Halloween Costume ideas 2015

रुग्णालयांत मरणाऱ्यांना कोण जबाबदार


नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरांत गेल्या दोन दिवसांत एकूण ८१ रुग्णांचा मृत्यू घरात नाही तर तिन्ही ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांत झाला. म्हणजे हा कुणाचा हलगर्जीपणा? सरकारचा की त्या त्या रुग्णालयांचा? मृत्यू पावणाऱ्यांच्या नशिबाचा? सामान्य माणूस तर जे काही कष्ट त्यांना सहन करावे लागते, ज्या यातना भोगाव्या लागतात, आजाराने असोत की पोट भरण्याचे, जगण्याचे असोत सर्वांसाठी त्याला आपले भाग्य आणि नशीबच समजतात. कुणाविरुद्ध तक्रार करायची त्यांच्यात हिंमत नाही. तक्रा केल्याने गेलेले प्राण परत येत नाहीत. दरदिवशी देशभर शासकीय रुग्णालयांत औषधांअभावी आणखी किती लोकांना आपले जीव गमवावे लागत असेल याचा अंदीजही नाही. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील या तिन्ही शहरांतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तीन वर्षे मागणीनुसार औषधांचा पुरवठा नसल्याने निष्पाप, गोरगरीब लोकांना जगातील जीवनाचा निरोप घ्यावा लागला. मृत्यूची अनेक कारणे असू शकतात. गंभीर आजार असल्यास मृत्यू होतात. हे नैसर्गिक पण इतक्या जुन्या आणि मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयांत औषधांअभावी मृत्यू व्हावेत याला जबाबदार कोण? राजकीय नेते, मंत्री काय करतात तर एकमेकांविरुद्ध टिकाटिप्पणी, घणाघात, टोलेबाजीच्या पलीकडे कमीत कमी टीव्हीवर यापेक्षा दुसरे काही दिसत नाही. वृत्तपत्रांत वाचायला मिळत नाही. ही कसली व्यवस्था? राज्यातील आताचे सरकार वैध की अवैध याचा निकाल न्यायालयात प्रलंबित राहतो तर कधी राज्याच्या विधानसभेत. आणि जोवर ही स्थिती आहे सरकारचा एकमेव उपक्रम आपली सत्ता वाचवायची याच दिशेने, सरकार असो की विरोधी पक्ष अहोरात्र झटत असतात. अशात लोकांना चांगले नव्हे एक कार्य करणारे सरकार कोण देणार? जून महिन्यापर्यंत सरकारचा निर्णय लागणार नाही आणि कदाचित या विधानसभेची मुदत असेपर्यंत. जेव्हा सरकारला, शासन चालवणाऱ्यांना निर्णय आणि न्याय मिळवण्यात इतका विलंब तर सामान्य माणसाला कुठे न्याय मिळणार? जे जे मयत झाले ते तर गेले, त्यांच्यासाठी जबाबदार कोण असणार? शासन व्यवस्थापन की न्यायप्रक्रिया? की राज्यव्यवस्था, ज्यांना फक्त एकमेकांचे सरकार पाडून आपले सरकार बनवण्यापलीकडे कशातच रस नाही. सामान्य नागरिकांच्या कल्याणाची काळजी देवानेच घ्यायची. देवाने मृत्यू दिला म्हणून मयत झाले, यावर समाधान, बाकी काही नाही. यापूर्वी ऑगस्टमध्ये ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तांसात २३ मृत्यू झाले होते. ठाण्याच्या कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाला जबाबदार कोण याचा अहवाल अजूनही आलेला नाही तोच नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी काही रुग्णांना जीव गमवावा लागलाय. सरकारी रुग्णालयांची दुरवस्था आणि प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा उघडी पडली आहे. देशाच्या राजधानी दिल्लीत एक मुलगा ज्याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. कुठून तरी एक केळ उचलून खातो, त्याला एका खांबाला बांधून मरेपर्यंत मारहान केली जाते. दोषी कोण? दोषींविरुद्ध कुणी कारवाई केली का? त्याला न्याय कोण देणार? की नशिबाच्या हवाली करून टाकणार? दिल्लीत उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने कमीतकमी इतक्या क्रूर घटनेची सोमोटो दखल घ्यायला हवी होती. नसता न्यायावर प्रशअन केलेच तर त्याला कोणत्या स्थितीला तोंड द्यावे लागेल?

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget