शनाने प्रकाश देण्यासाठी आले. मुहम्मद (स.) हे पैगंबरांच्या या साखळीतील शेवटचे पैगंबर होते.

पैगंबर हे ईश्वराचे विलक्षण धार्मिक प्रतिनिधी आहेत ज्यांचा दुसरा कोणताही हेतू नसतो आणि कोणत्याही स्वार्थीपणाशिवाय खऱ्या व शुद्ध हेतूने लोकांपर्यंत ईश्वराचा संदेश ते पोचवतात आणि वैयक्तिकरित्या ते स्वतःच्या जीवनात आचरणातही आणतात. त्यांचे जीवन केवळ त्या परम ईश्वराच्या दास्यतेकडे लोकांना आणण्याच्या कार्याभोवती फिरते. यासाठी त्यांना त्या सर्व दुष्ट लोकांचा आणि त्यांच्यापासून निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. जे दुष्ट लोक बाकी लोकांना ईश्वराचे अधीन होण्यापेक्षा आपल्या अधीन करायला भाग पाडतात, फक्त त्यांच्या स्वार्थी गरजांसाठी. ईश्वराने लोकांमधून पैगंबरांची निवड केली आहे कारण केवळ एक मनुष्यच ईशसंदेशाची तत्त्वे प्रत्यक्ष व्यवहारात दाखवू शकतो. कारण ती तत्त्वे मनुष्यजातीसाठी असतात, त्यात लागणारे कष्ट एक माणूसच सहन करून प्रत्यक्ष त्याचा प्रमाण देऊ शकतो, जे देवदूत किंवा स्वतः ईश्वरही ह्या कामासाठी नियुक्त करू शक्य होत नाही. कारण ते मानवी दुर्बलतेपासून मुक्त आहेत.

मुहम्मद (स.) यांना वयाच्या 40 व्या वर्षी पैगंबरत्व बहाल करण्यात आले होते जेव्हा ते त्यांचे जन्मस्थान मक्केत राहत होते. आधी सांगितल्याप्रमाणे संदेष्टा होण्याचे सर्व गुण त्याच्यात होते. ते संपूर्ण अरबस्तानात सर्वांत धार्मिक, सत्यनिष्ठ आणि विश्वासू म्हणून ओळखले जात होते. जेव्हा ते हीरा गुहेत एकांतात बसून उपासना करत होते आणि अरबमधील परिस्थितीबद्दल काळजी करत होते, जे त्या वेळी सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींचा  केंद्र होते, तेव्हाच ईश्वराकडून पवित्र कुराण त्याच्यावर प्रकट होऊ लागले आणि त्यांना प्रेषित्त्व मिळाले. हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे की पैगंबर निरक्षर होते आणि म्हणूनच त्यांना स्वतः कुराण लिहणे शक्य नव्हते. कुराणसारखे उच्च दर्जाचे साहित्य आणि तपशील ज्यामध्ये अर्थशास्त्र, विज्ञान, समाजशास्त्र, राजकारण, इतिहास, संस्कृती आणि सभ्यता, नागरिकशास्त्र, कायदा आणि न्यायशास्त्र, तत्वज्ञान आणि अलौकिक समस्या आहेत जे  एका निरक्षर माणसाला लिहणे शक्य नाही . म्हणून हा गैरसमज दूर करावा कि कुराण मुहम्मद (स.) ह्यांनी स्वतः लिहिले आणि हे जाणून घ्यावे की ती ईशवाणी आहे जी मुहम्मद (स.) वर अवतरित झाली. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत, सुमारे २३ वर्षांच्या कालावधीत, त्यांनी पैगंबर म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आणि कुराणचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, तो आपल्या जीवनात अंमलात आणला आणि कोणावरही जबरदस्ती न करता इतरांना त्याचे पालन करण्याचा सल्ला दिला.

संदेष्टा म्हणून त्यांची निःस्वार्थ सेवा या घटनेवरून समजू शकते की त्यांच्या प्रेषित्वाच्या सुरुवातीच्या काळात, मक्का शहराचे काही नेते त्यांच्याकडे आले आणि त्यांना आपला संदेश पोहोचविण्याऐवजी संपत्ती, नेतृत्व, स्त्रिया देण्याची लालसा दिली ज्यास पैगंबरांनी असे म्हणत नाकारले: “मी ईश्वराची शपथ घेऊन सांगतो, हे काका, जर त्यांनी माझ्या उजव्या हातात सूर्य आणि डाव्या हातात चंद्र ठेवला तरी मी हा संदेश देणे कधीच सोडणार नाही जोपर्यंत ईश्वर त्याला विजयप्राप्ती देत नाही किंवा मीच त्याच्या प्रयत्नांत नष्ट होऊन जात नाही."   (अल-मगाझी (1/154)

पैगंबराच्या जीवनातील नोंदी साक्ष देतात की मक्केतील त्यांच्या 13 वर्षांच्या जीवनात ईश्वराचा संदेशवाहक म्हणून त्यांनी सर्व प्रकारच्या अत्याचार, बहिष्कार, हकालपट्टी आणि शारीरिक हिंसाचाराचा सामना केला. शेवटी, त्यांना आपले जन्मस्थान मक्का सोडून मदीना शहरात स्थलांतर करावे लागले जेथे त्यांनी आणि काही अनुयायांनी कुराणच्या खालील श्लोकाच्या आधारे सर्वशक्तिमानाने ठरवलेल्या मार्गावर चालण्यासाठी शांततापूर्ण राज्य निर्माण केले.

"जर आपण पृथ्वीवर या माणसांना अधिकार दिला तर ते नमाज अदा करतील, गरिबांना दान देतील, योग्य गोष्टींची आज्ञा देतील आणि वाईट गोष्टींना मनाई करतील" (कुराण  22:41).

हे लक्षात घेण्यासारखे आहे की मदीना या नवीन इस्लामी राज्यामध्ये पैगंबरांनी तयार केलेल्या संविधानाने गैर-मुस्लिमांच्या अधिकारांचे रक्षण खालील शब्दांमध्ये केले आहे:

“जर कोणी एखाद्या जिम्मीवर (इस्लामिक राज्यामध्ये करारानुसार राहणार गैर-मुस्लिम) अन्याय करतो ज्याच्याशी करार केला गेला आहे, किंवा त्याचा कोणताही अधिकार कमी करतो, किंवा त्याच्या सहनशक्तीपेक्षा जास्त त्याच्यावर ओझे लादतो किंवा त्याच्याकडून त्याच्या निश्चित कराराशिवाय काहीही घेतो, मी पुनरुत्थानाच्या दिवशी त्याचा आव्हानकर्ता होईन." (हदीस अबू दाऊद).

जिझिया कर हा गैर-मुस्लिमांवर लावलेला एकमेव कर होता आणि तो त्या राज्यातील मुस्लिमांवरील करांपेक्षा कमी प्रमाणात होता. जिझिया हा गैर-मुस्लिमांनी त्यांच्या नागरी, राजकीय स्वातंत्र्य आणि परकीय हल्ल्यांच्या संरक्षणाच्या बदल्यात स्वतंत्र नागरिक म्हणून मुस्लिम राज्याला दिलेला कर होता.

येथे मक्केचे नेते, मदीना येथे स्थलांतरित झाल्यानंतरही पैगंबर आणि आस्तिकांशी सतत शत्रुत्वात होते आणि त्यांच्याविरुद्ध युद्ध करण्याचा कट रचत होते. या परिस्थितीतच पैगंबर आणि त्यांच्या अनुयायांना ईश्वराने स्वतःचे रक्षण करण्याची आणि मर्यादा न ओलांडता वाईट शक्तींशी लढण्याची आज्ञा दिली होती. 

“आणि ईशमार्गात त्यांच्याशी लढा जे तुमच्याशी लढत आहेत आणि मर्यादा ओलांडू नका, निश्चितच ईशमर्यादा ओलांडणाऱ्यांवर ईश्वर प्रेम करत नाही.” (कुराण २:१९०)

युद्धाच्या मर्यादा ह्या होत्या : "आगमध्ये कोणाला टाकायचे नाही, जो माणूस युद्धामध्ये सहभागी नाही अश्या जखमी व्यक्तीवर हल्ला नाही करायचा, बंदीला ठार न मारणे, दुष्मनाच्या राज्यात कसली लुटपात होता कामा नये, मृत शरीराची छेडछाड होता कामा नये, करारनाम्यांचे पालन तोपर्यंत प्रामाणिकपणाने होईल जोपर्यंत शत्रू त्याचे उल्लंघन करत नाही. जर शत्रूतर्फे त्याचे उलंघन झाले तर त्याला चेतावणी देऊन, युद्धाची घोषणा करून नंतर त्याच्यावर चढाई होईल."  ह्या नियमाची अंमलबजावणी करण्याची चेतावणी होत नाही तर त्याला दंड देण्याचाही नियम होता.

मानवी हक्कांबाबत त्यांनी पुढील शब्दांत लोकांना गंभीर इशारा दिलाः "तीन प्रकारातील लोक आहेत ज्यांच्या विरुद्ध मी स्वत: न्यायाच्या दिवशी फिर्यादी असेन. या तिघांपैकी एक तो आहे जो एखाद्या स्वतंत्र माणसाला गुलाम बनवतो, नंतर त्याला विकतो आणि ते पैसे खातो." (अल-बुखारी आणि इब्न माजा). एकट्या पैगंबरांनी तब्बल ६३ गुलामांना मुक्त केले.

त्यांनी  कुराणच्या ह्या वचनाची अंमलबजावणी करून लोकांच्या सन्मानाचे रक्षण केले: “हे ईमान राखणाऱ्यांनो! पुरुषांनी दुसऱ्या पुरुषांची थट्टा उडवू नये, संभवतः ते यांच्याहून अधिक चांगले असावेत आणि ना स्त्रियांनी (इतर) स्त्रियांची थट्टा करावी. संभवतः त्या, त्यांच्याहून अधिक चांगल्या असाव्यात, आणि आपसात एकमेकांवर दोषारोप ठेवू नका आणि ना एखाद्याला वाईट टोपण नाव द्या.

"हे ईमान राखणाऱ्यांनो! अनेक वाईट तर्क (दुराग्रह) करण्यापासून दूर राहा, विश्वास राखा की काही तर्क अपराध आहेत आणि भेद (जाणून घेण्यासाठी) पाळतीवर राहू नका आणि ना तुमच्यापैकी कोणी एखाद्याची निदा-नालस्ती (त्याच्या पश्चात) करावी. काय तुमच्यापैकी कोणीही आपल्या मेलेल्या भावाचे मांस खाणे पसंत करतो? तुम्हाला तर त्या गोष्टीचा तिरस्कारच वाटेल आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय, अल्लाह माफी कबूल करणारा दयाशील आहे.” (कुराण 49:11-12). त्यांनी कुराणमध्ये दिलेल्या इतर धर्माच्या लोकांच्या धार्मिक भावनांचा योग्य आदर केला, "आणि जे लोक अल्लाहशिवाय दुसऱ्यांना पुकारतात त्यांना अपशब्द वापरू नका...." (६:१०८).

जे इस्लामी राज्य, पैगंबरांनी स्थापन केले ते ह्या आधारावर: "राज्याचा प्रमुख हा त्याचा संरक्षक असतो, ज्याला पाठिंबा देणारा कोणीही नसतो." (अबू दाऊद, अल-तिर्मिधी)

प्रेषित मुहम्मद (स.) ह्यांच्यासाठी कायद्यापुढे सर्व समान होते. एकदा एका उच्चभ्रू कुटुंबातील एका महिलेला चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. केस पैगंबराकडे आणली गेली आणि तिला चोरीच्या शिक्षेपासून वाचवण्याची शिफारस करण्यात आली. पैगंबरांनी उत्तर दिले: "तुमच्या आधी जगलेल्या राष्ट्रांचा ईश्वराने नाश केला कारण त्यांनी सामान्य माणसांना त्यांच्या गुन्ह्यांबद्दल शिक्षा केली आणि त्यांच्या प्रतिष्ठितांना त्यांच्या गुन्ह्यांबद्दल शिक्षा न करता सोडले; मी त्याची (ईश्वराची) शपथ घेतो, ज्याने माझे जीवन त्याच्या हातात ठेवले आहे, जर मुहम्मदची मुलगी फातिमा हिने हा गुन्हा केला असता तरी मी तिचा हात कापला असता.”

ह्या त्यांच्या शिकवणी आणि व्यहारामुळेच मायकेल एच. हार्टने ऐतिहासिक व्यक्तींच्या विश्लेषणात पैगंबर मुहम्मद (स.) यांना अग्रस्थानी ठेवले आहे हे जाणून की धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष अशा दोन्ही पातळ्यांवर ते यशस्वी झाले. म्हणून त्यांना मानवतेचा उपकारकर्ता म्हणतात.


- नजराना दर्वेश

पणजी, गोवा

भ्रमणध्वनी : 8975074456


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget